अभ्यास लेख ९
गीत ५२ ख्रिस्ती समर्पण
बाप्तिस्मा घ्यायला उशीर लावू नका
“आता उशीर का लावतोस? ऊठ, बाप्तिस्मा घे.”—प्रे. कार्यं २२:१६.
या लेखात:
शोमरोनी लोक, तार्सचा शौल, कर्नेल्य आणि करिंथकरांच्या उदाहरणांवर विचार करा आणि बाप्तिस्म्यापर्यंत प्रगती करण्यासाठी लागणारी ताकद मिळवा.
१. बाप्तिस्मा घेण्यासाठी तुमच्याकडे कोणती चांगली कारणं आहेत?
यहोवाने आपल्याला जीवन आणि प्रत्येक चांगली देणगी दिली आहे. मग या सुंदर भेटी देणाऱ्या देवावर तुमचं प्रेम आहे का? तुम्हाला ते प्रेम व्यक्त करायचंय का? याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे आपलं जीवन त्याला समर्पित करणं आणि बाप्तिस्मा घेणं. ही पावलं उचलून तुम्ही यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनाल. यामुळे तुमचा पिता आणि मित्र या नात्याने तो तुमची काळजी घेईल आणि तुमचं मार्गदर्शन करेल. (स्तो. ७३:२४; यश. ४३:१, २) समर्पण करून बाप्तिस्मा घेतल्यामुळे तुम्हाला सर्वकाळाच्या जीवनाची आशासुद्धा मिळेल.—१ पेत्र ३:२१.
२. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?
२ बाप्तिस्मा घेण्यापासून एखादी गोष्ट तुम्हाला रोखत आहे का? असं असेल तर तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या आधी लाखो लोकांना बाप्तिस्मा घेण्यासाठी पात्र ठरायला आपल्या वागण्या-बोलण्यात बदल करावे लागले आहेत. आणि आता ते आनंदाने आणि आवेशाने यहोवाची सेवा करत आहेत. पहिल्या शतकात ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्यांच्याकडून आपल्याला काय शिकायला मिळू शकतं? त्यांच्यापुढे कोणते अडथळे आले? चला, त्यांच्या उदाहरणांतून आपल्याला काय शिकता येईल ते पाहू या.
शोमरोनी लोकांचा बाप्तिस्मा
३. शोमरोनी लोकांना बाप्तिस्मा घेण्यासाठी कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागला असेल?
३ येशूच्या काळात शोमरोनी नावाचा एक धार्मिक गट होता. हे लोक यहूदीयाच्या उत्तरेकडे असलेल्या शोमरोनच्या शहरात आणि शखेमच्या आसपास राहायचे. शोमरोनी लोकांना बाप्तिस्मा घेण्याआधी देवाच्या वचनाचं पूर्ण ज्ञान घेणं गरजेचं होतं. कारण त्यांचा असा विश्वास होता की फक्त बायबलची पहिली पाच पुस्तकं म्हणजे उत्पत्ती ते अनुवाद हीच देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आली आहेत. कदाचित यहोशवाच्या पुस्तकाबद्दलसुद्धा ते असंच मानायचे. पण अनुवाद १८:१८, १९ मध्ये दिलेल्या देवाच्या वचनाप्रमाणे तेसुद्धा मसीहाच्या येण्याची वाट पाहत होते. (योहा. ४:२५) पण बाप्तिस्मा घेण्याआधी त्यांना ही गोष्ट स्वीकारायची गरज होती की येशू हाच वचन दिलेला मसीहा आहे. आणि “बऱ्याच शोमरोनी लोकांनी” येशूवर विश्वास ठेवलाही. (योहा. ४:३९) तर इतर काही शोमरोनी लोकांना वेगळ्या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला असेल. ती म्हणजे शोमरोनी आणि यहुदी लोकांमध्ये असलेला भेदभाव. बाप्तिस्मा घेण्यासाठी बऱ्याच काळापासून मनात रुजलेला हा भेदभाव त्यांना काढून टाकावा लागला असेल.—लूक ९:५२-५४.
४. प्रेषितांची कार्यं ८:५, ६, १४ प्रमाणे जेव्हा फिलिप्पने शोमरोनी लोकांना प्रचार केला, तेव्हा त्यांच्यातल्या काही जणांनी काय केलं?
४ शोमरोनी लोकांना बाप्तिस्मा घ्यायला कशामुळे मदत झाली? जेव्हा फिलिप्प शोमरोनी लोकांना “ख्रिस्ताबद्दल शिकवू लागला,” तेव्हा काही जणांनी ‘देवाचं वचन स्वीकारलं.’ (प्रेषितांची कार्यं ८:५, ६, १४ वाचा.) फिलिप्प यहुदी होता. तरी त्यांनी त्याचा विरोध केला नाही. देव भेदभाव करत नाही हे बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांमध्ये सांगितल्याचं कदाचित त्यांना आठवलं असेल. (अनु. १०:१७-१९) कारण काहीही असो, फिलिप्प त्यांना ख्रिस्ताबद्दल जे सांगत होता त्याकडे त्यांनी “लक्ष दिलं,” हे मात्र नक्की. देवानेच फिलिप्पला पाठवलंय ही गोष्ट त्यांनी स्वीकारली. कारण फिलिप्पने तिथे जाऊन बरेच चमत्कारसुद्धा केले. त्याने आजारी लोकांना बरं केलं आणि दुष्ट स्वर्गदूतांना काढलं.—प्रे. कार्यं ८:७.
५. शोमरोनी लोकांकडून आपण कोणते धडे शिकू शकतो?
५ फिलिप्प यहुदी होता आणि तो शिकवत असलेल्या गोष्टी शोमरोनी लोकांनी कधीच ऐकल्या नव्हत्या, म्हणून ते त्याचं ऐकायला नकार देऊ शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. फिलिप्प सत्य शिकवतोय याची खातरी पटल्यावर त्यांनी बाप्तिस्मा घ्यायला उशीर केला नाही. बायबलमध्ये म्हटलंय: “देवाच्या राज्याबद्दलचा आणि येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करणाऱ्या फिलिप्पवर त्या लोकांचा विश्वास बसला. तेव्हा बऱ्याच स्त्रीपुरुषांनी बाप्तिस्मा घेतला.” (प्रे. कार्यं ८:१२) देवाचं वचन सत्य आहे याची तुम्हाला खातरी पटली आहे का? यहोवाचे साक्षीदार भेदभावांवर मात करून एकमेकांवर प्रेम करतात हे तुम्ही स्वतः अनुभवलंय का? कारण तेच खऱ्या ख्रिश्चनांचं ओळखचिन्ह आहे. (योहा. १३:३५) जर असं असेल तर बाप्तिस्मा घ्यायला मागे-पुढे पाहू नका. तुमच्या या निर्णयावर यहोवा नक्कीच आशीर्वाद देईल याची खातरी ठेवा.
६. रुबेनच्या उदाहरणावरून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
६ जर्मनीत राहणारा रुबेन, साक्षीदार कुटुंबात वाढला होता. तो तरुण होता, तेव्हा त्याच्या मनात शंका आली की यहोवा आस्तित्वात आहे की नाही. मग त्याने आपल्या शंकेवर कशी मात केली? त्याला कळलं की त्याला या विषयी कमी माहिती आहे. आणि त्याने याबद्दल काहीतरी करायचं ठरवलं. तो म्हणतो: “खरं काय आणि खोटं काय हे मला माझ्या वैयक्तिक अभ्यासात तपासून पाहायची गरज होती. मी उत्क्रांतीबद्दल बराच अभ्यास केला.” त्याने इज देअर अ क्रिएटर हू केअर्स अबाऊट यू? हे पुस्तक वाचलं. त्या पुस्तकाचा रुबेनवर इतका जबरदस्त प्रभाव पडला की तो स्वतःला म्हणाला, ‘यहोवा एक खरीखुरी व्यक्ती आहे.’ पुढे जेव्हा त्याने आपल्या जागतिक मुख्यालयाला भेट दिली, तेव्हा त्याला कळलं की जगभरातल्या आपल्या भाऊबहिणींमधली एकता ही एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही आणि त्याबद्दलची त्याची कदर आणखी वाढली. जर्मनीला परत आल्यावर वयाच्या १७ व्या वर्षी त्याने बाप्तिस्मा घेतला. तुम्ही जे शिकलात त्याबद्दल तुमच्या मनातही शंका आहेत का? असं असेल तर आपल्या प्रकाशनांमध्ये संशोधन करून तुम्हीसुद्धा आपल्या शंकांवर मात करू शकता. ‘अचूक ज्ञानामुळे’ शंकांवर मात करता येते. (इफिस. ४:१३, १४) जेव्हा तुम्ही जगभरातल्या यहोवाच्या लोकांच्या प्रेमाबद्दल आणि एकतेबद्दल ऐकाल, आणि तुमच्या स्वतःच्या मंडळीत याचा पुरावा पाहाल, तेव्हा तुमच्या मनातही त्याबद्दलची कदर वाढेल.
तार्सच्या शौलचा बाप्तिस्मा
७. शौलला आपला कोणता विचार बदलायचा होता?
७ तार्सच्या शौलचा विचार करा. त्याने यहुदी कायद्याचं चांगलं शिक्षण घेतलं होतं आणि तो यहुद्यांमध्ये खूप प्रतिष्ठित होता. (गलती. १:१३, १४; फिलिप्पै. ३:५) त्या काळात यहुदी लोक ख्रिश्चनांना धर्मत्यागी समजायचे आणि म्हणूनच शौलने त्यांचा क्रूरपणे छळ केला. असं करून आपण देवाला खूश करतोय असा चुकीचा विचार तो करत होता. (प्रे. कार्यं ८:३; ९:१, २; २६:९-११) मग जर आता शौलने येशूवर विश्वास ठेवला असता आणि ख्रिस्ती म्हणून बाप्तिस्मा घेतला असता, तर त्यालाही छळाचा सामना करायची तयारी दाखवावी लागली असती.
८. (क) शौलला बाप्तिस्मा घ्यायला कशामुळे मदत झाली? (ख) प्रेषितांची कार्यं २२:१२-१६ प्रमाणे हनन्याने शौलला कशी मदत केली? (चित्रसुद्धा पाहा.)
८ शौलला बाप्तिस्मा घ्यायला कशामुळे मदत झाली? जेव्हा येशू स्वर्गातून शौलशी बोलला, तेव्हा लख्ख प्रकाश पडला आणि शौलची दृष्टी गेली. (प्रे. कार्यं ९:३-९) यानंतर त्याने तीन दिवस उपवास केला. आपल्यासोबत नुकतंच जे झालं त्यावर त्याने नक्कीच मनन केलं असेल. मग शौलला खातरी पटली की येशू हाच मसीहा आहे आणि त्याचे शिष्य खऱ्या अर्थाने देवाची इच्छा पूर्ण करतात. शौलने स्तेफनच्या हत्येला मान्यता दिल्यामुळे त्याला खूप पस्तावा झाला असेल. (प्रे. कार्यं २२:२०) या तीन दिवसांनंतर येशूचा हनन्या नावाचा शिष्य शौलकडे गेला. तो शौलकडे गेल्यानंतर त्याला त्याची दृष्टी परत मिळाली. हनन्याने त्याला उशीर न करता बाप्तिस्मा घ्यायचं प्रोत्साहन दिलं. (प्रेषितांची कार्यं २२:१२-१६ वाचा.) शौलने नम्रपणे ही मदत स्वीकारली आणि बाप्तिस्मा घेतला.—प्रे. कार्यं ९:१७, १८.
शौलप्रमाणे तुम्हीही बाप्तिस्मा घेण्यासाठी मदत स्वीकारायला तयार आहात का? (परिच्छेद ८ पाहा)
९. शौलकडून आपण कोणते महत्त्वाचे धडे शिकू शकतो?
९ शौलकडून आपण काही महत्त्वाचे धडे शिकू शकतो. माणसांच्या भीतीमुळे किंवा गर्वामुळे तो बाप्तिस्मा घ्यायला नकार देऊ शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. तो नम्र होता आणि येशूचा शिष्य होण्यासाठी आपल्या जीवनात बदल करायला तयार होता. (प्रे. कार्यं २६:१४, १९) शौलला माहीत होतं, की ख्रिस्ती बनल्यावर त्याचा छळ केला जाईल. पण तरीसुद्धा तो येशूचा शिष्य बनायला तयार होता. (प्रे. कार्यं ९:१५, १६; २०:२२, २३) त्याच्या बाप्तिस्म्यानंतरही तो वेगवेगळ्या परीक्षांचा सामना करताना यहोवाच्या मदतीवर अवलंबून राहिला. (२ करिंथ. ४:७-१०) जेव्हा तुम्ही यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घ्याल, तेव्हा तुमच्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते किंवा तुम्हाला इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पण तुम्ही एकटे नाही. तुम्ही या गोष्टीची खातरी बाळगू शकता की यहोवा देव आणि येशू ख्रिस्त नेहमी तुमच्यासोबत असतील.—फिलिप्पै. ४:१३.
१०. आनाच्या उदाहरणातून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
१० आना पूर्व युरोपमध्ये राहायची. तिच्या आईचा बाप्तिस्मा झाल्यानंतर, वयाच्या नवव्या वर्षी तिच्या वडिलांच्या परवानगीने तिने बायबल अभ्यास करायला सुरुवात केली. आना एकत्र कुटुंबात राहायची. बायबल शिकू लागल्यामुळे तिच्या कुटुंबातले लोक तिचा विरोध करू लागले. आपल्या वाडवडिलांचा धर्म सोडून देणं, ही एक अपमानाची गोष्ट आहे असा त्यांचा दृष्टिकोन होता. आना जेव्हा १२ वर्षांची होती तेव्हा तिने तिच्या वडिलांकडे बाप्तिस्मा घ्यायची परवानगी मागितली. तिच्या वडिलांना हे जाणून घ्यायचं होतं की हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे, की कोणी तिला बाप्तिस्मा घ्यायला जबरदस्ती करतंय. तेव्हा आनाने त्यांना असं उत्तर दिलं: “मी यहोवावर प्रेम करते म्हणून मला बाप्तिस्मा घ्यायचाय.” मग तिच्या वडिलांनी तिला बाप्तिस्मा घ्यायला परवानगी दिली. बाप्तिस्मा झाल्यावर तिच्या कुटुंबातले लोक तिची थट्टा करू लागले आणि तिच्याशी वाईट वागू लागले. तिच्या एका नातेवाइकाने म्हटलं: “यहोवाची साक्षीदार बनण्याऐवजी तू अनैतिक जीवन जगत असतीस आणि सिगरेट पीत असतीस, तरी चाललं असतं.” आनाने या सगळ्या गोष्टींचा सामना कसा केला? ती म्हणते: “यहोवाने मला खंबीर राहायला मदत केली. माझ्या आईवडिलांनीसुद्धा मला चांगली साथ दिली.” यहोवाने तिला बऱ्याचदा मदत केली आहे. त्या सगळ्या आठवणी तिने लिहून ठेवल्या आहेत. यहोवाने तिला कशी मदत केली हे ती विसरू नये म्हणून ती वेळोवेळी त्या आठवणी वाचत असते. तुम्हालाही जर विरोधाची भीती वाटत असेल तर तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवू शकता, की यहोवा तुम्हालाही नक्की मदत करेल.—इब्री १३:६.
कर्नेल्यचा बाप्तिस्मा
११. कर्नेल्य बाप्तिस्मा घ्यायला उशीर का लावू शकला असता?
११ कर्नेल्यच्या उदाहरणातूनही आपण बरेच धडे शिकू शकतो. तो रोमन सैन्यात एक “शताधिपती” होता. म्हणजे, १०० सैनिकांच्या तुकडीवर अधिकारी होता. (प्रे. कार्यं १०:१, तळटीप) असं असल्यामुळे त्याला सैन्यात आणि समाजात मानाचं स्थान असावं. “तो पुष्कळ लोकांना दान द्यायचा.” (प्रे. कार्यं १०:२) यहोवाने प्रेषित पेत्रला त्याच्याकडे आनंदाचा संदेश सांगायला पाठवलं. पण कर्नेल्यच्या समाजातल्या स्थानामुळे त्याने बाप्तिस्मा घ्यायला उशीर केला का?
१२. कर्नेल्यला बाप्तिस्मा घ्यायला कशामुळे मदत झाली?
१२ कर्नेल्यला बाप्तिस्मा घ्यायला कशामुळे मदत झाली? बायबलमध्ये आपण वाचतो, की “तो आणि त्याचं संपूर्ण घराणं देवाला भिऊन वागायचं.” आणि कर्नेल्य देवाला नेहमी याचना करायचा. (प्रे. कार्यं १०:२) जेव्हा पेत्रने त्याला आनंदाचा संदेश सांगितला तेव्हा त्याने आणि त्याच्या कुटुंबाने ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि लगेच बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कार्यं १०:४७, ४८) कर्नेल्यला आणि त्याच्या कुटुंबाला सोबत मिळून यहोवाची उपासना करायची होती. त्यामुळे लागणारे सगळे बदल करायला तो तयार होता.—यहो. २४:१५; प्रे. कार्यं १०:२४, ३३.
१३. कर्नेल्यकडून आपण कोणते महत्त्वाचे धडे शिकतो?
१३ शौलप्रमाणे कर्नेल्यही समाजातल्या त्याच्या स्थानामुळे, ख्रिस्ती बनायला नकार देऊ शकला असता. पण त्याने असं होऊ दिलं नाही. सत्य स्वीकारण्यासाठी कदाचित तुम्हालाही तुमच्या जीवनात मोठमोठे बदल करावे लागतील. पण असं असलं तरी यहोवा तुम्हाला नक्की मदत करेल. बायबलच्या स्तरांनुसार जीवन जगायच्या तुमच्या निश्चयावर तो नक्की आशीर्वाद देईल.
१४. सुयोशीच्या उदाहरणातून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
१४ जपानमध्ये राहणाऱ्या सुयोशी नावाच्या भावाचा विचार करा. बाप्तिस्म्यासाठी पात्र ठरायला त्याला त्याच्या कामाच्या ठिकाणी एक मोठा बदल करावा लागला. तो लोकांना इकोनोबो कला शिकवणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा सहायक होता. या शाळेत फुलांची सजावट कशी करायची हे शिकवलं जातं. जेव्हा काही अंत्यविधी असायचे तेव्हा मुख्याध्यापक तिथे जाऊन फुलांची सजावट करायचे आणि बौद्ध रितीरिवाज पाळायचे. पण जेव्हा त्यांना तिथे जायला जमायचं नाही, तेव्हा त्यांच्या जागी सुयोशी तिथे जायचा आणि ते रितीरिवाज पाळायचा. मग सुयोशीला बायबलमधून मृत्यूबद्दलचं सत्य समजलं. त्याला कळलं की जर तो हे रितीरिवाज पाळत राहिला तर तो बाप्तिस्मा घेऊ शकणार नाही. म्हणून त्याने स्वतःहून हे रितीरिवाज न करायचा निर्णय घेतला. (२ करिंथ. ६:१५, १६) याबद्दल तो मुख्याध्यापकांशी बोलला. याचा परिणाम काय झाला? मुख्याध्यापकांनी त्याला सांगितलं की त्याला हे रितीरिवाज पाळायची गरज नाही आणि तो नोकरी करत राहू शकतो. बायबल अभ्यास सुरू केल्याच्या जवळपास एका वर्षानंतर त्याचा बाप्तिस्मा झाला. जर यहोवाला खूश करण्यासाठी तुम्हालाही तुमच्या नोकरीत बदल करावा लागला, तर तो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा नक्की पुरवेल याची तुम्ही खातरी ठेवू शकता.—स्तो. १२७:२; मत्त. ६:३३.
करिंथमधल्या लोकांचा बाप्तिस्मा
१५. बाप्तिस्मा घेण्यासाठी करिंथमधल्या लोकांपुढे कोणते अडथळे होते?
१५ बायबलच्या काळात करिंथ शहरात राहणारे बरेच लोक पैशांवर प्रेम करायचे आणि अनैतिक जीवन जगायचे. त्यांच्यातले बरेच जण अशा प्रकारचं जीवन जगायचे जे देवाला मुळीच आवडत नाही. यावरून हे स्पष्टच आहे की अशा वातावरणात कोणालाही आनंदाचा संदेश स्वीकारणं खूप कठीण गेलं असतं. असं असूनही प्रेषित पौल त्या शहरात गेला आणि त्याने तिथे ख्रिस्ताबद्दलच्या आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला. त्यामुळे करिंथमधल्या “बऱ्याच लोकांनी विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला.” (प्रे. कार्यं १८:७-११) त्यानंतर येशू ख्रिस्ताने पौलला एक दृष्टान्त दिला आणि म्हणाला: “या शहरात माझे आणखी बरेच लोक आहेत.” म्हणून पौल तिथे आणखी दीड वर्षं प्रचार करत राहिला.
१६. करिंथमधल्या काही जणांना बाप्तिस्म्याच्या आड येणाऱ्या अडथळ्यांवर मात करायला कशामुळे मदत झाली? (२ करिंथकर १०:४, ५)
१६ करिंथमधल्या लोकांना बाप्तिस्मा घ्यायला कशामुळे मदत झाली? (२ करिंथकर १०:४, ५ वाचा.) देवाच्या वचनामुळे आणि त्याच्या पवित्र शक्तीच्या ताकदीमुळे ते आपल्या जीवनात मोठमोठे बदल करू शकले. (इब्री ४:१२) करिंथमधल्या लोकांनी ख्रिस्ताबद्दलचा आनंदाचा संदेश स्वीकारला. त्यामुळे ते दारुडेपणा, चोरी आणि समलैंगिकता यांसारख्या वाईट सवयीसुद्धा सोडून देऊ शकले.—१ करिंथ. ६:९-११.a
१७. करिंथमधल्या लोकांकडून तुम्ही काय शिकू शकता?
१७ लक्ष द्या, करिंथमधल्या काहींना सहजासहजी न सुटणाऱ्या वाईट सवयी होत्या. पण त्यांनी असा विचार केला नाही की त्यांना ख्रिस्ती बनणं कठीण होईल. सर्वकाळाच्या जीवनाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर चालण्यासाठी त्यांनी मनापासून मेहनत घेतली. (मत्त. ७:१३, १४) बाप्तिस्मा घेता यावा म्हणून एखादी वाईट सवय सोडण्यासाठी तुम्हीही लढत आहात का? असं असेल, तर हार मानू नका. वाईट इच्छेवर मात करायला यहोवाने तुम्हाला त्याची पवित्र शक्ती द्यावी म्हणून त्याला कळकळून विनंती करा.
१८. मोनिकाच्या उदाहरणातून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
१८ जॉर्जियामध्ये राहणाऱ्या मोनिकाला बाप्तिस्मा घ्यायचा होता. म्हणून त्यासाठी तिने घाणेरडी भाषा आणि चुकीचं मनोरंजन सोडायला खूप मेहनत घेतली. ती म्हणते: “या सवयी सोडून द्यायला प्रार्थनेमुळे मला ताकद मिळाली. यहोवाला माहीत होतं की मला योग्य ते करायचंय. म्हणून तो मला नेहमी मदत करायचा आणि मार्गदर्शन करायचा.” मोनिकाने वयाच्या सोळाव्या वर्षी बाप्तिस्मा घेतला. यहोवाच्या इच्छेप्रमाणे त्याची सेवा करता यावी म्हणून तुम्हालाही काही वाईट सवयी सोडायच्या आहेत का? असं असेल, तर बदल करण्यासाठी त्याच्याकडे ताकद मागत राहा. कारण तो मागणाऱ्यांना उदारपणे पवित्र शक्ती देतो.—योहा. ३:३४.
विश्वासामुळे तुम्ही पर्वत हालवू शकता
१९. डोंगरांसारखे अडथळे पार करायला तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल? (चित्रसुद्धा पाहा.)
१९ यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्ही त्याच्या कुटुंबाचा भाग बनावा अशी त्याची इच्छा आहे या गोष्टीची खातरी बाळगा. बाप्तिस्मा घेण्यासाठी तुमच्यासमोर कितीही अडथळे आले तरीही ही गोष्ट खरी आहे. पहिल्या शतकातल्या आपल्या काही शिष्यांना येशूने असं म्हटलं: “जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याइतकाही विश्वास असला, तर तुम्ही या डोंगराला ‘इथून तिथे जा’ असं म्हणाल आणि तो जाईल. आणि कोणतीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नसेल.” (मत्त. १७:२०) ही गोष्ट ऐकताना त्याच्यापुढे जे होते ते काही वर्षांपासूनच त्याच्यासोबत होते. आणि त्यांना त्यांचा विश्वास अजून वाढवायची गरज होती. पण येशूने त्यांना अशी खातरी दिली, जर त्यांनी आपला विश्वास वाढवला तर यहोवा त्यांना डोंगरांसारखे अडथळे पार करायला मदत करेल. आणि असेच अडथळे पार करायला यहोवा तुम्हालाही मदत करेल.
यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही त्याच्या कुटुंबाचा भाग बनावं, अशी त्याची इच्छा आहे याची खातरी बाळगा (परिच्छेद १९ पाहा)b
२०. या लेखात दिलेल्या पहिल्या शतकातल्या आणि आजच्या काळातल्या भाऊबहिणींच्या उदाहरणामुळे तुम्हाला कसं प्रोत्साहन मिळालं?
२० जर बाप्तिस्मा घेण्यापासून एखादी गोष्ट तुम्हाला रोखत असेल, तर ती काढून टाकण्यासाठी लगेच पावलं उचला. पहिल्या शतकातल्या आणि आजच्या काळातल्या भाऊबहिणींच्या उदाहरणामुळे तुम्हाला सांत्वन आणि ताकद मिळेल. त्यांच्या उदाहरणामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळावं आणि तुम्ही आपलं जीवन यहोवाला समर्पित करून बाप्तिस्मा घ्यावा हीच आमची इच्छा आहे. तुम्ही खातरी ठेवू शकता की तुम्ही घेतलेला हा निर्णय सर्वात चांगला निर्णय असेल!
गीत ३८ तो तुला बळ देईल
a ‘बाप्तिस्मा घ्यायला तुम्ही का उशीर लावत आहात?’ हा jw.org वरचा व्हिडिओ पाहा.
b चित्राचं वर्णन: काही भाऊबहीण नुकताच बाप्तिस्मा झालेल्यांचं स्वागत करत आहेत.