वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ११/१ पृ. ९-१४
  • तुम्हाला देवाचे वचन किती प्रिय आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्हाला देवाचे वचन किती प्रिय आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या वचनाची “इच्छा धरा”
  • देवाचे नियम प्रिय मानणारा स्तोत्रकर्ता
  • धाडसी राजकुमार
  • देवाच्या वचनाने येशूला टिकवून ठेवले
  • ख्रिस्ताचे अनुकरण करणारे
  • यहोवाच्या वचनावर भरवसा ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • देवाच्या वचनाला तुमच्या मार्गाचा प्रकाश बनू द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • बायबल वाचन फायदेकारक व आनंददायक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • दैनंदिन बायबल वाचनातून लाभ मिळवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ११/१ पृ. ९-१४

तुम्हाला देवाचे वचन किती प्रिय आहे?

“अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.”—स्तोत्र ११९:९७.

१. देवाला भिऊन वागणारे कोणत्या मार्गाने देवाच्या वचनाबद्दल आपले प्रेम प्रदर्शित करू शकतात?

हजारो लोकांजवळ आज बायबल आहे. परंतु बायबल जवळ असणे आणि देवाचे वचन प्रिय असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक मनुष्य देवाचे वचन कधीतरी एकदा वाचत असेल, तर देवाचे वचन त्याला प्रिय आहे असे तो म्हणू शकतो का? निश्‍चितच नाही! दुसऱ्‍या बाजूला पाहता, पूर्वी बायबलमध्ये फारसा रस न घेणारे लोक आता दररोज बायबल वाचू लागले आहेत. देवाच्या वचनाला प्रिय मानायला ते शिकले आहेत आणि स्तोत्रकर्त्याप्रमाणे ते आता “दिवसभर” देवाच्या वचनावर मनन करतात.—स्तोत्र ११९:९७.

२. एका यहोवाच्या साक्षीदाराचा विश्‍वास कठीण परिस्थितींमध्येही कसा टिकून राहिला?

२ नॉशो डोरी हे त्यांच्यापैकी एक आहेत; देवाच्या वचनाला प्रिय मानायला ते शिकले. आपल्या मायदेशी अल्बेनियामध्ये, सहविश्‍वासूंसोबत कित्येक दशकांपासून यहोवाची सेवा करण्यात ते टिकून राहिले आहेत. दरम्यान बराच काळ यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी होती आणि या विश्‍वासू ख्रिश्‍चनांना हातावर मोजण्याइतके बायबल साहित्य मिळायचे. तरीही, बंधू डोरींनी आपला विश्‍वास कायम राखला. तो कसा? ते म्हणतात, “दर दिवशी कमीत कमी एक तास तरी बायबल वाचायचं हे माझं ध्येय होतं आणि ६० वर्षांपर्यंत, म्हणजे माझी दृष्टी गेली तोपर्यंत मी हा नित्यक्रम चालू ठेवला.” अल्बेनियन भाषेत अलीकडेच संपूर्ण बायबल उपलब्ध झाले; त्याआधी नव्हते. पण लहानपणी ग्रीक भाषा शिकल्यामुळे बंधू डोरी ग्रीक बायबल वाचायचे. नियमित बायबल वाचनामुळे बंधू डोरी यांना विविध परीक्षांमध्ये तग धरून राहायला मदत मिळाली. आपल्यालाही तशीच मदत मिळू शकते.

देवाच्या वचनाची “इच्छा धरा”

३. देवाच्या वचनाप्रती ख्रिश्‍चनांनी कोणती मनोवृत्ती आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे?

३ प्रेषित पेत्राने लिहिले: “तुम्ही नवीन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निऱ्‍या दुधाची इच्छा धरा.” (१ पेत्र २:२, पं.र.भा.) बालक आईच्या दुधासाठी आसुसलेले असते त्याचप्रमाणे आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव असलेल्यांना देवाचे वचन वाचायला अतिशय आनंद होतो. तुम्हालाही असेच वाटते का? नसेल वाटत तर, निराश होऊ नका. देवाचे वचन वाचण्याची इच्छा तुम्ही देखील निर्माण करू शकता.

४. दररोज बायबल वाचण्याची सवय लावून घेण्यासाठी काय करणे आवश्‍यक आहे?

४ तसे करण्यासाठी प्रथम बायबल वाचनाची सवय स्वतःला लावून घ्या; शक्य असल्यास दररोज वाचण्याची सवय लावा. (प्रेषितांची कृत्ये १७:११) कदाचित तुम्हाला नॉशो डोरी यांच्यासारखे दररोज एक तास बायबल वाचणे शक्य नसेल. पण कदाचित देवाच्या वचनावर मनन करण्यासाठी तुम्ही दररोज थोडाफार वेळ तरी काढू शकत असाल. अनेक ख्रिस्ती, बायबलमधील एखाद्या उताऱ्‍यावर मनन करण्यासाठी सकाळी जरा लवकर उठतात. अशातऱ्‍हेने दिवसाची सुरवात करण्यापेक्षा दुसरा उत्तम मार्ग कोणता असू शकतो? इतरांना बायबल वाचण्यासाठी कदाचित झोपण्याआधीची वेळ योग्य वाटत असेल. दुसऱ्‍यांना आणखी दुसरी वेळ सोयीस्कर वाटत असेल. पण बायबलचे नियमित वाचन करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर, थोडा वेळ वाचलेल्या गोष्टींवर मनन करावे. देवाचे वचन वाचून, त्यावर मनन करून काहींना कसा लाभ मिळाला त्याची काही उदाहरणे आपण पाहू या.

देवाचे नियम प्रिय मानणारा स्तोत्रकर्ता

५, ६. स्तोत्र ११९ च्या लेखकाचे नाव आपल्याला ठाऊक नसले, तरी त्यातील गोष्टी वाचून व त्यावर मनन करून आपण लेखकाविषयी काय शिकू शकतो?

५ स्तोत्र ११९ च्या लेखकाला निश्‍चितच देवाच्या वचनाविषयी खूप कदर वाटत होती. ते स्तोत्र कोणी लिहिले? बायबलमध्ये त्याचे नाव दिलेले नाही. परंतु, संदर्भावरून आपल्याला त्याच्याविषयी काही माहिती मिळते आणि त्याच्या जीवनातही समस्या होत्या हे पाहायला मिळते. त्याचे काही ओळखीचे लोक स्वतःला यहोवाचे उपासक म्हणवत होते, पण या स्तोत्रकर्त्याप्रमाणे त्यांना बायबलमधील तत्त्वे प्रिय वाटत नव्हती. तथापि, स्तोत्रकर्त्याने त्यांच्या मनोवृत्तीचा परिणाम स्वतःवर होऊ दिला नाही; तो मात्र योग्य ते करत राहिला. (स्तोत्र ११९:२३) तुम्ही देखील बायबलच्या दर्जांबद्दल आदर नसलेल्या लोकांसोबत राहात असाल किंवा काम करत असाल, तर स्तोत्रकर्त्याची परिस्थिती आणि तुमची परिस्थिती तुम्हाला सारखी दिसेल.

६ स्तोत्रकर्ता देव-भीरू होता पण फाजील धार्मिक नव्हता. स्वतःच्या अपरिपूर्णता त्याने उघड उघड स्वीकारल्या. (स्तोत्र ११९:५, ६, ६७) तथापि, त्याने पापाला स्वतःवर वर्चस्व करू दिले नाही. त्याने प्रश्‍न विचारला, “तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील?” आणि त्याचे उत्तर दिले: “तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.” (स्तोत्र ११९:९) भले काम करण्यासाठी देवाचे वचन केवढी शक्‍तिशाली प्रेरणा आहे यावर जोर देत स्तोत्रकर्ता पुढे म्हणाला: “मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे.” (स्तोत्र ११९:११) देवाविरुद्ध पाप करण्यापासून मागे धरून ठेवणारी ही प्रेरणा निश्‍चितच शक्‍तिशाली आहे!

७. खासकरून तरुणांनी दररोज बायबलचे वाचन करण्याविषयी सतर्क का असावे?

७ ख्रिस्ती युवकांनी स्तोत्रकर्त्याच्या शब्दांकडे लक्ष देणे किती महत्त्वाचे आहे. तरुण ख्रिश्‍चनांवर आज हल्ला होत आहे. यहोवाच्या उपासकांच्या नवीन पिढीला भ्रष्ट करणे हीच सैतानाची इच्छा आहे. तरुण ख्रिश्‍चनांना भुलवून त्यांना देहाच्या वासनांना वश होण्यास आणि देवाच्या नियमांचे उल्लंघन करण्यास लावणे हेच सैतानाचे ध्येय आहे. चित्रपट आणि टीव्हीच्या कार्यक्रमांमधून सहसा सैतानाचे विचार व्यक्‍त होतात. या कार्यक्रमांमधील तार-तारका फार आकर्षक वाटतात. त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध असणे सामान्य गोष्ट आहे असे दर्शवले जाते. यामधून कोणता संदेश दिला जातो? हाच की, ‘अविवाहित लोक एकमेकांवर खरे प्रेम करत असतील तर शरीरसंबंध ठेवायला काहीच हरकत नाही.’ दुःखाची गोष्ट अशी आहे की, दरवर्षी कित्येक तरुण ख्रिस्ती या विचारसरणीला बळी पडतात. काहीजण विश्‍वासातून पडतात. म्हणजेच, दबाव आहे! पण तुम्हा तरुण लोकांना प्रतिकार करता येणारच नाही इतका हा दबाव तीव्र आहे का? मुळीच नाही! तरुण ख्रिश्‍चनांना आपल्या अनुचित वासनांवर मात करण्यासाठी यहोवाने एक मार्ग दिला आहे. ‘देवाच्या वचनानुसार आपला वर्तनक्रम राखल्याने आणि आपल्या मनात देवाचे वचन जपून ठेवल्याने’ सैतानाच्या कोणत्याही हत्याराचा प्रतिकार ते करू शकतात. पण नियमितपणे व्यक्‍तिगत बायबल वाचन आणि मनन करण्यासाठी तुम्ही किती वेळ देता?

८. या परिच्छेदात दिलेली उदाहरणे तुम्हाला मोशेच्या नियमशास्त्राबद्दल कदर वाढवण्यास कशी मदत करू शकतात?

८ स्तोत्र ११९ च्या लेखकाने म्हटले: “तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे!” (स्तोत्र ११९:९७) तो कोणत्या नियमशास्त्राचा उल्लेख करत होता? यहोवाच्या प्रकट केलेल्या वचनाचा आणि मोशेच्या नियमशास्त्राचा. वरवर पाहिल्यास, हा नियमशास्त्र फार जुना आहे आणि तो कोणाला प्रिय वाटेल असे समजून काहीजण त्याच्याकडे दुर्लक्ष करतील. तथापि, स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपण मोशेच्या नियमशास्त्राच्या विविध पैलूंवर मनन केले तर नियमशास्त्रामधील बुद्धीची आपल्याला कदर वाटेल. नियमशास्त्राच्या अनेक भविष्यसूचक पैलूंखेरीज, स्वच्छता आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी त्यात स्वच्छतेविषयक आणि आहारविषयक नियमही होते. (लेवीय ७:२३, २४, २६; ११:२-८) इमानदारीने व्यापार करावा आणि इस्राएलांनी आपल्या गरजवंत सहउपासकांबद्दल सहानुभूती दर्शवावी असे नियमशास्त्रात आर्जवण्यात आले होते. (निर्गम २२:२६, २७; २३:६; लेवीय १९:३५, ३६; अनुवाद २४:१७-२१) न्यायिक निर्णयांमध्ये पक्षपात दाखवायचा नव्हता. (अनुवाद १६:१९; १९:१५) स्तोत्र ११९ च्या लेखकाने अनुभवानिशी हे जाणले की, देवाच्या नियमशास्त्राचे पालन करणाऱ्‍याचे भले होत होते; म्हणून, नियमशास्त्राबद्दल त्याची आवड वाढत गेली. आजही, बायबलच्या तत्त्वांचा व्यवहारात अंमल केल्याने देवाच्या वचनाविषयी त्यांचे प्रेम आणि त्यांची कदर वाढत राहते.

धाडसी राजकुमार

९. देवाच्या वचनाबद्दल हिज्कीया राजाने कोणता दृष्टिकोन विकसित केला?

९ हिज्कीया राजकुमार असताना त्याच्याविषयी आपल्याला जी माहिती आहे तिच्याशी स्तोत्र ११९ मधील मजकूर मिळताजुळता आहे. काही बायबल विद्वानांचे म्हणणे आहे की, हिज्कीयाने हे स्तोत्र लिहिले. हे आपल्याला निश्‍चित ठाऊक नाही, परंतु हिज्कीयाला देवाच्या वचनाविषयी खूप आदर होता एवढे मात्र पक्के आहे. आपल्या जीवनक्रमावरून त्याने हे दाखवून दिले की, स्तोत्र ११९:९७ मधील शब्दांशी तो पूर्णतः सहमत होता. हिज्कीयाविषयी बायबल म्हणते: “तो परमेश्‍वराला धरून राहिला; त्याला अनुसरण्याचे त्याने सोडिले नाही; परमेश्‍वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळिल्या.”—२ राजे १८:६.

१०. ज्या ख्रिश्‍चनांचे संगोपन ईश्‍वरी पालकांनी केलेले नाही त्यांच्यासाठी हिज्कीयाच्या उदाहरणाने काय उत्तेजन मिळते?

१० अहवालात सांगितल्यानुसार, हिज्कीयाचे कुटुंब देव-भीरू नव्हते. त्याचे वडील, राजा आहाज मूर्तिपूजक व अविश्‍वासू होते; त्यांनी आपला एक पुत्र तरी—हिज्कीयाचाच सख्खा भाऊ याला—जिवंत जाळून एका खोट्या देवताला बळी चढवला होता! (२ राजे १६:३) हिज्कीयासमोर हे वाईट उदाहरण असूनही देवाचे वचन जाणून घेतल्यामुळे मूर्तिपूजक प्रभावांपासून तो आपले ‘वर्तनक्रम शुद्ध राखू’ शकला.—२ इतिहास २९:२.

११. हिज्कीयाने पाहिल्याप्रमाणे, त्याच्या अविश्‍वासू वडिलांच्या कृत्यांचा काय परिणाम झाला?

११ आपले मूर्तिपूजक वडील राज्य कारभार कसे चालवतात हे हिज्कीयाने स्वतःहून पाहिले होते. शत्रूंनी यहूदाला घेरले होते. अरामाचा राजा रसीन आणि इस्राएलचा राजा पेकह यांनी मिळून यरुशलेमेवर चढाई केली. (२ राजे १६:५, ६) अदोमी आणि पलष्टी लोकांनी यहूदावर स्वारी करण्यात यश मिळवले आणि यहुदातील काही नगरे देखील काबीज केली. (२ इतिहास २८:१६-१९) ही संकटे आली तेव्हा आहाजने काय केले असावे? अरामापासून संरक्षण मिळवण्यासाठी यहोवाकडे मदत मागण्याऐवजी तो अश्‍शूरच्या राजाकडे गेला. त्याला सोन्यारुप्याची लाच दिली, मंदिराच्या खजिन्यातले सोनेरुपेही दिले. पण हे सर्व करूनही यहूदाला कायमची शांती मिळाली नाही.—२ राजे १६:६, ८.

१२. काय केल्याने हिज्कीया आपल्या वडिलांच्या चुका टाळू शकला?

१२ शेवटी, आहाज मरण पावला आणि हिज्कीया २५ वर्षांचा असताना राजा बनला. (२ इतिहास २९:१) तसे पाहता, तो फार लहान होता पण त्याचे शासन मात्र यशस्वी ठरले. आपल्या अविश्‍वासू वडिलांचे वर्तन अनुसरण्याऐवजी त्याने सदोदित यहोवाच्या नियमांचे पालन केले. त्यामध्ये राजांसाठी एक खास नियम होता: “[राजा] आपल्या राजासनावर आरूढ होईल तेव्हा लेवीय याजकापाशी असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वतःसाठी उतरून घ्यावी; ती त्याच्यापाशी असावी, आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधि पाळून व त्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्‍वर ह्‍याचे भय बाळगावयला शिकेल.” (अनुवाद १७:१८, १९) देवाचे वचन दररोज वाचल्याने यहोवाची भीती बाळगायला आणि आपल्या अधर्मी पित्याने केलेल्या चुका टाळायला हिज्कीया शिकणार होता.

१३. आध्यात्मिक अर्थाने एक ख्रिस्ती जे काही करील ते सर्वकाही सिद्धीस जाईल अशी त्याला खात्री कशी मिळू शकते?

१३ इस्राएलच्या राजांनाच केवळ देवाच्या वचनाचे सतत मनन करण्याचे उत्तेजन दिले जात नव्हते तर देवाला भिऊन वागणाऱ्‍या सर्व इस्राएलांना देखील असे करण्यास आर्जवले गेले होते. पहिल्या स्तोत्रात खरोखर आनंदी असलेल्या एका पुरुषाचे वर्णन केले आहे; तो “परमेश्‍वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो.” (स्तोत्र १:१, २) अशा पुरुषाबद्दल स्तोत्रकर्ता म्हणतो: “जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.” (स्तोत्र १:३) याच्या अगदीच उलट, यहोवा देवावर विश्‍वास न ठेवणाऱ्‍याविषयी बायबल म्हणते: “असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो.” (याकोब १:८) आपल्या सर्वांना आपण आनंदी असावे आणि यशस्वी व्हावे असे वाटते. नियमित व अर्थपूर्ण बायबल वाचनाने आपल्या आनंदात भर पडू शकते.

देवाच्या वचनाने येशूला टिकवून ठेवले

१४. येशूने देवाच्या वचनाबद्दल प्रेम कसे दर्शवले?

१४ एके प्रसंगी, येशूच्या पालकांना तो यरुशलेमच्या मंदिरात गुरूजनांमध्ये बसलेला आढळला. देवाच्या नियमशास्त्रात पारंगत असलेले हे लोक, “त्याच्या बुद्धीवरून व उत्तरावरून थक्क झाले”! (लूक २:४६, ४७) त्या वेळी येशू केवळ १२ वर्षांचा होता. होय, इतक्या लहान वयात देखील त्याला देवाच्या वचनाबद्दल आवड होती हे स्पष्ट होते. नंतर येशूने शास्त्रवचनांचा उपयोग करून सैतानाला दटावले; तो म्हणाला: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.” (मत्तय ४:३-१०) याच्या काही काळानंतरच, येशूने शास्त्रवचनांचा उपयोग करून आपल्या गावातील अर्थात नासरेथ येथील रहिवाशांना प्रचार केला.—लूक ४:१६-२१.

१५. इतरांना प्रचार करताना येशूने स्वतःचे उदाहरण कसे मांडले?

१५ आपल्या शिकवणींना आधार देण्यासाठी येशू वारंवार देवाच्या वचनाचा संदर्भ देत असे. लोकसमुदाय “त्याच्या शिक्षणावरून थक्क” व्हायचे. (मत्तय ७:२८) यात काही आश्‍चर्य नाही कारण त्याने शिकवलेल्या गोष्टी खुद्द यहोवा देवाकडून होत्या! येशू म्हणाला: “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. जो आपल्या मनचे बोलतो, तो स्वतःचेच गौरव पाहतो; परंतु आपणाला ज्याने पाठविले त्याचे गौरव जो पाहतो तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनीति नाही.”—योहान ७:१६, १८.

१६. देवाच्या वचनाबद्दल येशूने केवढे प्रेम दर्शवले?

१६ स्तोत्र ११९ च्या लेखकाप्रमाणे येशूमध्ये कोणतीही ‘अनीति नव्हती.’ तो पापरहित, देवाचा पुत्र होता ज्याने “वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून . . . स्वतःला लीन केले.” (फिलिप्पैकर २:८; इब्री लोकांस ७:२६) परंतु, परिपूर्ण असूनही येशूने देवाच्या नियमशास्त्राचा अभ्यास केला आणि त्याचे आज्ञापालन केले. तो शेवटपर्यंत निष्ठावान राहिला त्याचे हे मुख्य कारण होते. पेत्राने आपल्या गुरूजीला अटक करू नये म्हणून तलवार चालवली तेव्हा येशूने त्या प्रेषिताला दटावून म्हटले: “तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर ह्‍याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे?” (मत्तय २६:५३, ५४) होय, अतिशय क्लेशकारक आणि हिणवणारा मृत्यू टाळण्यापेक्षा शास्त्रवचनांच्या पूर्तीचे येशूला जास्त महत्त्व वाटत होते. देवाच्या वचनाबद्दल केवढे विलक्षण प्रेम!

ख्रिस्ताचे अनुकरण करणारे

१७. प्रेषित पौलासाठी देवाचे वचन किती महत्त्वपूर्ण होते?

१७ प्रेषित पौलाने सहख्रिश्‍चनांना लिहिले: “जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीहि माझे अनुकरण करणारे व्हा.” (१ करिंथकर ११:१) आपल्या गुरूजीप्रमाणे पौलाने शास्त्रवचनांविषयी आवड निर्माण केली होती. त्याने कबूल केले: “माझा अंतरात्मा देवाचे नियमशास्त्र अतिप्रिय मानतो.” (रोमकर ७:२२, द जेरुसलेम बायबल) पौल वारंवार देवाच्या वचनाचा संदर्भ द्यायचा. (प्रेषितांची कृत्ये १३:३२-४१; १७:२, ३; २८:२३) तीमथ्य या आपल्या प्रिय सहसेवकाला अखेरच्या काही सूचना देताना प्रत्येक ‘देवाच्या भक्‍ताच्या’ दैनंदिन जीवनात देवाच्या वचनाला महत्त्वाचे स्थान मिळावे यावर पौलाने जोर दिला.—२ तीमथ्य ३:१५-१७.

१८. आधुनिक काळात देवाच्या वचनाबद्दल आदर दाखवलेल्या व्यक्‍तीचे एक उदाहरण द्या.

१८ आधुनिक काळात यहोवाच्या अनेक विश्‍वासू सेवकांनीही देवाच्या वचनाबद्दल येशूला जे प्रेम होते त्याचे अनुकरण केले आहे. या शतकाच्या सुरवातीला एका तरुणाला आपल्या मित्राकडून एक बायबल मिळाले. ही मूल्यवान भेट मिळाल्यावर त्याला काय वाटले याबद्दल तो म्हणाला: “मी जीवनात एक दृढनिश्‍चय केला होता की दररोज बायबलचा एक भाग वाचून काढलाच पाहिजे.” तो तरुण होता फ्रेडरिक फ्रान्झ; बायबलबद्दल फ्रान्झ यांना प्रेम असल्यामुळे त्यांना यहोवाच्या सेवेत दीर्घकालीन, यशस्वी जीवन जगता आले. त्यांना बायबलमधले संपूर्णच्या संपूर्ण अध्याय तोंडपाठ होते; या त्यांच्या विलक्षण क्षमतेमुळे ते लोकांच्या नेहमी लक्षात राहिले.

१९. ईश्‍वरशासित सेवा प्रशालेमधील साप्ताहिक बायबल वाचनासाठी काहीजण कसा आराखडा बनवतात?

१९ यहोवाचे साक्षीदार नियमित बायबल वाचनाला अतिशय महत्त्व देतात. दर आठवडी, त्यांच्या एका ख्रिस्ती सभेची अर्थात ईश्‍वरशासित सेवा प्रशालेची तयारी करताना ते बायबलमधील पुष्कळ अध्याय वाचून काढतात. सभेदरम्यान नेमलेल्या बायबल वाचनाच्या ठळक मुद्द्‌यांवर चर्चा केली जाते. काही साक्षीदार आठवड्याच्या बायबल वाचनाचे सात लहान भाग करतात आणि मग प्रत्येक दिवशी एक भाग वाचतात. वाचत असताना ते त्यावर मननही करतात. शक्य असते तेव्हा बायबल आधारित प्रकाशनांच्या साहाय्याने ते आणखी संशोधन करतात.

२०. नियमितपणे बायबल वाचन करण्यासाठी काय आवश्‍यक आहे?

२० नियमितपणे बायबल वाचन करण्यासाठी तुम्हाला ‘वेळ खंडून घ्यावा’ लागेल. (इफिसकर ५:१६, पं.र.भा., टिप्पणी) यासाठी आपण कितीही त्याग केले असले, तरी फायदे त्यांच्यापेक्षा जास्त असतील. दैनिक बायबल वाचनाची सवय तुम्ही लावून घ्याल तसे देवाच्या वचनाबद्दल तुमचे प्रेम अधिक वाढेल. आणि तुम्हालाही स्तोत्रकर्त्यासोबत असे म्हणावेसे वाटेल: “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.” (स्तोत्र ११९:९७) या मनोवृत्तीमुळे, पुढील लेखात दाखवले आहे त्याप्रमाणे सध्या आणि भविष्यात पुष्कळ फायदे प्राप्त होतील.

तुम्हाला आठवते का?

◻ स्तोत्र ११९ च्या लेखकाने देवाच्या वचनाबद्दल अत्याधिक प्रेम कसे व्यक्‍त केले?

◻ येशू आणि पौलाच्या उदाहरणांवरून आपण कोणते धडे शिकू शकतो?

◻ व्यक्‍तिगतपणे देवाच्या वचनावरचे प्रेम आपण कसे वाढवू शकतो?

[१० पानांवरील चित्रं]

विश्‍वासू राजांना देवाचे वचन नियमितपणे वाचायचे होते. तुमच्याविषयी काय?

[१२ पानांवरील चित्र

लहान असतानाही येशूला देवाचे वचन प्रिय होते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा