वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg अध्या. ४५ पृ. २०४-२०७
  • “मी पापी माणूस आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “मी पापी माणूस आहे”
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • संशोधन करा
  • शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा
  • मनन करण्यासाठी
  • आणखी शिका
  • तो खडकासारखा मजबूत झाला
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • यहोवा आणि येशूसारखा विचार करायला शिका!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • आपल्या गुरूकडून तो क्षमा करण्यास शिकला
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • तो आपल्या धन्याकडून क्षमा करण्याचा धडा शिकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg अध्या. ४५ पृ. २०४-२०७

४५ पेत्र

“मी पापी माणूस आहे”

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

पेत्र मासेमारी करणारा एक मेहनती माणूस होता. तो आपल्या नातेवाइकांसोबत मिळून हा व्यवसाय करायचा. तो खूप धाडसी आणि धैर्यवान होता. त्याचा स्वभाव असा होता, की मनात येईल ते तो पटकन बोलायचा आणि गरज असेल तिथे पटकन पाऊलही उचलायचा. एकदा त्याचा भाऊ अंद्रिया त्याच्याकडे आला आणि भारावून जाऊन त्याला म्हणाला: “आम्हाला मसीहा सापडलाय.” हे ऐकल्यावर पेत्र लगेच त्याला भेटायला गेला आणि त्याचा शिष्य बनला.

काही महिन्यांनी येशू कफर्णहूमला आला. पेत्र तिथेच राहत होता. रात्रभर मासे पकडण्यासाठी बरीच मेहनत घेऊनसुद्धा त्याच्या हाती काहीच लागलं नव्हतं. पण आता येशूने त्याला खोल पाण्यात जाऊन जाळी टाकायला सांगितलं. पण याचा काहीच उपयोग होणार नाही असं पेत्रला वाटलं. कारण तो दिवसा जाळी टाकायला सांगत होता आणि मासे पकडायची ती योग्य वेळ नव्हती. पण तरीही येशूने सांगितल्याप्रमाणे त्याने केलं. काही वेळातच जाळीत इतके मासे सापडले, की दोन्ही नावा खचाखच भरून गेल्या आणि त्या बुडू लागल्या. हे पाहून पेत्र खूप घाबरला. आपण इतके पापी आहोत, की चमत्कार करणाऱ्‍या या देवाच्या मुलासमोर उभं राहायचीसुद्धा आपली लायकी नाही असं त्याला वाटलं. त्यामुळे येशूसमोर गुडघे टेकून तो म्हणाला: “हे प्रभू, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी माणूस आहे.” पण येशूने त्याला धीर देत म्हटलं: “घाबरू नकोस. कारण आतापासून तू जिवंत माणसं धरणारा होशील.”

येशू नावेच्या पुढच्या भागात बसला आहे आणि पेत्र त्याच्यासमोर गुडघे टेकून बसला आहे. संपूर्ण नाव माशांनी भरली आहे आणि कोळी माशांची जाळी ओढायचा प्रयत्न करत आहेत.

येशूने पेत्रमध्ये काही चांगल्या गोष्टी पाहिल्या होत्या. त्यामुळे लवकरच येशूने आपल्या १२ प्रेषितांमध्ये त्यालाही निवडलं. पेत्रने बऱ्‍याच मार्गांनी धैर्य दाखवलं. कधीकधी येशू असं काहीतरी बोलायचा जे शिष्यांना समजत नव्हतं आणि त्याबद्दल विचारायला ते कचरायचे. पण पेत्र मात्र त्याबद्दल जास्त जाणून घेण्यासाठी येशूला बिनधास्तपणे विचारायचा. एकदा येशू जेव्हा पाण्यावर चालत आला, तेव्हा ‘मीही तुझ्याकडे पाण्यावर चालत येऊ का?’ असं विचारणारा पेत्रच होता.

पेत्र सहसा उतावीळपणे बोलायचा, तरी जेव्हा त्याला सल्ला देण्यात आला तेव्हा तो स्वीकारायला आणि स्वतःमध्ये बदल करायला तयार होता

पेत्रने आणखी एका बाबतीत धैर्य दाखवलं. जेव्हा एखाद्या व्यक्‍तीची चूक सुधारली जाते तेव्हा ती प्रामाणिकपणे आणि नम्रपणे मान्य करायला आणि स्वतःमध्ये बदल करायला धैर्य लागतं. पेत्रमध्ये तशाच प्रकारचं धैर्य होतं आणि त्याने ते बऱ्‍याच वेळा दाखवून दिलं. एकदा येशू, लवकरच होणाऱ्‍या आपल्या मृत्यूबद्दल बोलत होता तेव्हा पेत्रने त्याला रागावून म्हटलं: “हे काय बोलतोस प्रभू? तुला नक्कीच असं काही होणार नाही.” तेव्हा येशूने कडक शब्दांत त्याची चूक सुधारली आणि तो सैतानासारखं देवाच्या इच्छेविरुद्ध बोलत आहे असं म्हटलं. त्या वेळी पेत्रने नम्रपणे आपली चूक मान्य केली.

येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याला आपल्या प्रेषितांना नम्रतेचा धडा शिकवायचा होता. म्हणून त्याने सहसा सेवक जे काम करायचा ते केलं. त्याने शिष्यांचे पाय धुवायला सुरुवात केली. हे पाहून पेत्रने त्याला रोखायचा प्रयत्न केला. तो म्हणाला: “मी तुला कधीच माझे पाय धुऊ देणार नाही.” यावर येशूने कडक शब्दांत त्याची चूक सुधारली. पण मग दुसरं टोक गाठत पेत्रने येशूला म्हटलं: ‘माझे पायच नाही, तर हात आणि डोकंसुद्धा धू.’ तेव्हा येशूने पुन्हा त्याला सुधारलं. नंतर येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं, की लवकरच ते सगळे त्याला सोडून जातील. तेव्हासुद्धा पेत्र खूप आत्मविश्‍वासाने त्याला म्हणाला, की ‘बाकी सगळे जरी सोडून गेले तरी मी तूला सोडून जाणार नाही.’ यावर येशूने पेत्रला म्हटलं की ‘आज रात्री तीन वेळा तू मला नाकारशील.’

काही तासांतच सैनिक आले आणि ते येशूला अटक करून घेऊन जाऊ लागले. त्या वेळी पेत्र काही अंतरावर राहून त्यांच्यामागे चालत होता. येशूला महायाजकाच्या घरी नेण्यात आलं. तिथे त्याची चूक नसतानाही त्याच्यावर आरोप लावून त्याचा अपमान आणि छळ केला जात होता. पेत्र त्या वेळी महायाजकाच्या घराच्या अंगणात होता. तिथे असलेल्या काही लोकांनी तो येशूचा शिष्य असल्याचं ओळखलं. पण आपण येशूला ओळखतही नाही असं म्हणून पेत्रने तीन वेळा त्याला नाकारलं. येशूने जसं सांगितलं होतं अगदी तसंच झालं.

त्यानंतर येशूने जेव्हा थेट पेत्रकडे पाहिलं तेव्हा ते त्याच्या मनाला खूप लागलं आणि “तो बाहेर जाऊन ढसाढसा रडू लागला.” काही तासांनंतर, आपल्या प्रभूला अतिशय क्रूरपणे वधस्तंभावर खिळलं जातंय हे पाहून त्याला नक्कीच खूप वाईट वाटलं असेल. त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याने इतका वाईट दिवस कधीच पाहिला नसेल. पण आपल्या चुकीमुळे पेत्र खचून गेला नाही, त्याने हार मानली नाही. उलट तो इतर प्रेषितांसोबत यहोवाची सेवा करत राहिला. नंतर एक जबरदस्त गोष्ट घडली. पेत्र एकटा असताना पुनरुत्थान झालेला येशू त्याला भेटला. त्यांच्यात काय बोलणं झालं हे आपल्याला माहीत नाही. पण त्यामुळे पेत्रला नक्कीच खूप प्रोत्साहन आणि दिलासा मिळाला असेल.

काही आठवड्यांनतर येशू जेव्हा गालील समुद्राजवळ त्याच्या शिष्यांना भेटला तेव्हा त्याने पेत्रसाठी खूप प्रेमळपणे एक गोष्ट केली. पेत्रने जसं येशूला तीन वेळा नाकारलं होतं, तसंच येशूने त्याला आपल्यावरचं प्रेम व्यक्‍त करायची तीन वेळा संधी दिली. येशूने त्याच्यावर एक अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवली. तो त्याला म्हणाला: “माझ्या लहान मेंढरांना चार.” आणि पेत्रनेही पुढे अतिशय धैर्याने ही जबाबदारी पार पाडली. याबद्दल आपण ४९ व्या अध्यायामध्ये पाहणारच आहोत.

याबद्दल बायबलमधून वाचा:

  • मत्तय १४:२३-२९; १५:१५; १६:२१-२३; १८:२१; १९:२७-२९; २६:६९-७५

  • मार्क १४:२७-३१, ५३, ५४; १६:७

  • लूक ५:१-११; १२:४१; २२:६१, ६२; २४:३३, ३४

  • योहान १:४०-४२; १३:३-१०, ३६-३८; २१:१५-१७

चर्चेसाठी:

या अध्यायात शिकल्याप्रमाणे पेत्रने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?

संशोधन करा

  1. १. बायबल काळात मासेमारीच्या व्यवसायात कोणकोणत्या गोष्टी सामील होत्या? (इन्साइट “शिकार करणं आणि मासेमारी” ¶६-७-wcgr) १

    पहिल्या शतकातला एक कोळी माशांची जाळी नीट करत आहे.

    चित्र १

  2. २. येशूने शिमोनला केफा (पेत्र) हे नाव का दिलं? (टेहळणी बुरूज२४.०६ २८ ¶११)

  3. ३. येशूने जेव्हा पेत्र आणि अंद्रियाला “मी तुम्हाला माणसं धरणारे करीन” असं म्हटलं तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? (मत्त. ४:१८-२०; टेहळणी बुरूज१६.०५ ९ ¶३-४) २

    पहिल्या शतकातले चार कोळी माशांनी भरलेली जाळी पूर्ण शक्‍ती लावून नावेत ओढायचा प्रयत्न करत आहेत.

    चित्र २

  4. ४. स्वर्गात जाण्याआधी येशूने पेत्रला “तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?” असं विचारलं. येशूच्या या प्रश्‍नाचा काय अर्थ असावा? (टेहळणी बुरूज१७.०५ २२ ¶२)

शिकलेल्या मुद्द्‌यांवर विचार करा

  • एखाद्या कमतरतेमुळे आपल्या हातून कदाचित वारंवार चुका होत असतील. असं असलं तरी यहोवाची सेवा करण्याच्या बाबतीत आपल्याला पेत्रकडून काय शिकायला मिळतं? ३

    कोलाज: एक तरुण भाऊ आपल्या कमतरतांवर मात करायचा प्रयत्न करत आहे. ही गोष्ट पुढच्या तीन चित्रांमध्ये दाखवण्यात आली आहे. एक तरुण भाऊ आपल्या कमतरतांचा विचार करत दुःखाने स्वतःला आरशात पाहत आहे. दोन भाऊ बायबलचा वापर करून त्या तरुण भावाची मेंढपाळ भेट घेत आहेत आणि त्याला धीर देत आहेत. तो तरुण भाऊ मंडळीच्या सभेत स्टेजवरून बायबल वाचत आहे.

    चित्र ३

  • यहोवा आणि येशूने उदारपणे पेत्रला माफ केलं. या गोष्टीवर विचार केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

  • या अहवालात पेत्रने जे धैर्य दाखवलं त्याचं तुम्ही अनुकरण कसं करू शकता?

मनन करण्यासाठी

  • या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

  • या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?

  • हा अध्याय वाचल्यानंतर, पेत्रला येशूसोबत स्वर्गात राज्य करायला निवडलंय याचा विचार करून तुम्हाला कसं वाटतं, आणि का?

आणखी शिका

यहोवा किती दयाळू आहे हे मुलांना शिकवण्यासाठी आईवडील पेत्रच्या उदाहरणाचा उपयोग कसा करू शकतात?

यहोवा माफ करतो (९:४०)

इतरांनी येशूला सोडून दिलं तरी पेत्र शेवटपर्यंत येशूसोबत कसा राहिला याचा विचार करा.

“परीक्षाप्रसंगांतही त्यानं एकनिष्ठा सोडली नाही” (अनुकरण करा! अध्या. २२)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा