गोरगरिबांना आशा द्या
१ येशूने गरिबांबद्दल विशेष आस्था व्यक्त केली. काही प्रसंगी त्याने चमत्कार करून लोकांना भौतिक साहाय्य पुरवले व रोग्यांना बरे केले. पण त्याने आपले लक्ष्य मुख्यतः गरिबांना “सुवार्ता” घोषित करण्यावर केंद्रित केले. (मत्त. ११:५) आजही ख्रिस्ती सेवाकार्याचा गरिबांसोबतच इतरांनाही फायदा होत आहे.—मत्त. २४:१४; २८:१९, २०.
२ खरी आशा: ख्रिस्ती धर्मजगताचे सेवक बरेचदा गरिबांना असे आश्वासन देतात की जर त्यांनी चर्चला उदार देणग्या दिल्या तर त्यांना आर्थिक समृद्धी लाभेल. पण बायबल असे शिकवते की केवळ देवाचे राज्यच गरिबीचा अंत करून मानवजातीच्या सर्व समस्या नाहीशा करेल. (स्तो. ९:१८; १४५:१६; यश. ६५:२१-२३) बायबल खरोखर काय शिकवते हे गरिबांना दाखवण्याद्वारे आपण त्यांना आशा देतो आणि त्यांची आध्यात्मिक गरज पूर्ण करण्यास त्यांना मदत करतो.—मत्त. ५:३.
३ येशूच्या काळातले परूशी लोक गोरगरिबांना तुच्छ लेखत. ते त्यांना तिरस्काराने आम्हारेट्स म्हणजे “धरतीचे लोक” असे म्हणून संबोधत. पण येशूच्या नजरेत मात्र “त्यांचे रक्त” अर्थात त्यांचे जीवन “अमोल” होते. (स्तो. ७२:१३, १४) आपणही अशा गोरगरिबांशी दयाळू व सहानुभूतीने वागण्याद्वारे त्यांचा ‘सन्मान’ करू शकतो व येशूचे अनुकरण करू शकतो. (नीति. १४:३१) जे लोक गरीब वस्त्यांमध्ये राहतात त्यांच्याविषयी आपण कधीही तिरस्काराने बोलू नये किंवा त्यांना साक्ष देण्याविषयी कधीही उदासीन वृत्ती दाखवू नये. राज्याच्या संदेशाला प्रतिसाद देत असलेल्यांमध्ये बहुतेकजण गरीबच आहेत.
४ आता मदत करा: आपण आपल्या क्षेत्रातल्या गरीब लोकांना बायबलमधील तत्त्वांविषयी शिकवतो तेव्हा त्यांना आताच गरिबीचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत मिळते. उदाहरणार्थ, बायबल दारूडेपणा, जुगार, आळशीपणा, तंबाखूचा वापर आणि गरिबीला कारणीभूत ठरणाऱ्या इतर सवयींची निर्भर्त्सना करते. (नीति. ६:१०, ११; २३:२१; २ करिंथ. ७:१; इफिस. ५:५) त्याऐवजी, बायबलमध्ये प्रामाणिकपणा व “जिवेभावे” काम करणे यांसारख्या गुणांना प्रोत्साहन दिले आहे. सहसा कामगारांमध्ये याच गुणांची अपेक्षा केली जाते. (कलस्सै. ३:२२, २३; इब्री १३:१८) किंबहुना, एका सर्वेक्षणात बहुतेक कंपन्यांच्या मालकांना नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांमध्ये प्रामाणिकपणा व खरेपणा हेच गुण सर्वात जास्त प्रभावित करणारे असतात असे दिसून आले.
५ यहोवा गरिबांच्या दुःखाकडे कानाडोळा करत नाही. लवकरच येशू ख्रिस्त ‘धावा करणाऱ्या दरिद्री’ लोकांना सोडवेल. (स्तो. ७२:१२) तोपर्यंत आपल्याला इतरांना व त्यांसोबतच गरिबांनासुद्धा बायबलमधील आशादायक संदेशाच्या साहाय्याने सांत्वन देण्याचा बहुमान मिळाला आहे.