आपल्या स्वाधीन केलेली संपत्ती
१ प्रचार करण्याच्या देवाने सोपवलेल्या कार्याविषयी प्रेषित पौलाला कदर होती आणि त्याने त्यास “संपत्ति” म्हटले. (२ करिंथ. ४:७) हे कार्य पार पाडण्याकरता त्याने खडतर परिस्थितीला आणि छळालाही तोंड दिले. जो कोणी भेटेल त्याला प्रचार करण्याकरता त्याने अथक परिश्रम घेतले. जमिनीवाटे व समुद्रावाटे त्याने हजारो किलोमीटरचा आणि कधीकधी तर अतिशय धोकेदायक परिस्थितीत प्रवास केला. आपल्यालाही आपल्या सेवाकार्याबद्दल अशीच कदर वाटते हे दाखवण्याकरता आपण कशाप्रकारे पौलाचे अनुकरण करू शकतो? (रोम. ११:१३) आपली ही संपत्ती इतकी अनमोल का आहे?
२ श्रेष्ठ संपत्ती: जगिक संपत्ती सहसा अतिशय दुःखदायक ठरते आणि तिचे फायदे मर्यादित व तात्कालिक आहेत. पण, आपले सेवाकार्य हे आपल्याला आणि इतरांनाही चिरकालिक फायदे मिळवून देते. (१ तीम. ४:१६) या सेवाकार्यामुळेच प्रामाणिक मनाच्या लोकांना यहोवाला जाणून घेण्याची, आपल्या जीवनात बदल करण्याची आणि सार्वकालिक जीवनाची वास्तविक आशा मिळवण्याची संधी मिळते. (रोम. १०:१३-१५) आपल्या या सेवाकार्याची जर आपण मनापासून कदर बाळगली तर आपल्याला जीवनात एक समाधानदायक उद्देश, काहीतरी साध्य केल्याची चिरकालिक संतुष्टी आणि भविष्याकरता एक आनंददायक आशा मिळेल.—१ करिंथ. १५:५८.
३ या संपत्तीबद्दल तुम्हाला कदर आहे हे दाखवा: आपण एखाद्या गोष्टीची किती कदर करतो हे त्या गोष्टीसाठी आपण काय गमवण्यास तयार आहोत यावरून दिसून येते. यहोवाची स्तुती करण्याकरता आपला वेळ व शक्ती खर्च करणे हा किती मोठा बहुमान आहे! (इफिस. ५:१६, १७) आपण ज्याप्रकारे आपला वेळ खर्च करतो त्यावरून आपल्याला भौतिक गोष्टींपेक्षा आध्यात्मिक गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात हे दिसून आले पाहिजे. आपल्याजवळ इतरांना देण्यासाठी काहीतरी मोलवान आहे या जाणिवेमुळे आपण उत्साहाने प्रचार केला पाहिजे आणि सुवार्ता सांगण्याकरता प्रत्येक संधीचा फायदा उचलण्यास आपण जागरूक असले पाहिजे.
४ अनमोल वस्तू सहसा लपवून ठेवल्या जात नाहीत तर इतरांनाही त्या पाहायला मिळाव्यात म्हणून सजवून ठेवल्या जातात. जर आपण आपल्या सेवाकार्याला अनमोल संपत्तीसारखे लेखत असू तर साहजिकच आपल्या जीवनात या सेवाकार्याला महत्त्वाचे स्थान असेल. (मत्त. ५:१४-१६) तर मग, मनःपूर्वक कृतज्ञतेने प्रेरित होऊन आपण प्रेषित पौलाचे अनुकरण करू या आणि आपल्याला आपल्या सेवाकार्याची कदर आहे, ते आपल्याकरता एका अनमोल संपत्तीसारखे आहे हे दाखवण्याकरता प्रत्येक संधीचा फायदा घेऊ या.