“लोकांना माझ्याजवळ जमव”
१. सीनाय पर्वताजवळ झालेल्या सभेत आणि प्रांतीय व आंतरराष्ट्रीय अधिवेशनांत काय साम्य आहे?
१ इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडले त्याच्या काही दिवसांनंतर यहोवाने मोशेला एक सूचना दिली. त्याने म्हटले, की लोकांना सीनाय पर्वताजवळ “जमव.” यामागचा उद्देश, त्यांनी यहोवाची वचने ऐकून त्याचे भय बाळगायला शिकावे व आपल्या मुलांनाही तसे करण्यास शिकवावे असा होता. (अनु. ४:१०-१३) हा प्रसंग त्यांच्यासाठी खरोखरच अविस्मरणीय व विश्वास मजबूत करणारा होता. पुढच्या काही महिन्यांदरम्यान यहोवाचे लोकसुद्धा त्याच्याकडून शिकण्यासाठी प्रांतीय व आंतरराष्ट्रीय अधिवेशनांत एकत्र येतील. याचा पूर्ण फायदा घेण्यासाठी आपण काय करू शकतो?
२. अधिवेशनाला उपस्थित राहता यावे म्हणून आपण काय केले पाहिजे?
२ तयार राहा: सीनाय पर्वताजवळ होणाऱ्या ऐतिहासिक सभेसाठी इस्राएली लोकांनी “तयार राहावे” अशी आज्ञा यहोवाने त्यांना दिली होती. (निर्ग. १९:१०, ११) त्याच प्रकारे, अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्यांनीसुद्धा काळजीपूर्वक तयारी करणे गरजेचे आहे, मग कार्यक्रमात त्यांना भाग असो वा नसो. उदाहरणार्थ, नोकरी करणाऱ्यांना सुट्टी घेण्याची गरज असेल. तुमची परिस्थिती कदाचित नहेम्यासारखी असेल. नहेम्या अर्तहशश्त राजाकडे प्यालेबरदार म्हणून काम करायचा. त्याला जेरूसलेमला जाऊन तेथील तटांची पुनर्बांधणी करण्याच्या कामात हातभार लावायचा होता. पण, राजा कदाचित आपल्याला जाऊ देणार नाही हे नहेम्याला माहीत होते. त्यामुळे त्याने प्रार्थना केली आणि धैर्य दाखवून आदरपूर्वक आपली विनंती राजासमोर मांडली. राजाने त्याला जाण्याची परवानगी दिली. इतकेच काय तर पुनर्बांधणीच्या कार्याला आवश्यक ती मदतही राजाने पुरवली. (नहे. २:१-९) अधिवेशनाला उपस्थित राहता यावे म्हणून सुट्टी काढण्याव्यतिरिक्त अधिवेशनाच्या ठिकाणी तुम्ही कसे जाल आणि कोठे राहाल याचीही योजना करा. ज्या कोणाला मदतीची गरज असेल त्यांना मंडळीतील वडील आनंदाने मदत करतील. सकाळच्या व दुपारच्या कार्यक्रमाला लवकर येण्याची योजना करा आणि पूर्ण कार्यक्रमाकडे “विशेष लक्ष” द्या.—इब्री २:१.
३. मनाची तयारी करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल?
३ आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनाची तयारी करणे. यामुळे आपण ऐकण्यास व शिकण्यास अधिक उत्सुक असू. (एज्रा ७:१०) अधिवेशनाची कार्यक्रम पत्रिका आधीच jw.org या वेबसाईटवर टाकली जाईल. त्यात प्रत्येक भाषणाचा विषय व त्यासोबत एक-दोन मुख्य शास्त्रवचनेही दिली जातील. तुम्हाला नेमलेल्या अधिवेशनाच्या काही आठवड्यांआधी तुम्ही तुमच्या कौटुंबिक उपासनेत या उत्कृष्ट माहितीचा उपयोग करू शकता.
४. आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आईवडील अधिवेशनांचा उपयोग कसा करू शकतात?
४ तुमच्या मुलांना शिकवा: सीनाय पर्वताजवळ भरलेल्या अधिवेशनाचा आणखी एक उद्देश यहोवाने स्पष्ट केला. तो म्हणजे इस्राएली आईवडिलांनी “आपल्या मुलाबाळांनाही” देवाचे भय बाळगायला शिकवायचे होते. (अनु. ४:१०) आधुनिक काळातील अधिवेशनांमुळे नेमकी हीच गोष्ट करायची उत्तम संधी आईवडिलांना मिळते. कार्यक्रमादरम्यान आईवडिलांनी मुलांना जवळ बसवावे आणि लक्ष देऊन ऐकण्यास त्यांना मदत करावी. कार्यक्रम संपल्यानंतर दररोज संध्याकाळी व नंतर तुमच्या कौटुंबिक उपासनेत शिकलेल्या गोष्टींची कुटुंब या नात्याने तुम्ही चर्चा करू शकता.
५. येणाऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होईल?
५ सीनाय पर्वताजवळ भरलेल्या त्या अत्यंत महत्त्वपूर्ण अधिवेशनामुळे इस्राएली लोकांना एक फायदा झाला. तो म्हणजे, देवाचे लोक असण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे याची कदर करण्यास त्यांना मदत मिळाली. (अनु. ४:७, ८) तसाच फायदा आपल्यालाही व्हावा या हेतूने येणाऱ्या अधिवेशनाची रचना करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या तीन दिवसांदरम्यान आपण सैतानाच्या जगातील रूक्ष अरण्यातून बाहेर पडून आध्यात्मिक नंदनवनातील तजेला व प्रोत्साहनदायक सहवास अनुभवू. (यश. ३५:७-९) यहोवाचा दिवस वेगाने जवळ येत आहे; तेव्हा एकमेकांना प्रोत्साहन देण्याची कोणतीही संधी आपण गमावू नये.—इब्री १०:२४, २५.