बायबल अभ्यास सादर करण्याकरता एक खास दिवस
१ जानेवारीपासून प्रत्येक मंडळी, महिन्यातल्या शनिवार-रविवार या जोड सुट्ट्यांतून कुठला तरी एक दिवस खास, बायबल अभ्यास सादर करण्याकरता ठरवेल. महिन्यातली कदाचित पहिली जोडसुटी म्हणजे पहिल्या शनिवारी अथवा पहिल्या रविवारी, स्थानिक परिस्थितीनुसार जे उचित असेल त्यानुसार ही व्यवस्था केली जाईल. त्यादिवशी, काही घरमालकांनी, बायबल अभ्यास नाकारला तरी प्रचारक त्यांना बायबल काय शिकवते पुस्तक किंवा नवीन नियतकालिके देतील. बायबल अभ्यास सुरू करण्याच्या या कार्यात मंडळीतल्या सर्व वडिलांनी व सेवा सेवकांनी भरभरून भाग घ्यावा आणि प्रचारकांनाही मदत करावी.
२ मंडळीची सेवा समिती, महिन्यातल्या जोडसुटीतील कोणत्या दिवशी हे कार्य करायचे ते ठरवेल. या कार्यासंबंधाने मंडळीत वेळोवेळी आठवण करून दिली पाहिजे जेणेकरून प्रचारक यात भाग घेण्याकरता तयारी करू शकतील आणि घरोघरच्या कार्यात तसेच ज्यांनी आधी आस्था दाखवली आहे अशांना बायबल अभ्यास सादर करण्याचा खास प्रयत्न करतील.
३ तयारी कशी करायची: जानेवारी २००६ च्या आमची राज्य सेवा यातील पुरवणीत तसेच रिझनींग पुस्तकाच्या १२ व्या पानावर, बायबल अभ्यास कसे सुरू करायचे त्याबद्दल काही सूचना देण्यात आल्या आहेत. काही प्रचारक कदाचित जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? या सारख्या पत्रिकेचा उपयोग करून बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करतील. तसेच, ज्यांनी मासिके स्वीकारली आहेत त्यांच्याबरोबर बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल, त्याबाबतीत ऑगस्ट २००७ च्या आमची राज्य सेवा यातील ३ ऱ्या पानावर काही सूचना देण्यात आल्या आहेत. वडील आणि सेवा सेवकांना क्षेत्र सेवेची १० ते १५ मिनिटांची संक्षिप्त सभा घेण्यासाठी आधीच नेमले जाईल. या सभेत, बायबल अभ्यास सुरू करण्याकरता सुचवण्यात आलेल्या एक अथवा दोन व्यावहारिक मार्गांची चर्चा करावी अथवा प्रात्यक्षिक करून दाखवावे. क्षेत्र सेवेत भाग घेताना दक्ष राहण्याच्या व समंजसपणा बाळगण्याच्या बाबतीत अलीकडच्या आमची राज्य सेवा यात देण्यात आलेल्या सूचना लक्षात ठेवल्या पाहिजेत.
४ अर्थात, सर्वच लोक बायबल अभ्यासाचा प्रस्ताव स्वीकारणार नाहीत किंवा अभ्यास पुढे चालू ठेवणार नाहीत. पण यामुळे आपण, लोकांपुढे अभ्यासाचा प्रस्ताव मांडण्याचे थांबवू नये. कारण, मेंढरासमान लोकांना आपल्या संघटनेकडे आकर्षित करणारा यहोवा आहे. (योहान ६:४४) आपले काम फक्त सत्याचे बी पेरणे इतकेच नाही तर, बी पेरल्यावर त्याची मशागत करणे व जेव्हा ते मूळ धरते तेव्हा त्याला पाणी घालणे हेही आहे. म्हणजे, जे लोक आवड दाखवतात, त्यांची आस्था आणखी वाढवून त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास सुरू करणे. असे केल्यानेच आपल्याला देवाचे सहकारी होण्याचा बहुमान मिळू शकेल.—१ करिंथकर ३:९.