देवाच्या शिक्षणाला जडून राहा
“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतिसूत्रे ३:५, ६.
१. आजच्या या युगात माहितीचा महापूर आहे असे का म्हणता येईल?
आज, सबंध जगात जवळजवळ ९,००० वेगवेगळी वृत्तपत्रे आहेत. अमेरिकेतच दर वर्षी सुमारे २,००,००० नवनवीन पुस्तके बाजारात येतात. एका अंदाजानुसार, मार्च १९९८ पर्यंत इंटरनेटवर जवळजवळ २७ कोटी ५० लाख वेब पेजेस होते आणि दर महिन्याला २ कोटी नव्या वेब पेजेसची भर पडत आहे. सांगण्याचे तात्पर्य हेच, की आजचे युग हे माहितीचे युग आहे. कोणताही विषय घ्या, त्यावर भरमसाट माहिती सहज मिळवता येते. अर्थात याचे फायदे आहेतच. पण माहितीच्या या महापुरामुळे पुष्कळ हानी देखील झाली आहे.
२. माहितीच्या या महापुरामुळे कोणकोणत्या समस्या उत्पन्न झाल्या आहेत?
२ काहींना जणू माहिती मिळवण्याचे व्यसनच जडले आहे. महत्त्वाची कामे सोडून ते सतत नवनवीन विषयांवर अनावश्यक माहिती गोळा करण्यात मग्न असतात. आणि त्यांची ही भूक कधीही संपत नाही. शिवाय, काहीजण एखाद्या विषयावर थोडीबहुत माहिती मिळवल्यावर स्वतःला त्या विषयाचे पंडित समजू लागतात. आणि या अर्धवट ज्ञानाच्या आधारावर ते अनेक महत्त्वाचे निर्णयही घेऊन बसतात. यामुळे केवळ त्यांचेच नुकसान होत नाही, तर कधीकधी इतरांनाही त्रास सहन करावा लागतो. तसेच, काही लोकांची खोट्या माहितीमुळे फसवणूक होते. कारण माहितीच्या या महापुरात कोणती माहिती खरी आणि कोणती खोटी हे ठरवण्याचा मार्गच नसतो.
३. बायबलमध्ये मानवी ज्ञानाबद्दल कोणता इशारा दिला आहे?
३ नवीन माहिती मिळवण्याची ओढ मनुष्याला या काळातच वाटू लागली आहे अशातला भाग नाही. कारण शलमोन या प्राचीन काळातील राजाने देखील निरुपयोगी किंवा हानीकारक माहितीच्या मागे लागून वेळ वाया घालवू नये असे सांगितले होतेच. त्याने म्हटले: “माझ्या पुत्रा असा बोध घे की ग्रंथरचनेला काही अंत नाही; बहुत ग्रंथपठण देहास शिणविते.” (उपदेशक १२:१२) याच्या कित्येक शतकानंतर प्रेषित पौलाने तीमथ्याला असा सल्ला दिला, की “तुझ्या स्वाधीन केलेली ठेव संभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर राहा. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून ढळले आहेत.” (१ तीमथ्य ६:२०, २१) आजही खऱ्या खिस्ती लोकांनी या सल्ल्याचे पालन केले पाहिजे. हानीकारक विचारांपासून दूर राहण्याची त्यांनी सतत खबरदारी घेतली पाहिजे.
४. आपण यहोवावर व त्याच्या शिक्षणावर कशाप्रकारे भरवसा दाखवू शकतो?
४ यहोवाच्या लोकांनी नीतिसूत्रे ३:५, ६ या वचनांतील शब्दांचे पालन केले पाहिजे; त्यांत असे म्हटले आहे: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” यहोवावर भाव ठेवणारी व्यक्ती त्याच्या वचनांशी सुसंगत नसणाऱ्या कोणत्याही विचारांशी सहमत होणार नाही, मग ते विचार त्या व्यक्तीचेच असोत वा इतर कोणाचे. आध्यात्मिकरित्या जागे राहण्यासाठी आपणही असेच केले पाहिजे. पण, हे आपोआप होणार नाही. देवाच्या वचनाशी सुसंगत नसणाऱ्या विचारांना ओळखून त्यांपासून दूर राहण्यासाठी आपण आपल्या ज्ञानेंद्रियांना सराव देण्याची गरज आहे. (इब्री लोकांस ५:१४) हानीकारक माहिती कोणकोणत्या माध्यमांतून आपल्यापर्यंत येऊ शकते याविषयी पाहू या.
सैतानाच्या मुठ्ठीत असलेले जग
५. हानीकारक कल्पना कोणत्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचू शकतात आणि याच्या मागे मुळात कोण आहे?
५ या जगात वाईट गोष्टींची काही कमी नाही. (१ करिंथकर ३:१९) आपल्या शिष्यांकरता देवाला प्रार्थना करताना येशू ख्रिस्ताने म्हटले होते: “तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून [“त्या वाईटापासून,” तळटीप, पं.र.भा.] राखावे अशी विनंती करितो.” (योहान १७:१५) सैतानाचा या जगावर किती मोठा प्रभाव आहे हे माहीत असल्यामुळेच येशूने त्याच्या शिष्यांना “त्या वाईटापासून” राखावे अशी देवाला प्रार्थना केली. आणि आज आपल्यावर देखील सैतानाचा प्रभाव आहे. आपण ख्रिस्ती असल्यामुळे या वाईट जगाचा आपल्यावर प्रभाव पडणार नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. योहानाने लिहिले: “आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) यामुळेच खासकरून शेवटल्या दिवसांच्या या अंतिम टप्प्यात सैतान व त्याचे दुरात्मे सबंध जगात वाईट माहिती पसरवत आहेत.
६. करमणुकीच्या माध्यमातून आपल्यावर हळूहळू कोणता वाईट प्रभाव पडू शकतो?
६ मुळात वाईट असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी वरवर पाहिल्या तर, चांगल्या वाटतात. (२ करिंथकर ११:१४) अनेकजण कबूल करतात की आजकाल चित्रपट, टीव्हीवरील कार्यक्रम, संगीत तसेच मासिके, कादंबऱ्या यांतून लैंगिक अनैतिकता, हिंसा, ड्रग्स यांसारख्या वाईट गोष्टींच पाहायला आणि वाचायला मिळतात. पहिल्यांदा जेव्हा एखादी वाईट गोष्ट लोकांसमोर येते तेव्हा सर्वांना धक्का बसतो, पण हळूहळू लोकांना सवय होते आणि नंतर त्या गोष्टीचे कोणाला काही वाटत नाही. म्हणूनच ज्या मनोरंजनाच्या माध्यमांतून अशा वाईट गोष्टी दाखवल्या जातात त्यांपासून दूर राहणेच चांगले. ‘एखाद्यावेळी चालण्यासारखे आहे,’ किंवा ‘यामुळे काय होणार आहे,’ असा विचार आपण कधीही करू नये.—स्तोत्र ११९:३७.
७. कोणत्या प्रकारच्या मानवी ज्ञानामुळे बायबलवरचा आपला भरवसा कमी होऊ शकतो?
७ बायबलच्या सत्यतेविषयी शंका घेणाऱ्या वैज्ञानिकांच्या आणि विद्वानांच्या विचारांमुळे देखील चुकीची माहिती लोकांसमोर येते. (पडताळा याकोब ३:१५.) बऱ्याचशा सुप्रसिद्ध मासिकांतून व पुस्तकांतून प्रकाशित केली जाणारी त्यांची बायबलच्या विरोधात असणारी माहिती वाचल्यामुळे बायबलवरचा आपला भरवसा कमजोर होऊ शकतो. या विद्वानांना देवाच्या वचनाच्या सत्यतेबद्दल निरनिराळे प्रश्न उभे करण्यात व शंका घेण्यात फार मौज वाटते. प्रेषितांच्या काळातही ही धोकेदायक प्रवृत्ती काही जणांमध्ये होती; म्हणूनच प्रेषित पौलाने म्हटले: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.”—कलस्सैकर २:८.
सत्याचे शत्रू
८, ९. आज धर्मद्रोह कशाप्रकारे दिसून येत आहे?
८ खऱ्या ख्रिस्ती धर्मातील काहीजण धर्मद्रोह करतील असे प्रेषित पौलाने पूर्वीच भाकीत केले होते. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०; २ थेस्सलनीकाकर २:३) त्याचे भाकीत खरे ठरले. प्रेषितांच्या मृत्यूनंतर बऱ्याच जणांनी धर्मद्रोह केला आणि यामुळे ख्रिस्ती धर्मात अनेक फुटी पडल्या. आज देवाच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मद्रोह होताना दिसत नाही. पण तरीसुद्धा काही जण देवाची संस्था सोडून गेले आहेत आणि त्यांपैकी काहींनी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल खोटी माहिती परसवण्याचा, त्यांची बदनामी करण्याचा एकच ध्यास घेतला आहे. काहीजण देवाची संस्था सोडून इतर संस्थांमध्ये गेले आहेत आणि आता ते यहोवाच्या उपासकांचा विरोध करतात. असा विरोध करण्याद्वारे खरे तर ते सैतानाचीच बाजू घेत आहेत, ज्याने सर्वात आधी देवाविरुद्ध विद्रोह केला होता. या धर्मद्रोही लोकांचे विचार देखील अतिशय धोकेदायक ठरू शकतात.
९ बऱ्याचदा हे धर्मद्रोही प्रसार माध्यमांतून, उदाहरणार्थ इंटरनेटच्या माध्यमातून यहोवाच्या साक्षीदारांबद्दल खोटी माहिती प्रकाशित करतात. यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासांबद्दल माहिती मिळवायला खरोखर इच्छुक असणारे लोक कधीकधी या धर्मद्रोही लोकांनी प्रकाशित केलेली ही चुकीची माहिती वाचतात. अशा धर्मद्रोही लोकांनी प्रकाशित केलेली चुकीची माहिती नवीन लोकांच्याच नव्हे, तर यहोवाच्या साक्षीदारांच्या देखील वाचण्यात येऊ शकते. शिवाय, अनेक देशांत यहोवाची संस्था सोडून गेलेले हे लोक टीव्ही आणि रेडियोवर कार्यक्रम प्रसारित करतात. या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
१०. धर्मद्रोही लोकांनी पसरवलेल्या माहिती संबंधाने आपण काय करावे?
१० प्रेषित योहानाने ख्रिस्ती लोकांना असा सल्ला दिला की त्यांनी धर्मद्रोही लोकांना आपल्या घरातही घेऊ नये. त्याने म्हटले, “हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हांकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारु नका; कारण जो त्याचे स्वागत करितो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो.” (२ योहान १०, ११) आधुनिक प्रसार माध्यमांतून धर्मद्रोही लोकांचे विचार ऐकणे, पाहणे किंवा वाचणे हे त्यांना आपल्या घरात घेण्यासारखेच आहे. अशा लोकांच्या भ्रष्ट विचारांपासून दूर राहण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवणे. केवळ उत्सुकतेपोटी आपण त्यांचे विचार जाणून घेण्याचा कधीही प्रयत्न करू नये; नाहीतर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल!—नीतिसूत्रे. २२:३.
मंडळीत
११, १२. (अ) पहिल्या शतकातल्या मंडळीत चुकीचे विचार कशाप्रकारे पसरले? (ब) काही ख्रिस्ती कशाप्रकारे देवाच्या तत्त्वांच्या विरोधात वागले?
११ ख्रिस्ती मंडळीत देखील चुकीचे विचार फैलावण्याची शक्यता आहे. तशी मंडळीतली कोणतीही समर्पित ख्रिस्ती व्यक्ती मुद्दामहून खोट्या शिकवणुकींना बढावा देणार नाही; पण काहींना विचार न करता बोलण्याची सवय असू शकते, आणि त्यामुळे चुकीचे विचार मंडळीत पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. (नीतिसूत्रे १२:१८) आपण सर्वच अपरिपूर्ण असल्यामुळे कधी न कधी नको ते बोलून जातो. (नीतिसूत्रे १०:१९; याकोब ३:८) पौलाच्या काळातही काही बांधव जिभेला लगाम देण्याऐवजी निरर्थक वादविवाद करायचे. (१ तीमथ्य २:८) आपलेच विचार खरे आहेत असे त्यांना वाटायचे. त्यांनी प्रेषित पौलाचीही टिका करायला कमी केले नाही. (२ करिंथकर १०:१०-१२) अशा अविचारी बोलण्यामुळे मंडळीत कारण नसताना वादविवाद व्हायचे.
१२ हळूहळू या वादविवादांमुळे ‘भांडणे’ होऊ लागली आणि यामुळे साहजिकच मंडळीतील शांती भंग पावली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. (१ तीमथ्य ६:५; गलतीकर ५:१५) या गोष्टीस कारणीभूत असलेल्या लोकांविषयी पौलाने म्हटले: “जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती, व सुभक्त्यनुसार जे शिक्षण ते, मान्य करीत नाही, तर तो गर्वाने फुगलेला आहे; त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यामुळे वेडा बनला आहे; ह्यापासून हेवा, कलह, अपशब्द दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय ही उत्पन्न होतात.”—१ तीमथ्य ६:३, ४.
१३. पहिल्या शतकात बहुतेक ख्रिस्ती काय करत होते?
१३ पण प्रेषितांच्या काळात सगळेच ख्रिस्ती असे भांडखोर होते असे नाही. उलट त्याकाळचे बहुतेक ख्रिस्ती एकनिष्ठ होते आणि इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांनी सुवार्तेच्या कामाकडे जास्त लक्ष दिले. संकटग्रस्त ‘अनाथांना आणि विधवांना’ मदत करण्यात त्यांनी जास्तीत-जास्त वेळ खर्च केला. लहानसहान गोष्टींवरून निरर्थक वादविवाद करण्यात वेळ घालवण्याऐवजी त्यांनी सतत स्वतःला ‘जगापासून निष्कलंक ठेवण्याचा’ प्रयत्न केला. (याकोब १:२७) ख्रिस्ती मंडळीतही काही जणांसोबत केलेली मैत्री “कुसंगती” होऊ शकते याची त्यांना जाणीव होती; आणि म्हणून आपली आध्यात्मिकता टिकवण्यासाठी त्यांनी अशा लोकांची संगत टाळली.—१ करिंथकर १५:३३; २ तीमथ्य २:२०, २१.
१४. काळजी न घेतल्यास साध्या चर्चेचे वादविवादांत कशाप्रकारे रूपांतर होऊ शकते?
१४ याचा अर्थ यहोवाच्या साक्षीदारांमध्येही सतत वादविवाद आणि भांडणे होतात असे नाही. पण असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बायबलच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणे स्वाभाविक आहे. शिवाय, नव्या जगातील जीवनाबद्दल अद्याप स्पष्ट न करण्यात आलेल्या बाबींविषयी प्रश्न उद्भवणेही साहजिक आहे. तसेच पेहराव, श्रृंगार किंवा करमणुकीच्या प्रकारांबद्दल एकमेकांना आपले विचार सांगण्यातही काही चुकीचे नाही. पण नेहमी आपलेच म्हणणे खरे करून दाखवण्याचा प्रयत्न करणे किंवा इतरजण आपल्याशी सहमत न झाल्यास त्यांच्यावर रागावणे योग्य नाही. कारण असे केल्याने साध्या चर्चेचे रूपांतर भांडणात व्हायला वेळ लागणार नाही आणि क्षुल्लक बाबींमुळे मंडळीत फूट पडेल.
आपल्याला दिलेली ठेव सांभाळणे
१५. ‘भुतांच्या शिक्षणामुळे’ आपल्याला कोणते आध्यात्मिक नुकसान होऊ शकते आणि बायबलमध्ये कोणता सल्ला आपल्याला आढळतो?
१५ प्रेषित पौलाने ताकीद दिली: “आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील; . . . खोटे बोलणाऱ्या माणसांच्या ढोंगाने ते फुसलाविणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील.” (१ तीमथ्य ४:१, २) चुकीचे विचार किती धोकेदायक असू शकतात याची पौलाला जाणीव होती. म्हणूनच त्याने आपला प्रिय मित्र, तीमथ्याला आर्जवून सांगितले: “हे तीमथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव संभाळ; अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतापासून दूर राहा. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून ढळले आहेत.”—१ तीमथ्य ६:२०, २१.
१६, १७. देवाने आपल्याला कोणती ठेव दिली आहे आणि आपण तिला कशाप्रकारे सुरक्षित ठेवू शकतो?
१६ या सल्ल्याचा आज आपल्याला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो? तीमथ्याला एक अमूल्य ठेव देण्यात आली होती, व त्याला तिचा संभाळ करायला सांगण्यात आले होते. ती ठेव काय होती? पौल याविषयी खुलासा करतो: “ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्वास व प्रीती ह्यामध्ये दृढपणे राख. आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगे ती चांगली ठेव संभाळ.” (२ तीमथ्य १:१३, १४) तर ही ठेव म्हणजे ख्रिस्ताची “सुवचने” किंवा ‘सुभक्तीचे शिक्षण.’ (१ तीमथ्य ६:३) या शब्दांनुसार आज ख्रिस्ती या नात्याने आपण देखील आपल्या विश्वासाला व आपल्याला शिकवण्यात आलेल्या सत्याला सर्व हानिकारक प्रभावांपासून सुरक्षित ठेवले पाहिजे.
१७ हे आपल्याला कसे करता येईल? यासाठी बायबल आणि बायबलवर आधारित असलेल्या प्रकाशनांचा नियमित अभ्यास करण्याची सवय लावणे महत्त्वाचे आहे. तसेच, नियमितपणे प्रार्थना करणे आणि ‘सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करणे’ आवश्यक आहे. (गलतीकर ६:१०; रोमकर १२:११-१७) पौल तीमथ्याला याविषयी आणखी मार्गदर्शन देताना म्हणतो: “नीतिमत्व, सुभक्ति, विश्वास, प्रीति, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे, आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तो चांगला पत्कर केला.” (१ तीमथ्य ६:११, १२) ‘सुयुद्ध कर,’ “बळकट धर” असे म्हणताना पौल हे सुचवत होता की वाईट गोष्टींपासून दूर राहण्याकरता आपण दृढ निश्चयाने व पूर्ण शक्तीने प्रयत्न केला पाहिजे.
चांगल्यावाईटाची पारख
१८. ख्रिस्ती लोक जगाच्या ज्ञानाविषयी कशाप्रकारे अतिरेकी दृष्टिकोन टाळू शकतात?
१८ चांगल्यावाईटाची पारख करता येणे महत्त्वाचे आहे. (नीतिसूत्रे २:११; फिलिप्पैकर १:९) उदाहरणार्थ, संस्थेने प्रकाशित केलेल्या साहित्याव्यतिरिक्त बाहेरची सर्व माहिती चुकीची, वाईट आहे असे टोकाचे मत बनवणे योग्य नाही. (फिलिप्पैकर ४:५; याकोब ३:१७) सगळेच मानवी विचार देवाच्या वचनाच्या विरुद्ध नसतात. येशूने एकदा बोलताना असे सुचवले होते की आजारी व्यक्तीने वैद्याकडे जावे. (लूक ५:३१) येशूच्या काळातील वैद्यकीय उपचार आपल्या काळाइतके प्रगत नव्हते, पण आजारी व्यक्ती डॉक्टरकडे गेल्यास ती बरी होते हे मात्र येशूला माहीत होते. आज खऱ्या ख्रिस्ती लोकांनी देखील जगिक ज्ञानाबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगला पाहिजे. पण आध्यात्मिकता धोक्यात येईल अशी कोणतीही माहिती जाणून न घेण्याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे.
१९, २०. (अ) अविचारीपणे बोलण्याची सवय असणाऱ्यांना मदत करताना वडील कशाप्रकारे चांगल्यावाईटाची अचूक पारख करू शकतात? (ब) जे लोक ताकीद दिल्यावरही खोट्या शिकवणुकींना बढावा देतात अशा लोकांवर मंडळीत कोणती कारवाई केली जाते?
१९ मंडळीत निरर्थक वादविवाद करणाऱ्या लोकांना समजावून सांगताना वडिलांनी देखील चांगल्यावाईटाची योग्य पारख केली पाहिजे. (१ तीमथ्य २:७) कधीकधी हे वादविवाद अगदी क्षुल्लक विषयांवर, एखाद्याच्या व्यक्तिगत मतावर होतात. मंडळीची एकता टिकवून ठेवण्याकरता वडिलांनी अशा समस्यांकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे. पण वादविवाद करणारे बांधव मुळातच वाईट आहेत, धर्मद्रोही आहेत असा लगेच संशय घेणे योग्य ठरणार नाही.
२० अशांना कशाप्रकारे समज द्यावी याबद्दल पौलाने चांगले मार्गदर्शन केले आहे. तो म्हणतो: “बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहा ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा.” (गलतीकर ६:१) यहुदाने देखील ख्रिस्ती शिकवणींवर शंका घेणाऱ्या बांधवांविषयी लिहिले: “जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा. त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा.” (यहूदा २२, २३) अर्थात, वारंवार सांगितल्यावरही जर एखादा खोट्या शिकवणुकींना बढावा देत असेल तर मग मात्र मंडळीच्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी.—१ तीमथ्य १:२०; तीत ३:१०, ११.
चांगल्या गोष्टींवर सतत मनन करा
२१, २२. कोणत्या गोष्टीची आपण पारख केली पाहिजे आणि कोणत्या गोष्टींवर आपण नेहमी मनन केले पाहिजे?
२१ कर्करोगासारख्या पसरणाऱ्या वाईट गोष्टींना ख्रिस्ती मंडळीत मुळीच थारा नाही. (२ तीमथ्य २.१६, १७, इजी टू रीड व्हर्शन; तीत ३:९) यांत आजच्या जगाचे ‘ज्ञान,’ धर्मद्रोही लोकांच्या अफवा आणि मंडळीत अविचारी लोकांचे वादविवाद देखील समाविष्ट आहेत. नवीन माहिती मिळवण्याची इच्छा मुळात वाईट नसली तरीही अति जिज्ञासेमुळे आपण नको ती माहिती मिळवण्याचा धोका पत्करतो. सैतान कोणकोणते डावपेच खेळतो हे आपल्याला माहितीच आहे. (२ करिंथकर २:११) देवाची सेवा आपण उत्साहाने करू नये म्हणून तो आपले लक्ष विचलित करण्याचा सतत प्रयत्न करतो.
२२ देवाचे सेवक या नात्याने आपण त्याच्या शिक्षणाला, तत्त्वांना नेहमी जडून राहू. (१ तीमथ्य ४:६) त्यासाठी आपण जी काही माहिती घेतो ती कशा स्वरूपाची आहे हे आधी पारखून घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे केल्याने आपण सैतानाने पसरवलेल्या वाईट किंवा अनावश्यक माहितीला बळी पडणार नाही. म्हणूनच “जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुति” अशाच गोष्टींचे आपण मनन करत राहू. असे केल्यास शांतिदाता देव, यहोवा सदैव आपल्या पाठीशी राहील.—फिलिप्पैकर ४:८, ९.
आपण काय शिकलो?
• बायबलवर आधारित नसलेल्या ज्ञानामुळे आपल्या आध्यात्मिक आरोग्याला कोणत्या प्रकारचे नुकसान होऊ शकते?
• धर्मद्रोही लोकांनी पसरवलेल्या हानीकारक माहितीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?
• मंडळीत आपण कशाप्रकारच्या चर्चा टाळल्या पाहिजेत?
• माहितीच्या या युगात ख्रिस्ती व्यक्ती कशाप्रकारे संतुलित दृष्टिकोन बाळगू शकते?
[९ पानांवरील चित्र]
लोकप्रिय मासिकांमध्ये व पुस्तकांमध्ये ख्रिस्ती तत्त्वांच्या विरोधात असलेली माहिती प्रकाशित केली जाते
[१० पानांवरील चित्र]
ख्रिस्ती बांधव आपसात चर्चा करतात पण ते कोणावरही आपले विचार लादण्याचा प्रयत्न करत नाहीत