वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w17 ऑक्टोबर पृ. ३-६
  • यहोवा सांगतो ते केल्याने आशीर्वादच मिळतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा सांगतो ते केल्याने आशीर्वादच मिळतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • माझा नवीन जोडीदार
  • “आम्ही तयार आहोत”
  • पुन्हा इंग्लंडमध्ये आणि नंतर स्कॉटलंडमध्ये
  • आयरलँडमधली नवीन नेमणूक
  • आयरलँडमधल्या साक्षीदारांसाठी एक महत्त्वाचा प्रसंग
  • पूर्णपणे नवीन नेमणूक
  • माझे जीवन समर्पित करण्याजोगी सर्वोत्तम गोष्ट
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • १९२१—शंभर वर्षांआधी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • खोटे बोलू न शकणाऱ्‍या देवाने पालनपोषण केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • मी विश्‍वासू लोकांचं आयुष्य बहरताना पाहिलंय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
w17 ऑक्टोबर पृ. ३-६
ऑलीव मॅथ्यूज

जीवन कथा

यहोवा सांगतो ते केल्याने आशीर्वादच मिळतात

ऑलीव मॅथ्यूज

मी, माझे पती, माझा भाऊ आणि त्याची पत्नी अशा आम्हा चौघांना एक खास प्रकारची सेवा करायला आवडेल का, असं विचारण्यात आलं. त्यावर आम्ही लगेच म्हणालो, “आम्ही तयार आहोत!” आम्ही ती सेवा का स्वीकारली आणि यहोवाने आम्हाला कसं आशीर्वादित केलं, या प्रश्‍नांची उत्तरं देण्याआधी मी स्वतःविषयी थोडक्यात सांगते.

माझा जन्म १९२३ साली इंग्लडमधल्या हॅम्सवर्थ या छोट्याशा शहरात झाला. मला एक मोठा भाऊ होता, त्याचं नाव बॉब. मी नऊ वर्षांची असताना माझ्या वडिलांना काही पुस्तकं मिळाली होती. त्यांत, खोट्या धर्माने लोकांची कशी फसवणूक केली आहे ते सांगितलं होतं. चर्चचे पाळक शिकवायचे एक आणि वागायचे एक; हे माझ्या वडिलांना पहिल्यापासूनच आवडत नव्हतं. त्यामुळे ते पुस्तक वाचून माझे वडील खूप प्रभावित झाले. त्याच्या काही वर्षांनंतर, बॉब ॲटकेन्सन हे आमच्या घरी आले आणि त्यांनी आम्हाला बंधू रदरफर्ड यांचं रेकॉर्डींग ऐकवलं. ते ऐकल्यावर आमच्या लक्षात आलं, की माझ्या वडिलांनी वाचलेली पुस्तकं ज्यांनी छापली होती, त्यांच्याकडूनच हे भाषण आहे. त्यानंतर माझ्या आईवडिलांनी बंधू ॲटकेन्सन यांना रोज रात्री जेवायला आणि बायबल प्रश्‍नांची उत्तरं द्यायला बोलवलं. बंधू ॲटकेन्सन यांनी आम्हाला एका बांधवाच्या घरी होणाऱ्‍या ख्रिस्ती सभांना यायचं आमंत्रण दिलं. त्याचं घर आमच्या घरापासून काही कि.मी. अंतरावर होतं. आम्ही त्यांच्या घरी सभांना नियमितपणे जाऊ लागलो, आणि मग हॅम्सवर्थमध्ये एक लहान मंडळी स्थापन झाली. त्यामुळे काही काळातच आमच्या घरी झोन सर्व्हंट (विभागीय पर्यवेक्षक) राहायला येऊ लागले. शिवाय, आसपासच्या मंडळ्यांमधले पायनियरसुद्धा आमच्याकडे अधूनमधून जेवायला यायचे. या बंधुभगिनींचा माझ्यावर चांगला प्रभाव पडला.

त्या वेळी आमच्या कुटुंबाने नुकताच एक व्यवसाय सुरू केला होता. पण माझे वडील, भावाला म्हणाले, “तुला पायनियर होण्याचं असेल, तर आपण हा व्यवसाय बंद करू.” बॉब त्यासाठी तयार झाला, आणि त्याने पायनियर सेवा करण्यासाठी घर सोडलं. त्या वेळी तो २१ वर्षांचा होता. त्यानंतर दोन वर्षांनी, वयाच्या १६ व्या वर्षी मीसुद्धा पायनियर सेवा करू लागले. शनिवारी-रविवारी मी इतर बंधुभगिनींसोबत मिळून प्रचार करायचे. पण इतर दिवशी सहसा मला एकटीलाच प्रचार करावा लागायचा. प्रचार करण्यासाठी मी फोनोग्राफ रेकॉर्डर आणि टेस्टमनी कार्ड (थोडक्यात व सोप्या भाषेत बायबलचा संदेश लिहिलेलं कार्ड) वापरायचे. मी बायबलमध्ये आस्था असलेल्या एका स्त्रीसोबत अभ्यास सुरू करू शकले, हा माझ्यासाठी एक मोठा आशीर्वादच होता. कारण त्या स्त्रीने पुढे चांगली प्रगती केली. शिवाय, तिच्या घरातल्या इतरांनीही नंतर सत्य स्वीकारलं. त्याच्या पुढच्याच वर्षी मेरी हेन्शेलसोबत मला खास पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी चेसशायरला पाठवण्यात आलं. तिथं पूर्वी कधीही प्रचार झाला नव्हता.

दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी स्त्रियांना युद्धाशी संबंधित काही कामं करण्याची सक्‍ती केली जायची. धार्मिक सेवा करणाऱ्‍यांना अशा कामांपासून सूट दिली जायची. त्यामुळे आम्हाला वाटलं की खास पायनियर असल्यामुळे आम्हालाही अशी सूट दिली जाईल. पण, कोर्टाला हे मान्य नव्हतं आणि त्यांनी मला ३१ दिवसांसाठी तुरुंगात पाठवलं. त्याच्या पुढच्याच वर्षी जेव्हा मी १९ वर्षांची झाले, तेव्हा मला दोन वेळा कोर्टात जावं लागलं. कारण, युद्धाशी संबंधित कामं करणं अजूनही माझ्या विवेकाला पटत नव्हतं. पण दोन्ही वेळेस कोर्टाने मला सोडून दिलं. या संपूर्ण अनुभवादरम्यान मला एक गोष्ट जाणवली, की यहोवाचा पवित्र आत्मा मला मदत करत होता आणि आणखी मजबूत करत होता.—यश. ४१:१०, १३.

माझा नवीन जोडीदार

१९४६ साली माझी आर्थर मॅथ्यूजशी भेट झाली. त्या वेळी तो तुरुंगात तीन महिन्यांची शिक्षा भोगून आला होता. कारण त्यानेही युद्धात सहभागी होण्यास नकार दिला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो डेनिससोबत प्रचारकार्य करू लागला. त्याचा भाऊ डेनिस हॅम्सवर्थमध्ये खास पायनियर म्हणून सेवा करत होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना अगदी लहानपणापासूनच यहोवाविषयी शिकवलं होतं आणि किशोरवयात त्यांचा बाप्तिस्मा झाला होता. त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याच्या काही काळानंतर डेनिसला आयरलँडमध्ये सेवाकार्यासाठी पाठवण्यात आलं. त्यामुळे पायनियर सेवेत आर्थरला कोणीही जोडीदार राहिला नाही. आर्थरची मेहनती वृत्ती व चांगलं वर्तन पाहून माझे आईवडील खूप प्रभावित झाले. म्हणून त्यांनी त्याला त्यांच्यासोबत राहण्यासाठी बोलावलं. मी घरी जायचे तेव्हा जेवणानंतर सहसा मी आणि आर्थर मिळून भांडी घासायचो. त्यानंतर लवकरच आम्ही एकमेकांना पत्र लिहू लागलो. १९४८ मध्ये आर्थरला पुन्हा तीन महिन्यांसाठी तुरुंगात जावं लागलं. जानेवारी १९४९ मध्ये आमचं लग्न झालं. लग्नानंतरसुद्धा होईल तितकं पूर्णवेळेच्या सेवेत राहण्याचं आमचं ध्येय होतं. आम्ही खूप जपून खर्च करायचो आणि सुट्यांमध्ये फळं वेचणाऱ्‍यांसोबत काम करायचो. त्यातून आम्हाला थोडे पैसे मिळायचे. यहोवाच्या आशीर्वादांमुळे आम्ही आमची पायनियर सेवा चालू ठेवू शकलो.

आर्थर आणि ऑलीव मॅथ्यूज, १९४९

लग्नानंतर काही काळातच हेम्सवर्थमध्ये, १९४९ साली

लग्नाच्या एकदीड वर्षानंतर आम्हाला उत्तर आयरलँडला प्रचारासाठी पाठवण्यात आलं; सुरुवातीला आर्मा आणि नंतर न्यूरी या लहान शहरांमध्ये. या दोन्ही शहरांमध्ये कॅथलिक लोक जास्त होते आणि त्यांच्यावर धर्माचा मोठा पगडा होता. त्यामुळे आम्ही खूप सावधपणे प्रचार करायचो. ख्रिस्ती सभा एका साक्षीदार जोडप्याच्या घरी व्हायच्या आणि त्यासाठी आम्हाला १६ कि.मी. जावं लागायचं. जवळजवळ आठ लोक सभेला हजर असायचे. कधीकधी आम्ही तिथंच राहायचो. आम्ही खाली फरशीवर झोपायचो आणि सकाळी मस्त नाश्‍ता करायचो. आता तिथं अनेक साक्षीदार आहेत, हे पाहून खूप आनंद होतो.

“आम्ही तयार आहोत”

माझा भाऊ आणि त्याची पत्नी लॉती, हे दोघे आधीपासूनच उत्तर आयरलँडमध्ये खास पायनियर म्हणून सेवा करत होते. १९५२ मध्ये आम्ही चौघं बेलफास्टमधल्या अधिवेशनाला उपस्थित राहिलो. आम्हा चौघाना आणि आमच्यासोबत आणखी एक बांधव प्राइस ह्‍यूझ यांना एका बांधवाने त्याच्या घरात राहण्यासाठी जागा दिली. बंधू प्राइस हे त्या वेळी ब्रिटनमध्ये शाखा कार्यालय सेवक (ब्रांच सर्व्हंट) म्हणून काम पाहायचे. एका रात्री, आम्ही संघटनेने प्रकाशित केलेल्या गॉड्‌स वे इज लव्ह या नव्या पुस्तिकेविषयी बोलत बसलो होतो. ही पुस्तिका खास आयरलँडमधल्या लोकांसाठी तयार करण्यात आली होती. आयरिश रिपब्लिकमधल्या कॅथलिक लोकांना प्रचार करणं किती अवघड आहे हे बंधू प्राइस आम्हाला सांगत होते. तिथं प्रचार करणाऱ्‍या आपल्या बांधवांना घर सोडून जाण्यासाठी भाग पाडलं जातं आणि तिथले पाळक लोकांना आपल्या बांधवांवर हल्ले करण्यासाठी चिथवतात असं त्यांनी सांगितलं. प्राइस पुढे म्हणाले: “त्या संपूर्ण देशात या नवीन पुस्तिकेचं वाटप करण्यासाठी आम्हाला अशा साक्षीदार जोडप्यांची गरज आहे ज्यांच्याकडे कार आहे.”a आम्ही लगेच म्हणालो “आम्ही तयार आहोत!”

आर्थर आणि ऑलीव मॅथ्यूज इतर पायनियर बंधुभगिनींसोबत मोटरबाइक आणि साईडकारमध्ये

पायनियर सोबत्यांबरोबर मोटरबाईकवर आणि तिला जोडलेल्या साईडकारमध्ये

डब्लिन शहरात मा रेटलँड या बहिणीच्या घरी पायनियर केव्हाही जाऊन राहू शकत होते. या बहिणीने अनेक वर्षं यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली होती. सुरुवातीला आम्हीसुद्धा तिच्याच घरी राहिलो. आम्ही आमच्या सामानापैकी काही सामान विकलं. त्यानंतर आम्ही बॉबच्या मोटरबाईक आणि तिला जोडलेल्या साईडकारमध्ये बसून कार खरेदीसाठी गेलो. आम्हाला एक चांगली सेकंडहँड कार मिळाली. पण तिच्या मालकालाच आम्ही ती आमच्या घरी पोचवायला सांगितली. कारण, आम्हाला कार चालवता येत नव्हती. त्या दिवशी आर्थरने खाटेवर बसून आपण जणू खरोखर कार चालवत आहोत अशी कल्पना केली आणि तो हाताने गियर बदलत राहिला. संपूर्ण संध्याकाळ त्याने असा सराव केला! दुसऱ्‍या दिवशी सकाळी तो घराच्या आवाराबाहेर कार काढण्याचा प्रयत्न करत असताना मिशनरी सेवा करणारी मिल्ड्रेड विलेट (तिने पुढे जॉन बार यांच्यासोबत लग्न केलं) ही बहीण तिथं आली. तिला कार चालवता येत होती! तिने आम्हाला कार चालवायला शिकवलं आणि त्यानंतर आम्ही कुठेही जायला सज्ज झालो.

आर्थर आणि ऑलीव मॅथ्यूज ते राहत असलेल्या ट्रेलर आणि कारसोबत

आमची कार आणि ट्रेलर

आम्ही राहण्यासाठी जागाही शोधत होतो. बांधवांनी आम्हाला सांगितलं होतं, की आम्ही ट्रेलरमध्ये राहू नये. कारण, सेवाकार्याला विरोध करणारे त्याला आग लावू शकतात. त्यामुळे आम्ही घर शोधत होतो, पण ते मिळालं नाही. त्या रात्री आम्ही चौघं कारमध्येच झोपलो. दुसऱ्‍या दिवशी, आम्हाला हाताने तयार केलेला एक ट्रेलर मिळाला. या ट्रेलरमध्ये दोन बंकर बेड होते. आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता, त्यामुळे हाताने तयार केलेला ट्रेलरच आमचं घर बनलं! आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, कोणत्याही शेतकऱ्‍याच्या जमिनीवर ट्रेलर उभा केला तरी ते तक्रार करायचे नाहीत. तिथून आम्ही १६ ते २४ कि.मी. दूर प्रचारकार्यासाठी जायचो. मग जेव्हा आम्ही एखाद्या नवीन ठिकाणी जायचो, तेव्हा ट्रेलर आधी जिथं उभा केला होता तिथं प्रचारासाठी परत यायचो.

दक्षिण-पूर्व आयरिश रिपब्लिकमध्ये आम्ही सगळ्या घरांमध्ये साक्ष दिली. तिथं आम्हाला जास्त विरोधाचा सामना करावा लागला नाही. आम्ही २०,००० हून अधिक पुस्तिका वाटल्या आणि आस्थेवाईकांची नावं ब्रिटनमधल्या शाखा कार्यालयाला पाठवली. आज त्या क्षेत्रात शेकडो यहोवाचे साक्षीदार आहेत हे पाहून आनंद होतो!

पुन्हा इंग्लंडमध्ये आणि नंतर स्कॉटलंडमध्ये

काही वर्षांनंतर आम्हाला पुन्हा इंग्लंडमध्ये बोलावण्यात आलं आणि दक्षिण लंडनमध्ये आमची नेमणूक करण्यात आली. काही आठवड्यांतच, ब्रिटन शाखा कार्यालयाने आर्थरला बोलावलं आणि दुसऱ्‍याच दिवसापासून विभागीय पर्यवेक्षक म्हणून काम पाहायला सांगितलं. एका आठवड्याच्या प्रशिक्षणानंतर आम्ही स्कॉटलंडमधल्या एका विभागाला भेट द्यायला गेलो. या सर्व गोष्टींमुळे आर्थरला भाषणांच्या तयारीसाठी पूरेसा वेळच मिळाला नाही. अर्थात, मिळालेल्या कोणत्याही सेवेच्या जबाबदारीसाठी आर्थर नेहमी तयार असायचा; मग ती जबाबदारी कितीही कठीण असली तरीही. त्याच्या या चांगल्या उदाहरणामुळे मला नेहमीच उत्तेजन मिळालं. आम्हाला विभागीय कार्य आवडायचं. त्यापूर्वी आम्ही बरीच वर्षं, प्रचार न झालेल्या क्षेत्रांमध्ये सेवा केली होती. आणि आता बंधुभगिनींसोबत सेवा करणं खरंच खूप आनंददायक होतं.

१९६२ मध्ये आर्थरला गिलियड प्रशालेचं आमंत्रण मिळालं. त्याला दहा महिन्यांसाठी जावं लागणार होतं. मला आमंत्रण मिळालं नसल्यामुळे मी जाऊ शकत नव्हते. त्यामुळे निर्णय घेणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. पण, आर्थरने ते आमंत्रण स्वीकारणं योग्यच ठरेल असं आम्हाला वाटलं. आर्थर प्रशालेसाठी गेल्यानंतर पायनियर सेवेत मला कोणीही जोडीदार असणार नव्हता, म्हणून शाखा कार्यालयाने मला खास पायनियर म्हणून हेम्सवर्थला पाठवलं. मग जवळपास एका वर्षानंतर आर्थर परत आला, तेव्हा आमची नेमणूक प्रांतीय कार्यासाठी करण्यात आली. आम्हाला ज्या क्षेत्रांना भेटी द्याव्या लागायच्या त्यांत स्कॉटलंड, उत्तर इंग्लंड आणि उत्तर आयरलँड ही क्षेत्रं होती.

आयरलँडमधली नवीन नेमणूक

१९६४ मध्ये आर्थरला आयरिश रिपब्लिकमध्ये शाखा कार्यालय सेवक म्हणून नेमण्यात आलं. सुरुवातीला बेथेलमध्ये जायची मला भीती वाटत होती. कारण, मला प्रवासी कार्य आवडायचं. पण आता जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं, की मला बेथेलमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली हे खूप चांगलं झालं. माझं स्वतःचं असं मत आहे, की एखादी जबाबदारी किंवा सेवा करणं तुम्हाला आवडत नसतानाही तुम्ही ती स्वीकारता, तेव्हा यहोवा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतो. बेथेलमध्ये मी ऑफिसमधली कामं करायचे. तसंच, प्रकाशनांचं पॅकींग करणं, जेवण बनवणं आणि सफाई करणं अशीही कामं करायचे. काही काळासाठी आम्ही पुन्हा प्रांतीय कार्य केलं. त्या निमित्तानं आम्हाला अनेक बांधवांना भेटता आलं. शिवाय, आमचे बायबल विद्यार्थी करत असलेली प्रगतीही आम्ही पाहत होतो. या सर्व गोष्टींमुळे बंधुभगिनींसोबतचं आमचं नातं आणखी मजबूत झालं. खरंच, यहोवाकडून मिळालेला हा मोठा आशीर्वादच होता!

आयरलँडमधल्या साक्षीदारांसाठी एक महत्त्वाचा प्रसंग

आयरलँडमध्ये सर्वात पहिलं आंतरराष्ट्रीय अधिवेशन १९६५ मध्ये डब्लिन या शहरात भरवण्यात आलं.b मोठा विरोध असूनही हे अधिवेशन यशस्वी रीत्या पार पडलं. यात ३,९४८ लोक उपस्थित होते आणि ६५ जणांनी बाप्तिस्मा घेतला. वेगवेगळ्या देशांमधून आलेले ३,५०० बंधुभगिनी डब्लिनमधल्या लोकांच्या घरी राहिले. आदरातिथ्य दाखवणाऱ्‍या या घरमालकांचे आभार मानण्यासाठी बंधुभगिनींनी त्यांना पत्रं लिहिली. आणि या घरमालकांनीसुद्धा बांधवांच्या चांगल्या आचरणाबद्दल प्रशंसा केली. आयरलँडमध्ये झालेला हा खरंच एक सकारात्मक बदल होता.

आर्थर आणि बंधू नॉर, १९६५

अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आलेले बंधू नेथन नॉर यांचं स्वागत करताना आर्थर, १९६५ साली

१९८३ साली गायलिक भाषेत बायबल कथांचं माझं पुस्तक प्रकाशित करताना आर्थर

१९८३ साली गायलिक भाषेत बायबल कथांचं माझं पुस्तक प्रकाशित करताना आर्थर

राजकीय आणि धार्मिक गोष्टींवरून उत्तर आणि दक्षिण आयरलँडमधल्या लोकांमध्ये एक मोठी दरी निर्माण झाली होती. त्यामुळे, १९६६ मध्ये हे दोन्ही विभाग डब्लिन शाखेच्या देखरेखीखाली आले, ही गोष्ट फार विशेष होती. एके काळी कॅथलिक आणि प्रोटेस्टंट असलेले लोक सत्यात आल्यानंतर एकत्र मिळून यहोवाची सेवा करत आहेत हे पाहून आम्हाला आनंद व्हायचा.

पूर्णपणे नवीन नेमणूक

२०११ मध्ये आयरलँड आणि ब्रिटन शाखांना एकत्र करण्यात आलं. हा आमच्यासाठी मोठा बदल होता. आम्हाला पुन्हा लंडनमधल्या बेथेलमध्ये पाठवण्यात आलं. त्या वेळी आर्थरची तब्येत बिघडत चालली होती, आणि मला त्याची खूप काळजी वाटत होती. डॉक्टरांनी सांगितलं की त्याला पार्किन्सनचा आजार आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे ६६ वर्षं मला साथ देणाऱ्‍या आर्थरचा २० मे २०१५ मध्ये मृत्यू झाला.

मागच्या काही वर्षांपासून मला खूप एकटेपणा जाणवतो आणि बऱ्‍याच वेळा मी दुःखी व निराश होते. पूर्वी आर्थर नेहमी माझ्यासोबत असायचा. आता मला त्याची कमी भासते. पण, आपण ज्या-ज्या वेळी अशा परिस्थितींतून जात असतो, त्या-त्या वेळी आपण खरंतर यहोवाच्या आणखी जवळ येतो. मला आयरलँड, ब्रिटन आणि अमेरिकेहून बंधुभगिनींची पत्रं येतात. ते आर्थरवर किती प्रेम करायचे हे पाहून खूप बरं वाटतं. या पत्रांसोबतच, आर्थरचा भाऊ डेनिस आणि त्याची पत्नी मेविस, तसंच त्यांच्या मुली रूथ आणि ज्यूडी यांच्याकडून मिळणाऱ्‍या धीरामुळेही मला खूप मदत झाली आहे. या सर्वांकडून मिळणारी ही मदत मी शब्दांत व्यक्‍त करू शकत नाही.

मला यशया ३०:१८ (पं.र.भा.) या वचनातून खूप प्रोत्साहन मिळतं. त्यात म्हटलं आहे: “तुम्हावर कृपा करावी म्हणून यहोवा वाट पाहील, आणि तुम्हावर दया करावी म्हणून तो उंचावला जाईल, कारण यहोवा न्यायीपणाचा देव आहे; जे सर्व त्याची वाट पाहतात ते आशीर्वादित आहेत.” आपल्या सर्व समस्यांचा अंत करण्यासाठी आणि नव्या जगात एक नवीन नेमणूक व आनंददायक काम देण्यासाठी यहोवा धीरानं वाट पाहत आहे, ही गोष्ट मला खूप दिलासा देते.

मी आमच्या जीवनाचा विचार करते, तेव्हा यहोवाने आयरलँडमध्ये प्रचाराच्या कार्याचं कसं मार्गदर्शन केलं आणि ते कसं आशीर्वादित केलं हे लक्षात येतं. यहोवाच्या या कार्यात मदत करणाऱ्‍यांपैकी मीही एक आहे या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. खरंच, यहोवा सांगतो ते केल्याने आशीर्वादच मिळतात.

a इयरबुक ऑफ जेहोवाज व्हिटनेसेस १९८८, या पुस्तकातली पृष्ठं १०१-१०२ पाहा.

b इयरबुक ऑफ जेहोवाज व्हिटनेसेस १९८८, या पुस्तकातली पृष्ठं १०९-११२ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा