स्मारक विधीची तयारी करण्यात कोणतीच कसूर करू नका
दर वर्षी, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारक विधी पार पाडण्याकरता आपण सर्व जण एकत्र येतो. त्या दिवशी संध्याकाळी होणाऱ्या या विधीची उत्तम तयारी करणे हा ख्रिस्ताच्या अनुयायांसाठी एक बहुमान व आनंदाचे कारण आहे. (लूक २२:१९) स्मारक विधीची तयारी करण्याकरता आपण कोणती व्यावहारिक पावले उचलू शकतो?
◼ वेळ आणि स्थान: स्मारक विधी केव्हा व कोठे पार पाडला जाईल याची नेमकी वेळ आणि स्थान प्रत्येकाला माहीत असले पाहिजे. एकापेक्षा जास्त मंडळ्या, एकाच राज्य सभागृहात स्मारक विधी पार पाडणार असतील तर सर्वांनी वेळेवर येणे व विधी संपल्यावर शिस्तीने बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. कारण, दोन सभांच्या दरम्यान वेळ फार कमी असतो. प्रवेशद्वारात, लॉबीमध्ये, फूटपाथवर किंवा पार्किंगच्या ठिकाणी अनावशयक गर्दी करण्याचे टाळा.
◼ आमंत्रण पत्रिका: सर्व प्रचारकांकडे आमंत्रण पत्रिकांचा पुरेसा साठा आहे का व ही आमंत्रण पत्रिका प्रत्येकाने वाचून काढली आहे का? आमंत्रण पत्रिका कशी सादर करावी याचा तुम्ही सराव केला आहे का? तुम्ही कोणाकोणाला आमंत्रण पत्रिका द्याल? मंडळीजवळ असलेल्या सर्व आमंत्रण पत्रिका देण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करा.
◼ येण्या-जाण्याची व्यवस्था: काही आस्थेवाईक लोकांना व बंधूभगिनींना स्मारक विधीला येण्या-जाण्यासाठी किंवा इतर काही मदतीची गरज भासू शकते. अशा लोकांना मदत करण्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे?
◼ बोधचिन्हे: स्मारक विधीची बोधचिन्हे सूर्यास्तापूर्वी फिरवली जाणार नाहीत याची खात्री करा. आजारपणामुळे स्मारक विधीला येऊ न शकणाऱ्या अभिषिक्त बांधवांना बोधचिन्हे देण्याची व्यवस्था करण्यात यावी. विधीकरता लागणारी उचित भाकर व द्राक्षारस तयार करण्यात यावा.—टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, २००३, पृष्ठे १४-१५ परिच्छेद १४, १७ पाहा.
◼ राज्य सभागृह: स्मारक विधी होण्याच्या बऱ्याच आधी राज्य सभागृहाची चांगली स्वच्छता करण्यात यावी. विधीसाठी लागणारे प्लेट्स, वाईन कप्स किंवा वाईन ग्लासेस तसेच चांगला टेबल व टेबल क्लॉथ या सर्व गोष्टी विधी सुरू होण्याआधीच उचित ठिकाणी मांडून ठेवाव्यात. स्मारक विधी, सभागृहात न होता दुसरीकडे कोठे होणार असेल तर तेथील साऊंड सिस्टम उत्तम आहे याची खात्री करा, जेणेकरून उपस्थित असलेल्या सर्वांना वक्त्याचे भाषण व्यवस्थित ऐकता येईल. अटेन्डेन्ट व बोधचिन्हे फिरवणाऱ्या बांधवांची आधीच निवड करा तसेच त्यांच्या जबाबदाऱ्या, कार्यक्रमाची पद्धत आणि सभ्य व शालीन पेहराव अशा सर्व गोष्टींची त्यांना आधीच माहिती द्या.
या सर्वात महत्त्वाच्या प्रसंगाची अर्थात येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीची तयारी करण्यात वैयक्तिकपणे व मंडळी या नात्याने आपण कोणतीच कसूर करू इच्छित नाही. यहोवाने आपला परमप्रिय प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या बलिदानाकरवी सबंध मानवजातीसाठी केलेल्या तरतुदीबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता दाखवणाऱ्या सर्वांना तो भरपूर आशीर्वाद देईल याची आपण खात्री बाळगू शकतो.