त्यांच्या विश्वासू सेवेचे अनुकरणीय उदाहरण
१ एकोणीसशे सदतीस साली, पूर्ण वेळेच्या सेवेचा एक नवीन प्रकार सुरू करण्यात आला—खास पायनियर सेवा. ख्रिस्ती सेवाकार्याचा अनुभव असलेल्या कार्यक्षम स्त्रीपुरुषांनी, संघटनेने नियुक्त केलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचे आव्हान स्वेच्छेने स्वीकारले. आज कित्येक दशकांनंतरही खास पायनियर विश्वासूपणे सेवा करत आहेत आणि त्यांचा विश्वासूपणा अनुकरण करण्याजोगा आहे.—इब्री ६:१२.
२ त्यांनी पुढाकार घेतला: अगदी सुरुवातीला खास पायनियरांनी फोनोग्राफ्सच्या साहाय्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रचार कार्य केले. हे हलके, वाहून नेण्याजोगे फोनोग्राफ घरमालकाच्या दाराजवळ ठेवून ते त्यावर घरमालकाला बायबलवर आधारित भाषणांच्या ध्वनिफिती ऐकवायचे. आस्था दाखवणाऱ्या लोकांना पुन्हा भेट देतानाही ते या फोनोग्राफ्सवर निरनिराळ्या ध्वनिफिती ऐकवून त्यांच्या आधारावर घरमालकाशी बायबलमधून चर्चा करायचे. ज्या ठिकाणी आधीपासूनच मंडळ्या आहेत अशा मोठ्या शहरांतच सहसा हे कार्य केले जात होते. नंतर मात्र खास पायनियरांना राज्य प्रचारकांची जेथे जास्त गरज आहे अशा क्षेत्रात पाठवले जाऊ लागले. तेथे ते आस्था दाखवणाऱ्या सर्व लोकांना पुन्हा पुन्हा भेटी देऊन बायबल अभ्यास चालवण्याचे काम करू लागले. त्यांच्या उत्साही कार्यामुळेच, शेकडो नव्या मंडळ्या स्थापन झाल्या. आणि सुवार्ता प्रसाराच्या कार्यात त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच आज संघटनेत जी अभूतपूर्व वाढ झालेली आपण पाहतो, ती होऊ शकली. (यश. ६०:२२) आजही, “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेच्या प्रसारात खास पायनियर महत्त्वाचे योगदान देत आहेत.—कलस्सै. १:२३.
३ अनुकरणीय उदाहरण: काही खास पायनियर कित्येक दशकांपासून या पूर्ण वेळेच्या सेवेत टिकून राहिले आहेत. या वर्षांदरम्यान, निरनिराळ्या प्रकारच्या परिस्थितीला तोंड देताना त्यांच्या विश्वासाची पारख झाली. पण हे निष्ठावान स्त्रीपुरुष डगमगले नाहीत. (१ पेत्र १:६, ७) विशेष गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याकरता त्यांनी स्वखुषीने भौतिक सुविधांचा व सुखसोयींचा त्याग केला. त्यांच्यापैकी काहीजण आता वृद्ध झाले आहेत, त्यांचे आरोग्य खालावले आहे; तर काहीजण इतर प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत. (२ करिंथ. ४:१६, १७) भारतातल्या कार्यात आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे बऱ्याच खास पायनियरांना, त्यांनी वर्षानुवर्षे विश्वासूपणे केलेली ही बहुमोल सेवा सोडून द्यावी लागली. तरीपण, ते ‘वृद्धपणातहि फळ देतच आहेत.’ (स्तो. ९२:१४) ते यहोवावर पूर्ण भरवसा ठेवतात आणि त्यामुळे यहोवाने त्यांना आशीर्वादित केले आहे.—स्तो. ३४:८; नीति. १०:२२.
४ खास पायनियर निश्चितच आपल्या प्रशंसेस पात्र आहेत. जर तुमच्या मंडळीत खास पायनियर असतील किंवा पूर्वी जे या सेवेत होते असे बंधूभगिनी असतील तर हा एक बहुमान समजा. त्यांच्या सहवासाचा आणि अनुभवाचा फायदा करून घ्या. विश्वासू राज्य उद्घोषक या नात्याने त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांची कदर करा. त्यांच्या अढळ विश्वासापासून प्रोत्साहन मिळवा. त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करणाऱ्या सर्वांना यहोवाची कृपा व आशीर्वाद लाभतील कारण विश्वासू राहून “सत्याने वागणारे त्यास आनंद देतात.”—नीति. १२:२२.