“कृतज्ञ असा”
१ येशूने दहा कुष्ठरोग्यांना बरे केले तेव्हा त्यांच्यापैकी केवळ एक जण येशूचे आभार मानण्याकरता परत आला. येशूने त्याला विचारले: “दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत?” (लूक १७:११-१९) यावरून दिसून येते की यहोवा देवाने, अर्थात आपल्या उदार व प्रेमळ स्वर्गीय पित्याने आपल्याला दिलेल्या प्रत्येक उत्तम देणगीबद्दल व प्रत्येक पूर्ण दानाबद्दल कृतज्ञ असणे आणि ही कृतज्ञता व्यक्त करणे किती महत्त्वाचे आहे!—कलस्सै. ३:१५; याको. १:१७.
२ आपण ज्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत? खंडणी ही देवाने मानवजातीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे आणि या देणगीबद्दल आपण त्याचे मनापासून आभारी आहोत. (योहा. ३:१६) तसेच, यहोवाने आपल्याला त्याच्याकडे आकर्षिले यासाठीही आपण त्याचे ऋणी आहोत. (योहा. ६:४४) देवाला कृतज्ञ असण्याचे आणखी एक कारण म्हणजे ख्रिस्ती मंडळीतील ऐक्य. (स्तो. १३३:१-३) अर्थातच, यहोवाने आपल्याला आणखीही अनेक देणग्या दिल्या आहेत. आपण या सर्व देणग्यांबद्दल नेहमी कृतज्ञ मनोवृत्ती बाळगली पाहिजे. यहोवाने केलेली महत्कृत्ये विसरून गेलेल्या इस्राएली लोकांप्रमाणे आपण कधीही होऊ नये.—स्तो. १०६:१२, १३.
३ कृतज्ञता व्यक्त करा: येशूने आपल्याकरता जे केले, त्याबद्दल कदाचित दहाही कुष्ठरोग्यांना मनोमन कृतज्ञता वाटली असेल, पण त्यांच्यापैकी केवळ एकाने आपली कृतज्ञता व्यक्त केली. (लूक १७:१५) त्याच प्रकारे आपणही सेवाकार्यात आवेशाने सहभाग घेण्याद्वारे आपली कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने आपल्याकरता जे काही केले आहे त्याबद्दल जर आपण खरोखरच कृतज्ञ असू, तर इतरांना त्याच्याविषयी सांगण्याद्वारे त्याच्या प्रेमाचे व उदार मनोवृत्तीचे अनुकरण करण्यास आपले मन आपोआपच प्रवृत्त होईल. (लूक ६:४५) आणि जेव्हा आपण यहोवाच्या ‘अद्भुत कृत्यांबद्दल व आपल्याविषयीच्या त्याच्या विचारांबद्दल’ लोकांना सांगू, तेव्हा त्याच्याप्रती आपले प्रेम व कृतज्ञता वाढतच जाईल.—स्तो. ४०:५.
४ इतरांनाही कृतज्ञ असण्यास प्रोत्साहित करा: आपल्या मुलांना व आपण ज्यांच्यासोबत बायबल अभ्यास करतो त्या व्यक्तींना कृतज्ञ मनोवृत्ती विकसित करण्यास कशी मदत करता येईल याविषयी आपण सतत जागरूक राहिले पाहिजे. आईवडिलांना आपल्या मुलांच्या मनात कृतज्ञ मनोवृत्ती रुजवण्याच्या अनेक संधी मिळतात. उदाहरणार्थ, यहोवाने निर्माण केलेल्या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना ते असे करण्याचा प्रयत्न करू शकतात. (रोम. १:२०) बायबल अभ्यास घेताना, आपण विद्यार्थ्याला असे विचारू शकतो, “या माहितीवरून यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळते?” अभ्यास करणाऱ्या व्यक्तीच्या मनातली कृतज्ञता जसजशी वाढत जाईल, तसतसे देवावरचे त्याचे प्रेम व देवाच्या आज्ञांनुसार वागण्याची त्याची इच्छाही वाढत जाईल.
५ या शेवटल्या काळात बहुतेकजणांची कृतघ्न मनोवृत्ती, म्हणजेच दुसऱ्यांनी केलेले उपकार विसरून जाण्याची मनोवृत्ती आहे. (२ तीम. ३:१, २) पण अशा लोकांमध्ये राहत असतानाही, यहोवाचे समर्पित सेवक, सेवाकार्यात उत्साहीपणे सहभाग घेण्याद्वारे आपली कृतज्ञता व्यक्त करतात हे पाहून यहोवाला किती आनंद होत असेल!—याको. १:२२-२५.