वाचक विचारतात
लोकांना शिक्षा देण्यासाठी देव नैसर्गिक संकटांचा वापर करतो का?
लोकांना शिक्षा देण्यासाठी देव नैसर्गिक संकटांचा वापर करत नाही. त्याने पूर्वी कधी असे केले नाही, आणि यापुढेही कधी तो असे करणार नाही. का? कारण, बायबलमध्ये १ योहान ४:८ येथे “देव प्रीति आहे” असे म्हटले आहे.
देवाच्या प्रत्येक कृतीतून त्याचे प्रेम झळकते. जी व्यक्ती इतरांवर प्रेम करते ती लोकांचे नुकसान होईल असे काहीच करत नाही, कारण बायबलमध्ये असे म्हटले आहे, “प्रीती शेजाऱ्यांचे काही वाईट करीत नाही.” (रोमकर १३:१०) ईयोब ३४:१२ येथे बायबल असे म्हणते: “देव निःसंशय काही वाईट करीत नाही.”
आपल्या काळात “मोठमोठे भूमिकंप” व अशी इतर संकटे येतील असे बायबलमध्ये भाकीत केले होते हे खरे आहे. (लूक २१:११) पण, या संकटांमुळे होणाऱ्या नुकसानासाठी यहोवा जबाबदार आहे का? समजा, हवामानाचा अंदाज सांगणाऱ्याने वादळ येणार असल्याचे सांगितले व त्याने सांगितल्याप्रमाणे खरेच वादळ आले, तर त्या जोरदार वादळामुळे झालेल्या हानीकरता आपण हवामान वृत्त देणाऱ्याला जबाबदार ठरवू का? मुळीच नाही. त्याच प्रकारे, नैसर्गिक संकटांमुळे होणाऱ्या नुकसानासाठी आपण यहोवाला जबाबदार धरू शकत नाही. तर मग, ही संकटे का येतात?
बायबलमध्ये असे म्हटले आहे, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे,” म्हणजेच दियाबल सैतानाच्या ताब्यात आहे. (१ योहान ५:१९) मानवजातीच्या सुरुवातीला देवाविरुद्ध बंड केले तेव्हापासूनच तो मनुष्यांचा घात करत आहे. (योहान ८:४४) सैतानाच्या लेखी मानवी जीवनाला काहीच किंमत नाही, ते कवडीमोल आहे. तो आपल्या स्वार्थी महत्त्वाकांक्षेने झपाटलेला आहे. आणि म्हणूनच त्याने स्वार्थाच्या जोरावर चालणारी जागतिक यंत्रणा अस्तित्वात आणली आहे. आजच्या या जगात कित्येक असहाय लोकांचे इतके शोषण केले जात आहे की त्यांना निरुपाय म्हणून अशा ठिकाणी राहावे लागते जेथे नैसर्गिक संकटांमुळे किंवा मानवनिर्मित संकटांमुळे जिविताला धोका संभवतो. (इफिसकर २:२; १ योहान २:१६) म्हणून, या संकटांमुळे होणाऱ्या नुकसानासाठी बऱ्याच अंशी ही स्वार्थी माणसे जबाबदार आहेत. (उपदेशक ८:९) ते कसे?
कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या संकटांपैकी बरीच संकटे काही प्रमाणात का होईना मानवनिर्मित असतात. वादळ आणि त्यापाठोपाठ आलेल्या पुरामुळे अमेरिकेतील न्यू ऑर्लीअन्झ शहरातील रहिवाशांवर कोसळलेली संकटे, तसेच व्हेनिझुएलाच्या किनारी प्रदेशातील दरडी कोसळून जमीनदोस्त झालेल्या घरांचेच उदाहरण घ्या. या आणि अशाच इतर घटनांमध्ये पर्यावरणाविषयीचे अज्ञान, निकृष्ट दर्जाचे बांधकाम, नियोजनाचा अभाव, धोक्याच्या इशाऱ्यांकडे केलेले दुर्लक्ष, आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा यांमुळे वादळ आणि पाऊस यांसारख्या नैसर्गिक घडामोडी मोठ्या प्रमाणावर विनाशकारी ठरल्या.
बायबलमध्ये सांगितलेल्या एका विपत्तीबद्दल पाहू या. येशूच्या काळात अचानक एक बुरूज कोसळल्यामुळे १८ जण मृत्यूमुखी पडले. (लूक १३:४) ही दुर्घटना मनुष्यांच्या चुकीमुळे, ‘समय व प्रसंगांमुळे’ किंवा या दोन्हींमुळे घडली असावी. पण, त्या लोकांना शिक्षा करण्यासाठी देवाने ती घडवून आणली नव्हती एवढे मात्र नक्की.—उपदेशक ९:११, पं.र.भा.
मग, याचा अर्थ देवाने कधीच कोणतीही संकटे आणली नाहीत असा होतो का? नाही, याचा असा अर्थ नाही. पण, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटांच्या अगदी उलट, देवाने आणलेल्या संकटांमुळे सर्व लोकांचा सरसकट नाश झाला नाही. ती संकटे आणण्यामागे एक उद्देश होता आणि देवाने क्वचितच अशी संकटे आणली. याची दोन उदाहरणे म्हणजे, कुलपिता नोहाच्या दिवसांतील जगव्याप्त जलप्रलय आणि लोटच्या दिवसांतील सदोम व अमोरा या शहरांचा नाश. (उत्पत्ति ६:७-९, १३; १८:२०-३२; १९:२४) देवाच्या या न्यायदंडांमुळे अपश्चात्तापी लोकसमुदायांचा नाश झाला. पण, देवाच्या नजरेत नीतिमान असलेले लोक या नाशातून बचावले.
खरेतर, यहोवा देवाजवळ सर्व दुःखांचा अंत करण्याचे आणि नैसर्गिक संकटांमुळे येणाऱ्या हालअपेष्टांतून मुक्त करण्याचे सामर्थ्य आहे, आणि असे करण्याची त्याची इच्छा देखील आहे. देवाने नेमलेला राजा, येशू ख्रिस्त याच्याविषयी स्तोत्र ७२:१२ मध्ये असे भाकीत करण्यात आले आहे: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना तो सोडवील.” (w०८ ५/१)