सेवाकार्यात प्रगतीशील असा
१ आपण आध्यात्मिक प्रगती करतो तेव्हा आपल्या स्वर्गीय पित्याला आनंद वाटतो. आध्यात्मिक प्रगती करण्यात, सुवार्ता प्रचाराच्या कार्यात परिपक्व व परिणामकारक होण्याचा प्रयत्न करणेही समाविष्ट आहे. पर्यवेक्षकपदी कार्य करणाऱ्या तीमथ्याला पौलाने असे प्रोत्साहन दिले की त्याने आपली प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून सतत प्रयत्नशील असावे. (१ तीम. ४:१३-१५) तेव्हा, आपण बऱ्याच काळापासून प्रचारक असलो तरी, आपण सर्वांनीच आपल्या सेवेचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करू नये का?
२ वैयक्तिक ध्येये ठेवणे: प्रगती करण्यासाठी आपण वैयक्तिक ध्येये ठेवली पाहिजे. कोणत्या प्रकारची ध्येये आपल्याला ठेवता येतील? आत्म्याची तलवार, अर्थात बायबल वापरण्यात आणखी निपुण होण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. (इफिस. ६:१७) कदाचित एखाद्या विशिष्ट पद्धतीने सेवाकार्य करण्यात आपल्याला प्रगती करण्याची गरज असू शकते. उदाहरणार्थ रस्त्यावर, टेलिफोनद्वारे किंवा बिझनेस क्षेत्रातील सेवाकार्य आणखी परिणामकारक रीत्या करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तसेच, पुनर्भेटी आणखी चांगल्या रीतीने कशा हाताळता येतील या दृष्टीनेही आपण प्रयत्न करू शकतो. बायबल अभ्यास सुरू करण्याची व ते चालवण्याची आपली क्षमता वाढवणे हे देखील एक उत्तम ध्येय आहे.
३ ध्येये गाठण्यास साहाय्य करणाऱ्या तरतुदी: मंडळीच्या सभा, विशेषतः ईश्वरशासित सेवा प्रशाला व सेवा सभा आपल्याला सुवार्तेचे प्रचारक या नात्याने प्रगती करण्यास साहाय्य करण्याच्या दृष्टीनेच तयार केल्या जातात. या सभांची तयारी करण्याचा, त्यांना उपस्थित राहण्याचा तसेच या सभांतून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचा आपण जितका जास्त प्रयत्न करू तितकाच आपल्याला त्यांपासून फायदा होईल.—२ करिंथ. ९:६.
४ आपण सर्वांनीही एकमेकांना प्रगती करण्यास साहाय्य केले पाहिजे. (नीति. २७:१७) सेवाकार्यात आपण ज्यांच्यासोबत काम करतो, ते कशा प्रकारे सुवार्ता सादर करतात हे लक्ष देऊन ऐकल्यास आपल्याला सुधारणा करण्यास साहाय्य मिळेल. तसेच, आपल्या पुस्तक अभ्यास गटाचे पर्यवेक्षक आपल्याला वैयक्तिक पातळीवर साहाय्य मिळावे म्हणून काही खास व्यवस्था करू शकतात. सेवाकार्यात अधिक परिणामकारक होण्यास व आपली सेवा अधिक आनंददायक बनवण्यास एखाद्या अनुभवी पायनियरने किंवा प्रचारकाने आपल्याला वैयक्तिक रीत्या साहाय्य केल्यास ते नक्कीच आपल्याकरता एक वरदान ठरेल! आपल्या पुस्तक अभ्यास गटात एखादा नवीन प्रचारक आहे का? असल्यास, आपण पुढाकार घेऊन अशा प्रचारकाला आपल्यासोबत क्षेत्र सेवेस येण्याविषयी विचारू शकतो.
५ ख्रिस्ती सेवाकार्य हे आजच्या काळात केले जात असलेले सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. या कार्यात सहभागी होण्याद्वारे आपण यहोवाला “स्तुतीचा यज्ञ” अर्पण करतो. पण, आपण त्याला सर्वात उत्तम प्रतीचा यज्ञ अर्पण करू इच्छितो. (इब्री १३:१५) म्हणूनच, आपण आपल्या सेवाकार्यात प्रगतीशील असण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यास, आपण ‘सत्याचे वचन नीट सांगणारे, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेले’ उत्तम कामकरी ठरू.—२ तीम. २:१५.