आईच्या प्रेमातून दिसणारे देवाचे प्रेम
“स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.”—यशया ४९:१५.
एक आई आपल्या बाळाला दूध पाजत आहे आणि ते बाळ तिच्या कुशीत अगदी निवांत विसावले आहे. या दृश्यातून आईची कोमलता आणि ममत्व दिसून येते. “मी जेव्हा पहिल्यांदा माझ्या बाळाला हातात घेतलं तेव्हा या कोवळ्या जीवाला प्रेमानं व काळजीनं वाढवण्याच्या जबाबदारीची मला जाणीव झाली,” असे पॅम नावाच्या एका आईने म्हटले.
बाळाच्या विकासासाठी आईची माया अतिशय महत्त्वाची असते ही वस्तुस्थिती आहे आणि संशोधनानेही आता ते सिद्ध झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे मानसिक आरोग्य कार्यक्रम या विषयावर प्रकाशित करण्यात आलेल्या एका लेखात असे म्हणण्यात आले: “ज्या मुलांना लहानपणी टाकून देण्यात आले होते किंवा आपल्या आईपासून वेगळे करण्यात आले होते ती मुले मोठेपणी दुःखी व हताश झाल्याचे, एवढेच नव्हे तर भीतरटही बनल्याचे दिसून आले आहे.” याच लेखात आणखी एका अभ्यासाविषयी म्हटले होते, की बालपणापासूनच प्रेमळ वातावरणात वाढणारी, त्यांच्याकडे लक्ष दिले जात असणारी मुले, दुर्लक्षित मुलांपेक्षा बऱ्याच प्रमाणात हुशार असतात.
बाळाच्या विकासासाठी आईचे प्रेम किती महत्त्वाचे आहे या संबंधाने अमेरिकेतील युसीएलए स्कूल ऑफ मेडिसीन येथील मनोदोषचिकित्सेचे प्राध्यापक ॲलन शोर असे म्हणतात: “बाळाचा सर्वात आधी आपल्या आईबरोबर संबंध येतो. हा संबंध एका साच्यासारखा आहे. आणि या साच्यानुसारच ती व्यक्ती भविष्यात इतर भावनिक नातेसंबंध जोडते.”
खिन्नता, आजारपण अथवा इतर कारणांमुळे एखादी आई आपल्या बाळाकडे कदाचित दुर्लक्ष करेल किंवा “तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल.” (यशया ४९:१५) पण हा अपवाद आहे; सहसा असे होत नाही. खरे तर आईला आपल्या मुलांवर प्रेम करायला शिकवावे लागत नाही. प्रसूतीच्या वेळी, मातेच्या शरीरात ऑक्सीटोसीन नावाचे होर्मोन वाढते व यामुळे तिचे गर्भाशय आकुंचन पावते आणि तिला पान्हा फुटतो. हेच होर्मोन पुरुष आणि स्त्रिया या दोघांनांही, प्रेमळपणे व निःस्वार्थपणे वागण्यास प्रेरित करते, असे मानले जाते.
प्रेमाचा उगम
उत्क्रांतीवादाचे समर्थक अशी शिकवण देतात, की आई व बाळामधील निःस्वार्थ प्रेमाची सुरुवात अचानक झाली व नैसर्गिक निवडीमुळे ती टिकून राहिली कारण या प्रेमामुळे आईला व बाळालाही फायदा होतो. इंटरनेटवरील मदरींग मॅगझीन नावाचे मासिक असा दावा करते, की “आपल्या मेंदूचा खालचा भाग सरपटणाऱ्या जनावरांकडून क्रमविकासाने आपल्याला मिळाला आहे आणि त्यावर वाढलेल्या मेंदूच्या समोरच्या भागाला मेंदूसंस्था म्हणतात. या मेंदूसंस्थेत भावना उत्पन्न होतात. याच मेंदूसंस्थेमुळे, आई आणि तिच्या बाळातले नाते जुळणे शक्य होते.”
मेंदूसंस्थेत भावना उत्पन्न होतात हे संशोधनामुळे सिद्ध झाले आहे, यात काहीच वाद नाही. पण, सरिसृपाकडून मिळालेल्या मेंदूवर अचानक वाढलेल्या भागात, आईला आपल्या लेकराबद्दल वात्सल्य उत्पन्न होते ही गोष्ट तुमच्या तर्कास पटते का?
त्याऐवजी हे कसे वाटते ते पाहा. बायबल म्हणते, की मानवाला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले होते. म्हणजे, मानवाला देवाचे गुण दाखवण्याच्या कुवतीसह निर्माण करण्यात आले होते. (उत्पत्ति १:२७) देवाचा प्रमुख गुण प्रेम आहे. प्रेषित योहानाने असे लिहिले: “जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही.” का ओळखत नाही? “कारण देव प्रीति आहे.” (१ योहान ४:८) देवाला प्रीती आहे, असे बायबलमधील या वचनात म्हटलेले नाही, तर देव प्रीति आहे असे म्हटले आहे याची कृपया नोंद घ्या. म्हणजे, देव प्रीतिचा उगम आहे.
बायबलमध्ये प्रीतीचे वर्णन पुढील शब्दांत करण्यात आले आहे: “प्रीति सहनशील आहे, परोपकारी आहे; प्रीति हेवा करीत नाही; प्रीति बढाई मारीत नाही, फुगत नाही; ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही; ती अनीतीत आनंद मानीत नाही, तर सत्यासंबधी आनंद मानते; ती सर्व काही सहन करिते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही.” (१ करिंथकर १३:४-८) सर्व गुणांत श्रेष्ठ असलेल्या प्रीती या गुणाची सुरुवात अचानक झाली, या गोष्टीवर विश्वास ठेवायला कठीण वाटते, नाही का?
तुमच्यावर कसा परिणाम होतो?
प्रेमाविषयीचे मागच्या परिच्छेदांतील वर्णन वाचल्यावर, आपल्यावरही कुणीतरी असंच प्रेम करावं, असं तुम्हाला तीव्रपणे जाणवलं का? तुमच्या मनात अशी भावना येणं हे साहजिक आहे. का बरे? कारण “आपण देवाचे वंशज” आहोत. (प्रेषितांची कृत्ये १७:२९) अशा प्रकारचे प्रेम मिळण्यास व व्यक्त करण्यास आपली रचना करण्यात आली आहे. आणि देवाला आपल्याबद्दल नितांत प्रेम आहे, अशी खात्री आपण बाळगू शकतो. (योहान ३:१६; १ पेत्र ५:६, ७) या लेखाच्या सुरुवातीला उल्लेख करण्यात आलेल्या वचनानुसार, देवाला आपल्याबद्दल असलेले प्रेम, एका आईला तिच्या बाळाबद्दल असलेल्या प्रेमापेक्षाही अधिक आहे. देवाचे प्रेम कधीही न संपणारे प्रेम आहे.
पण मग तुमच्या मनात असे प्रश्न येतील, की ‘जर देव सर्वज्ञानी, सर्वशक्तिमान व प्रेमळ आहे तर तो जगात चाललेले दुःख काढून का टाकत नाही? जगात कितीतरी मुलांचा मृत्यू होत आहे, जुलूम चालला आहे, गैरव्यवस्था व लोभ यामुळे पृथ्वीची नासाडी होत आहे, आणि याबाबतीत तो काहीही का करत नाही?’ हे खरोखरच विचार करायला लावणारे प्रश्न आहेत, ज्यांची समाधानकारक उत्तरे आपल्याला मिळाली पाहिजेत.
अज्ञेयवादी व्यक्ती काहीही म्हणत असले तरीसुद्धा, या प्रश्नांची मनास समाधान देणारी उत्तरे मिळणे शक्य आहे. शेकडो राष्ट्रांतील कोट्यवधी लोकांना, यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करून या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली आहेत. या मासिकाचे प्रकाशक तुम्हालाही असेच करण्याचे उत्तेजन देत आहेत. देवाचे वचन आणि सृष्टी यांचा अभ्यास केल्यावर देवाबद्दलचे तुमचे ज्ञान वाढेल. ज्ञान वाढल्यावर तुम्हाला समजेल की तो दूर किंवा अनाकलनीय नाही. देव “आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही,” अशी तुमची खात्री नक्कीच पटेल.—प्रेषितांची कृत्ये १७:२७. (w०८ ५/१)
[८ पानांवरील संक्षिप्त आशय]
देवाला आपल्याबद्दल असलेले प्रेम, एका आईला तिच्या बाळाबद्दल असलेल्या प्रेमापेक्षाही अधिक आहे