कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या
समस्या सोडवणे
तो विचारतो: “मुली कुठं गेल्यात?”
ती म्हणते: “शॉपिंग मॉलला गेल्यात, नवीन कपडे आणायला.”
तो म्हणतो: [आवाज चढवून] “नवीन कपडे आणायला? मागच्या महिन्यातच नवीन कपडे आणले होते ना?”
ती म्हणते: [वैतागून] “हो, पण तिकडे सेल लागलाय. जाऊदेत, त्या मला विचारून गेल्यात ना पण!”
तो: [खेकसतो] “मला न विचारता पैसे खर्च केलेले मला मुळीच आवडत नाही, हे तुला माहीत आहे ना! मला कळत नाही, माझ्या परवानगीशिवाय तू त्यांना जाऊच कसं दिलं?”
वर उल्लेख करण्यात आलेल्या पती-पत्नीला नेमक्या कोणत्या समस्या सोडवायच्या होत्या, असे तुम्हाला वाटते? पतीला आपला राग आवरता येत नसल्याचे तर स्पष्टच दिसत होते. याशिवाय, आपल्या मुलांना किती मोकळीक दिली पाहिजे, याबद्दल दोघांत दुमत असल्याचे दिसत होते. त्यांच्यात मोकळा संवाद होत नाही हेही दिसत होते.
कोणताही विवाह परिपूर्ण नाही. सर्वच जोडप्यांना या नाही तर त्या समस्यांना तोंड द्यावेच लागते. मग त्या समस्या लहान असोत किंवा मोठ्या, त्या कशा सोडवायच्या हे पतीपत्नीला माहीत असणे अतिशय महत्त्वाचे आहे. का महत्त्वाचे आहे?
कारण, न सोडवलेल्या समस्या काही काळानंतर, मोकळ्या संवादाला अडखळण ठरू शकतात. सुज्ञ राजा शलमोनाच्या पाहण्यात आले, की ‘कलह, दुर्गाच्या अडसरांसारखे’ आहेत. (नीतिसूत्रे १८:१९) तेव्हा, समस्यांचा सामना करतेवेळी तुम्ही प्रभावकारी संवाद साधण्याचा दरवाजा कसा उघडू शकता?
रक्तप्रवाह सुरळीत चालण्यासाठी जसे हृदय व फुप्फुसे महत्त्वाची भूमिका पार पाडतात तसेच विवाहात संवाद सुरळीत चालण्यासाठी प्रेम आणि आदर महत्त्वाची भूमिका पार पाडतात. (इफिसकर ५:३३) विवाहातील समस्या सोडवताना, एक दांपत्य प्रेमाने प्रवृत्त होऊन मागच्या चुका उकरणार नाही. यामुळे होणारी भावनिक दुखापत ते टाळतील व त्यांच्यात जो वाद चालला आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतील. (१ करिंथकर १३:४, ५; १ पेत्र ४:८) एकमेकांचा आदर करणारे पतीपत्नी, आपल्या भावना मोकळेपणे व्यक्त करण्यास एकमेकांना वाव देतील आणि आपला सोबती नेमके काय सांगू इच्छितोय, हे समजण्याचा प्रयत्न करतील.
समस्या सोडवण्याकरता चार कानमंत्र
खाली सुचवण्यात आलेले चार कानमंत्र विचारात घ्या आणि प्रेमळ व आदरणीय मार्गाने समस्या सोडवण्याकरता बायबलमधील तत्त्वे तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतात ते पाहा.
१. समस्येची चर्चा करण्यासाठी निश्चित वेळ ठरवा. “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; . . . मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:१, ७) या लेखाच्या सुरुवातीला पतीपत्नीत चाललेल्या वादाचा उल्लेख करण्यात आला आहे. अशा वादांमुळे, पतीपत्नी कदाचित एकमेकांचा पाणउतारा करतील. असे झाल्यास, वाद आणखी चिघळण्याआधी स्वतःवर ताबा ठेवा अर्थात ‘मौन धरा.’ “कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी,” या बायबलमधील सल्ल्याचे पालन केल्याने तुमचा नातेसंबंध आणखी बिघडणार नाही.—नीतिसूत्रे १७:१४.
पण जसा मौन धरण्याचा समय तसा ‘बोलण्याचाही समय’ असतो. पतीपत्नीत समस्या उद्भवतात तेव्हा त्या वेळीच सोडवणे उत्तम; त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास त्या जंगली गवताप्रमाणे भराभर वाढत राहतील. तुमच्यात समस्या निर्माण झाली असेल तर ती लगेच सोडवा; आज ना उद्या ती ठीक होईल, असे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. वाद आणखी चिघळण्याधी तुम्ही जर तो मध्येच थांबवत असाल, तर वातावरण निवळल्यानंतर त्या समस्येवर चर्चा करण्यासाठी वेळ ठरवून आपल्या सोबत्याला आदर दाखवा. असे करण्याचे वचन दिल्याने तुम्हा दोघांनाही, “तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये,” या बायबलमधील सल्ल्याचे पालन करण्यास सोपे जाईल. (इफिसकर ४:२६) अर्थात, दिलेले वचन तुम्ही पाळले पाहिजे.
हे करून पाहा: आठवड्यातला एक दिवस ठरवा ज्या दिवशी तुम्ही, कौटुंबिक समस्यांची चर्चा करू शकता. दिवसाच्या एखाद्या विशिष्ट वेळी, तुम्ही मूडमध्ये नसता असे जर तुम्हाला दिसून आले, जसे की कामावरून घरी आल्याबरोबर किंवा जेवणाआधी, तर त्या वेळेला समस्यांची चर्चा करायची नाही, असे ठरवा. त्याऐवजी, जेव्हा तुम्ही दोघेही निवांत असता अशी एखादी वेळ निवडा.
२. आपले मत प्रामाणिकपणे व आदराने व्यक्त करा. “तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला.” (इफिसकर ४:२५) तुम्ही विवाहित असाल तर तुमचा सर्वात जवळचा शेजारी तुमचा वैवाहिक सोबती आहे. तेव्हा, आपल्या सोबत्याशी बोलताना, आपल्या भावना प्रामाणिकपणे व नेमक्या शब्दांत व्यक्त करा. मार्गारेटाच्याa लग्नाला २६ वर्षे उलटली आहेत. ती म्हणते: “माझं नवीनच लग्न झालं होतं. आमच्यात समस्या उभी राहिलीच तर मला वाटायचं की माझा नवरा, मी त्याला काही न सांगताच मला समजून घेईल. पण मी केलेली ही अपेक्षा किती चुकीची होती, हे नंतर मला जाणवलं. आता मी, स्पष्ट शब्दांत माझी मतं व्यक्त करण्याचा प्रयत्न करतेय.”
समस्येची चर्चा करताना, तुम्हाला युद्धात विजयी ठरायचे असते किंवा शत्रूचा पराभव करायचा नसतो तर तुमच्या मनात नेमक्या कोणत्या भावना आहेत हे तुमच्या सोबत्याला कळवायचे असते. असे प्रभावीपणे करण्याकरता, तुमच्या मते समस्या काय आहे, ती केव्हा उद्भवते आणि त्यावेळेला तुम्हाला नेमके कसे वाटते ते बोलून दाखवा. उदाहरणार्थ, तुमच्या सोबत्याच्या गबाळेपणाचा तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही अगदी आदराने असे म्हणू शकता, ‘तुम्ही जेव्हा कामावरून घरी येता आणि मग कपडे असे इकडे-तिकडे फेकता, [समस्या काय आहे व ती केव्हा उद्भवते] तेव्हा घर नीटनेटकं ठेवण्यासाठी मी जे काही करत असते त्याची कुणाला कदर नाहीए, असं मला वाटतं [तुम्हाला नेमके कसे वाटते].’ आणि मग व्यवहारकुशलतेचा उपयोग करून, या समस्येवर अमूक हा उपाय आहे, असे सुचवा.
हे करून पाहा: आपल्या मनातील विचार आपल्या सोबत्यापुढे स्पष्टपणे व्यक्त करण्यास तुम्हाला मदत व्हावी म्हणून, तुमच्या मते समस्या नेमकी काय आहे व ती कशी सोडवायची, हे एका कागदावर लिहा.
३. आपल्या सोबत्याच्या भावना ऐकून घ्या आणि त्या मान्य करा. शिष्य याकोबाने असे लिहिले, की ख्रिश्चनाने “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद” असावे. (याकोब १:१९) अशा फार कमी गोष्टी आहेत ज्यामुळे वैवाहिक जीवन दुःखी होऊ शकते; त्यापैकी एक गोष्ट म्हणजे, एखाद्या समस्येविषयी तुम्हाला नेमके कसे वाटते हे तुमच्या सोबत्याला कळत नाही, अशी छाप तुमच्या मनावर पडली तर तुमचे वैवाहिक जीवन आणखीनच दुःखी होऊ शकते. यास्तव, आपल्या सोबत्याच्या मनावर अशी छाप पडणार नाही ही खबरदारी घ्या.—मत्तय ७:१२.
वुल्फगांग यांच्या लग्नाला ३५ वर्षे उलटली आहेत. ते म्हणतात: “आम्ही समस्या सोडवत असतो तेव्हा, माझ्या बायकोला माझी विचार करायची पद्धत समजत नाही, असं जेव्हा मला जाणवू लागतं, तेव्हा माझ्या छातीत अक्षरशः धडधडतं.” डायनाच्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत. ती कबूल करते: “आम्ही जेव्हा एखाद्या समस्येची चर्चा करत असतो तेव्हा, माझ्या नवऱ्याचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नसतं, अशी माझी सतत तक्रार असते.” या समस्यांवर तुम्ही कशाप्रकारे मात करू शकता?
तुमचा सोबती काय विचार करतोय, किंवा त्याला कसे वाटत आहे, हे तुम्हाला कळते, असे गृहीत धरू नका. देवाचे वचन म्हणते की “गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणाऱ्यांजवळ ज्ञान असते.” (नीतिसूत्रे १३:१०) आपला सोबती बोलत असताना, मधे-मधे बोलून त्याला अनादर दाखवू नका. मग, तुमच्या सोबत्याने सांगितलेले सर्वकाही तुम्हाला नीट समजले आहे, याची खात्री करण्यासाठी ते पुन्हा बोलून दाखवा पण हे तिरसटपणे किंवा रागाने करू नका. पुन्हा बोलून दाखवताना गैरसमजेमुळे तुम्ही काही चुकीचे बोललात तर तुमच्या सोबत्याला तुमची चूक सुधारू द्या. तुमचेच तुणतुणे सतत वाजवू नका. अमूक एखाद्या विषयावर आपल्याला एकमेकांच्या भावना, विचार समजत आहेत यावर जोपर्यंत तुमचे एकमत होत नाही, तोपर्यंत आळीपाळीने एकमेकांचे बोलणे ऐकून घ्या.
आपल्या सोबत्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकण्यास व त्याचे/तिचे मत मान्य करण्यास नम्रपणा व धीर लागतो. पण तुम्ही जर आपल्या सोबत्याचा आदर करण्यात पुढाकार घेतलात तर तुमचा सोबतीही तुमचा आदर करण्यास प्रवृत्त होईल.—मत्तय ७:२; रोमकर १२:१०.
हे करून पाहा: आपल्या सोबत्याने व्यक्त केलेले विचार पुन्हा बोलून दाखवताना, पोपटासारखे जसे का तसे बोलून दाखवू नका. तुमचा सोबती काय म्हणतोय व त्याला/तिला कसे वाटत आहे हे तुम्हाला समजत असल्याचे त्याला/तिला प्रेमळपणे सांगा.—१ पेत्र ३:८.
४. समस्येवर तोडगा निघतो तेव्हा सहमती दाखवा. “एकट्यापेक्षा दोघे बरे; कारण त्यांच्या श्रमांचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. त्यांतला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल.” (उपदेशक ४:९, १०) पती व पत्नीने एकत्र मिळून काम केले व एकमेकांना मदत केली तर विवाहातील बहुतेक समस्या सोडवता येतात.
हे खरे आहे, की यहोवाने पतीला कुटुंबाचा मस्तक नेमले आहे. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२३) परंतु मस्तकपदाचा अर्थ, हुकूमशाही नव्हे. सुज्ञ पती, आपल्या पत्नीचे मत न विचारता कुठलाही निर्णय घेणार नाही. डेव्हीड यांच्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत. ते म्हणतात: “मला जर निर्णय घ्यायचा असेल, तर माझी पत्नी सहमत होईल आणि आमच्या दोघांचा एकच निर्णय असेल, याची खात्री मी करतो.” तान्याच्या लग्नाला सात वर्षे झाली आहेत. ती म्हणते: “कोण बरोबर आहे आणि कोण चूकतय, हा प्रश्न नाही. कधीकधी, एखादी समस्या कशी सोडवायची याबद्दल पती-पत्नीची मतं वेगवेगळी असतात. यातही, दोघंही जर लवचीक व समंजस असले, तर समस्या सोडवता येतात, असं मी पाहिलं आहे.”
हे करून पाहा: समस्या कशा सोडवता येतील यावर तुमच्या दोघांच्या डोक्यात जितक्या कल्पना येतात तितक्या एका कागदावर लिहून काढा; दोघांनाही, आपण एकत्र मिळून कार्य करतोय, असे वाटले पाहिजे. आता आणखी पुढे आपल्याला काही सुचत नाही, असे जेव्हा तुम्हाला वाटते तेव्हा ती सूची वाचा आणि दोघांचेही ज्यावर सहमत होईल, असा तोडगा अंमलात आणा. आणि मग, काही दिवसानंतर तुम्ही घेतलेल्या निर्णयाप्रमाणे तुम्ही दोघंही वागत आहात किंवा नाही, व तुम्हाला कितपत यश आले आहे हे पाहण्यासाठी वेळ काढा.
एकएकटे नव्हे तर एकजुटीने काम करा
येशूने विवाहसंस्थेची तुलना जुवाशी केली. (मत्तय १९:६) येशूच्या दिवसांत लाकडी तुळईपासून जू बनवले जात असे. एकजुटीने काम करावे म्हणून या तुळईच्या दोन्ही बाजूला दोन प्राणी जुंपले जात असत. प्राण्यांनी एकमेकांना सहकार्य दिले नाही तर त्यांना व्यवस्थित काम करता येत नसे आणि त्यांच्या मानांवर असलेल्या जोखडामुळे या प्राण्यांनाच जखम होत असे. पण जर त्यांनी एकजुटीने काम केले तर ते वजनदार वस्तू ओढू शकत होते किंवा शेत नांगरू शकत होते.
तसेच, पतीपत्नीने एकजुटीने काम केले नाही तर वैवाहिक जोखडामुळे त्यांना जखम होऊ शकते. पण त्यांच्यात जर एकी असेल तर ते त्यांच्यासमोर येणारी कोणतीही समस्या सोडवू शकतात व आपला विवाह सुखी बनवू शकतात. कलाला नावाचे विवाहित गृहस्थ या गोष्टीचे सार अशा शब्दांत मांडतात: “गेल्या २५ वर्षांपासून आम्ही पतीपत्नीनं, मन मोकळेपणे बोलण्याद्वारे, स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवण्याद्वारे, मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करण्याद्वारे व बायबल तत्त्वांचा अवलंब करण्याद्वारे समस्या सोडवल्या आहेत.” तुम्हीही असेच करू शकता का? (w०८ ५/१)
स्वतःला विचारा . . .
▪ अशी कोणती समस्या आहे जिची चर्चा मी माझ्या पतीबरोबर/पत्नीबरोबर केलीच पाहिजे?
▪ या विषयावर माझ्या सोबत्याच्या खऱ्या भावना समजून घेण्याकरता मी काय करू शकतो/शकते?
▪ जर मी नेहमी माझंच घोडं पुढं चालू ठेवलं तर काय होऊ शकतं?
[तळटीप]
a काही नावे बदलण्यात आली आहेत.