“समयोचित भाषण”
१ इतरांना जीवनाचा संदेश सांगायला तुम्हाला कठीण वाटते का? ऐकल्या ऐकल्या घरमालकावर छाप पडली पाहिजे असे काही तरी प्रत्येक वेळी बोलण्याचे दडपण तुमच्यावर असते का? येशूने आपल्या शिष्यांना प्रचारासाठी पाठवले तेव्हा तो त्यांना म्हणाला: “जात असताना अशी घोषणा करीत जा, की ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’” (मत्त. १०:७) हा संदेश साधासोपा आणि सुटसुटीत होता. आजही तो बदललेला नाही.
२ सहसा संभाषण सुरू करायला अगदी मोजकेच शब्द पुरेसे असतात. फिलिप्प कुशी षंढाला भेटला तेव्हा त्याने त्याला विचारले: “आपण जे वाचीत आहा ते आपल्याला समजते काय?” (प्रे.कृत्ये ८:३०) अहवालानुसार, त्या दोघांत यानंतर अतिशय चांगली चर्चा झाली. केवळ एका “समयोचित” प्रश्नामुळे हे शक्य झाले.—नीति. २५:११.
३ ही गोष्ट, सेवेत असताना तुम्ही आठवणीत ठेवू शकता. घरमालकाशी बोलायच्या आधी, घरातील वस्तुंवर एक नजर टाका, त्यांच्या परिस्थितीचा वेध घ्या आणि त्यानुसार योग्य शब्दांची निवड करा. घरमालकाला प्रश्न विचारा. आणि त्याचे उत्तर लक्ष देऊन ऐका.
४ विचारण्याजोगे काही साधे प्रश्न: संभाषण सुरू करण्यासाठी तुम्ही पुढीलपैकी कोणताही प्रश्न विचारू शकता:
▪ “तुम्ही प्रभूची प्रार्थना (किंवा, हे आमच्या स्वर्गातील पित्या) म्हणता का?” (मत्त. ६:९, १०) प्रार्थनेतील सुरवातीचे शब्द बोलल्यावर म्हणा: “काही लोक असं विचारतात, की ‘तुझे नाव पवित्र मानले जावो, असे येशूने जे म्हटले ते नाव काय आहे?’ इतर जण असे विचारतात, की ‘येशूने ज्या राज्याबद्दल आपल्याला प्रार्थना करायला सांगितले ते राज्य काय आहे?’ या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं तुम्हाला मिळालीत का?”
▪ “‘जीवनाचा काय उद्देश आहे?’ हा प्रश्न तुमच्या मनात कधी आला का?” जीवनाच्या उद्देशाचा संबंध देवाच्या ज्ञानाशी आहे हे सांगा.—उप. १२:१३; योहा. १७:३.
▪ “मृत्यूचा कधी अंत होईल असं तुम्हाला वाटतं का?” त्याचे खात्रीलायक उत्तर देण्यासाठी यशया २५:८ व प्रकटीकरण २१:४ या वचनांचा उपयोग करा.
▪ “जगातल्या अनेक समस्यांवर, अडचणींवर एखादा साधासोपा उपाय आहे का?” देव आपल्याला आपल्या ‘शेजाऱ्यावर प्रेम’ करण्यास शिकवतो, हे त्यांना दाखवा.—मत्त. २२:३९.
▪ “अंतराळातील दुर्घटनेमुळे आपल्या पृथ्वीग्रहाचा सर्वनाश होईल का?” पृथ्वी कायम टिकेल, हे बायबलमधील अभिवचन त्यांना सांगा.—स्तोत्र १०४:५.
५ साध्यासोप्या, सरळ पद्धतीने आणि प्रेमळपणे सुवार्ता सांगा. सत्य सांगण्याच्या तुमच्या प्रयत्नांवर यहोवा जरूर आशीर्वाद देईल याची खात्री बाळगा.