वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ११/१ पृ. १४-१९
  • देवाचे वचन प्रिय मानण्याचे फायदे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाचे वचन प्रिय मानण्याचे फायदे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कायमस्वरूपी नुकसानापासून सांभाळ
  • स्वतःला ‘चांगली जमीन’ शाबीत करा
  • ‘प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ देणे’
  • उज्ज्वल भवितव्य
  • ‘वाढवणारा देवच आहे’!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • ‘माझ्या वचनात राहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • “धीराने फळ” उत्पन्‍न करणाऱ्‍या लोकांवर यहोवा प्रेम करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • ‘विपुल फळ देत राहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ११/१ पृ. १४-१९

देवाचे वचन प्रिय मानण्याचे फायदे

‘बुद्धीची आवड धर म्हणजे ती तुझा सांभाळ करील. तिला कवटाळून राहशीलतर ती तुझे गौरव करील.’—नीतिसूत्रे ४:६, ८.

१. देवाचे वचन खरोखर प्रिय मानण्यामध्ये काय गोवलेले आहे?

बायबलचे वाचन करणे ख्रिस्ती व्यक्‍तीसाठी अत्यावश्‍यक आहे. परंतु, फक्‍त वाचल्याने देवाचे वचन आपल्याला प्रिय वाटते हे सिद्ध होत नाही. एखादी व्यक्‍ती बायबल वाचत असेल परंतु बायबलच्या अगदी विरुद्ध कार्य करत असेल तर काय? स्पष्टतः, स्तोत्र ११९ च्या लेखकाला देवाचे वचन जसे प्रिय आहे तसे तिला ते प्रिय नाही. स्तोत्र ११९ च्या लेखकाला देवाचे वचन प्रिय वाटल्यामुळे त्याने त्यामधील अपेक्षांनुसार आचरण केले.—स्तोत्र ११९:९७, १०१, १०५.

२. देवाच्या वचनावर आधारित असलेल्या बुद्धीने कोणते फायदे मिळतात?

२ देवाच्या वचनानुसार आचरण करण्यासाठी आपल्या विचारसरणीत आणि जीवनशैलीत सतत सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे. अशा आचरणातून ईश्‍वरी बुद्धी प्रतिबिंबित होते; ईश्‍वरी बुद्धी म्हणजे बायबलच्या अभ्यासातून प्राप्त झालेले ज्ञान व समज यांवर प्रत्यक्ष अंमल. ‘बुद्धीची आवड धर म्हणजे ती तुझा सांभाळ करील. तिला उच्च पद दे म्हणजे ती तुझी उन्‍नति करील; तिला कवटाळून राहशील तर ती तुझे गौरव करील; ती तुला शोभिवंत शिरोभूषण देईल; तुला सुंदर मुकुट देईल.’ (नीतिसूत्रे ४:६, ८, ९) देवाच्या वचनाबद्दल आवड धरण्यासाठी आणि त्याचे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी किती छान उत्तेजन! आपला सांभाळ केला जावा, आपली उन्‍नती व्हावी आणि गौरव व्हावा असे कोणाला वाटणार नाही?

कायमस्वरूपी नुकसानापासून सांभाळ

३. ख्रिश्‍चनांचा सांभाळ करण्याची आता जास्त गरज का आहे आणि कोणापासून?

३ देवाच्या वचनाचा अभ्यास आणि त्यानुसार आचरण केल्याने प्राप्त झालेल्या बुद्धीमुळे एखाद्याचा सांभाळ कसा होतो? पहिली गोष्ट म्हणजे, त्याचा सैतानापासून सांभाळ होतो. येशूने आपल्या अनुयायांना दुष्टापासून अर्थात सैतानापासून सोडव अशी प्रार्थना करायला शिकवले. (मत्तय ६:१३, मराठी ईजी-टू-रीड-व्हर्शन) आज विशेषकरून आपल्या प्रार्थनांमध्ये ही विनंती करणे अगत्याचे आहे. सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांना १९१४ नंतर स्वर्गातून बाहेर घालवण्यात आले आणि त्यामुळे “आपला काळ थोडा आहे हे ओळखून [सैतान] अतिशय संतप्त” झाला आहे. (प्रकटीकरण १२:९, १०, १२) या शेवटल्या क्षणी तर तो रागाने जळफळत असेल कारण “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे” ह्‍यांच्याबरोबर लढाई करण्यात तो अद्यापही यशस्वी ठरलेला नाही.—प्रकटीकरण १२:१७.

४. सैतानी दबाव आणि पाशांपासून ख्रिश्‍चनांचा सांभाळ कसा होतो?

४ क्रोधिष्ठ सैतान या ख्रिस्ती सेवकांना अजूनही त्रास देत आहे आणि त्यांच्याविरुद्ध हिंसक छळ चेतवत आहे किंवा त्यांच्या कार्यात इतर अडथळे आणत आहे. राज्य प्रचारकांनी राज्य प्रचाराच्या कार्यात लक्ष घालण्याऐवजी जगिक प्रसिद्धी, ऐषाराम, भौतिक गोष्टी, सुखविलास यांच्यामागे लागावे म्हणून तो त्यांना भुरळ घालत आहे. सैतानाच्या या दबावांना वश होण्यापासून किंवा त्याच्या पाशांत अडकण्यापासून देवाच्या विश्‍वासू सेवकांचा सांभाळ कसा होऊ शकतो? प्रार्थना, यहोवासोबत निकटचा नातेसंबंध आणि त्याच्या अभिवचनांवर पूर्ण विश्‍वास या गोष्टी फार आवश्‍यक आहेत. पण या सर्व गोष्टी देवाच्या वचनाचे ज्ञान असण्यावर आणि त्यामधील सूचनांनुसार आचरण करण्याचा दृढनिश्‍चय करण्यावर अवलंबून आहेत. या सूचनांची आठवण, बायबलच्या आणि बायबल आधारित साहित्यांच्या वाचनातून, ख्रिस्ती सभांमधून, सहविश्‍वासूने दिलेल्या शास्त्रवचनीय सल्ल्यातून किंवा बायबल तत्त्वांवर प्रार्थनापूर्वक मनन करताना पवित्र आत्म्याकरवी करून दिली जाते.—यशया ३०:२१; योहान १४:२६; १ योहान २:१५-१७.

५. देवाच्या वचनावर आधारलेली बुद्धी आपला सांभाळ कशी करते?

५ देवाचे वचन प्रिय मानणाऱ्‍यांना इतर गोष्टींपासूनही संरक्षण मिळते. उदाहरणार्थ, मादक औषधांचा दुरुपयोग, तंबाखूचा वापर आणि लैंगिक अनैतिकता यांमुळे होणाऱ्‍या भावनात्मक मनःस्तापापासून आणि शारीरिक आजारांपासून ते दूर राहतात. (१ करिंथकर ५:११; २ करिंथकर ७:१) इतरांविषयी नको त्या गोष्टी करून किंवा वाईट बोलून ते आपापसातील संबंध बिघडवून घेत नाहीत. (इफिसकर ४:३१) त्याचप्रमाणे, जगिक बुद्धीच्या फसव्या तत्त्वज्ञानाचा शोध करून ते देवाच्या वचनावर शंका करत नाहीत. (१ करिंथकर ३:१९) देवाचे वचन प्रिय मानल्याने देवासोबतचा नातेसंबंध आणि सार्वकालिक जीवनाची आशा हिरावून घेणाऱ्‍या गोष्टींपासून त्यांचे संरक्षण होते. बायबलमधील अद्‌भुत अभिवचनांवर शेजाऱ्‍यांना विश्‍वास ठेवण्यासाठी मदत करण्यात ते स्वतःला व्यस्त ठेवतात; असे केल्याने ते ‘स्वतःचे व त्यांचे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधतील’ हे त्यांना ठाऊक आहे.—१ तीमथ्य ४:१६.

६. देवाच्या वचनावर आधारलेली बुद्धी कठीण परिस्थितींमध्येही आपला सांभाळ कशी करू शकते?

६ अर्थात, “समय व प्रसंग” सर्वांवरच येतात, देवाच्या वचनावर प्रेम करणारे लोकही याला अपवाद नाहीत. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) आपणातील काहीजणांवर नैसर्गिक आपत्ती, गंभीर आजारपण, अपघात किंवा अकाली मृत्यू ओढवेल हे अपेक्षितच आहे. तरीही आपण सुरक्षित आहोत. कोणत्याही आपत्तीमुळे देवाच्या वचनाला प्रिय मानणाऱ्‍या व्यक्‍तीचे कायमचे नुकसान होणार नाही. यास्तव, भविष्यात काय घडेल याची आपण अनावश्‍यक चिंता करू नये. उचित दक्षता बाळगल्यानंतर यहोवाच्या हातात सर्व काही सोपवणे आणि आजच्या असुरक्षित जीवनामुळे आपली शांती हिरावू न देणे हेच सर्वात उत्तम. (मत्तय ६:३३, ३४; फिलिप्पैकर ४:६, ७) पुनरुत्थानाच्या आशेची निश्‍चितता आणि देव ‘सर्व गोष्टी नवीन करील’ तेव्हाचे उत्तम जीवन लक्षात ठेवा.—प्रकटीकरण २१:५; योहान ११:२५.

स्वतःला ‘चांगली जमीन’ शाबीत करा

७. येशूकडे येणाऱ्‍या जमावांना त्याने कोणता दृष्टान्त सांगितला?

७ येशूच्या एका दृष्टान्तात देवाच्या वचनाविषयी उचित दृष्टिकोन असण्याच्या महत्त्वाविषयी ठासून सांगितले होते. संपूर्ण पॅलेस्टाईनमध्ये येशू सुवार्तेचा प्रचार करत होता तेव्हा लोकसमुदाय त्याचे ऐकण्यासाठी जमत होते. (लूक ८:१, ४) परंतु, सर्वांनाच देवाचे वचन प्रिय नव्हते. पुष्कळजण केवळ त्याचे चमत्कार पाहण्यासाठी किंवा त्यांना त्याच्या शिकवण्याची निराळी पद्धत आवडत होती म्हणून येत होते. यास्तव, येशूने जमावांना एक दृष्टान्त दिला: “पेरणारा आपले बी पेरावयास निघाला; आणि तो पेरीत असताना काही बी वाटेवर पडले; ते तुडविले गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले; काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटविली. काही चांगल्या जमिनीत पडले; ते उगवून शंभरपट पीक आले.”—लूक ८:५-८.

८. येशूच्या दृष्टान्तातील बी काय आहे?

८ येशूच्या दृष्टान्तातून स्पष्ट झाले की, ऐकणाऱ्‍या व्यक्‍तीच्या अंतःकरणानुसार सुवार्तेच्या प्रचाराला निरनिराळ्या प्रतिक्रिया मिळतील. बीज म्हणजे “देवाचे वचन आहे.” (लूक ८:११) किंवा, दृष्टान्ताचा दुसरा अहवाल सांगतो त्यानुसार, बीज हे “राज्याचे वचन” आहे. (मत्तय १३:१९) येशू दोन्ही अभिव्यक्‍ती वापरू शकत होता कारण राजपदी असलेल्या येशू ख्रिस्ताच्या अधीन असलेले स्वर्गाचे राज्यच देवाच्या वचनाचा मुख्य विषय आहे; या राज्याद्वारे यहोवा आपल्या सार्वभौमत्त्वाचे समर्थन करील आणि आपले नाव पवित्र करील. (मत्तय ६:९, १०) त्यामुळे, बी देवाच्या वचनातील अर्थात बायबलमधील सुवार्तेचा संदेश आहे. यहोवाचे साक्षीदार, येशू ख्रिस्त या मूळच्या बी पेरणाऱ्‍याचे अनुकरण करून बी पेरताना या राज्य संदेशाला महत्त्व देतात. त्यांना कसा प्रतिसाद मिळतो?

९. (अ) रस्त्याच्या कडेला (ब) खडकाळीवर (क) काटेरी झाडांत पडणारे बीज कशाचे चित्रण करते?

९ काही बी रस्त्याच्या कडेला पडतात आणि तुडवले जातात असे येशू म्हणतो. कामधंद्यात फार व्यस्त असल्यामुळे ज्यांच्या अंतःकरणात राज्याचे बीज मूळ धरू शकत नाही त्या लोकांना हे सूचित करते. देवाच्या वचनाबद्दल आवड निर्माण करण्याआधीच “त्यांनी विश्‍वास ठेवू नये व त्यास तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो.” (लूक ८:१२) काही बी खडकाळ जमिनीवर पडतात. जे लोक बायबलचा संदेश ऐकून आकर्षित होतात परंतु आपल्या अंतःकरणावर त्याचा प्रभाव पडू देत नाहीत अशांना हे सूचित करते. विरोध येतो किंवा बायबलमधील सल्ला अंमलात आणणे कठीण जाते तेव्हा ते “गळून पडतात” कारण त्यांना मूळ नसते. (लूक ८:१३) मग असे काही लोक आहेत जे वचन ऐकतात परंतु “संसाराच्या चिंता, धन व विषयसुख” यांतच अडकून राहतात. कालांतराने, काटेरी झाडांमध्ये अडकलेल्या रोपट्याप्रमाणे “त्यांची वाढ खुंटते.”—लूक ८:१४.

१०, ११. (अ) चांगली जमीन कोणाला सूचित करते? (ब) आपल्या अंतःकरणात देवाचे वचन ‘धरून ठेवण्यासाठी’ आपण काय करावे?

१० शेवटी, काही बी चांगल्या जमिनीवर पडतात. हे, ‘सालस व चांगल्या अंतःकरणाने’ संदेशाचा स्वीकार करणाऱ्‍या लोकांना सूचित करते. साहजिकच, आपल्या सर्वांनाच आपण या गटातले आहोत असे धरून चालायला आवडेल. परंतु शेवटच्या परीक्षणात देवाचा आपल्याविषयी काय दृष्टिकोन आहे यावरच सर्वकाही अवलंबून असेल. (नीतिसूत्रे १७:३; १ करिंथकर ४:४, ५) त्याचे वचन म्हणते की, आपले ‘सालस व चांगले अंतःकरण’ आहे हे आपण आतापासून आपल्या मृत्यूपर्यंत किंवा देव या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत करील तोपर्यंत आपल्या कार्यांद्वारे शाबीत केले पाहिजे. राज्य संदेशाला आपण सुरवातीला चांगला प्रतिसाद दिला असल्यास चांगलेच आहे. परंतु, सालस व चांगले अंतःकरण असलेले लोक देवाचे वचन स्वीकारतात व ते “धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.”—लूक ८:१५.

११ आपल्या अंतःकरणात देवाचे वचन धरून ठेवण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग म्हणजे व्यक्‍तिगतपणे आणि सहविश्‍वासूंच्या सोबत त्याचे वाचन व अभ्यास करणे होय. त्यासाठी, येशूच्या खऱ्‍या अनुयायांच्या आध्यात्मिक हितसंबंधांची काळजी घेण्यासाठी नेमलेल्या माध्यमाद्वारे पुरवल्या जाणाऱ्‍या आध्यात्मिक अन्‍नाचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. (मत्तय २४:४५-४७) अशा तऱ्‍हेने, देवाचे वचन आपल्या अंतःकरणात धरून ठेवणाऱ्‍यांना “धीराने फळ देत” राहण्याची प्रीतीने प्रेरणा मिळते.

१२. आपण धीराने उत्पन्‍न करण्याचे फळ कोणते आहे?

१२ चांगल्या जमिनीतून उत्पन्‍न होणारे फळ म्हणजे काय? निसर्गाच्या नियमानुसार, बीजातून झाड उत्पन्‍न होते आणि ते झाड त्याच बीजाचे फळ उत्पन्‍न करते; हे बीज पुन्हा विखुरले जाऊन आणखी फळे उत्पन्‍न करता येतात. त्याचप्रमाणे, सालस आणि चांगल्या अंतःकरणाच्या लोकांमध्ये वचनाचे बीज वाढल्यामुळे ते इतपत आध्यात्मिक प्रगती करतात की तेसुद्धा इतरांच्या अंतःकरणात बी पेरू शकतात. (मत्तय २८:१९, २०) विशेष म्हणजे, इतरांच्या अंतःकरणात बी पेरण्याचे हे काम ते धीराने करत राहतात. आणि असे करणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करण्यासाठी येशू पुढे म्हणाला: “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:१३, १४.

‘प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ देणे’

१३. पौलाने कोणती प्रार्थना केली ज्यामध्ये फळांचा देवाच्या वचनाच्या ज्ञानाशी कसा संबंध असल्याचे दाखवले?

१३ प्रेषित पौलानेही फळ देण्याच्या गरजेविषयी सांगितले आणि फळ देण्याचा देवाच्या वचनाशी कसा संबंध आहे हे त्याने दाखवले. “सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्‍यांच्याद्वारे तुम्ही [देवाच्या] इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ द्यावे” अशी प्रार्थना त्याने आपल्या सहउपासकांसाठी केली.—कलस्सैकर १:९, १०; फिलिप्पैकर १:९-११.

१४-१६. पौलाने प्रार्थना केल्याप्रमाणे देवाच्या वचनाला प्रिय मानणारे लोक कोणती फळे उत्पन्‍न करतात?

१४ अशाप्रकारे पौल हे दाखवून देतो की, बायबलचे ज्ञान प्राप्त केले म्हणजे पुरे होत नाही. त्याउलट देवाच्या वचनाची प्रीती ‘प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ देत’ राहून ‘यहोवाला शोभेल असे वागण्यास’ प्रेरित करते. कोणते सत्कार्य? या शेवटल्या काळात, राज्याच्या सुवार्तेचा प्रचार हेच ख्रिश्‍चनांना दिलेले सर्वात मुख्य काम आहे. (मार्क १३:१०) या शिवाय, देवाच्या वचनावर प्रीती करणारे या कार्याला नियमितपणे आर्थिक सहयोग देण्याचा होता होईल तितका प्रयत्न करतात. किंबहुना, ही सुसंधी मिळाल्याचा त्यांना आनंद होतो कारण “संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो” हे त्यांना ठाऊक आहे. (२ करिंथकर ९:७) त्यांच्या या अनुदानांतून शंभरहून अधिक बेथेल सुविधांचा खर्च भागवला जातो; या बेथेल सुविधा राज्य प्रचाराचे कार्य निर्देशित करतात आणि काहींमध्ये बायबल व बायबल साहित्य तयार केले जाते. त्यांच्या या अनुदानातून मोठाली ख्रिस्ती अधिवेशने त्याचप्रमाणे प्रवासी पर्यवेक्षक, मिशनरी आणि इतर पूर्ण-वेळेच्या सुवार्तिकांचा खर्चही भागवला जातो.

१५ खऱ्‍या उपासनेच्या केंद्रांचे बांधकाम व त्यांची देखभाल हे देखील या सत्कार्यांमध्ये सामील होते. संमेलन गृहे आणि राज्य सभागृहांची हेळसांड होणार नाही याची खात्री करण्यास देवाच्या वचनाबद्दलची प्रीती देवाच्या उपासकांना प्रेरित करते. (पडताळा नहेम्या १०:३९.) या इमारतींवर देवाचे नाव असल्यामुळे ती आतून त्याचप्रमाणे बाहेरून स्वच्छ आणि आकर्षक ठेवली जावीत शिवाय त्यांच्या आत येऊन उपासना करणाऱ्‍यांचे वर्तन कोणीही बोट दाखवणार नाही असे असणे महत्त्वाचे आहे. (२ करिंथकर ६:३) काही ख्रिस्ती इतर मार्गांनी यहोवाच्या सेवेत अधिक कार्य करू शकतात. देवाच्या वचनाच्या प्रीतीने प्रेरित होऊन ते दूरदूरचा प्रवास करून गरीब किंवा जेथे कुशल कारागीर सहज उपलब्ध नाहीत अशा देशांमध्ये उपासनेकरता नवीन सभागृहे बांधून देण्यामध्ये सहकार्य करतात.—२ करिंथकर ८:१४.

१६ ‘प्रत्येक प्रकारच्या सत्कार्यांचे फळ देण्यामध्ये’ कौटुंबिक जबाबदाऱ्‍या पार पाडणे आणि सहख्रिश्‍चनांबद्दल काळजी दाखवणे हे देखील सामील होते. देवाच्या वचनाची प्रीती, ‘विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांच्या’ गरजांप्रती संवेदनशील असण्यास आणि ‘आपल्या घरच्यांबरोबर सुभक्‍तीनुसार वागण्यास’ आपल्याला प्रेरित करते. (गलतीकर ६:१०; १ तीमथ्य ५:४, ८) आजारी असलेल्यांना जाऊन भेटणे आणि दुःखी असलेल्यांचे सांत्वन करणे हेसुद्धा एक सत्कार्य आहे. शिवाय, मंडळीतील वडील आणि हॉस्पिटल लेएझॉन कमिटी वैद्यकीय पेचप्रसंगांचा सामना करणाऱ्‍या व्यक्‍तींना मदत करतात हे देखील एक मोठे सत्कार्यच आहे! (प्रेषितांची कृत्ये १५:२९) अलीकडे, नैसर्गिक व मनुष्याच्या बेजबाबदारपणामुळे घडणाऱ्‍या इतर विपत्तींचे प्रमाण देखील बरेच वाढले आहे. देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने विपत्तीग्रस्त त्याचप्रमाणे अपघातांमधील सहविश्‍वासूंना व इतरांनाही ताबडतोब मदत देण्यामध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी अनेक देशांमध्ये चांगले नावलौकिक कमवले आहे. ही देवाच्या वचनाला प्रिय मानणाऱ्‍या लोकांनी दाखवलेली चांगली फळे आहेत.

उज्ज्वल भवितव्य

१७, १८. (अ) राज्याचे बीज पेरण्याद्वारे काय साध्य केले जात आहे? (ब) लवकरच देवाच्या वचनाला प्रिय मानणारे पृथ्वीला हादरून टाकणाऱ्‍या कोणत्या घटना पाहतील?

१७ राज्याचे बीज पेरल्याने मानवजातीला पुष्कळ फायदे मिळतच आहेत. अलीकडील वर्षांमध्ये, दरवर्षी ३,००,००० लोकांनी आपल्या अंतःकरणात बायबलच्या संदेशाला मूळ धरू दिले आहे आणि परिणामस्वरूप यहोवाला आपले जीवन समर्पित करून पाण्याच्या बाप्तिस्म्याने ते समर्पण चिन्हांकित केले आहे. यांच्यासमोर केवढे उज्ज्वल भवितव्य आहे!

१८ देवाच्या वचनाला प्रिय मानणाऱ्‍यांना हे ठाऊक आहे की, लवकरच यहोवा त्याच्या नावाचा महिमा करील. “मोठी बाबेल,” अर्थात खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य नष्ट केले जाईल. (प्रकटीकरण १८:२, ८) मग, देवाच्या वचनानुसार जे जगू इच्छित नाहीत त्यांना राजा येशू ख्रिस्त मृत्यूदंड देईल. (स्तोत्र २:९-११; दानीएल २:४४) नंतर, देवाचे राज्य गुन्हेगारी, युद्ध आणि इतर विपत्तींपासून आपली कायमची सुटका करील. दुःख, आजारपण आणि मृत्यूमुळे लोकांचे सांत्वन करण्याची गरज उरणार नाही.—प्रकटीकरण २१:३, ४.

१९, २०. देवाच्या वचनाला खरोखर प्रिय मानणाऱ्‍यांसाठी कोणते उज्ज्वल भवितव्य राखून ठेवले आहे?

१९ त्या वेळी, देवाच्या वचनाला प्रिय मानणारे केवढी महान सत्कार्ये करतील! हर्मगिदोनातून बचावलेले लोक या पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर करण्याच्या आनंददायी कामाला सुरवात करतील. त्यांना मृतांच्या पुनरुत्थानात सहभागी होण्याच्या आशेसह सध्या कबरेत झोपलेल्या आणि देवाच्या स्मरणात असलेल्या मृत मानवांसाठी तयारी करण्याची रोमहर्षक सुसंधी असेल. (योहान ५:२८, २९) त्या वेळी, सार्वभौम प्रभू, यहोवाकडून त्याच्या गौरवयुक्‍त पुत्राद्वारे अर्थात येशू ख्रिस्ताद्वारे परिपूर्ण मार्गदर्शन दिले जाईल. ‘पुस्तके उघडली जातील’ व त्यांतून यहोवा आपल्या लोकांना नवीन जगातील जीवनासाठी आवश्‍यक सूचना प्रकट करील.—प्रकटीकरण २०:१२.

२० यहोवाच्या नियुक्‍त वेळी, सर्व विश्‍वासू अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” बनण्यासाठी स्वर्गीय बक्षीस दिले जाईल. (रोमकर ८:१७) ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान देवाच्या वचनाला प्रिय मानणाऱ्‍या पृथ्वीवरील सर्व मानवांना परिपूर्ण मन आणि शरीर दिले जाईल. अखेरच्या परीक्षेत स्वतःला विश्‍वासू शाबीत केल्यावर त्यांना सार्वकालिक जीवन दिले जाईल आणि ते “देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता” प्राप्त करतील. (रोमकर ८:२१; प्रकटीकरण २०:१-३, ७-१०) तो केवढा अद्‌भुत समय असेल! यहोवाने आपल्याला स्वर्गीय अथवा पार्थिव अशी कोणतीही आशा दिली असली, तरी त्याच्या वचनाबद्दल धीरजवंत प्रेम आणि ईश्‍वरी बुद्धीनुसार जगण्याचा दृढनिश्‍चय यांमुळे सध्या आपला सांभाळ होईल. आणि भवितव्यात ‘त्याला कवटाळून राहिलो तर ते आपले गौरव करील.’—नीतिसूत्रे ४:६, ८.

तुम्ही स्पष्ट करू शकता का?

◻ देवाच्या वचनाबद्दलची प्रीती आपला सांभाळ कशी करील?

◻ येशूच्या दृष्टान्तातील बीज काय आहे आणि त्याची पेरणी कशी केली जाते?

◻ आपली ‘चांगली जमीन’ असल्याचे आपण कसे सिद्ध करू शकतो?

◻ देवाच्या वचनाला प्रिय मानणारे कोणत्या फायद्यांची अपेक्षा करू शकतात?

[१६ पानांवरील चित्र]

येशूच्या दृष्टान्तातील बी, देवाच्या वचनामधील सुवार्तेच्या संदेशाला सूचित करते

[Credit Line]

Garo Nalbandian

[१७ पानांवरील चित्र]

यहोवाचे साक्षीदार महान पेरणी करणाऱ्‍याचे अनुकरण करतात

[१८ पानांवरील चित्रं]

हर्मगिदोनातून बचावलेले लोक पृथ्वीच्या फळांचा आस्वाद घेतील

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा