आपल्या सेवाकार्यात ख्रिस्ताचे अनुकरण करा
१ आपले सेवाकार्य पार पाडत असताना आपल्याला अनुकरण करता येईल असे एक उदाहरण येशूने पुरवले. त्याला देवाबद्दल आणि लोकांबद्दल मनापासून प्रेम होते हे कित्येक प्रसंगी आणि कित्येक मार्गांनी दिसून आले. त्याने नम्र लोकांना सत्याचे ज्ञान दिले आणि जे पीडित व तुच्छ लेखलेले लोक होते त्यांच्याकरता त्याने दयाळू व प्रेमळ कृत्ये केली.—मत्त. ९:३५.
२ येशूचे उदाहरण व शिकवणुकी: येशूने राजकीय घडामोडींत, निव्वळ समाजसेवेच्या उपक्रमांत किंवा समाजसुधार घडवून आणण्यात स्वतःला गुंतवून आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. तसेच त्याने इतरांच्या चांगल्या हेतूंमुळे किंवा प्रयत्नांमुळेही आपल्या सर्वात महत्त्वाच्या कार्यावरून आपले लक्ष हटू दिले नाही. (लूक ८:१) तर देवाचे राज्य मानवजातीच्या सर्व समस्यांवर एकच कायमचा उपाय आहे, ही सुवार्ता सर्वदूर पसरवण्यावर त्याने आपले लक्ष केंद्रित केले. येशूसमोर एक विशाल कार्य होते आणि ते साध्य करण्याकरता त्याच्याजवळ मर्यादित वेळ होता. कफर्णहूमच्या लोकांनी त्याला आपल्याच गावात राहण्याचा आग्रह केला तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना म्हटले: “आपण दूसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे.”—मार्क १:३८.
३ शिष्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर येशूने त्यांना ही स्पष्ट सूचना देऊन पाठवले की, “अशी घोषणा करीत जा, की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” (मत्त. १०:७) त्याने आपल्या अनुयायांना, राज्याच्या कार्याला जीवनात प्राधान्य देण्यास शिकवले. (मत्त. ६:३३) स्वर्गात जाण्याअगोदर येशूने आपल्या शिष्यांना उद्देशून बोललेल्या शेवटल्या शब्दांवरून स्पष्ट केले की त्यांनी काय करायचे होते. त्याने म्हटले: “जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा.”—मत्त. २८:१९.
४ राज्याचे महत्त्व: येशूच्या चर्चेचा प्रमुख विषय देवाचे राज्य हाच होता. आणि त्याने शिष्यांनाही आपल्या उदाहरणाचे अनुकरण करण्याचे उत्तेजन दिले. मानवजातीच्या समस्या मनुष्याच्या प्रयत्नांनी कधीही सुटणार नाहीत. (यिर्म. १०:२३) केवळ देवाचे राज्यच देवाचे नाव पवित्र करून मानवजातीला सर्व समस्यांपासून मुक्त करेल. (मत्त. ६:९, १०) जे लोक “आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप” करत आहेत त्यांना राज्याविषयीच्या सत्याचे ज्ञान दिल्याने आजही आनंदी व यशस्वी जीवन जगण्यास आणि भविष्याकरताही एका विश्वासार्ह आशेला धरून राहण्यास मदत मिळते.—यहे. ९:४.
५ येशू आजही देवाच्या राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्यात सक्रियरित्या सहभागी असून या कार्याला त्याचा पाठिंबा असल्याचे तो आपल्याला आश्वासन देतो. (मत्त. २८:२०) येशूने आपल्याकरता पुरवलेल्या आदर्शानुसार खरच आपण आपले सेवाकार्य पार पाडत आहोत का? (१ पेत्र २:२१) या अतिशय महत्त्वाच्या शेवटल्या दिवसांत, आपण येशूने त्याच्या सेवाकार्याद्वारे पुरवलेल्या आदर्शाचे हर तऱ्हेने अनुकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे!