असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्यांना सांत्वन देणे
“आईचं आजारपण आटोक्याबाहेर गेलंय हे समजलं तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. अगदी सैरभैर झाले होते मी. आई आपल्याला सोडून जाणार हे मन मानायलाच तयार नव्हतं.”—ग्रेस, कॅनडा.
एखाद्या जवळच्या व्यक्तीला प्राणांतक आजार झाल्याचे निदान होते तेव्हा कुटुंबातील सदस्य, मित्रपरिवार यांच्यावर जणू आभाळच कोसळते. काय बोलावे, काय करावे त्यांना सुचत नाही. रुग्णाला सगळे खरे सांगावे की नाही, असा त्यांना प्रश्न पडतो. तर काहींना, आपल्या प्रिय व्यक्तीच्या वेदना, रोगामुळे झालेली तिची दुरवस्था आपल्याला पाहवेल का अशी भीती वाटते. अगदी अखेरचे क्षण कसे असतील? काय करावे, रुग्णाला कोणत्या शब्दांत सांत्वन द्यावे हे तेव्हा आपल्याला सुचेल का अशी काळजी बऱ्याच जणांना घेरते.
अशा वाईट बातमीला तुमच्या कोणत्या संभाव्य प्रतिक्रिया असू शकतात? तसेच अशा कष्टदायी काळात तुम्ही आपल्या प्रिय व्यक्तीला सांत्वन व प्रेमाचा आधार कसा देऊ शकता?—नीतिसूत्रे १७:१७.
स्वाभाविक प्रतिक्रिया
आपल्या प्रिय व्यक्तीला गंभीर आजार झाला आहे हे समजल्यावर अतिशय दुःख होणे स्वाभाविक आहे. डॉक्टर तर रोजच मृत्यू पाहात असतात. पण असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या शारीरिक व मानसिक वेदना बरेचदा त्यांनाही दुखवून जातात, हतबल वाटायला लावतात.
आपल्या प्रिय माणसाचं दुःख पाहून तुमच्याही मनात भावनांचा पूर येऊ शकतो. होझा या ब्राझीलमध्ये राहणाऱ्या स्त्रीच्या बहिणीला असाध्य आजार झाला, तेव्हा तिने म्हटले: “आपल्याला अतिशय प्रिय वाटणाऱ्या व्यक्तीला सतत वेदना सोसाव्या लागतात तेव्हा ते पाहणं खूपच कठीण असतं.” देवाचा विश्वासू सेवक मोशे याच्या बहिणीला कोड लागला तेव्हा त्याने देवाला काकुळतीने विनवले: “हे देवा, कृपा करून हिला बरे कर.”—गणना १२:१२, १३.
आजारी असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीची दयनीय अवस्था पाहून आपल्याला दुःख होण्याचे कारण म्हणजे आपल्याला सहानुभूतीशील देव यहोवा याच्या प्रतिरूपाचे निर्माण करण्यात आले आहे. (उत्पत्ति १:२७; यशया ६३:९) यहोवाला मानवांचे दुःख पाहून कसे वाटते? हे समजून घेण्याकरता येशूचे उदाहरण पाहूया, कारण तो आपल्या पित्याच्या व्यक्तिमत्त्वाचे हुबेहूब प्रतिबिंब होता. (योहान १४:९) येशूने जेव्हा रोगांनी पीडित असलेल्यांना पाहिले तेव्हा त्याला त्यांचा “कळवळा आला.” (मत्तय २०:२९-३४; मार्क १:४०, ४१) या अंकातील याआधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, येशूचा स्नेही लाजर मरण पावला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांना व मित्रांना शोक करताना पाहून येशूही अतिशय व्याकूळ होऊन “रडला.” (योहान ११:३२-३५) म्हणूनच, बायबलमध्ये मृत्यूला मानवांचा शत्रू म्हणण्यात आले आहे आणि आजारपण व मृत्यू लवकरच नाहीसे केले जातील असे आश्वासनही त्यात देण्यात आले आहे.—१ करिंथकर १५:२६; प्रकटीकरण २१:३, ४.
आपल्या प्रिय माणसाला असाध्य आजाराने ग्रासले आहे या वाईट बातमीबद्दल कोणालातरी—मग तो कोणीही असो—दोषी ठरवण्याची तीव्र इच्छा तुम्हाला होऊ शकते. पण, अत्यवस्थ रुग्णांची काळजी कशी घ्यावी या विषयावर डॉ. मार्था ऑर्टीस यांनी लिहिलेल्या शोध-प्रबंधात त्यांनी असा सल्ला दिला आहे: “रुग्णाच्या आजारपणाबद्दल इतरांना, म्हणजे डॉक्टर, नर्सेस किंवा स्वतःलाही दोषी ठरवू नका. कारण यामुळे केवळ तणाव निर्माण होईल आणि ज्याकडे लक्ष देण्याची सर्वात जास्त गरज आहे नेमके त्याकडेच, म्हणजे रुग्णाच्या गरजांकडे यामुळे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.” तेव्हा, तुमच्या प्रिय व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या आजाराला तोंड देण्यास, तसेच लवकरच मृत्यू होणार या वस्तुस्थितीला सामोरे जाण्यास तुम्ही कशी मदत करू शकता?
आजाराकडे नव्हे, व्यक्तीकडे लक्ष द्या
पहिली गोष्ट म्हणजे, आजारामुळे किंवा उपचारांमुळे झालेल्या रुग्णाच्या शरीराच्या दुरवस्थेवरच सगळे लक्ष केंद्रित करण्याऐवजी, एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहा. हे तुम्ही कसे करू शकता? सारा नावाची एक नर्स म्हणते: “मी सहसा रुग्णांचे आजारी पडण्याआधीचे, म्हणजे जेव्हा ते तंदुरुस्त होते तेव्हाचे फोटो पाहते. ते आपल्या आठवणी सांगतात तेव्हा मी लक्ष देऊन ऐकते. असे केल्यामुळे, मला रुग्णाच्या सध्याच्या दुरवस्थेकडेच न पाहता त्या व्यक्तीचे जीवन व तिचे अतीतही आठवणीत ठेवण्यास साहाय्य होते.”
ॲन-कॅट्रीन ही आणखीन एक नर्स, रुग्णाच्या शारीरिक अवस्थेच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे पाहणे तिला कसे शक्य होते याविषयी सांगते. ती म्हणते: “मी त्या व्यक्तीच्या डोळ्यांत बघून त्यांच्याशी बोलते. तसेच, रुग्णाचा त्रास कमी करण्याकरता जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करते.” द नीड्स ऑफ द डाईंग—अ गाईड फॉर ब्रिंगिंग होप, कंफर्ट, ॲन्ड लव्ह टू लाईफ्स फायनल चॅप्टर या पुस्तकात असे म्हटले आहे: “आजारपणामुळे किंवा अपघातामुळे विरूप झालेल्या प्रिय व्यक्तीकडे पाहताच कमालीचे अस्वस्थ वाटणे साहजिक आहे. अशा वेळी फक्त आपल्या प्रिय व्यक्तीच्या डोळ्यांत बघा. त्यांचे न बदललेले तपकीरी, हिरवे किंवा निळे डोळे तुम्हाला आठवण करून देतील की ही तुम्हाला प्रिय वाटणारी तीच व्यक्ती आहे.”
अर्थात, अशा प्रकारे वागण्याकरता तुम्हाला मनाचा निर्धार करून आपल्या भावनांवर ताबा ठेवावा लागेल. असाध्य रोगाने पीडित रुग्णांना नियमित भेटी देणारे एक ख्रिस्ती वडील, जॉर्ज असे म्हणतात: “आजारी व्यक्तीबद्दल आपल्याला वाटणारा जिव्हाळा हा तिला झालेल्या आजारापेक्षा प्रबळ असला पाहिजे.” आजारपणाकडे लक्ष न देता, त्या व्यक्तीकडे पाहणे हे तुमच्याकरता व त्या व्यक्तीकरताही फायद्याचे आहे. ईवॉन, जी पूर्वी कॅन्सरग्रस्त मुलांची काळजी घेत होती, ती म्हणते: “आपण या रुग्णांना त्यांचा आत्मसन्मान टिकवून ठेवण्यास साहाय्य करू शकतो हे समजून घेतल्यास त्यांच्या खालावत जाणाऱ्या स्थितीला तोंड देणे शक्य होते.”
ऐकून घेण्यास उत्सुक असा
काही जण, अंतिम अवस्थेत असणाऱ्या रुग्णावर मनापासून प्रेम असूनही त्याला भेट देणे, किंवा त्याच्यासोबत संपर्क साधणे टाळत असतील. का? कारण काय बोलावे, कसे सांत्वन द्यावे हे सुचणार नाही अशी त्यांना भीती वाटत असते. पण, ॲन-कॅट्रीन जिने अलीकडेच एका अत्यवस्थ मैत्रिणीची सेवा केली, ती असे म्हणते, की या रुग्णांना भेटायला गेल्यास नेहमीच काहीतरी बोललेच पाहिजे असे नसते. ती म्हणते: “सांत्वन हे आपण केवळ शब्दांतूनच नव्हे तर आपल्या एकंदर वागण्यातूनही देत असतो. आजारी व्यक्तींच्या बिछान्याजवळ खुर्ची ओढून बसणे, त्यांच्याजवळ झुकून त्यांचा हात हातात घेणे, रडू आले तरी न संकोचता अश्रूंद्वारे आपल्या भावना व्यक्त होऊ देणे या सर्व गोष्टींतून आपण त्यांच्याविषयी आपल्याला वाटणारी कळकळ व्यक्त करतो.”
तुमच्या प्रिय व्यक्तीलाही कदाचित आपल्या भावनांना वाट करून देण्याची गरज वाटत असेल—मनात दडलेल्या गोष्टी काही आडपडदा न ठेवता, भडभडून सांगाव्याशा वाटत असतील. पण, घरचे लोक उगाच आपल्यामुळे आणखीनच अस्वस्थ होतील या भीतीने बरेचदा रुग्ण गंभीर विषयांसंबंधी आपल्या मनातले बोलायला कचरतो. तर दुसरीकडे, रुग्ण मनाने खचेल असा विचार करून कधीकधी कुटुंबीय व मित्र देखील त्याला माहीत असल्या पाहिजेत अशा गोष्टी त्याच्यापासून लपवून ठेवू शकतात. रोगाबद्दल व उपचारांबद्दल महत्त्वाची माहिती देखील कधीकधी ते रुग्णाला सांगत नाहीत. अशा प्रकारे कट करून रुग्णाला अंधारात ठेवल्यामुळे काय होते? अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करणारे एक डॉक्टर असे सांगतात की सहसा एक खोटे लपवण्यासाठी दहा खोटी बोलावी लागतात. आणि सत्य लपवण्याच्या या प्रयत्नात, आजारपणाला धैर्याने तोंड देऊन त्याविषयी मोकळेपणाने बोलण्याची संधी आपण रुग्णाकडून हिरावून घेतो. तसेच, यामुळे रुग्णाला त्याच्या आजाराला तोंड देण्यास मदत करण्यासाठी घरच्या व इतर जवळच्या माणसांजवळ शक्ती उरत नाही. म्हणूनच, आजारी व्यक्तीची इच्छा असल्यास तिला आपल्या आजारपणाबद्दल किंवा संभाव्य मृत्यूबद्दल मोकळेपणाने बोलू द्यावे.
पुरातन काळात, देवाच्या सेवकांनी मरणासन्न अवस्थेत असताना यहोवा देवाजवळ आपल्या मनातील भीती न संकोचता व्यक्त केली. उदाहरणार्थ, आपला मृत्यू होणार हे ३९ वर्षांच्या राजा हिज्कियाला समजले तेव्हा त्याने याविषयी दुःख व्यक्त केले. (यशया ३८:९-१२, १८-२०) त्याच प्रकारे, अत्यवस्थ रुग्णांनाही आपले जीवन अकाली संपुष्टात येणार या जाणिवेने होणारे दुःख व्यक्त करू दिले पाहिजे. कदाचित प्रवास करणे, कुटुंब वाढवणे, नातवंडांचे बालपण पाहणे किंवा देवाची अधिक सेवा करणे यांसारख्या मनात असलेल्या बराचशा गोष्टी आता अधुऱ्या राहतील याची खंत त्यांना सतावत असेल. आपले कुटुंबीय, मित्र आपल्याशी कसे वागावे हे समजत नसल्यामुळे आपल्याला टाळतील अशी त्यांना भीती वाटत असेल. (ईयोब १९:१६-१८) किंवा परावलंबनाची, लोळागोळा होऊन खितपत पडण्याची, किंवा मृत्यू येईल तेव्हा एकटे असण्याची भीती त्यांना राहून राहून घेरत असेल.
ॲन-कॅट्रीन म्हणते: “रुग्णाला भरभरून बोलू द्या. त्याला मध्येच टोकू नका, कशाविषयीही दोषी ठरवू नका किंवा त्याला वाटणारी भीती अनाठायी आहे असे सुचवू नका. त्याच्या मनातील विचार व भावना जाणून घेण्याचा आणि त्याच्या इच्छा, भय, व अपेक्षा समजून घेण्याचा हा खरे तर सर्वात उत्तम मार्ग ठरेल.”
मूलभूत गरजा समजून घ्या
आपल्या प्रिय माणसाचे दुःख पाहून, आणि त्यातच तीव्र उपचारांमुळे त्याला सोसाव्या लागणाऱ्या वेदना व दुष्परिणाम यांमुळे तुम्ही इतके खिन्न होऊ शकता की त्याच्या एका मूलभूत गरजेकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. ही म्हणजे रुग्णाला आपल्या उपचारांसंबंधी पूर्ण निर्णयस्वातंत्र्य असण्याची गरज.
काही संस्कृतींत कुटुंबीय, आजारी माणसाच्या मनावर उगाच ताण यायला नको म्हणून त्याला किंवा तिला आजारपणाबद्दल अंधारातच ठेवतात. इतके, की वैद्यकीय उपचारांबद्दलचे निर्णयही ते रुग्णाला न सांगता परस्पर घेतात. इतर संस्कृतींत काहीशा वेगळ्या स्वरूपाची समस्या असू शकते. उदाहरणार्थ, परिचारक असणारा जेरी सांगतो, “भेटायला येणारे लोक कधीकधी आजारी माणसाच्या बिछान्याजवळ उभे राहून, जणू तो तिथे नाहीच अशा आविर्भावात आपसांत त्याच्याविषयी बोलतात.” अशा वागण्यामुळे रुग्णाच्या आत्मप्रतिष्ठेचा आदर केला जात नाही.
उमेद ही अशा प्रकारच्या रुग्णांची आणखी एक मूलभूत गरज असते. काही देशांत उत्तम दर्जाचे वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी, सर्वात परिणामकारक ठरेल अशी उपचारपद्धती शोधून काढता आल्यास, रुग्णाला आपण बरे होऊ अशी आशा वाटते. मीशेल हिच्या आईचा कॅन्सर तीनवेळा परत आला. या सबंध काळात ती आपल्या आईच्या पाठीशी उभी राहिली. ती सांगते: “आईला जर दुसऱ्या प्रकारचा उपचार करून पाहावासा वाटत असेल किंवा दुसऱ्या एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावासा वाटत असेल, तर मी तिला आवश्यक माहिती मिळवायला मदत करते. एक गोष्ट मी शिकले आहे, ती म्हणजे, मनात वास्तवाची जाणीव ठेवायची पण त्याच वेळेस तिच्याशी बोलताना सतत आशावादी राहायचं.”
पण समजा कोणताच उपचार उपलब्ध नसेल, तर? प्राणांतक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला मृत्यूविषयी मोकळेपणाने बोलू देणे आवश्यक आहे, हे आठवणीत असू द्या. जॉर्ज नावाच्या ज्या ख्रिस्ती वडिलांचा याआधी उल्लेख करण्यात आला आहे, ते म्हणतात: “रुग्णाजवळ किती काळ उरला आहे याचा त्याला स्पष्ट अंदाज देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे त्याला आवश्यक व्यवहारांची व्यवस्था करण्याची व आपल्या मनाची तयारी करण्याची संधी मिळते.” अशा प्रकारे तयारी करता आल्यामुळे रुग्णाला अनेक अधुऱ्या गोष्टी पुऱ्या केल्याचे समाधान मिळू शकते, तसेच आपले इतरांवर ओझे होईल याविषयी त्याची काळजी काहीशी कमी होईल.
अर्थात या विषयांवर बोलणे बहुतेकांना अवघड वाटते. पण मनमोकळेपणाने बोलल्यामुळे, तुम्हाला एरवी ज्या भावना बोलून दाखवण्यास संकोच वाटू शकतो अशा अगदी मनातल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करण्याची संधी मिळेल. मरणोन्मुख व्यक्तीला जुने मतभेद मिटवण्याची, मनात वर्षानुवर्ष दडपून ठेवलेल्या खंती, निराशा व्यक्त करण्याची किंवा क्षमा मागण्याची इच्छा असू शकते. भावनांच्या या आदानप्रदानामुळे तुमच्या नात्यातली वीण आणखी घट्ट होईल.
अखेरच्या दिवसांत सांत्वन देणे
अखेरच्या घटका मोजत असलेल्या व्यक्तीला तुम्ही कशा प्रकारे सांत्वन देऊ शकता? डॉ. ऑर्टीस, ज्यांचे शब्द याआधी उद्धृत करण्यात आले आहेत ते म्हणतात: “रुग्णाला आपल्या शेवटल्या इच्छा व्यक्त करू द्या. त्यांचे लक्षपूर्वक ऐकून घ्या. शक्य असल्यास, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जर शक्य नसेल, तर प्रामाणिकपणे त्यांना तसे सांगा.”
मरणोन्मुख व्यक्तीला आपल्या जवळच्या, प्रिय माणसांच्या सतत संपर्कात राहण्याची गरज आता कधी नव्हे इतक्या प्रकर्षाने जाणवू शकते. जॉर्ज म्हणतात, “रुग्णाला अशक्तपणामुळे जास्त वेळ बोलता येत नसले, तरीसुद्धा त्याला आपल्या प्रिय व्यक्तींशी संपर्क साधण्यास मदत करा.” टेलिफोनने का होईना, पण जवळच्या व्यक्तींशी संपर्क केल्यास, एकमेकांना दिलासा देण्याची व सोबत मिळून प्रार्थना करण्याची संधी मिळू शकते. क्रिस्टीना या कनेडियन स्त्रीच्या तीन प्रिय व्यक्ती एकापाठोपाठ एक मरण पावल्या. ती सांगते: “अगदी अखेरच्या दिवसांत त्यांना ख्रिस्ती बांधवांच्या प्रार्थनांची गरज अधिकाधिक भासत होती.”
तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तीसमोर रडायला भीती वाटावी का? नाही. उलट, त्यांच्यासमोर आपले अश्रू वाहू दिल्यास तुम्ही त्यांना, सांत्वन देणाऱ्याची भूमिका घेण्याची संधी देत असता. द नीड्स ऑफ द डाईंग या पुस्तकात म्हटले आहे: “मरणासन्न व्यक्तीने आपल्याला दिलासा देणे हा एक हेलावून टाकणारा अनुभव असतो. पण त्यांच्यासाठी हा अतिशय म्हत्त्वाचा ठरू शकतो.” सर्वांकडून ज्या व्यक्तीची सतत काळजी घेतली जात आहे, ती व्यक्ती जेव्हा इतरांना सांत्वन देते, तेव्हा तिला एक मित्र, आई किंवा वडील म्हणून आपल्या भूमिकेची आठवण होते.
तुम्हाला आपल्या प्रिय व्यक्तीच्या शेवटल्या क्षणांत तिच्याजवळ असणे शक्य होईलच असे नाही. पण जर इस्पितळात किंवा घरी त्याच्या/तिच्यासोबत असणे तुम्हाला शक्य असेल, तर अगदी शेवटपर्यंत त्यांचा हात धरून ठेवण्याचा प्रयत्न करा. हे शेवटले क्षण, पूर्वी कधीही बोलून दाखवल्या नव्हत्या अशा भावना व्यक्त करण्याची तुम्हाला संधी देतील. तो/ती तर शुद्धीवर नाही, त्याच्या/तिच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया नाही असा विचार करून, त्यांचा निरोप घेण्याची, त्यांच्याविषयी आपले प्रेम व्यक्त करण्याची व पुनरुत्थानात त्यांना पुन्हा भेटण्याची आशा व्यक्त करण्याची संधी हातून जाऊ देऊ नका.—ईयोब १४:१४, १५; प्रेषितांची कृत्ये २४:१५.
या शेवटल्या क्षणांचा पुरेपूर फायदा घेतल्यास, कदाचित तुमच्या मनाला नंतर चुटपुट लागणार नाही. किंबहुना, हे भावनांनी ओथंबलेले क्षणच नंतर, आयुष्यातील निराशादायी वळणांवर तुमचे साथीदार बनू शकतील, तुम्हाला सांत्वन देऊ शकतील. आपल्या प्रिय व्यक्तीच्या ‘विपत्कालात’ शेवटपर्यंत साथ दिल्याचे समाधान कायम तुमच्या मनात राहील.—नीतिसूत्रे १७:१७. (w०८ ५/१)
[२८ पानांवरील संक्षिप्त आशय]
फक्त आजारपणाकडेच लक्ष न देता, आपल्या प्रिय व्यक्तीच्या व्यक्तित्वाकडे पाहणे हे तुमच्याकरता व तिच्याकरताही फायद्याचे आहे
[२९ पानांवरील चौकट/चित्र]
रुग्णाच्या आत्मप्रतिष्ठेचा आदर करण्याचा मार्ग
प्राणांतक रोगाने ग्रस्त रुग्णाला शांतीने व आत्मप्रतिष्ठेसह मरण्याचा जो मूलभूत हक्क आहे त्यास जपण्याच्या दृष्टीने बऱ्याच देशांत प्रयत्न केले जात आहेत. या हक्कांचा आदर करण्याकरता व घरी अथवा शुश्रूषा केंद्रात मरण्याच्या रुग्णाने व्यक्त केलेल्या इच्छेला मान देण्याकरता लेखी स्वरूपातील आगाऊ निर्देशपत्रे साहाय्यक ठरतात.
आगाऊ निर्देशपत्रामुळे पुढील गोष्टी साध्य होतील:
• डॉक्टर व नातेवाईकांशी सुसंवाद साधला जाईल
• महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या जबाबदारीतून कुटुंबीय मुक्त होतील
• रुग्णाला नको असलेले, निरुपयोगी, तीव्र व खर्चिक उपचार त्याला दिले जाणार नाहीत
प्रभावी आगाऊ निर्देशपत्रात निदान खालील माहिती असलीच पाहिजे:
• उपचारांसंबंधी निर्णय घेण्यास तुम्ही प्रतिनिधी म्हणून नेमलेल्या व्यक्तीचे नाव
• तुमचा आजार अगदीच आटोक्याबाहेर गेल्यास कोणते उपचार तुम्ही स्वीकारण्यास तयार आहात व कोणते तुम्ही स्वीकारू इच्छित नाही
• शक्य असल्यास, तुमच्या निर्णयांविषयी ज्यांना माहीत आहे अशा डॉक्टरांचे नाव