प्रचार करत राहा!
१ देवाची अशी इच्छा आहे, की “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीम. २:४) म्हणून त्याने आपल्याला सुवार्तेचा प्रचार करण्याचे काम नेमले आहे. (मत्त. २४:१४) आपण प्रचार का करत राहिले पाहिजे हे एकदा आपल्याला समजल्यावर, आपल्यापुढे कितीही अडखळणे किंवा संभाव्य विकर्षणे आली तरी आपण या कामापासून हटणार नाही.
२ नियमित का गेले पाहिजे? लोकांचे लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी आज जगामध्ये असल्यामुळे आपण सांगितलेला संदेश त्यांच्या नेहमी लक्षात राहतोच असे नाही. शिवाय, काही लोक आपला संदेश गांभीर्याने ऐकत नाहीत. त्यामुळे तारणासाठी असलेला देवाचा संदेश त्यांना वारंवार जाऊन सांगणे महत्त्वाचे आहे. (मत्त. २४:३८, ३९) लोकांची परिस्थिती देखील कायम बदलत राहते, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. कधीकधी तर सबंध जगाला हादरविणाऱ्या घटना घडतात. (१ करिंथ. ७:३१, पं.र.भा.) आपण ज्या लोकांना प्रचार करतो त्या लोकांसमोर कदाचित उद्या, पुढच्या आठवडी, पुढच्या महिन्यात इतर समस्या येऊ शकतील; त्यामुळे आपण सांगत असलेल्या सुवार्तेकडे ते गांभीर्याने लक्ष देतील. म्हणून आपण नियमितपणे लोकांना प्रचार करत राहिला पाहिजे. आपल्याला ज्या साक्षीदाराने सुवार्ता सांगितली, तो किंवा ती नियमितपणे आपल्या घरी आल्यामुळेच तर आज आपण सत्यात आहोत; यासाठी तुम्हाला त्या साक्षीदाराचे आभार मानावेसे वाटत नाही का?
३ देवाच्या दयेचे अनुकरण करणे: दुष्टांवर न्यायदंड बजावण्याआधी यहोवाने त्यांना खूप संधी दिली आहे. तो त्यांच्याविषयी धीर धरत आहे. प्रांजळ मनाच्या लोकांनी त्याच्याकडे वळावे आणि येणाऱ्या नाशापासून आपला जीव वाचवावा म्हणून त्यांना मदत करण्याची जबाबदारी त्याने आपल्यावर सोपवली आहे. (२ पेत्र ३:९) आपण जर देवाच्या या दयापूर्ण संदेशाविषयी आणि जे आपल्या वाईट मार्गांपासून दूर होत नाहीत अशा सर्वांवर येणाऱ्या देवाच्या न्यायदंडाविषयी लोकांना सांगितले नाही तर आपण रक्तदोषी ठरू. (यहे. ३३:१-११) सर्वच लोक आपला प्रचार आनंदाने ऐकत नसले तरी देवाच्या दयेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या प्रांजळ लोकांना वारंवार मदत करण्यात आपण धिमे अथवा मंद होऊ नये.—प्रे.कृत्ये २०:२६, २७; रोम. १२:११.
४ आपले प्रेम प्रदर्शित करणे: खरे तर संपूर्ण पृथ्वीवर सुवार्तेची घोषणा करण्याची आज्ञा आपल्याला येशू ख्रिस्तामार्फत यहोवा देवाने दिली आहे. (मत्त. २८:१९, २०) लोक आपला संदेश ऐकायला नकार देत असले तरीसुद्धा जे योग्य आहे ते करत राहिल्याने आपण देवाबद्दल आपल्याला असलेले प्रेम आणि श्रद्धा दाखवू शकतो.—१ योहा. ५:३.
५ तेव्हा, प्रचार कार्य करत राहण्याच्या दृढनिश्चयावर आपण अटळ राहू या! आणि यहोवाचा “तारणाचा दिवस” येईपर्यंत आवेशाने प्रचार कार्य करत राहू या!—२ करिंथ. ६:२.