अभ्यास लेख ४४
गीत १३८ नीती ही वृद्धांची शोभा!
म्हातारपणातही आनंद टिकवून ठेवा
“म्हातारपणीही ते फळ देत राहतील”—स्तो. ९२:१४.
या लेखात:
वृद्ध लोकांसाठी त्यांचा आनंद टिकवून ठेवणं का गरजेचंय आणि ते हे कसं करू शकतात ते पाहू या.
१-२. यहोवा त्याच्या वृद्ध झालेल्या विश्वासू सेवकांना कोणत्या नजरेने पाहतो? (स्तोत्र ९२:१२-१४; चित्रसुद्धा पाहा.)
जगातल्या काही भागातले लोक म्हातारपणाला सन्मानाची गोष्ट समजतात. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत खरं नसतं. तुमच्याबद्दल काय? तुमचा पहिला पिकलेला केस पाहून, तुम्हाला कसं वाटलं? कदाचित, तुम्ही तो लगेच उपटला असेल. पण पिकलेले केस कितीही उपटले तरी आपल्याला म्हातारपणापासून पळ काढता येणार नाही या गोष्टीची तुम्हाला जाणीव झाली असेल. या उदाहरणावरून आपल्याला कळतं की कोणालाही म्हातारं व्हायला आवडत नाही.
२ पण, आपला स्वर्गीय पिता त्याच्या वृद्ध सेवकांकडे कोणत्या नजरेने पाहतो? (नीति. १६:३१) तो त्यांची तुलना बहरलेल्या झाडांसोबत करतो. (स्तोत्र ९२:१२-१४ वाचा.) ही तुलना योग्य आहे असं आपण का म्हणू शकतो? सहसा बरीच वर्षं जुनी असलेली झाडं हिरवीगार असतात आणि सुगंधी फुलांनी बहरलेली असतात. अशाच प्रकारची झाडं जपानमध्ये सापडतात. त्यांना चेरी ब्लॉसम म्हणतात. यांतली सगळ्यात सुंदर झाडं खरंतर हजारो वर्षं जुनी आहेत. या झाडांसारखेच यहोवाचे विश्वासू सेवक त्याच्या नजरेत सुंदर आहेत. यहोवा त्यांच्या पिकलेल्या केसांकडे नाही, तर त्यांच्यात असलेल्या चांगल्या गुणांकडे पाहतो. त्यांनी आजपर्यंत कशा प्रकारे धीर धरला आणि त्याची इतकी वर्षं एकनिष्ठपणे सेवा केली, या गोष्टींचा त्याला अभिमान वाटतो.
ज्या प्रकारे जुनी झाडं सुंदर आणि टवटवीत असतात त्याच प्रकारे बरीच वर्षं विश्वासूपणे सेवा केलेले वयस्कर भाऊबहीण यहोवाच्या नजरेत सुंदर असतात आणि चांगली फळं देत राहतात. (परिच्छेद २ पाहा)
३. यहोवाने आपला उद्देश पूर्ण करायला वृद्ध लोकांचा कसा वापर केला याची काही उदाहरणं द्या.
३ एका व्यक्तिचं वय वाढतं तेव्हा यहोवाच्या नजरेत तिची किंमत कमी होते असं नाही.a खरंतर यहोवाने बऱ्याचदा त्याचा उद्देश पूर्ण करायला वृद्ध लोकांचा वापर केलाय. जसं की, सारापासून एक मोठं राष्ट्र बनेल आणि ती मसीहाची पूर्वज बनेल हे जेव्हा यहोवाने सांगितलं, तेव्हा साराचं खूप वय झालं होतं. (उत्प. १७:१५-१९) यहोवाने जेव्हा मोशेला इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर काढण्यासाठी निवडलं, तेव्हा तोही वयस्कर होता. (निर्ग. ७:६, ७) आणि यहोवाने प्रेषित योहानला बायबलची पाच पुस्तकं लिहायची प्रेरणा दिली, तेव्हा त्याचंही बरंच वय झालं होतं.
४. नीतिवचनं १५:१५, प्रमाणे कोणत्या गोष्टीमुळे वयस्कर लोकांना समस्यांचा सामना करायला मदत होऊ शकते? (चित्रसुद्धा पाहा.)
४ जसजसं एखाद्याचं वय वाढत जातं तसतसं त्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. याबद्दल एक वयस्कर बहीण गमतीने असं म्हणते: “म्हातारं होणं काही खेळ नाही!” पण आनंदीb राहिल्यामुळे वृद्ध लोकांना धीराने समस्यांचा सामना करायला मदत होऊ शकते. (नीतिवचनं १५:१५ वाचा.) म्हणून वृद्ध लोक आनंदी राहायला काय करू शकतात, हे आपण या लेखात पाहणार आहोत. तसंच, मंडळीतले भाऊबहीण त्यांना कशी मदत करू शकतात हेही आपण पाहू या. पण त्याआधी, या वयात आनंदी राहणं वृद्धांना कठीण का जाऊ शकतं हे आपण पाहू.
आनंदी राहिल्यामुळे म्हातारपणात येणाऱ्या समस्यांचा धीराने सामना करता येतो (परिच्छेद ४ पाहा)
म्हातारपणी आनंद टिकवून ठेवणं कठीण जाऊ शकतं
५. वयस्कर लोक कोणत्या गोष्टीमुळे निराश होऊ शकतात?
५ कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही निराश होऊ शकता? तुम्ही एकेकाळी करत असलेल्या गोष्टी कदाचित आता तुम्हाला करता येत नसतील. तुम्ही तरुण होता, धडधाकट होता त्या दिवसांची तुम्हाला आठवण येत असेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला वाईट वाटत असेल. (उप. ७:१०) याबद्दल बोलताना आपली बहीण रुबी असं म्हणते: “माझे हात-पाय दुखतात, मला जास्त हालचाल करता येत नाही. त्यामुळे कपडे घालताना मला खूप त्रास होतो. मला संधिवात असल्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. म्हणून पायात मोजे घालण्यासारखी साधी गोष्टही मला जमत नाही.” बेथेलमध्ये आधी सेवा केलेले भाऊ हेरॉल्ड म्हणतात: “मी आधी करत असलेल्या गोष्टी आता मला करता येत नसल्यामुळे माझी खूप चिडचिड होते. मी आधी खेळाडू होतो. मला बेसबॉल खेळायला खूप आवडायचं. एक जमाना होता, जेव्हा लोक म्हणायचे, ‘हेरॉल्डकडे बॉल द्या, त्याचा नेम कधीच चूकत नाही.’ पण आता, मला साधा बॉल फेकता येईल की नाही, माहीत नाही.”
६. (क) वयस्कर लोक आणखी कोणत्या गोष्टींमुळे निराश होऊ शकतात? (ख) आपण गाडी चालवावी की नाही हे ठरवायला वयस्कर लोकांना कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते? (या अंकातला “मी गाडी चालवणं सोडून द्यावं का?” हा लेख पाहा.)
६ तुम्हाला सांभाळायला कदाचित नेहमी एखादी व्यक्ती तुमच्यासोबत असेल, किंवा तुम्हाला तुमच्या मुलांपैकी एखाद्यासोबत राहावं लागत असेल. यामुळे आपण इतरांवर अवलंबून आहोत या विचाराने तुम्ही निराश होत असाल. शिवाय, दिवसेंदिवस तुमची तब्येत खालावत चालली असेल आणि नजर कमजोर होत असेल. त्यामुळे तुम्हाला स्वतःहून कुठेही जाता येत नसेल किंवा गाडी चालवता येत नसेल. या सगळ्या गोष्टींमुळे आनंदी राहणं तुम्हाला खरंच कठीण जात असेल. पण हे नेहमी लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येत असल्या किंवा नसल्या, तरी यावरून यहोवाच्या आणि इतरांच्या नजरेत तुमचं मोल कमी होत नाही. यहोवाला तुमच्या परिस्थितीची आणि भावनांची जाणीव आहे याची खातरी असू द्या. यहोवा तुमचं हृदय पाहतो. तुमच्या मनात त्याच्याबद्दल आणि भाऊबहिणींबद्दल किती प्रेम आहे, कदर आहे हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचंय.—१ शमु. १६:७.
७. आपल्या जीवनकाळात या दुष्ट व्यवस्थेचा अंत होणार नाही असा विचार करून दुःखी असलेल्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?
७ कदाचित तुमच्या जीवनकाळात या दुष्ट व्यवस्थेचा अंत होणार नाही असा विचार करून तुम्ही दुःखी होत असाल. असं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल? नेहमी लक्षात असू द्या, की या दुष्ट व्यवस्थेचा अंत करण्यासाठी यहोवा बऱ्याच वर्षांपासून धीराने वाट पाहतोय. (यश. ३०:१८) त्याच्या धीरामुळेच लाखो लोकांना त्याला जाणून घ्यायची आणि त्याची सेवा करायची संधी मिळत आहे. (२ पेत्र ३:९) त्यामुळे तुम्ही निराश व्हाल, तेव्हा अंत येण्याआधी यहोवाच्या धीरामुळे किती लोकांना फायदा होईल याचा विचार करा. कोण जाणे त्यांतले काही तुमचे नातेवाईकही असतील!
८. आजारपणामुळे वयस्कर लोकांकडून काय होऊ शकतं?
८ आपण आजारी असतो तेव्हा आपण असं काहीतरी बोलू किंवा करू शकतो ज्याचा आपल्याला नंतर पस्तावा होईल. (उप. ७:७; याको. ३:२) उदाहरणार्थ, जेव्हा ईयोब समस्येत होता, तेव्हा तो ‘वेड्या माणसासारखा बडबडला.’ (ईयो. ६:१-३) तसंच, वयस्कर लोक सहसा बोलणार नाहीत अशा काही गोष्टी ते आजारपणामुळे किंवा औषधांच्या परिणामांमुळे बोलून जातील. हे खरंय, की आपल्यापैकी कोणीही आपल्या तब्येतीचं किंवा आपल्या वयाचं कारण देऊन इतरांशी उद्धटपणे वागणार नाही किंवा त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवणार नाही. पण आपण एखाद्याच्या मनाला लागेल असं काहीतरी बोललोय किंवा केलंय असं जर आपल्याला जाणवलं, तर त्यांची माफी मागायला आपण मागेपुढे पाहणार नाही.—मत्त. ५:२३, २४.
आपला आनंद टिकवून कसा ठेवता येईल?
म्हातारपणातही तुम्ही आनंदी कसे राहू शकता? (परिच्छेद ९-१३ पाहा)
९. तुम्ही इतरांची मदत का घेतली पाहिजे? (चित्रंसुद्धा पाहा.)
९ इतरांची मदत घ्या. (गलती. ६:२) असं करणं सुरुवातीला तुम्हाला कठीण जाऊ शकतं. याबद्दल आपली एक बहीण ग्रेटल असं म्हणते: “इतरांकडे मदत मागून कशाला उगीच त्यांना त्रास द्यायचा असा कधीकधी मी विचार करायचे. पण माझे विचार बदलायला आणि त्यांच्या मदतीची मला खरंच गरज आहे हे मान्य करायला मला जरा वेळ लागला.” तुम्ही इतरांकडून मदत घेता, तेव्हा तुम्ही त्यांना देण्यातून मिळणारा आनंद चाखण्याची संधी देता. (प्रे. कार्यं २०:३५) जेव्हा तुम्ही असं कराल, तेव्हा इतरांचं तुमच्यावर किती प्रेम आहे आणि त्यांना तुमची किती काळजी आहे हे पाहून तुम्हाला खूप आनंद होईल.
(परिच्छेद ९ पाहा )
१०. आपण इतरांना कदर दाखवायला का विसरू नये? (चित्रसुद्धा पाहा.)
१० कदर असल्याचं दाखवा. (कलस्सै. ३:१५; १ थेस्सलनी. ५:१८) इतर लोक आपल्यासाठी काही करतात तेव्हा आपल्याला खूप बरं वाटतं, त्यांची कदर वाटते. पण कधीकधी आपण ती व्यक्त करायला विसरून जातो. आपण जर फक्त एक स्माईल करून थँक्यू बोललो तरी आपली मदत करणाऱ्यांची आपल्याला कदर आहे याची त्यांना जाणीव होते. बेथेलमध्ये वयस्कर भाऊबहिणींची काळजी घेणारी बहीण लीया म्हणते: “मी ज्या बहिणींची देखभाल करते त्यांपैकी एक बहीण माझ्यासाठी थँक्यू कार्ड लिहून ठेवते. त्यात खूपकाही लिहिलेलं नसतं. पण तरी ते वाचून मला खूप छान वाटतं. असे कार्ड मला कधी मिळतील याची मी खरंतर वाटच पाहत असते. ते वाचल्यावर त्यांना माझी किती कदर आहे, हे मला जाणवतं आणि मला खूप आनंद होतो.”
(परिच्छेद १० पाहा)
११. तुम्ही इतरांना कशी मदत करू शकता? (चित्रसुद्धा पाहा.)
११ इतरांना मदत करायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही इतरांचा विचार कराल आणि त्यांना मदत कराल तेव्हा तुमच्या समस्यांकडे तुमचं कमी लक्ष जाईल. वयस्कर लोक जीवनातले महत्त्वाचे धडे देणाऱ्या पुस्तकांसारखे असतात. पण पुस्तकं फक्त कपाटातच पडून राहिली तर त्याचा कोणालाही फायदा होणार नाही. तसंच, तुम्ही जर तरुणांशी बोललाच नाहीत, तुमचे अनुभव त्यांना सांगितलेच नाहीत तर त्यांना जीवनातले महत्त्वाचे धडे शिकता येतील का? नक्कीच नाही. म्हणून त्यांच्याशी बोला. त्यांचं ऐकून घ्या. यहोवाच्या नैतिक स्तरांप्रमाणे जगणंच नेहमी चांगलं असतं आणि त्यामुळेच खरा आनंद मिळवता येतो हे त्यांना सांगा. तुम्ही जेव्हा तुमच्या तरुण मित्रांना प्रोत्साहन द्याल, त्यांची काळजी असल्याचं दाखवाल तेव्हा तुम्हाला खरंच खूप आनंद होईल यात काही शंका नाही!—स्तो. ७१:१८.
(परिच्छेद ११ पाहा)
१२. यशया ४६:४ प्रमाणे यहोवा वयस्कर लोकांसाठी काय करायचं वचन देतो? (चित्रसुद्धा पाहा.)
१२ ताकदीसाठी यहोवाला प्रार्थना करा. बऱ्याचदा तुम्हाला अगदी थकल्यासारखं किंवा गळून गेल्यासारखं वाटू शकतं. म्हणून तुम्ही निराशही होऊ शकता. पण नेहमी लक्षात असू द्या, यहोवा खूप शक्तीशाली आहे. बायबल म्हणतं: “तो कधीही थकत नाही किंवा दमत नाही.” (यश. ४०:२८) म्हणून तो तुम्हाला लागत असलेली ताकद पुरवू शकतो. (यश. ४०:२९-३१) खरंतर, तुम्हाला मदत करायचं त्याने वचन दिलंय. (यशया ४६:४ वाचा.) आणि तो नेहमी त्याचं वचन पाळतो. (यहो. २३:१४; यश. ५५:१०, ११) म्हणून तुम्ही जेव्हा यहोवाला प्रार्थना कराल, तेव्हा तो तुमच्या प्रार्थनेचं उत्तर कसं देतो हे पाहून तुम्हाला समजेल, की त्याचं तुमच्यावर किती प्रेम आहे आणि त्याला तुम्हाला मदत करायची किती इच्छा आहे. आणि हे जाणून तुमचा आनंद आणखी वाढेल.
(परिच्छेद १२ पाहा)
१३. २ करिंथकर ४:१६-१८ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? (चित्रसुद्धा पाहा.)
१३ लक्षात असू द्या की ही परिस्थिती तात्पुरती आहे. जेव्हा आपल्याला माहीत असतं की एखादी समस्या तात्पुरती आहे तेव्हा आपल्याला धीराने तिचा सामना करायला सोपं जातं. बायबल म्हणतं की म्हातारपण आणि आजारपण तात्पुरतंय. ही गोष्ट माहीत असल्यामुळे आपल्याला धीर धरायला मदत होईल. (ईयो. ३३:२५; यश. ३३:२४) खरंतर, तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ तुम्ही अजून पाहिलाच नाही! बायबल म्हणतं की तो काळ लवकरच येणार आहे. जर तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली, तर तुम्हाला तुमचा आनंद टिकवून ठेवता येईल. (२ करिंथकर ४:१६-१८ वाचा.) पण सध्या, इतर जण तुम्हाला कशी मदत करू शकतात?
(परिच्छेद १३ पाहा)
इतर जण कशी मदत करू शकतात?
१४. वयस्कर लोकांना भेटणं आणि फोन करणं का महत्त्वाचंय?
१४ नियमितपणे वयस्कर भाऊबहिणींना भेटा आणि फोन करा. (इब्री १३:१६) वयस्कर लोकांना कधीकधी एकटं पडल्यासारखं वाटतं. एक वयस्कर भाऊ कॅमे याला, घराबाहेर पडणं शक्य नाही. तो म्हणतो: “मी दिवसभर घरातच असतो. म्हणून मला खूप कंटाळा येतो. कधीकधी मला वाटतं, की मी पिंजऱ्यात कोंडलेल्या म्हाताऱ्या सिंहासारखा झालोय. त्यामुळे मला खूप दुःखं होतं आणि खूप वैताग येतो.” आपण जेव्हा वयस्कर लोकांना भेटायला जातो, तेव्हा ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि आपलं त्यांच्यावर खूप प्रेम आहे याची आपण त्यांना जाणीव करून देतो. आपण बऱ्याचदा वयस्कर लोकांना भेटायचं आणि फोन करायचं ठरवतो तर खरं, पण व्यस्त असल्यामुळे आपल्याकडून ते कधीकधी राहून जातं. बायबल म्हणतं: ‘कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्या.’ (फिलिप्पै. १:१०) यात वयस्कर लोकांना भेटणंही सामील आहे. म्हणून वेळ मिळेल तेव्हा जाईन किंवा फोन करीन असा विचार करू नका. तर त्यांना भेटायला केव्हा जाणार, किंवा त्यांना कधी फोन करणार याची कॅलेंडरवर नोंद करून ठेवा.
१५. तरुण आणि वयस्कर भाऊबहीण मिळून काय करू शकतात?
१५ तुम्ही तरुण असाल तर वयस्कर भाऊबहिणींसोबत काय बोलावं, कसा वेळ घालवावा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण याबद्दल जास्त विचार करत बसू नका. फक्त त्यांचे चांगले मित्र बनण्याचा प्रयत्न करा. (नीति. १७:१७) सभेआधी किंवा नंतर थांबून त्यांच्याशी बोला. कदाचित तुम्ही त्यांना त्यांच्या आवडत्या वचनाबद्दल किंवा लहानपणीच्या गोड आठवणींबद्दल विचारू शकता. तुम्ही त्यांना ब्रॉडकास्टिंग बघायलासुद्धा बोलवू शकता. शिवाय, तुम्ही त्यांना फोन वापरायला आणि नवीन प्रकाशनं डाऊनलोड करायला मदत करू शकता. एक वयस्कर बहीण कॅरल तरुणांना असा सल्ला देते: “तुम्हाला तुमच्या वयाच्या लोकांसोबत ज्या गोष्टी करायला आवडतात त्या आम्हालाही आवडतात. मी वयस्कर असले म्हणून काय झालं? मला अजूनही मजा करायला आवडतं. मला शॉपींग करायला, बाहेर जाऊन खायला आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं.” मायरा नावाची एक तरुण बहीण म्हणते: “माझी एक मैत्रीण ९० वर्षांची आहे आणि आमच्यात ५७ वर्षांचं अंतर आहे. तरी आमचं वय आमच्या मैत्रीच्या आड येत नाही. आम्ही सोबत मजा करतो, पिक्चर पाहतो आणि एखादी समस्या येते तेव्हा एकमेकींचा सल्लाही घेतो.”
१६. वयस्कर भाऊबहिणींसोबत डॉक्टरांकडे गेल्यामुळे त्यांना कसा फायदा होईल?
१६ वयस्कर लोकांसोबत डॉक्टरकडे जा. वयस्कर लोकांना फक्त दवाखान्यात घेऊन जाऊ नका, तर डॉक्टरांशी बोलताना त्यांच्यासोबत थांबा. यामुळे त्यांना योग्य उपचार मिळत आहेत की नाहीत याची तुम्हाला खातरी करता येईल. (यश. १:१७) डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींची नोंद घेऊनसुद्धा तुम्ही त्यांना मदत करू शकता. याबद्दल एक वयस्कर बहीण रूथ असं म्हणते: “मी हॉस्पिटलला एकटी गेले की डॉक्टर मला हलक्यात घेतात. ते कधीकधी असंही म्हणतात, की ‘तुम्हाला काही नाही झालंय. तुम्ही खूप विचार करताय म्हणून तुम्हाला असं वाटतंय.’ पण भाऊबहीण माझ्यासोबत असतात तेव्हा डॉक्टर माझ्याशी नीट बोलतात, माझं ऐकून घेतात. भाऊबहीण माझ्यासाठी वेळ काढून येतात यासाठी मी त्यांचे खूप आभारी आहे.”
१७. तुम्ही कोणत्या मार्गांनी वयस्कर भाऊबहिणींसोबत प्रचार करू शकता?
१७ त्यांच्यासोबत प्रचार करा. काही वयस्कर भाऊबहिणींना घरोघरचं प्रचारकार्य करणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्ही त्यांना ट्रॉलीवरचं साक्षकार्य करायला विचारू शकता. तसंच, ट्रॉलीजवळ बसायला त्यांच्यासाठी खुर्ची ठेवू शकता. तुम्ही त्यांना तुमच्या बायबल अभ्यासासाठी घेऊन जाऊ शकता किंवा त्यांच्या घरी अभ्यास घेऊ शकता. मंडळीतले वडीलसुद्धा वयस्कर भाऊबहिणींच्या घरी प्रचाराची सभा ठेवू शकतात, म्हणजे त्यांनाही सहभाग घेता येईल. लक्षात असू द्या, की वयस्कर भाऊबहिणींची मदत करायला आपण जे काही करतो त्या सगळ्याची यहोवा दखल घेतो.—नीति. ३:२७; रोम. १२:१०.
१८. पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?
१८ यहोवाचं वयस्कर लोकांवर किती प्रेम आहे आणि ते त्याच्यासाठी किती मौल्यवान आहेत या गोष्टीची आपल्याला या लेखामुळे जाणीव झाली. आपल्यालाही त्यांच्याबद्दल असंच वाटतं, नाही का? हे खरंय, की म्हातारपणात आनंद टिकवून ठेवणं सोपं नाही. पण यहोवाच्या मदतीने ते शक्य आहे. (स्तो. ३७:२५) तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ तर पुढे येणार आहे या जाणीवेमुळे आपल्याला खरंच किती हायसं वाटतं. पण घरच्या वयस्कर लोकांचा, लहान मुलांचा किंवा आजारी व्यक्तीचा सांभाळ करणाऱ्यांबद्दल काय? ते त्यांचा आनंद कसा टिकवून ठेवू शकतात? याबद्दल आपण पुढच्या लेखात पाहू या.
गीत ३० माझा देव, माझा पिता आणि मित्र
a jw.org आणि JW लायब्ररी वरचा वृद्धजनांनो—तुमच्याकडे महत्त्वाची भूमिका आहे हा व्हिडिओ पाहा.
b शब्दाचा अर्थ: आनंद हा देवाच्या पवित्र शक्तीच्या फळाचा एक पैलू आहे. (गलती. ५:२२) आणि यहोवासोबत एक घनिष्ठ नातं असल्यामुळे आपल्याला हा आनंद मिळतो.