चांगल्या सवयी जोपासून, अनेक आशीर्वाद मिळवा
१. आपल्या आध्यात्मिक सवयींचे परीक्षण करणे हिताचे का आहे?
१ तुम्ही बाप्तिस्मा घेऊन यहोवाचे साक्षीदार बनला, तेव्हा निश्चितच बायबल अभ्यास, ख्रिस्ती सभा, क्षेत्र सेवाकार्य आणि प्रार्थना यांसारखी आध्यात्मिक कार्ये नेमाने करण्याकरता तुम्ही बराच प्रयत्न करत असाल. आणि यहोवाने तुमच्या या प्रयत्नांवर आशीर्वाद दिल्यामुळे तुम्ही आध्यात्मिकरित्या प्रगती देखील केली असेल. पण आता कदाचित तुमच्या बाप्तिस्म्याला बरीच वर्षे झाली असतील. आजही तुम्ही सुरुवातीच्या त्या चांगल्या आध्यात्मिक सवयी टिकवून ठेवल्या आहेत का?
२. दररोज बायबलचे वाचन केल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?
२ आपल्या सवयींचे परीक्षण करा: तुम्हाला दररोज देवाच्या वचनाचा काही भाग वाचण्याची सवय आहे का? असे केल्यामुळे अनेक आशीर्वाद मिळू शकतात! (यहो. १:८; स्तो. १:२, ३) प्राचीन काळात इस्राएलच्या प्रत्येक राजाला स्वतःकरता नियमशास्त्राची प्रत बनवून तिचे “जन्मभर” वाचन करण्याची आज्ञा देण्यात आली होती. असे केल्यामुळे त्याला कोणते आशीर्वाद मिळू शकत होते? देवाने सांगितले होते, की असे केल्यामुळे त्याचे हृदय उन्मत्त होणार नाही, आणि नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा पाळून व त्याप्रमाणे आचरून तो यहोवाचे भय बाळगायला शिकेल. (अनु. १७:१८-२०) त्याचप्रमाणे आजही, दररोज बायबल वाचल्यामुळे या दुष्ट, नीतिभ्रष्ट जगात निर्दोष व निष्कलंक राहायला आपल्याला साहाय्य मिळते. तसेच बायबलचे दररोज वाचन केल्यामुळे आपण सेवाकार्यात निपुण बनतो.—फिलिप्पै. २:१५; २ तीम. ३:१७.
३. नियमित सभांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?
३ येशूच्या काळात सभास्थानांमध्ये शास्त्रवचनांवर चर्चा केली जात असे. या सभास्थानांत जाण्याचा येशूचा परिपाठ होता. (लूक ४:१६) यामुळे निश्चितच त्याच्यावर आलेल्या सर्व परीक्षा सहन करण्याचे त्याला बळ मिळाले असावे. आपल्यालाही मंडळीच्या सभांमधून दिल्या जाणाऱ्या आध्यात्मिक शिक्षणामुळे व बांधवांच्या सहवासातून मिळणाऱ्या ‘उत्तेजनामुळे’ खूप बळ मिळते. (रोम. १:१२) बांधवांसोबत नियमितपणे एकत्र आल्यामुळे या शेवटल्या काळातल्या खडतर परिस्थितीतही विश्वासात टिकून राहायला आपल्याला मदत मिळते. (इब्री १०:२४, २५) मंडळीच्या सर्व सभांना जाण्याचा परिपाठ तुम्ही अजूनही पाळत आहात का?
४. दर आठवडी क्षेत्र सेवेत सहभाग घेतल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो?
४ बायबलचा प्रेरित अहवाल आपल्याला सांगतो, की येशूचे प्रेषित “दररोज मंदिरात व घरोघर” सुवार्ता घोषित करत होते. (प्रे. कृत्ये ५:४२) कदाचित दररोज प्रचार कार्य करणे आपल्याला शक्य नसेल. पण निदान दर आठवडी आपण कोणत्या न कोणत्या प्रकारे सेवाकार्यात सहभागी होण्याची सवय लावू शकतो का? असे केल्यामुळे निश्चितच आपण देवाच्या वचनाचा अधिक चांगल्याप्रकारे उपयोग करायला शिकू. आणि यामुळे इतरांना बायबलमधील सत्याविषयी सांगण्याचे अनेक प्रोत्साहनदायक अनुभव आपल्याला लाभतील.
५. यहोवाला नियमित प्रार्थना करणे का महत्त्वाचे आहे?
५ संदेष्टा दानीएल याने आपल्या सबंध जीवनभर यहोवाची सेवा करण्याचा ‘नित्यक्रम’ पाळला. त्याला नियमितरित्या यहोवाला प्रार्थना करण्याची सवय होती. (दानी. ६:१०, १६, २०) दानीएलाप्रमाणेच आपणही जर नियमितरित्या यहोवाला मनापासून प्रार्थना केली, तर तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देऊन आशीर्वादित करेल. (लूक ११:९-१३) इतकेच नव्हे, तर आपल्या प्रार्थनांना प्रतिसाद देऊन यहोवा आपल्या जवळ येईल. आणि अशारितीने आपण त्याच्यासोबत एका घनिष्ट नात्याचा आनंद उपभोगू शकू. (स्तो. २५:१४; याको. ४:८) यापेक्षा आणखी चांगले प्रतिफळ कोणते असू शकते? तेव्हा, आपण सर्वजण चांगल्या आध्यात्मिक सवयी जोपासण्याकरता प्रयत्नशील राहू या. असे केल्यामुळे आपल्याला यहोवाकडून विपुल आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.