“कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार?”
१ देवाचे वचन वाचणाऱ्या एका कुशी षंढाला फिलिप्पाने विचारले, आपण जे वाचता ते आपल्याला समजते काय? तेव्हा त्याने उत्तर दिले: “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” तेव्हा फिलिप्पाने त्याला येशूविषयीची सुवार्ता समजावून सांगितली आणि यामुळे त्या मनुष्याने लगेच बाप्तिस्मा घेतला. (प्रे. कृत्ये ८:२६-३८) ‘सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यांस बाप्तिस्मा द्या व त्यांना शिकवा.’ ही ख्रिस्ताने दिलेली आज्ञा फिलिप्पाने पाळली.—मत्त. २८:१९, २०.
२ फिलिप्पाप्रमाणे आपण देखील शिष्य बनवण्याची येशूची आज्ञा पाळली पाहिजे. पण कुशी षंढाने ज्याप्रमाणे लगेच प्रतिसाद देऊन बाप्तिस्मा घेतला त्याप्रमाणे त्वरित प्रगती सहसा आपल्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येणार नाही. कुशी षंढ हा यहुदी धर्माचे पालन करणारा होता; त्याला शास्त्रवचनांचे बऱ्यापैकी ज्ञान होते, शिवाय शिकून घेण्याची इच्छा देखील होती. त्याच्याबाबतीत पाहिल्यास त्याने केवळ येशूला वचनयुक्त मशीहा म्हणून स्वीकारणे आवश्यक होते. पण आपण ज्यांच्यासोबत अभ्यास करतो त्यांच्यापैकी काहींना तर बायबलचा गंधही नसतो; किंवा खोट्या धर्मांच्या शिकवणींची त्यांच्या डोळ्यावर पट्टी असते; शिवाय, बरेचजण जीवनातल्या समस्यांनी बेजार झालेले असतात; साहजिकच अशा परिस्थितींत आध्यात्मिक प्रगती करणे त्यांना कठीण जाते. पण अशांना समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याकरता आपण कशी मदत करू शकतो?
३ तुमच्यासोबत बायबल अभ्यास करणाऱ्या व्यक्तीच्या आध्यात्मिक गरजा ओळखा: ऑगस्ट १९९८ च्या आमची राज्य सेवा या अंकात अपेक्षा ब्रोशर व ज्ञान पुस्तकातून एखाद्या व्यक्तीबरोबर किती काळ अभ्यास केला जावा याविषयी चर्चा करण्यात आली होती. त्यात असे म्हटले होते: “विद्यार्थ्याची परिस्थिती आणि ग्रहणशक्ती यांवर अभ्यासाचा वेग आधारित ठेवणे आवश्यक आहे. . . . अभ्यासाच्या वेगाच्या मागे लागून विद्यार्थ्याच्या स्पष्ट समजेकडे दुर्लक्ष करण्याची आपली इच्छा नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला देवाच्या वचनावरील त्याच्या नवीन प्राप्त झालेल्या विश्वासाकरता भक्कम पायाची आवश्यकता असते.” त्यामुळे कसेही करून ज्ञान पुस्तक सहा महिन्यात पूर्ण झाले पाहिजे, असा विचार करून घाईघाईने एकेक अध्याय संपवण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरणार नाही. काही लोकांसोबत हे पुस्तक पूर्ण करायला कदाचित सहा महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागेल. दर आठवडी अभ्यास घेताना त्या व्यक्तीला विषय नीट समजला आहे किंवा नाही, त्याला तो पटला किंवा नाही याकडे लक्ष द्या. वेळ लागला तरी हरकत नाही, पण विद्यार्थ्याला नीट समजणे सर्वात महत्त्वाचे आहे. काहीवेळा ज्ञान पुस्तकाचा एकच अध्याय संपवायला दोन तीन आठवडेही लागू शकतात. यामुळे प्रत्येक अध्यायात उल्लेख केलेल्या शास्त्रवचनांपैकी होताहोईल तितकी वचने वाचून त्यांचे स्पष्टीकरण करण्यास वेळ मिळू शकेल.—रोम. १२:२.
४ पण ज्ञान पुस्तक संपल्यावरही विद्यार्थ्याला काही विषय नीट समजलेले नाहीत किंवा सत्य स्वीकारण्याइतपत आणि परमेश्वराला आपले जीवन समर्पित करण्याइतकी त्याच्या मनाची तयारी झालेली नाही असे तुमच्या लक्षात आल्यास काय करावे? (१ करिंथ. १४:२०) जीवनाच्या मार्गावर प्रगती करण्याकरता तुम्ही त्याला आणखी कोणत्याप्रकारे मदत करू शकता?—मत्त. ७:१४.
५ बायबल विद्यार्थ्याच्या आध्यात्मिक गरजांकडे लक्ष द्या: असे समजा की अपेक्षा ब्रोशर व ज्ञान पुस्तकातून एखाद्याचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि त्याने अजूनही म्हणावी तितकी प्रगती केलेली नाही. अर्थात प्रगतीची चिन्हे दिसत आहेत आणि सत्याबद्दल त्याची आस्थाही वाढत आहे, पण हळूहळू. अशा परिस्थितीत आणखी दुसऱ्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास सुरू ठेवू शकता. तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यासोबत असे करावे हे आम्हाला सुचवायचे नाही. पण आवश्यकता आहे असे तुम्हाला वाटल्यास उपासनेतील ऐक्य किंवा “तुझे राज्य येवो” या पुस्तकांपैकी एखाद्या पुस्तकातून तुम्ही अभ्यास पुढे सुरू ठेवू शकता. मंडळीत या पुस्तकांचा साठा नसला तरी बऱ्याच प्रचारकांकडे या पुस्तकांच्या प्रती असतील. पण अपेक्षा ब्रोशर व ज्ञान पुस्तकाचा अभ्यास पूर्ण झाल्यावरच या दुसऱ्या पुस्तकांतून अभ्यास घेण्याचा विचार करावा. या दुसऱ्या पुस्तकाचा अभ्यास संपण्याआधीच विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा झाला तरीसुद्धा तुम्ही अभ्यास सुरू ठेवू शकता; तसेच अभ्यास, पुनर्भेटी आणि अभ्यासाचे तास देखील तुम्ही आधीसारखेच मोजू शकता आणि रिपोर्टमध्ये लिहू शकता.
६ मग याचा अर्थ ज्यांचा अलीकडेच बाप्तिस्मा झाला आहे, पण त्यांचा केवळ एकाच पुस्तकातून अभ्यास झाला अशा बांधवांसोबत पुन्हा अभ्यास सुरू केला जावा का? नाही, याची आवश्यकता नाही. पण जर नव्यानेच बाप्तिस्मा झालेला एखादा बांधव अक्रियाशील झाला असेल किंवा प्रगती करत नसेल आणि जर त्याला स्वतःला असे वाटत असेल की कोणीतरी आपल्याला आध्यात्मिक मदत करावी तर अशावेळी सर्व्हिस ओव्हरसियरशी विचारविनिमय करून या बाप्तिस्मा झालेल्या बांधवासोबत किंवा बहिणीसोबत तुम्ही पुन्हा अभ्यास सुरू करू शकता. पण मंडळीत जर कोणाचा बऱ्याच दिवसांआधी ज्ञान पुस्तकातून अभ्यास पूर्ण झाला असूनही त्याने समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याइतकी प्रगती केली नसेल, तर अशा व्यक्तीला पुन्हा अभ्यास करायला आवडेल का असे तुम्ही स्वतः त्यांना विचारू शकता.
७ आपण ज्यांच्यासोबत अभ्यास करतो त्या प्रत्येक व्यक्तीच्या आध्यात्मिक गरजांकडे आपण जातीने लक्ष दिले पाहिजे; हाच आपल्या ख्रिस्ती प्रेमाचा पुरावा आहे. आपल्या विद्यार्थ्याला देवाच्या वचनातले सत्य अगदी चांगल्याप्रकारे समजावे हीच आपली इच्छा आहे. यामुळेच पुढे तो जाणतेपणाने सत्य स्वीकारण्याचा स्वतःहून निर्णय घेऊ शकेल आणि समर्पण करून बाप्तिस्मा घेण्याइतकी प्रगती करू शकेल.—स्तोत्र ४०:८; इफिस. ३:१७-१९.
८ त्या कुशी षंढाचा बाप्तिस्मा झाल्यानंतर काय झाले तुम्हाला आठवते का? येशू ख्रिस्ताचा नवा शिष्य बनल्यानंतर “तो आपल्या वाटेने हर्ष करीत” गेला. (प्रे. कृत्ये ८:३९, ४०) सत्याच्या मार्गावर चालायला आपण ज्यांना मदत करतो त्यांच्यासोबत मिळून आपण सदैव यहोवा देवाची हर्षाने सेवा करत राहू या.