“सर्व काही उन्नतीसाठी असावे”
१ आपल्या बांधवांसोबत व्यवहार करताना आपण सर्वकाही त्यांच्या उन्नतीसाठी केले पाहिजे. याचा अर्थ त्यांना कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक हानी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच पैशांच्या व्यवहारात देखील, उदाहरणार्थ एखादा बिझनेस करताना आपल्या बांधवांना कोणत्याही प्रकारे अडखळण्याचे कारण होणार नाही याची काळजी देखील आपण घेतली पाहिजे.—२ करिंथ. ६:३; फिलिप्पै. १:९, १०.
२ काही जणांनी बांधवांनाच आपले मुख्य ग्राहक मानून वेगवेगळे बिझनेस सुरू केले आहेत. काही सेल्स कंपन्या त्यांच्या प्रतिनिधींना प्रत्येक व्यक्तीकडे संभाव्य ग्राहक या दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला देतात. स्वधर्मियांना आपले ग्राहक बनवा असाही सल्ला त्यांना दिला जातो. बांधवांना विशिष्ट बिझनेसमध्ये सहभागी होण्याचे प्रोत्साहन देण्याकरता काही बांधवांनी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केल्याचे देखील आढळले आहे. काहीजण आपल्या बिझनेसची जाहिरात करण्यासाठी बांधवांना मोफत माहितीपत्रके, इंटरनेटवरील माहिती किंवा टेप्स इत्यादी देतात. ख्रिस्ती बांधवांच्या ओळखीचा असा फायदा घेणे योग्य आहे का? नाही!—१ करिंथ. १०:२३, २४, ३१-३३.
३ बांधवांनी सावध राहावे: ख्रिस्ती बांधवासोबत कोणताच बिझनेस किंवा व्यवहार केला जाऊ नये असा याचा अर्थ नाही. हा एक वैयक्तिक प्रश्न आहे. पण काहीजण झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या स्कीम किंवा योजनांमध्ये बांधवांना भागीदार होण्याचे किंवा पैसा गुंतवण्याचे प्रोत्साहन देतात. यांपैकी बऱ्याच स्कीम्स अपयशी ठरतात आणि त्यांत भाग घेणाऱ्यांचा पैसाही बुडतो. अर्थात, झटपट श्रीमंत होण्याच्या मोहाला बळी पडून अशा स्कीम्समध्ये सहभागी होणारे बांधव स्वतः याला जबाबदार आहेत हे कबूल आहे; पण ज्याने या योजनेची मंडळीतल्या बांधवांना माहिती दिली तो देखील जबाबदारीतून मुक्त नाही. अशाप्रकारच्या योजनांची जाहिरात करण्याआधी त्याने काळजीपूर्वक विचार केला पाहिजे, की ही योजना बारगळली तर बांधवांचे आध्यात्मिक आणि आर्थिक दृष्टीने कोणते नुकसान होईल. मंडळीत जबाबदारीच्या पदांवर काम करणाऱ्या बांधवांनी तर याबाबतीत अधिकच दक्ष राहिले पाहिजे कारण मंडळीतले बांधव त्यांच्याकडे आदराने पाहतात व त्यांच्यावर खूप भरवसा करतात. बांधवांच्या भरवशाचा गैरफायदा घेणे चुकीचे ठरेल. जबाबदारीच्या पदावर काम करणाऱ्याने इतर बांधवांचा आदर गमवल्यास त्याचा विशेषाधिकार काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.
४ “सर्व काही उन्नतीसाठी असावे” हाच सदैव आपला प्रयत्न असला पाहिजे. (१ करिंथ. १४:२६) मंडळीत व्यावसायिक स्वरूपाचे व्यवहार करण्याचे किंवा त्यांना बढावा देण्याचे आपण आवर्जून टाळले पाहिजे. ज्या कारणांकरता बांधवांसोबत एकत्र येण्याकरता बायबल सांगते त्या कारणांचा आपण कधीही विसर पडू देऊ नये.—इब्री १०:२४, २५.