वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 मार्च पृ. १४-१९
  • येशूकडून आवेशाने प्रचार करायला शिका!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • येशूकडून आवेशाने प्रचार करायला शिका!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • त्याने यहोवाच्या इच्छेला महत्त्व दिलं
  • त्याने बायबलच्या भविष्यवाण्यांकडे लक्ष दिलं
  • तो मदतीसाठी यहोवावर अवलंबून राहिला
  • त्याने आशा सोडली नाही
  • सेवाकार्यातला आनंद वाढवा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • प्रचार करत राहण्यासाठी प्रेम तुम्हाला प्रवृत्त करत राहो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीत हे नम्रपणे स्वीकारा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • संमेलनातून तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील
    २०२५-२०२६ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 मार्च पृ. १४-१९

अभ्यास लेख ११

गीत ५७ सर्व प्रकारच्या लोकांना संदेश सांगा!

येशूकडून आवेशाने प्रचार करायला शिका!

“प्रभूने . . . ज्या प्रत्येक नगरात आणि ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता, त्या त्या ठिकाणी त्याने त्यांना जोडीजोडीने आपल्यापुढे पाठवलं.”—लूक १०:१.

या लेखात:

आपण कोणत्या चार मार्गांनी येशूप्रमाणे आवेशाने प्रचार करू शकतो ते पाहा.

१. कोणती गोष्ट यहोवाच्या लोकांना स्वतःला ख्रिस्ती म्हणणाऱ्‍या इतर लोकांपासून वेगळं करते?

यहोवाच्या लोकांमध्ये आनंदाचा संदेश सांगायची जबरदस्त इच्छा असते आणि त्यासाठी ते खूप मेहनत घेतात. हीच गोष्ट त्यांना स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्‍या इतर लोकांपेक्षा वेगळी करते. (तीत २:१४) पण तुम्हाला कधीकधी आवेशाने प्रचार करायला कठीण जातं का? वडील म्हणून सेवा करणाऱ्‍या एका मेहनती भावासारखं तुम्हालासुद्धा वाटू शकतं. तो म्हणतो: “कधीकधी मला प्रचार करायची इच्छाच होत नाही.”

२. आपल्याला कधीकधी प्रचारासाठी आवेश टिकवून ठेवणं कठीण का जाऊ शकतं?

२ प्रचार करण्यापेक्षा यहोवाच्या सेवेतली इतर कामं करायला आपल्याला जास्त आवडत असेल. का? कारण आपण जेव्हा बांधकाम प्रकल्पांमध्ये, विपत्ती मदतकार्यामध्ये किंवा भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्याच्या कामामध्ये भाग घेतो, तेव्हा आपल्याला त्याचे परिणाम लगेच पाहायला मिळतात आणि आपण काहीतरी केल्याचं समाधानसुद्धा मिळतं. तसंच, भाऊबहिणींसोबत काम करताना आपल्याला प्रेम आणि शांतीसुद्धा जाणवते. आणि आपल्याला माहीत असतं की आपल्या कामाची कदर केली जात आहे. दुसरीकडे, कदाचित आपण एकाच क्षेत्रात बऱ्‍याच वर्षांपासून प्रचार करतोय, पण फार कमी लोक आपलं ऐकतात. किंवा मग ते आपला संदेश नाकारतात. आपल्याला हेसुद्धा माहीत आहे, की जसजसा अंत जवळ येतोय तसतसं आपल्याला आणखी विरोधाचा सामना करावा लागेल. (मत्त. १०:२२) तर मग, प्रचारासाठी आपला आवेश टिकवून ठेवायला आणि तो वाढवायला आपल्याला कशामुळे मदत होईल?

३. लूक १३:६-९ मध्ये दिलेल्या माळ्याच्या उदाहरणातून आपल्याला येशूच्या आवेशाबद्दल काय शिकायला मिळतं?

३ प्रचारात आपला आवेश कसा टिकवून ठेवायचा याबद्दल आपण येशूकडून शिकू शकतो. प्रचार करत असताना त्याने कधीच आपला आवेश कमी होऊ दिला नाही. उलट, जसजसा वेळ गेला तसतसं त्याने प्रचार करण्यात आणखी मेहनत घेतली. (लूक १३:६-९ वाचा.) येशूने दिलेल्या माळ्याच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. अंजिराच्या झाडाने फळ द्यावं म्हणून माळ्याने तीन वर्षं मेहनत घेतली. तरीसुद्धा त्या झाडाला फळं आली नाहीत. त्याचप्रमाणे येशूनेसुद्धा यहुद्यांना तीन वर्षं प्रचार केला. पण त्यांच्यातल्या बहुतेकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. ज्याप्रमाणे अंजिराचं झाड कधी न कधी फळ देईल अशी आशा माळ्याने सोडली नाही, त्याचप्रमाणे येशूने लोकांबद्दल आशा सोडली नाही. तो त्यांना प्रचार करत राहिला. त्याने कधीच आपला आवेश कमी होऊ दिला नाही. उलट त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी तो आणखी मेहनत घेतच राहिला.

४. येशूकडून आपण कोणत्या चार गोष्टी शिकणार आहोत?

४ येशूने प्रचारात आवेश दाखवला. पण त्याने पृथ्वीवरच्या त्याच्या शेवटच्या सहा महिन्यांमध्ये हा आवेश कसा दाखवला, याबद्दल आपण या लेखात चर्चा करणार आहोत. (लूक १०:१ “इसके बाद,” हिंदी अध्ययन नोट पाहा.) येशूने शिकवलेल्या गोष्टींचं पालन केल्यामुळे आणि त्याच्यासारखं वागल्यामुळे आपल्याला प्रचारात आपला आवेश टिकवून ठेवता येईल. यासाठी, आता आपण येशूकडून चार गोष्टी शिकू या. (१) त्याने यहोवाच्या इच्छेला महत्त्व दिलं, (२) त्याने बायबलच्या भविष्यवाण्यांकडे लक्ष दिलं, (३) तो मदतीसाठी यहोवावर अवलंबून राहिला आणि (४) निदान काही लोक तरी आपलं ऐकतील अशी त्याने आशा बाळगली.

त्याने यहोवाच्या इच्छेला महत्त्व दिलं

५. येशूने कसं दाखवलं की तो देवाच्या इच्छेला महत्त्व देतोय?

५ येशूने आवेशाने “देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश” सांगितला. कारण त्याला माहीत होतं, की त्याने हेच काम करावं अशी देवाची इच्छा आहे. (लूक ४:४३) येशूसाठी प्रचाराचं काम सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. आपल्या सेवाकार्याच्या शेवटच्या महिन्यांमध्येसुद्धा तो “शहरोशहरी आणि गावोगावी” जाऊन लोकांना शिकवत राहिला. (लूक १३:२२) इतकंच नाही, तर त्याने आणखी शिष्यांनासुद्धा प्रचार करायला शिकवलं.—लूक १०:१.

६. यहोवाच्या सेवेत आपल्याला इतर कामं असली तरी यहोवा प्रचाराच्या कामाला कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? (चित्रसुद्धा पाहा.)

६ येशूच्या दिवसांप्रमाणे आजही आनंदाच्या संदेशाचा प्रचार करणं हे देवाच्या लोकांचं मुख्य काम आहे. यहोवा देवाची आणि येशूची हीच इच्छा आहे की आपणही ते काम करावं. (मत्त. २४:१४; २८:१९, २०) यहोवाच्या सेवेत आपण जी इतर कामं करतो त्यांत आणि प्रचार कामात थेट संबंध आहे. उदाहरणार्थ, आपण राज्य सभागृहं बांधतो. त्यामुळे ज्यांना आपण प्रचार करतो त्यांना तिथे येऊन यहोवाची उपासना करता येते. आपण बेथेलमध्ये किंवा इतर ठिकाणी सेवा करतो. त्यामुळेसुद्धा प्रचाराच्या कामाला हातभार लागतो. आपण जेव्हा विपत्ती मदतकार्य करतो, तेव्हा भाऊबहिणींना फक्‍त त्यांच्या गरजेच्या वस्तूच मिळत नाहीत, तर त्यांना यहोवाची सेवा पुन्हा सुरू करायलासुद्धा मदत होते. आणि यात प्रचार करणंसुद्धा सामील आहे. जेव्हा आपण हे लक्षात ठेवतो की प्रचाराचं काम सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आपण ते करावं अशी यहोवाची इच्छा आहे, तेव्हा आपल्याला नियमितपणे आणि आवेशाने प्रचाराचं काम करायची प्रेरणा मिळते. हंगेरीमध्ये राहणारे यानोस नावाचे वडील म्हणतात: “मी नेहमी स्वतःला या गोष्टीची आठवण करून देतो, की यहोवाच्या सेवेतलं कोणतंही काम प्रचाराची जागा घेऊ शकत नाही. तेच आपलं सर्वात मुख्य काम आहे.”

कोलाज: १. एक भाऊ बांधकाम प्रकल्पावर काम करतोय. २. आणखी एक भाऊ बेथेलसाठी घरून काम करतोय. ३. नंतर ते दोन्ही भाऊ सोबत प्रचार करत आहेत.

प्रचाराचं काम आजही आपलं मुख्य काम आहे आणि यहोवा देवाची आणि येशूची इच्छा आहे की आपण ते काम करावं (परिच्छेद ६ पाहा)


७. आपण प्रचार करत राहावं असं यहोवाला का वाटतं? (१ तीमथ्य २:३, ४)

७ आपण जर लोकांकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर आपल्याला आवेशाने प्रचार करत राहता येईल. यहोवाची अशी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी आनंदाचा संदेश ऐकावा आणि तो स्वीकारावा. (१ तीमथ्य २:३, ४ वाचा.) लोकांचं जीवन वाचवणारा हा संदेश सांगण्यात आपण आणखी कुशल बनावं म्हणून तो आपल्याला प्रशिक्षण देतो. जसं की, त्याने आपल्याला लोकांवर प्रेम करा—शिष्य बनवा हे माहितीपत्रक दिलंय. या माहितीपत्रिकेत संभाषण सुरू करण्यासाठी व्यावहारिक सल्ले दिले आहेत. यामुळे आपल्याला शिष्य बनवायला मदत होते. आज जरी लोकांनी आपलं ऐकलं नाही, तरी मोठं संकट संपण्याच्या आधी त्यांच्याकडे यहोवाची सेवा करायची संधी आहे. आपण आत्ता त्यांना जे सांगू ते कदाचित भविष्यात त्यांना आठवेल आणि ते यहोवाची सेवा सुरू करतील. पण आपण जर आज त्यांना प्रचार केला, तरच पुढे त्यांना हे करता येईल.

त्याने बायबलच्या भविष्यवाण्यांकडे लक्ष दिलं

८. बायबलमधल्या कोणत्या भविष्यवाण्यांमुळे येशूला त्याच्या वेळेचा चांगला वापर करता आला?

८ बायबलमधल्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होणार आहेत हे येशूला माहीत होतं. त्याला माहीत होतं की त्याचं सेवाकार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे फक्‍त साडेतीन वर्षं आहेत. (दानी. ९:२६, २७) त्याला हेसुद्धा माहीत होतं की त्याचा मृत्यू केव्हा आणि कधी होईल. (लूक १८:३१-३४) या भविष्यवाण्या कशा पूर्ण होणार आहेत हे माहीत असल्यामुळे येशूला त्याच्या वेळेचा चांगला वापर करता आला. म्हणून त्याला दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी त्याने आवेशाने प्रचार केला.

९. बायबलच्या भविष्यवाण्या समजून घेतल्यामुळे आपल्याला आवेशाने प्रचार करायचं प्रोत्साहन कसं मिळतं?

९ बायबलच्या भविष्यवाण्या समजून घेतल्यामुळे आपल्याला आवेशाने प्रचार करायची प्रेरणा मिळते. आपल्याला माहीत आहे की सैतानाच्या व्यवस्थेचे आता खूप थोडे दिवस उरलेत. बायबलमध्ये आधीच सांगण्यात आलं होतं की शेवटच्या काळात लोक कसे असतील आणि कोणत्या घटना घडतील. आणि आज आपण हे घडताना प्रत्यक्ष पाहत आहोत. बायबलमधल्या आणखी एका भविष्यवाणीत म्हटलंय की “अंताच्या समयी” दक्षिणेच्या राजामध्ये आणि उत्तरेच्या राजामध्ये लढाई होईल. (दानी. ११:४०) आपल्याला समजलंय की हे राजे अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेला आणि रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना सूचित करतात. आपल्याला हेसुद्धा समजलंय की दानीएल २:४३-४५ मध्ये सांगितलेल्या मूर्तीचे पाय हे अँग्लो-अमेरिकन जागतिक महासत्तेला सूचित करतात. आपली ही खातरी पटली आहे की बायबलच्या भविष्यवाण्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे अगदी लवकरात लवकर देवाचं राज्य मानवी सरकारांचा नाश करेल. या सगळ्या भविष्यवाण्यांमधून दिसून येतं की आपण अंताच्या अगदी जवळ आहोत. म्हणून आपण आपल्या वेळेचा सर्वात चांगला वापर करून आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला पाहिजे.

१०. आणखीन कोणत्या कारणांमुळे बायबलच्या भविष्यवाण्या आपल्याला आवेशाने प्रचार करायला मदत करू शकतात?

१० बायबलच्या भविष्यवाण्यांमधून आपल्याला एक असा संदेशही मिळतो जो आपण इतरांना सांगायला उत्सुक असतो. डोमिनिकन प्रजासत्ताकमध्ये राहणारी कॅरी नावाची बहीण म्हणते: “यहोवाने चांगल्या भविष्याबद्दल दिलेल्या वचनांमुळे मला इतरांना सत्य सांगायची प्रेरणा मिळते. जेव्हा मी हे पाहते की आज लोक कोणत्या गोष्टींचा सामना करत आहेत तेव्हा मला हे समजतं की ही वचनं फक्‍त माझ्यासाठीच नाहीत, तर ती त्यांच्यासाठीसुद्धा आहेत.” बायबलच्या भविष्यवाण्यांमधून आपल्याला हे कळतं की प्रचाराच्या कामाला यहोवाचा पाठिंबा आहे. त्यामुळे ते काम करत राहायचं आपल्याला प्रोत्साहन मिळतं. हंगेरीमध्ये राहणारी लैला म्हणते: “यशया ११:६-९ मधून आपल्याला कळतं की यहोवाच्या मदतीने कोणीही बदलू शकतं. यामुळे जे ऐकणार नाहीत असं वाटतं त्यांनासुद्धा आनंदाचा संदेश सांगायला मला मदत होते.” झांबियामध्ये राहणारा क्रिस्टफर नावाचा भाऊ म्हणतो: “मार्क १३:१० मध्ये सांगितल्याप्रमाणे आज आनंदाच्या संदेशाची घोषणा जगभरात केली जात आहे. आणि ही भविष्यवाणी पूर्ण होण्यात माझाही वाटा आहे ही माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे.” मग बायबलमधल्या कोणत्या भविष्यवाण्यांमुळे तुम्हाला प्रचार करत राहायचं प्रोत्साहन मिळतं?

तो मदतीसाठी यहोवावर अवलंबून राहिला

११. आवेशाने प्रचार करत राहण्यासाठी येशूला यहोवावर अवलंबून राहायची गरज का होती? (लूक १२:४९, ५३)

११ आवेशाने प्रचार करत राहता यावा म्हणून येशू नेहमी यहोवावर अवलंबून राहिला. लोकांना प्रचार करताना येशू त्यांच्याशी आदराने बोलायचा. पण त्याला माहीत होतं की काही लोक त्याच्यावर रागावतील आणि बरेच जण त्याच्या संदेशाचा विरोध करतील. (लूक १२:४९, ५३ वाचा.) येशू सांगत असलेला संदेश धार्मिक पुढाऱ्‍यांना आवडला नाही. म्हणून त्यांनी बऱ्‍याच वेळा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. (योहा. ८:५९; १०:३१, ३९) पण यहोवा त्याच्यासोबत आहे हे माहीत असल्यामुळे तो प्रचार करत राहिला. त्याने म्हटलं: “मी एकटा नाही, तर ज्याने मला पाठवलं तो पिता माझ्यासोबत आहे. . . . त्याने मला एकटं सोडलं नाही, कारण मी नेहमी त्याला आवडणाऱ्‍या गोष्टी करतो.”—योहा. ८:१६, २९.

१२. विरोध होत असला तरीही प्रचार करत राहायला येशूने आपल्या शिष्यांना कशी मदत केली?

१२ येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की ते मदतीसाठी यहोवावर अवलंबून राहू शकतात. जेव्हा त्यांना छळाचा सामना करावा लागेल, तेव्हासुद्धा यहोवा त्यांना मदत करेल अशी त्याने त्यांना वारंवार खातरी करून दिली. (मत्त. १०:१८-२०; लूक १२:११, १२) यासोबतच त्याने आपल्या शिष्यांना सावध राहायलासुद्धा सांगितलं. (मत्त. १०:१६; लूक १०:३) ज्या लोकांना त्यांचा संदेश ऐकायचा नाही त्यांच्यावर त्यांनी ऐकायची जबरदस्ती करू नये अशीही सूचना त्याने त्यांना दिली. (लूक १०:१०, ११) तसंच, छळ होतो तेव्हा त्यांनी ते ठिकाण सोडून दुसरीकडे पळून जावं असं त्याने त्यांना सांगितलं. (मत्त. १०:२३) येशू आवेशी होता आणि त्याचा यहोवावर पूर्ण भरवसा होता. तरी त्याने विनाकारण आपला जीव धोक्यात घातला नाही.—योहा. ११:५३, ५४.

१३. यहोवा आपल्याला मदत करेल याची आपण खातरी का बाळगू शकतो?

१३ आज आपला छळ केला जातो, म्हणून आवेशाने प्रचार करण्यासाठी आपल्याला यहोवाच्या मदतीची गरज आहे. (प्रकटी. १२:१७) मग यहोवा आपल्याला मदत करेल याची खातरी आपण कशी बाळगू शकतो? योहानच्या १७ व्या अध्यायात येशूने जी प्रार्थना केली त्याकडे लक्ष द्या. येशूने यहोवाला अशी विनंती केली की त्याने प्रेषितांचा सांभाळ करावा आणि यहोवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. छळ होत असतानाही यहोवाने प्रेषितांना आवेशाने प्रचार करायला कशी मदत केली हे आपल्याला प्रेषितांची कार्यं पुस्तकात पाहायला मिळतं. येशूने आपल्या प्रार्थनेत यहोवाला अशीसुद्धा विनंती केली की प्रेषितांच्या संदेशावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांनाही त्याने सांभाळावं. यात आपणसुद्धा सामील आहोत. यहोवा आजही येशूच्या त्या प्रार्थनेचं उत्तर देतोय. त्याने जशी प्रेषितांना मदत केली तशी आपल्यालाही करेल.—योहा. १७:११, १५, २०.

१४. आपण आवेशाने प्रचार करत राहू शकतो याची खातरी आपण का बाळगू शकतो? (चित्रसुद्धा पाहा.)

१४ अंत जसजसा जवळ येतोय तसतसा आनंदाच्या संदेशाचा प्रचार करणं आपल्यासाठी आणखीन कठीण होऊ शकतं. पण येशूने आपल्याला खातरी दिली की हे काम आवेशाने करत राहण्यासाठी आपल्याला हवी असलेली मदत नक्की मिळेल. (लूक २१:१२-१५) येशू आणि त्याच्या शिष्यांप्रमाणेच, लोकांनी आपलं ऐकायचं की नाही हे आपण त्यांच्यावर सोपवतो. आपण उगाच लोकांसोबत वाद घालत नाही. ज्या ठिकाणी आपल्या कामावर बंदी आहे, तिथेसुद्धा आपले भाऊबहीण आनंदाच्या संदेशाचा प्रचार करत आहेत. कारण ते स्वतःच्या ताकदीवर नाही तर यहोवावर अवलंबून राहतात. जशी यहोवाने पहिल्या शतकातल्या त्याच्या सेवकांना ताकद दिली तशीच ताकद तो आज आपल्यालाही देईल. त्यामुळे आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे आनंदाच्या “संदेशाचा पूर्णपणे प्रचार” करता येईल. (२ तीम. ४:१७) आपण जर यहोवावर अवलंबून राहिलो तर आपण एका गोष्टीची खातरी ठेवू शकतो. ती म्हणजे आपल्याला आवेशाने आनंदाच्या संदेशाचा प्रचार करत राहता येईल.

ज्या देशांमध्ये आपल्या कामावर बंदी आहे तिथेसुद्धा आपले भाऊबहीण आवेशाने पण सावधपणे प्रचार करायचीसंधी शोधतात (परिच्छेद १४ पाहा)a


त्याने आशा सोडली नाही

१५. लोक आपला संदेश ऐकतील अशी आशा येशूने कधीच सोडली नाही हे कशावरून दिसून येतं?

१५ येशूला नेहमी ही आशा होती की त्याला त्याचा संदेश ऐकणारे लोक भेटतील. यामुळेच तो आवेशाने प्रचार करू शकला. उदाहरणार्थ, इ.स. ३० च्या शेवटीशेवटी येशूने पाहिलं की बरेच जण त्याचा संदेश ऐकत आहेत. त्याने त्यांची तुलना कापणीसाठी तयार असलेल्या शेतासोबत केली. (योहा. ४:३५) या घटनेच्या एका वर्षांनंतर, त्याने आपल्या शिष्यांना सांगितलं: “पीक तर भरपूर आहे.” (मत्त. ९:३७, ३८) यानंतर पुन्हा एकदा त्याने असं म्हटलं: “पीक तर भरपूर आहे . . . म्हणून, पिकाच्या मालकाने कापणी करायला कामकरी पाठवावेत अशी त्याला विनंती करा.” (लूक १०:२) लोक आनंदाचा संदेश ऐकतील अशी येशूने नेहमी आशा ठेवली आणि जेव्हा लोकांनी त्याचं ऐकलं तेव्हा त्याला आनंद झाला.—लूक १०:२१.

१६. प्रचाराच्या कामाबद्दल आपण आशा सोडू नये हे येशूने दिलेल्या उदाहरणातून कसं दिसून येतं? (लूक १३:१८-२१) (चित्रसुद्धा पाहा.)

१६ येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं की त्यांनी प्रचार केल्यामुळे खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील. यामुळे त्यांना प्रचारातला आवेश टिकवून ठेवायला मदत झाली. यासाठी त्याने त्यांना दोन उदाहरणं दिली. (लूक १३:१८-२१ वाचा.) पहिल्या उदाहरणात त्याने राज्याच्या संदेशाची तुलना एका मोहरीच्या छोट्याशा दाण्याशी केली. मोहरीच्या छोट्या दाण्याचं पुढे मोठं झाड बनतं. त्याच प्रकारे, आनंदाचा संदेश बरेच लोक स्वीकारतील आणि कोणत्याही गोष्टीमुळे त्याची वाढ थांबणार नाही हे त्याने सांगितलं. दुसऱ्‍या उदाहरणात, त्याने राज्याच्या संदेशाची तुलना खमीरासोबत केली. खमीर जेव्हा पिठात टाकलं जातं, तेव्हा सगळं पीठ फुगतं. त्याचप्रमाणे, राज्याचा संदेश जगात दूरदूरपर्यंत पसरेल आणि त्यामुळे लोक आपल्या जीवनात बदल करतील. पण कदाचित हे बदल इतरांना लगेच दिसणार नाहीत. अशा प्रकारे, येशूने शिष्यांना हे समजायला मदत केली की त्यांच्या प्रचाराच्या कामामुळे बऱ्‍याच लोकांना मदत होणार आहे.

दोन बहिणी वर्दळ असलेल्या ठिकाणी ट्रॉलीवरचं साक्षकार्य करत आहेत. पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही.

येशूप्रमाणे आपणही आशा ठेवतो की काही लोक आपला संदेश ऐकतील (परिच्छेद १६ पाहा)


१७. आशा न सोडता प्रचार करत राहण्यासाठी आपल्याकडे कोणती कारणं आहेत?

१७ जेव्हा आपण हे पाहतो की आपल्या प्रचारामुळे जगभरातल्या लोकांना कशी मदत होते तेव्हा आपल्याला प्रचार करत राहण्याचं प्रोत्साहन मिळतं. दरवर्षी, आवड दाखवणारे लाखो लोक स्मारकविधीला हजर होतात आणि आपल्यासोबत बायबल अभ्यास करतात. इतकंच नाही तर, लाखो लोक बाप्तिस्मा घेऊन आपल्यासोबत प्रचाराच्या कामात सामील होतात. आपल्याला हे माहीत नाही की अजून किती लोक आपला संदेश स्वीकारतील. पण आपल्याला हे नक्की माहीत आहे की यहोवा एका मोठ्या लोकसमुदायाला एकत्र करतोय. आणि हा समुदाय मोठं संकट पार करेल. (प्रकटी. ७:९, १४) यहोवा देव पिकाचा मालक आहे, आणि त्याला अशी खातरी आहे की आणखी बरेच लोक आनंदाचा संदेश स्वीकारतील. म्हणून आपण प्रचार करत राहिलं पाहिजे.

१८. लोकांना आपल्या बाबतीत काय कळावं अशी आपली इच्छा आहे?

१८ येशूच्या खऱ्‍या शिष्यांनी नेहमीच आवेशाने आनंदाच्या संदेशाचा प्रचार केलाय. जेव्हा लोकांनी प्रेषितांना धाडसाने बोलताना पाहिलं, तेव्हा त्यांना जाणवलं की ही “माणसं येशूसोबत असायची.” (प्रे. कार्यं ४:१३) तर आपणसुद्धा धाडसाने आणि आवेशाने आनंदाचा संदेश सांगत राहू या. त्यामुळे लोकांना कळेल की आपणही येशूसारखं वागतोय.

तुमचं उत्तर काय असेल?

  • प्रचाराच्या कामाबद्दल येशूचा दृष्टिकोन कसा होता आणि आपण त्याच्यासारखा आवेश कसा दाखवू शकतो?

  • येशू यहोवावर कसा अवलंबून राहिला आणि आपणही त्याच्यासारखं कसं वागू शकतो?

  • प्रचाराच्या बाबतीत येशूची मनोवृत्ती काय होती आणि आपण त्याच्याकडून काय शिकू शकतो?

गीत ५८ शांतीची आस ठेवणाऱ्‍यांना शोधुया!

a चित्राचं वर्णन: पेट्रोल पंपावर एक भाऊ सावधपणे एका माणसाला प्रचार करतोय.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा