‘तुमचा प्रकाश लोकांसमोर पडू द्या’
१. आपल्याला कोणता बहुमान मिळाला आहे?
१ तांबडे फुटल्यापासून संध्याकाळी अंधार पडेपर्यंत असलेल्या प्रकाशाचे सौंदर्य यहोवा देवाचे स्तुती करते. पण येशू आपल्या शिष्यांना, एक वेगळ्या प्रकारचा प्रकाश—‘जीवनाचा प्रकाश’ बाळगण्याचे आमंत्रण देत होता. (योहा. ८:१२) हा आध्यात्मिक प्रकाश प्राप्त होणे एक खूप मोठा बहुमान आहे पण त्याचबरोबर आपल्यावर एक मोठी जबाबदारीदेखील येते. याबाबतीत येशूने अशी सूचना दिली: “तुमचा प्रकाश लोकांसमोर . . . पडू द्या,” आणि याचा इतरांना फायदा होणार होता. (मत्त. ५:१६) आज सगळीकडे आध्यात्मिक अर्थाने अंधार पसरला असल्यामुळे आपण इतरांना हा आध्यात्मिक प्रकाश दाखवला पाहिजे आणि असे करणे सध्या खूप निकडीचे आहे. ख्रिस्ताप्रमाणे आपणही आपला प्रकाश लोकांपुढे कसा पाडू शकतो?
२. आध्यात्मिक प्रकाश दिल्याने लोकांना फायदा होणार आहे याचे महत्त्व येशूने कसे दाखवून दिले?
२ प्रचार करण्याद्वारे: जेथे कोठे लोक भेटतील, मग ते त्यांच्या घरी असोत, चौकात असोत, डोंगरमाथ्यावर असोत, त्यांना सत्याचा प्रकाश देण्याकरता येशूने आपला सर्व वेळ, आपली सर्व शक्ती आणि आपली सर्व कौशल्ये पणाला लावली. लोकांना खरा आध्यात्मिक प्रकाश दिल्याने त्यांना किती फायदा होणार होता, हे त्याला माहीत होते. (योहा. १२:४६) अधिकाधिक लोकांना आध्यात्मिक प्रकाश मिळावा म्हणून येशूने आपल्या शिष्यांनाही “जगाचा प्रकाश” बनण्यास तयार केले. (मत्त. ५:१४) लोकांसाठी चांगली कृत्ये करून व देवाबद्दलच्या सत्य गोष्टी सांगून या शिष्यांनी लोकांवर आपला प्रकाश पाडला.
३. सत्याच्या प्रकाशाबद्दल खरी कृतज्ञता आपण कशी व्यक्त करू शकतो?
३ देवाचे लोक, “प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला,” ही त्यांना मिळालेली जबाबदारी गांभीर्याने घेतात. त्यामुळे जेथे कोठे लोक भेटतात तेथे ते त्यांना देवाच्या राज्याविषयी सांगतात. (इफिस. ५:८) कामाच्या किंवा शाळेच्या मधल्या सुटीत एका अशा जागी बसून—जेथे लोक सहजपणे आपल्याला पाहू शकतात—बायबल किंवा आपले एखादे प्रकाशन वाचले तर लोक स्वतःहूनच आपल्याबरोबर चर्चा सुरू करतील. अशाच रीतीने एका तरुण भगिनीने एक बायबल अभ्यास सुरू केला व तिच्या वर्गातल्या १२ मुलामुलींना तिने आपल्या संस्थेची पुस्तके दिली.
४. ‘इतरांवर प्रकाश पाडण्यात’ आपल्या उत्तम वर्तनाचादेखील समावेश होतो, हे कसे?
४ आपल्या सत्कृत्यांद्वारे: आपल्या रोजच्या वर्तनाद्वारेही आपण इतरांवर प्रकाश पाडू शकतो. (इफिस. ५:९) कामाच्या ठिकाणी, शाळेत आणि सार्वजनिक ठिकाणी असताना, लोक आपले ख्रिस्ती वर्तन पाहतातच व यामुळे आपल्याला बायबलमधील सत्ये सांगण्याची संधी मिळते. (१ पेत्र २:१२) जसे की, पाच वर्षांच्या एका मुलाचे वर्तन पाहून त्याची शिक्षिका इतकी प्रभावित झाली की तिने त्याच्या आईवडिलांना बोलावून घेतले व त्यांना म्हणाली, “बरोबर काय आणि वाईट काय यांतला फरक कळत असलेल्या इतक्या लहान मुलाला मी आजपर्यंत पाहिले नव्हते!” होय, आपल्या सेवेमुळे आणि आपल्या उत्तम वर्तनामुळे लोक ‘जीवनाच्या प्रकाशाकडे’ आकर्षित होतात आणि आपल्या देवाची स्तुती करतात.