नवीन विभागीय संमेलन कार्यक्रम
आजच्या या ‘कठीण दिवसात’ आपल्याला यहोवाची मर्जी प्राप्त करून सतत त्याच्या मर्जीत राहण्याकरता त्याच्याकडून येणारी बुद्धी हवी आहे. (२ तीम. ३:१) २००५ सेवा वर्षादरम्यानच्या विभागीय संमेलन कार्यक्रमातून आपल्याला, “‘वरून येणाऱ्या ज्ञानाचे’ मार्गदर्शन स्वीकारा” हा विषय समजावून सांगितला जात असताना व्यावहारिक सल्ला आणि उत्तेजन दिले जाईल.—याको. ३:१७.
“‘वरून येणारे ज्ञान’ आपल्या जीवनात प्रदर्शित करणे” असा विषय असलेल्या पहिल्या परिसंवादात, शुद्ध, शांतिप्रिय, सौम्य आणि समजूत होण्याजोगे अर्थात आज्ञा मानण्यास तयार असण्यात काय काय गोवलेले आहे ते आपल्याला समजावण्यात येईल. यानंतर विभागीय पर्यवेक्षक ईश्वरी बुद्धीच्या इतर तीन पैलूंकडे लक्ष देतील. काही जण ख्रिस्ती सेवकांना “निरक्षर व अज्ञानी” समजत असले तरी, देवाकडून येणाऱ्या बुद्धीचे बोल बोलण्यास ते समर्थ आहेत, हे प्रांतीय पर्यवेक्षक पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाच्या शेवटल्या भाषणात दाखवून देतील.—प्रे. कृत्ये ४:१३.
दुसऱ्या दिवशी, “उभारणीकारक कार्ये करा,” असा विषय असलेल्या परिसंवादात, आध्यात्मिकरीत्या आपल्याला कमजोर करू शकणारी कार्ये ओळखून ती कशी टाळायची यासंबंधाने मदत पुरवली जाईल. मंडळीच्या सभा, क्षेत्र सेवा आणि कौटुंबिक वर्तुळात आपण एकमेकांची उभारणी कशी करू शकतो, हे या परिसंवादात आपल्याला दाखवले जाईल. “देवाकडून येणाऱ्या बुद्धीचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो,” या विषयाच्या जाहीर भाषणाद्वारे, देवाच्या तत्त्वांचे आपल्या जीवनात पालन केल्यामुळे मिळणाऱ्या लाभांबद्दल गुणग्राहकता बाळगण्यास आपल्याला मदत केली जाईल. “देवाकडून येणाऱ्या बुद्धीनुसार वागल्याने आपले संरक्षण होते,” हे शेवटले भाषण, या शेवटल्या काळात बुद्धी प्राप्त करण्यासाठी देवाकडे वळण्यासाठी आपण केलेला निश्चय आणखी पक्का करेल.
नव्या शिष्यांसाठी असलेला बाप्तिस्मा, प्रत्येक संमेलनाचे खास वैशिष्ट्य असतो. संमेलनाच्या आठवड्याची ईश्वरशासित सेवा प्रशाला आणि टेहळणी बुरूज अभ्यास देखील संमेलनाच्या कार्यक्रमात असेल. यहोवा देत असलेल्या बुद्धीतून सर्वांनी लाभ घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. आपल्या या विभागीय संमेलनात आपल्याला मिळणारा सल्ला व उत्तेजन यांद्वारे आपण आध्यात्मिकरीत्या समृद्ध होऊ.—नीति. ३:१३-१८.