आत्म्याच्या तलवारीने भ्रष्टाचाराशी लढणे
“सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.”
रोमी साम्राज्य, हे एकेकाळी जगातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य होते. त्याचे कायदे इतके कार्यक्षम होते, की आजही अनेक राष्ट्रांची कायदेव्यवस्था यांवर आधारलेली आहे. रोमने अनेक मोठमोठे विजय मिळवले, पण एका शत्रूपुढे त्याला हात टेकावे लागले. याच शत्रूमुळे शेवटी बलाढ्य रोमी साम्राज्य धुळीस मिळाले. हा शत्रू म्हणजे भ्रष्टाचार.
या भ्रष्टाचाराचा त्रास प्रेषित पौलाला देखील सहन करावा लागला. त्याची उलट तपासणी करणारा फेलिक्स त्या काळात सर्वात भ्रष्ट अधिकारी म्हणून ओळखला जात होता. त्याला पक्के माहीत होते, की पौल निर्दोष आहे. पण पैशाच्या हव्यासापोटी तो पौलाला सोडण्यास टाळाटाळ करत होता.—प्रेषितांची कृत्ये २४:२२-२६.
पौलाने फेलिक्सला लाच दिली नाही. उलट तो त्याला देवाच्या नीतिनियमांविषयी वारंवार सांगत राहिला. पण फेलिक्समध्ये तीळमात्र बदल झाला नाही. आणि लाच न दिल्यामुळे पौलाला तुरुंगातच राहावे लागले, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो लोकांना सत्याच्या आणि प्रामाणिकतेच्या मार्गावर चालण्याचा उपदेश द्यायचा आणि स्वतःही तसेच वागायचा. त्याने यहुदी ख्रिश्चनांना लिहिले: “सर्व बाबतीत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे.”—इब्री लोकांस १३:१८.
पौलाच्या आणि त्या काळातील लोकांच्या विचारसरणीत जमिनआस्मानाचा फरक होता. फेलिक्सचा भाऊ पालस याचेच उदाहरण पाहा. त्याच्याकडे असलेली संपत्ती ४५ कोटी डॉलरच्या आसपास होती. ही अवाढव्य संपत्ती त्याने कशी गोळा केली होती? भ्रष्टाचाराने. पण ही रक्कम आजच्या भ्रष्ट पुढाऱ्यांनी बँकांमध्ये जमा केलेल्या संपत्तीपुढे शून्य वाटते. त्यामुळे आजच्या सरकारांनी भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत विजय मिळवला आहे असे मानणारे केवळ स्वतःची फसवणूक करत आहेत.
भ्रष्टाचाराला अजूनही आळा घालता आला नाही त्याअर्थी भ्रष्टाचार करणे हा मानवाचा स्वभावच आहे असे आपण मानावे का? भ्रष्टाचाराला कधी आळा घालता येईल का?
भ्रष्टाचार कसा रोखता येईल?
भ्रष्टाचारामुळे फक्त बेईमान लोकांचाच फायदा होतो; ईमानदार लोकांचे मात्र यामुळे नुकसान होते हे लोकांना पहिल्यांदा कळले पाहिजे. आणि काही लोकांना आता याची जाणीव होऊ लागली आहे. अमेरिकेचे सरकारी उपसचिव, जेम्स फोली यांनी म्हटले, की “लाचखोरीची फार मोठी किंमत आपल्या सर्वांना मोजावी लागते, हे आपण ओळखले आहे. भ्रष्टाचारामुळे देशाचा कारभार सुरळीत चालत नाही, देशाची अर्थव्यवस्था कोलमडते आणि याचा सर्वसामान्य नागरिकाला त्रास सहन करावा लागतो.” पुष्कळ लोकांना जेम्स फोली यांचे म्हणणे पटेल. डिसेंबर १७, १९९७ रोजी, ३४ राष्ट्रांनी “लाचलुचपत निर्मूलन ठराव” मंजूर केला. “जागतिक पातळीवर भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम” राबविणे हा या ठरावाचा उद्देश आहे. या ठरावानुसार, “आंतरराष्ट्रीय व्यापारी करार करताना लाच देण्याचे वचन देणे किंवा प्रत्यक्षात लाच देणे हा एक गुन्हा आहे.”
पण फक्त आंतराराष्ट्रीय व्यापारी करार करताना लाच दिली नाही किंवा घेतली नाही म्हणजे भ्रष्टाचार थांबेल का? भ्रष्टाचार पूर्णपणे थांबवयाचा असेल, तर लोकांच्या विचारसरणीत बदल झाला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीने भ्रष्टाचाराचा कडाडून विरोध केला पाहिजे. तरच तो नाहीसा होईल. न्यूजवीक मासिकात सांगितल्याप्रमाणे “प्रत्येक नागरिकाला त्याच्या नैतिक जबाबदारीची जाण करून देणे,” हे सरकारचे कर्तव्य आहे. ट्रॅन्स्परन्सी इंटरनॅशनल नावाच्या एका भ्रष्टाचारविरोधी गटाने आपल्या सदस्यांना सल्ला दिला, की त्यांनी कामाच्या ठिकाणी “प्रामाणिकतेचे बीजारोपण” करावे.
भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई ही नैतिक लढाई आहे, त्यामुळे केवळ कायद्याच्या ‘तलवारीचा’ धाक दाखवून त्यावर विजय मिळवता येणार नाही. (रोमकर १३:४, ५) पण इफिसकर ६:१७ मध्ये प्रेषित पौलाने देवाच्या वचनाला ‘आत्म्याची तलवार’ असे म्हटले आहे. या तलवारीमुळे अर्थात देवाच्या वचनामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल होतो. आणि भ्रष्टाचारावर विजय मिळवण्यासाठी हेच आवश्यक आहे; नैतिकता आणि प्रामाणिकता लोकांच्या हृदयात रुजली पाहिजे.
भ्रष्टाचाराविषयी बायबलचा दृष्टिकोन
पौलाने फेलिक्सला लाच का दिली नाही? कारण ‘पक्षपात न करणाऱ्या आणि लाच न घेणाऱ्या’ देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे त्याला जास्त महत्त्वाचे वाटले. (अनुवाद १०:१७) शिवाय, मोशेच्या नियमशास्त्रात लाच देण्याविरुद्ध किंवा घेण्याविरुद्ध असलेला विशिष्ट नियमही त्याला माहीत होता. “पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये, कारण लाच शहाण्याचे डोळे आंधळे करिते आणि नीतिमानाच्या दाव्याचा विपर्यास करिते,” असा तो नियम होता. (अनुवाद १६:१९) तसेच दावीद राजालाही हे माहीत होते, की यहोवाला भ्रष्टाचाराचा वीट आहे. त्यामुळेच ज्यांचे ‘हात लाचलुचपतीनी भरलेले आहेत अशा लोकांमध्ये’ आपल्याला गणू नये अशी त्याने देवाला विनंती केली.—स्तोत्र २६:१०.
अशी इतरही कारणे आहेत ज्यांमुळे देवाचे प्रामाणिक उपासक भ्रष्टाचाराला विरोध करतात. शलमोनाने लिहिले: “न्यायी राजा राष्ट्राला स्थैर्य देतो, पण लाच मागणारा राजा राष्ट्राचा सत्यानाश करतो.” (नीतिसूत्रे २९:४, सुबोध भाषांतर.) वरिष्ठ अधिकाऱ्यापासून चपराशापर्यंत सर्वांनी प्रामाणिकपणे आपआपली कामे केल्यास देशात स्थैर्य राहते. पण भ्रष्टाचारामुळे देश भीकेला लागतो. न्यूजवीक मासिकाने म्हटले: “एखाद्या देशात जर प्रत्येक जणच आपले घर भरू लागला तर देशाचे आर्थिक स्थैर्य बिघडेल.”
भ्रष्टाचारी लोकांना उजळ माथ्याने समाजात वावरताना पाहून प्रामाणिक लोकांना साहजिकच फार चीड येते. (स्तोत्र ७३:३, १३) पण मुळात ज्याने मनुष्याला ही न्यायबुद्धी दिली आहे त्या यहोवा देवाला भ्रष्टाचाराचा आणि अप्रामाणिकतेचा वीट आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्याने शिक्षा दिल्याची इतिहासातही उदाहरणे आहेत. जेरुसलेम राष्ट्राचेच उदाहरण पाहा.
आपला संदेष्टा मीखा याच्याद्वारे देवाने ताकीद दिली: “याकोब घराण्यातील प्रमुखहो, इस्राएल घराण्याचे सरदारहो, जे तुम्ही न्यायाचा अव्हेर करिता व नीट आहे त्यास वाकविता ते तुम्ही हे ऐका. तिचे प्रमुख लाच खाऊन न्याय करितात, तिचे याजक वेतन घेऊन धर्मशिक्षण देतात, तिचे संदेष्टे पैसे घेऊन भविष्य सांगतात; . . . म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरितील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल.” रोममधील समाज भ्रष्टाचाराने पोकळ झाला होता त्याचप्रमाणे जेरुसलेममधील सर्व लोक भ्रष्टाचारी बनले होते. आणि म्हणूनच मीखाने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे देवाने जेरुसलेमचा नाश केला.—मीखा ३:९, ११, १२.
कोणत्याही राष्ट्राला भ्रष्टाचारावर विजय मिळविणे अशक्य नाही. भ्रष्टाचारी व्यक्तीने आपला मार्ग सोडून नीतीच्या मार्गाने चालावे, असे देव सांगतो. (यशया ५५:७) स्वार्थ साधण्याऐवजी किंवा भ्रष्टाचार करण्याऐवजी आपण निःस्वार्थ आणि नीतिमान असावे अशी देव अपेक्षा करतो. तो म्हणतो: “जो गरिबाला छळितो तो आपल्या उत्पन्नकर्त्याचा अवमान करितो, पण जो गरजवंतावर दया करितो तो त्याचा सन्मान करितो.”—नीतिसूत्रे १४:३१.
भ्रष्टाचारावर मात करणारे बायबलमधील सत्य
कोणती गोष्ट मनुष्याला त्याच्या विचारसरणीत बदल करण्यास प्रेरणा देते? बायबलमधील सत्य. याच सत्यामुळे परुशी असणारा शौल येशूचा विश्वासू शिष्य बनला. पौलाने लिहिले: “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे. (इब्री लोकांस ४:१२) आजही, बायबलमधील सत्य, भ्रष्टाचाराच्या गाळात पूर्णपणे रुतलेल्या मनुष्याला वर आणून त्याला प्रामाणिक बनण्यास साहाय्य करू शकते. पुढील उदाहरणाचा विचार करा.
युरोपचा रहिवासी असलेला अलेक्झॅन्डर पूर्वी लष्करात कामाला होता. पण नंतर तो श्रीमंत लोकांकडून बळजबरीने पैसे गोळा करणाऱ्या एका गँगमध्ये गेला.a तो म्हणतो: “मोठमोठ्या लोकांचं संरक्षण करण्याकरता मी त्यांच्याकडून पैसे घ्यायचो. अशा शेठ लोकांना मी विश्वासात घ्यायचो आणि आमच्याच टोळीतले इतर गुंड या शेठ लोकांना ठार मारण्याची धमकी द्यायचे. हे शेठ जिवाच्या भितीने मदतीकरता माझ्याकडे यायचे आणि मग मी त्यांच्याकडून भली मोठी रक्कम घेऊन त्यांना मारेकऱ्यांच्या हातून सोडवायचो. ही ‘गिऱ्हाईकं’ माझे किती मनापासून आभार मानायचे. कारण आम्ही सर्वजण मिळालेले आहोत हे या शेठ लोकांना माहीत नसायचं. हे काम करण्यात मला मजा वाटायची.
“या कामात भरपूर पैसा मिळत असल्यामुळे मी खूप चैन करत होतो. माझ्याकडे महागडी कार होती, आलिशान बंगला होता. पैशाने मला काहीही विकत घेता येत होतं. लोकांमध्ये माझी दहशत होती. मी कोणीतरी आहे असं मला वाटू लागलं. मला असं वाटायचं, की माझ्याशी कोणीच टक्कर घेऊ शकत नाही, आणि पोलिसंही मला पकडू शकत नाहीत. आणि पकडलंच, तर माझा एक चांगला वकील होता. खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून तो मला सोडवायचाच. यानंही काम झालं नाही तर मग योग्य व्यक्तीचा खिसा गरम करून मी आरामात सुटायचो.
“पण भ्रष्टाचाराच्या जगात कोणी कोणाचा दोस्त नसतो. टोळीतलाच एक जण माझा द्वेष करू लागला आणि हळूहळू सर्वच माझ्या विरोधात झाले. माझी कार, माझा पैसा, उडाऊ प्रेयसी, सर्व काही अचानक माझ्या हातून निसटून गेलं. टोळीतल्या सर्वांनी मला बेदम मारलं. तेव्हा मला जीवनाची किंमत वाटू लागली. मी जीवनाच्या उद्देशाचा विचार करू लागलो.
“काही महिन्यांपूर्वीच माझी आई यहोवाची साक्षीदार बनली होती. त्यांची पुस्तकं मी वाचू लागलो. नीतिसूत्रे ४:१४, १५ या वचनानं मला विचार करायला भाग पाडलं कारण तिथे लिहिलं आहे: ‘दुर्जनांच्या मार्गांत शिरू नको; दुष्टांच्या मार्गाने चालू नको. त्यापासून दूर राहा, त्याजवळून जाऊ नको; त्यावरून मागे फीर आणि आपल्या मार्गाला लाग.’ बायबलमधून इतर गोष्टी वाचल्यावरही माझी खात्री पटली, की गुन्हेगाराच्या जीवनाला काही अर्थच नसतो. मी यहोवाला प्रार्थना करू लागलो, की त्याने मला योग्य मार्ग दाखवावा. यहोवाच्या साक्षीदारांबरोबर मी बायबलचा अभ्यास केला आणि देवाला माझं जीवन समर्पित केलं. माझा आधीचा वाईट मार्ग मी सोडून दिला.
“आता माझ्याकडे पहिल्यासारखा पैसा नाही. पण माझ्या जीवनाला अर्थ आहे, माझ्या जीवनात आशा आहे. आता मला कळतं, की माझी पूर्वीची उंची जीवन-शैली पत्त्यांच्या इमारतीप्रमाणे केव्हाही कोसळणारी होती. पूर्वी मी काहीही केलं तरी मला त्याचं काही वाटत नव्हतं. पण आता, लहानसहान बाबतींतही बेईमानी करण्याचं माझं धाडस होत नाही. माझा विवेक मला लगेच बोचू लागतो. मी स्तोत्र ३७:३ वचनानुसार जगण्याचा प्रयत्न करतो. तिथे म्हटलं आहे: ‘परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल.’”
“लाचलुचपतीचा तिटकारा असलेल्याला जीवन लाभेल”
बायबलमधील सत्यामुळे भ्रष्टाचारी प्रवृत्तींवर विजय मिळविणे शक्य आहे हेच अलेक्झॅन्डरच्या अनुभवातून दिसून येते. प्रेषित पौलाने इफिसकरांना दिलेल्या सल्ल्यानुसार अलेक्झॅन्डरने आपल्या जीवनात बदल केले होते. पौलाने म्हटले: “तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे, आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपआपल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहो. चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करु नये, तर त्यापेक्षा गरजवंताला द्यावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करुन उद्योग करीत राहावे.” (इफिसकर ४:२२-२५, २८) असे बदल केल्याशिवाय भ्रष्टाचारावर मात करणे शक्य नाही.
लाचखोरीमुळे रोमी साम्राज्याचे पतन झाले त्याचप्रमाणे आज भ्रष्टाचाराला आळा बसला नाही तर या जगाचा विनाश हा अटळ आहे. पण यहोवा तसे होऊ देणार नाही कारण या “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करण्याचे त्याने ठरवले आहे. (प्रकटीकरण ११:१८) भ्रष्टाचारापासून मुक्त असणाऱ्या जगात जगण्याची आस धरणाऱ्यांना यहोवा आश्वासन देतो, की लवकरच तो अशा ‘नव्या आकाशाची आणि नव्या पृथ्वीची’ स्थापना करील.—२ पेत्र ३:१३.
या भ्रष्ट जगात प्रामाणिकपणे जगणे इतके सोपे नाही. पण आपण यहोवाच्या नीतिनियमांनी चालत राहिल्यास आपल्याला शेवटी चांगले प्रतिफळ मिळेल. कारण देव म्हणतो: “हावरेपणाने गैरफायदा उठविणारा आपल्या घरादाराला संकटात लोटतो. परंतु लाचलुचपतीचा तिटकारा असलेल्याला जीवन लाभेल.”b (नीतिसूत्रे १५:२७, कॉमन लँग्वेज भाषांतर.) आज आपण भ्रष्टाचाराचा विरोध करण्याद्वारे दाखवून देतो, की ‘देवाचे राज्य यावे, त्याची इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होते तशी पृथ्वीवर व्हावी’ ही आपली मनापासून इच्छा आहे.—मत्तय ६:१०.
देवाचे राज्य येईपर्यंत आपण भ्रष्टाचाराच्या कोणत्याही प्रकारांत सामील होऊ नये कारण असे करण्याद्वारे आपण आपल्या अंतःकरणांत “धार्मिकतेची पेरणी” करू शकतो. (होशेय १०:१२) असे केल्यास, आपण शाबीत करून देऊ, की बायबलमध्ये मनपरिवर्तन घडवण्याची शक्ती आहे. आत्म्याच्या तलवारीने भ्रष्टाचारावर नक्कीच विजय मिळवणे शक्य आहे!
[तळटीपा]
a नाव बदलण्यात आले आहे.
b लाच आणि टीप यांत फरक आहे. लाच म्हणजे न्यायाचा मार्ग फिरवण्यासाठी किंवा इतर कोणत्याही अप्रामाणिक कार्यासाठी दिलेली रक्कम आणि टीप म्हणजे केलेल्या कामाबद्दल आभार व्यक्त करण्याकरता दिलेली रक्कम. ऑक्टोबर १, १९८७ च्या टेहळणी बुरूजमध्ये “वाचकांचे प्रश्न” या सदराखाली अधिक माहिती मिळू शकेल.
[७ पानांवरील चित्र]
बायबल आपल्याला ‘नवे मनुष्यत्व धारण’ करून भ्रष्टाचारावर मात करण्याची प्रेरणा देते