एक खासप्रकारचे परस्पर उत्तेजन
१ यहोवाच्या लोकांचा असा एकही दिवस जात नाही जेव्हा त्यांना त्यांच्या विश्वासाच्या परीक्षेला तोंड द्यावे लागत नाही. आपला फार कमी वेळ राहिला आहे हे माहीत असल्यामुळे दियाबल, यहोवाबरोबरील आपली सचोटी तोडण्याचा अगदी शेवटचा कडा प्रयत्न करत आहे. (प्रकटी. १२:१२) त्यामुळे आपण “प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत” गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला ‘वाईट दिवसात प्रतिकार करता येईल व सर्व काही केल्यावर टिकाव धरता येईल.’—इफिस. ६:१०, १३.
२ सहविश्वासू बांधवांबरोबर संगती, ही यहोवाकडून सामर्थ्य प्राप्त करण्याची त्याने केलेली एक योजना आहे. प्रेषित पौलाने याचे महत्त्व जाणले होते. आपल्या ख्रिस्ती बांधवांच्या सहवासात राहण्याची त्याला उत्कंठा होती जेणेकरून ‘त्यांना उभयतांस उत्तेजन प्राप्त होईल’ व ते ‘स्थिर होतील.’ (रोम. १:११, १२) देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला खंबीर करण्याकरता, नियमन मंडळाने आपल्याला, आगामी “आवेशी राज्य उद्घोषक” प्रांतीय अधिवेशनांत एकमेकांना उत्तेजन देण्याच्या संधीचा लाभ घेण्याची प्रेमळपणे योजना केली आहे.
३ लाभ घेण्यासाठी तेथे हजर राहा: तिन्ही दिवशी हजर राहण्याचा निश्चय करा. सुरवातीच्या गीताच्या आधी येऊन शेवटल्या प्रार्थनेत “आमेन” म्हणेपर्यंत तेथे हजर राहिणे ‘आपल्याच हिताचे’ आहे. (यश. ४८:१७, १८) या वर्षी, अधिवेशनांची योजना सार्वजनिक सुटीच्या दिवसांदरम्यान करण्यात आली असल्यामुळे मुलांना आणि काम करणाऱ्या प्रचारकांना, जादा सुटी काढण्याची गरज पडणार नाही. परंतु, उत्तरेकडील व ईशान्येकडील बांधवांना इतरांच्या तुलनेत जरा जास्त प्रवास करून मुंबईला यावे लागेल; त्यामुळे त्यांनी आपल्या कामाची आधीपासूनच योजना केली पाहिजे जेणेकरून त्यांना अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहण्यासाठी वेळ मिळेल. या मोठ्या अधिवेशनांना उपस्थित राहण्याकरता नेहमीपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागतील पण यहोवा हमी देतो की तो आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करील. (१ योहा. ५:१४, १५) रेल्वे आरक्षण दोन महिने आगाऊ करता येत असल्यामुळे अधिवेशनाला जाण्याची आपण अद्याप काही निश्चित योजना केली नसेल तर प्रवासाची व राहण्याची योजना करण्याची आताच वेळ आहे; नंतर पाहू म्हणून आपण निश्चिंत राहू नये. तिन्ही दिवशी उपस्थित राहण्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवा आशीर्वाद देईल हा विश्वास आपण बाळगू शकतो.—नीति. १०:२२.
४ उत्तेजनाची आतुरतेने वाट पाहा: तुम्ही एखाद्या अधिवेशनानंतर कधी असे म्हणालात का, की “हे अधिवेशन सर्वात उत्तम होते!” तुम्हाला असे का वाटले होते? कारण, आपण अपरिपूर्ण मानव असल्यामुळे हळूहळू आपण थकत जातो, आपल्याला आध्यात्मिक उत्तेजनाची आवश्यकता भासू लागते. (यश. ४०:३०) एका भगिनीने म्हटले: “या व्यवस्थीकरणामुळे मी थकून जाते पण अधिवेशनांमुळे माझा आध्यात्मिक दृष्टिकोन पुन्हा नवा होतो, मला हवी असलेली आध्यात्मिक ताकद मिळते. असे वाटते, जणू हे उत्तेजन मला हवे असते तेव्हाच अगदी वेळेवर येते.” तुम्हाला कदाचित या भगिनीसारखेच वाटले असेल.
५ आपल्याला केवळ भाषणे व मुलाखती यांद्वारेच उत्तेजन मिळत नाही तर आपल्या अधिवेशनाच्या इतर पोषक पैलूंद्वारेही मिळते. एका बांधवाने म्हटले: “बायबल तत्त्वांना, स्पष्टपणे मांडले जाते, व्यावहारिक मार्गाने त्यांना कसे लागू करायचे हे तिथे सांगितलेले मला खूप आवडते. अर्थात, नाटक देखील बरेच अमूल्य असते; गतकाळातल्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही उदाहरणांतून आपण लाभ कसा मिळवू शकतो हे त्यात दाखवले जाते. नवीन पुस्तकांच्या प्रकाशनाच्या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत असतो, घरी गेल्यावरही कित्येक दिवसांपर्यंत मला ती वाचायला आवडतात.”
६ ‘शेवटल्या काळच्या या कठीण दिवसात’ अधिवेशने ही यहोवाकडून एक अतिमहत्त्वपूर्ण योजना आहेत. (२ तीम. ३:१) अधिवेशने आपल्याला “सावध असा, विश्वासात स्थिर राहा; मर्दासारखे वागा; खंबीर व्हा,” या ईश्वरप्रेरित सल्ल्याचे पालन करण्यास मदत करतात. (१ करिंथ. १६:१३) यास्तव, आपण “आवेशी राज्य उद्घोषक” प्रांतीय अधिवेशनाच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा व तेथे मिळणाऱ्या भरपूर परस्पर उत्तेजनाचा लाभ घेण्याचा निश्चय करू या!
[३ पानांवरील चौकट]
तिन्ही दिवशी उपस्थित राहण्याची योजना करा
▪ रजेकरता अर्ज करा.
▪ अधिवेशन होणाऱ्या शहरात राहण्याची आगाऊ व्यवस्था करा.
▪ अधिवेशनाला येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासाची व्यवस्था करा.