इतका भ्रष्टाचार का?
“लाच घेऊ नको कारण लाच डोळसांना आंधळे करिते आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करिते.”
हानियम मोशेच्या नियमशास्त्रात सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वीच देण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक कायदे काढण्यात आले आहेत. पण हे कायदे आणि नियम अद्याप भ्रष्टाचाराला आळा घालू शकले नाहीत. आज आपण कोठेही पाहिले तरी लाच देणारे आणि घेणारे आपल्याला पाहायला मिळतात. आणि या भ्रष्टाचाराचा फटका प्रामाणिक लोकांना बसतो.
मानवी समाजाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आज इतकी फैलावली आहे आणि तिने इतके गंभीर रूप धारण केले आहे, की यामुळे मानवी समाजाचा पायाच अगदी खिळखिळा झाला आहे. काही राष्ट्रांमध्ये तर जोपर्यंत तुम्ही कोणाचा खिसा गरम करत नाही तोपर्यंत तुमचे कोणतेही काम होत नाही. परीक्षेत पास व्हायचे असेल, ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल, एखादे कॉन्ट्रॅक्ट मिळवायचे असेल, कोर्टातील केस जिंकायची असेल किंवा तुमचे कोणतेही काम असेल तुम्हाला लाच द्यावीच लागते. ऑरनो मॉन्टबर या पॅरिसमधील एका वकिलाचे असे म्हणणे आहे की पदोपदी होणाऱ्या या भ्रष्टाचारामुळे लोक अगदी लाचार झाले आहेत, हताश झाले आहेत.
व्यापारी जगात लाच मोठ्या प्रमाणात दिली व घेतली जाते. काही कंपन्यांमध्ये, मिळालेल्या नफ्यातली जवळजवळ ३० टक्के रक्कम सरकारी अधिकाऱ्यांना लाच देण्यासाठी राखून ठेवली जाते. द इकॉनॉमिस्ट या ब्रिटिश मासिकानुसार, दर वर्षी शस्त्रांच्या व्यापारावर २५,००० कोटी डॉलर खर्च होतात. आणि यातील १० टक्के रक्कम लाच म्हणून दिली जाते. भ्रष्टाचार जसजसा वाढत गेला तसतसा त्याचा परिणामही आणखी वाईट होत गेला आहे. गेल्या दहा वर्षांत, भ्रष्टाचारामुळे कित्येक राष्ट्रांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे.
भ्रष्टाचाराचा सर्वात जास्त त्रास गरिबांना सहन करावा लागतो कारण लाच देण्याकरता त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यामुळेच द इकॉनॉमिस्टने म्हटले: “भ्रष्टाचार हा अत्याचारच आहे.” पण हा भ्रष्टाचार कधी थांबेल का? या प्रश्नाचे उत्तर जाणण्याकरता आपण आधी भ्रष्टाचाराची काही मूलभूत कारणे ओळखली पाहिजेत.
भ्रष्टाचाराची कारणे
आज भ्रष्टाचार सर्वसामान्य का होत चालला आहे? पहिले कारण, अनेकांच्या मते, काम करून घेण्याचा हा सहसा सोपा आणि कधीकधी तर एकमेव मार्ग असतो. दुसरे कारण म्हणजे त्यांना होणारी शिक्षा किंवा दंड ते लाच देऊन टाळू शकतात. तिसरे कारण म्हणजे नेते, पोलिस, न्यायाधीश यांसारखे प्रतिष्ठित लोकच भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करतात किंवा स्वतःच भ्रष्टाचार करतात.
भ्रष्टाचार आज इतका सामान्य झाला आहे, की लोकांना तो आता चुकीचा वाटत नाही. रोजच्या गरजा भागवण्याकरता वरची कमाई मिळालीच पाहिजे असे तुटपुंजा पगार असणाऱ्या लोकांना वाटते. आणि भ्रष्ट लोकांचा विरोध करण्याची सहसा कोणाची हिंमत होत नाही. कारण त्यांना याची पूर्ण कल्पना असते, की कितीही आवाज उठवला तरी या लाच घेणाऱ्या व देणाऱ्या लोकांना कोणी शिक्षा करू शकत नाही. अगदी हेच शलमोन राजाने म्हटले: “दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्राचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.”—उपदेशक ८:११.
भ्रष्टाचाराच्या आगीत तेल ओतणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत: स्वार्थ आणि लोभ. भ्रष्टाचारी लोक इतरांना होणाऱ्या त्रासाची पर्वा करत नाहीत कारण त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. पैशासाठी हापापलेल्या लोकांनी कितीही पैसा कमावला तरी त्यांचे समाधान होत नाही. शलमोनाने म्हटले: “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ति होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही.” (उपदेशक ५:१०) हे खरे आहे, की पैशाच्या लोभामुळे एखादी व्यक्ती श्रीमंत बनेल, पण हाच लोभ भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर कार्यांना खतपाणी घालतो.
भ्रष्टाचार वाढण्याचे आणखी एक कारण आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते म्हणजे दियाबल सैतान या जगावर राज्य करत आहे. (१ योहान ५:१९; प्रकटीकरण १२:९) सैतानाला आपण पाहू शकत नाही पण तोच लोकांना भ्रष्टपणे वागायला चेतवतो. सैतानाने एकदा येशूला म्हटले होते: “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन.” (मत्तय ४:८, ९) इतकी मोठी लाच आजपर्यंत कोणीही कोणाला दिली नाही!
येशूने भ्रष्टाचाराला कधीही थारा दिला नाही आणि हेच त्याने आपल्या शिष्यांनाही शिकवले. ख्रिस्ताच्या त्या शिकवणी आजही आपल्याला भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यास साहाय्य करू शकतील का? पुढील लेख या प्रश्नाचे उत्तर देईल.