ताऱ्यांच्या निर्मितीवरून दिसणारी देवाची शक्ती
“आपले डोळे वर करून पाहा; ह्यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांस बाहेर आणितो; तो त्या सर्वास नावांनी हाका मारितो, तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे; म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही.”—यशया ४०:२६.
आपला सूर्य हा केवळ एक सामान्य तारा आहे. तरी तो पृथ्वीपेक्षा ३,३०,००० पटीने विशाल आहे. पृथ्वीजवळचे बहुतेक तारे सूर्यापेक्षा आकाराने लहान आहेत. पण, इतर तारे आपल्या सूर्याच्या आकारापेक्षा किमान २७ पटीने विशाल आहेत, यापैकी एक म्हणजे, V382 सीग्नी नाव असलेला तारा.
आपल्या सूर्यातून किती उर्जा बाहेर पडते? अशी कल्पना करा, की एखाद्या ठिकाणी खूप मोठी आग लागली आहे आणि त्या ठिकाणापासून तुम्ही १५ किलोमीटर दूर आहात तरीही त्या आगीची झळ तुम्हाला लागत आहे. म्हणजे त्या आगीची उष्णता किती असावी याचा विचार करा! सूर्याचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर सुमारे १५ कोटी किलोमीटर इतके आहे. तरीसुद्धा, बाहेर तळपत्या उन्हात जर तुम्ही गेलात तर उष्णतेमुळे तुमच्या अंगावर फोड येऊ शकतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सूर्याच्या उर्जेच्या शंभर कोटीतील केवळ एक अंश उर्जा पृथ्वीपर्यंत पोहचते. तरी, सूर्याच्या उर्जेतील फक्त हा अल्पांश, पृथ्वीवरील जीवसृष्टीला टिकवून ठेवण्यास पुरेसा आहे.
खरे तर, शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे, की आपल्या सूर्यातून उत्सर्जित होणारी एकूण उर्जा, पृथ्वीसारख्या सुमारे ३१ महापद्म ग्रहांना टिकवून ठेवण्यास पुरेशी आहे. किंवा, ही महाकाय उर्जा मापण्याची दुसरी एक पद्धत म्हणजे, सूर्याची सर्व शक्ती फक्त एक सेकंदापुरती वापरली तर, “अमेरिका सध्या जितक्या उर्जेचा वापर करत आहे तितकी उर्जा पुढील ९०,००,००० वर्षांपर्यंत चालेल,” असे वेबसाईटवरील स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटर (एसडब्ल्यूपीसी) म्हणते.
सूर्याच्या गाभ्यातून केंद्रक संमीलनामुळे प्रचंड उर्जा उत्सर्जित होते. सूर्याचे आकारमान इतके विशाल आहे आणि त्याचा गाभा इतका दाट आहे, की गाभ्यातील उर्जा पृष्ठभागापर्यंत येण्याकरता लक्षावधी वर्षे लागतात. “सूर्याने जर आज उर्जा उत्सर्जित करण्याचे थांबवले तर पृथ्वीवर याचे परिणाम दिसण्याकरता ५,००,००,००० वर्षे लागतील,” असे वेबसाईटवरील एसडब्ल्यूपीसी म्हणते.
आता या वस्तुस्थितीचा विचार करा: निरभ्र काळोख्या रात्री तुम्ही आकाशात अगणित लुकलुकणारे तारे पाहता. प्रत्येक तारा सूर्याप्रमाणेच प्रचंड प्रमाणात उर्जा उत्सर्जित करत असतो. आणि शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे, की विश्वात असे लक्षावधी तारे आहेत.
हे सर्व तारे कोठून आले? बहुतेक संशोधक आता असे मानू लागले आहेत, की सुमारे १४ अब्ज वर्षांपूर्वी हे विश्व अचानक अस्तित्वात आले असा आपण विश्वास करत असलो तरी, हा विश्वास आपण का करतो त्याचे कारण मात्र आपल्याला अद्यापही उमगलेले नाही. पण बायबल अगदी साध्यासोप्या शब्दात म्हणते की “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.” (उत्पत्ति १:१) प्रचंड उर्जा उत्पन्न करणाऱ्या मशीनी अर्थात तारे ज्याने बनवले तो “प्रबळ” आहे, असे आपण मनात कसलीही शंका न बाळगता म्हणू शकतो.—यशया ४०:२६.
देव आपल्या शक्तीचा उपयोग करतो
यहोवा देव त्याच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्यांना बळ देण्याकरता आपल्या शक्तीचा उपयोग करतो. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने लोकांना देवाविषयी शिकवण्यात आपली शक्ती पणाला लावली. पौल आपल्यासारखाच मनुष्य होता तरीपण, कठोर विरोधातही तो खूप चांगल्या चांगल्या गोष्टी साध्य करू शकला. कशा काय? आपल्याला देवाकडून ‘पराकोटीचे सामर्थ्य’ मिळाले आहे, असे त्याने कबूल केले.—२ करिंथकर ४:७-९.
जे यहोवाच्या नैतिक दर्जांचा उद्दामपणे भंग करतात अशांचा नाश करण्याकरता देखील यहोवाने आपल्या शक्तीचा उपयोग केला आहे. केवळ दुष्ट लोकांचा नाश करण्याकरता यहोवा आपल्या विनाशकारी शक्तींचा उपयोग कसा करतो हे दाखवण्यासाठी येशू ख्रिस्ताने सदोम व गमोराचे आणि नोहाच्या दिवसांत आलेल्या महापुराचे उदाहरण दिले. लवकरच यहोवा पुन्हा एकदा, त्याच्या दर्जांकडे कानाडोळा करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग करणार असल्याचे देखील येशूने भाकीत केले.—मत्तय २४:३, ३७-३९; लूक १७:२६-३०.
तुमच्यावर कसा परिणाम होतो?
ताऱ्यांच्या निर्मितीवरून दिसणाऱ्या देवाच्या शक्तीवर मनन केल्यावर तुम्हालाही राजा दावीदाप्रमाणे वाटेल. त्याने म्हटले, “आकाश जे तुझे अंगुलीकार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पहावे तर — मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे?”—स्तोत्र ८:३, ४.
होय, या विशाल विश्वाच्या तुलनेत आपण किती क्षुद्र आहोत या जाणीवेने आपण नम्र होतो. याचा अर्थ देवाच्या शक्तीने आपण भारावून जावे असा होत नाही. यहोवाने संदेष्टा यशयाला दिलासा देणारे पुढील शब्द लिहिण्याची प्रेरणा दिली: “[देव] भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.”—यशया ४०:२९-३१.
जर देवाच्या इच्छेनुसार तुम्ही वागू इच्छिता तर तो तुम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याकरवी बळ देईल, अशी पक्की खात्री तुम्ही बाळगू शकता. पण तुम्हाला त्याच्याजवळ पवित्र आत्मा मागावा लागेल. (लूक ११:१३) देवाच्या पाठींब्याने तुम्ही कोणत्याही परीक्षेला तोंड देऊ शकता व जे बरोबर आहे ते करण्याची शक्ती प्राप्त करू शकता.—फिलिप्पैकर ४:१३. (w०८ ५/१)
[७ पानांवरील संक्षिप्त आशय]
देवाच्या पाठींब्याने तुम्ही जे बरोबर आहे ते करण्याची शक्ती प्राप्त करू शकता
[७ पानांवरील चित्रे]
वर डावीकडून: सर्पिलाकारी आकाशगंगा, प्लिआयडस तारकापुंज; ओरीओन नेब्युला, ॲन्ड्रोमेडा आकाशगंगा
[७ पानांवरील चित्रे]
सूर्य पृथ्वीपेक्षा ३,३०,००० पटीने विशाल आहे
[७ पानांवरील चित्राचे श्रेय]
Pleiades: NASA, ESA and AURA/Caltech; वरील इतर सर्व चित्रे: National Optical Astronomy Observatories