विशेष असलेल्या सहस्रकाची तयारी करा!
ख्रिस्ताची हजार वर्षीय राजवट मानव परिवारासाठी अमाप आशीर्वाद देईल. येशूच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली, मानवजातीला तिच्या सध्याच्या दयनीय स्थितीतून काढून वैभवी परिपूर्णतेच्या स्थितीत आणले जाईल. याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो त्याचा जरा विचार करा. आरोग्याला नवीन झळाळी येईल! कल्पना करा, दररोज सकाळी उठल्यावर तुम्हाला आधीच्या दिवसापेक्षा अधिक ताजेतवाने वाटेल. कोट्यवधी अबालवृद्ध त्या सुकाळाची उत्सुकतेने वाट पाहून आहेत. हा सुकाळ येईल याची त्यांना पक्की खात्री आहे, ते त्याच्यासाठी प्रार्थना करतात. हे आशीर्वाद आपल्याला लाभतील याची खात्री त्यांना बायबलच्या अभ्यासाद्वारे पटली आहे.
परंतु, येशू ख्रिस्त आपली हजार वर्षांची राजवट सुरू करण्याआधी त्याच्या शासनाचा विरोध करणाऱ्यांचे पृथ्वीवरून उच्चाटन करील. हे तो बायबलमध्ये हर्मगिदोन म्हटलेल्या युद्धात करील. (प्रकटीकरण १६:१६) पृथ्वीवरील प्रांजळ ख्रिश्चनांना या युद्धात भाग घ्यावा लागणार नाही. हे देवाचे युद्ध आहे. आणि हे युद्ध कोणत्याही एका स्थळी होणार नाही. ते पृथ्वीच्या कानाकोपऱ्यापर्यंत चालेल असे बायबल म्हणते. ख्रिस्ताच्या शासनाच्या शत्रूंना नष्ट केले जाईल. त्यांच्यातील कोणीही वाचणार नाही!—यिर्मया २५:३३.
मग येशू आपले लक्ष दियाबल सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांकडे वळवील. प्रकटीकरणाच्या लेखकाच्या वर्णनातून त्याचे दृश्य आपल्या डोळ्यांसमोर आणा: “मी एका देवदूताला [येशू ख्रिस्ताला] स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल, व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्यास धरले, आणि त्याने एक हजार वर्षांपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले.” (प्रकटीकरण २०:१, २) नंतर सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांचा कायमचा नाश केला जाईल.—मत्तय २५:४१.
‘कोणाला मोजता येत नाही असा, मोठा लोकसमुदाय’ हर्मगिदोनातून बचावेल. (प्रकटीकरण ७:९) एक मेंढपाळ आपल्या मेंढरांना जीवनदायी पाण्याकडे नेतो तसे ख्रिस्त या मोठ्या समुदायातील लोकांना “जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल.” (प्रकटीकरण ७:१७) सैतान आणि त्याच्या दुरात्म्यांनी आणलेल्या अडखळणांना न जुमानणाऱ्या हर्मगिदोनातून बचावलेल्या या लोकांना, परिपूर्णता प्राप्त करेपर्यंत आपल्या पापी प्रवृत्तींवर मात करण्यास हळूहळू साहाय्य केले जाईल!
ख्रिस्ताच्या प्रेमळ शासनाखाली आपले जीवन उत्तरोत्तर सुधारत जाईल. यहोवा देव येशू ख्रिस्तामार्फत यातना आणि दुःख यांना कारणीभूत ठरणाऱ्या सर्व गोष्टींचे समूळ उच्चाटन करील. “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” (प्रकटीकरण २१:४) संदेष्टा यशया असे म्हणत चित्र पूर्ण करतो: “अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्याचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.” (यशया ३५:५, ६) आणि मरण पावलेले सर्व ‘लहानथोर’ पुन्हा जिवंत होतील; पुन्हा कधीही न मरण्याची आशा त्यांच्यापुढे असेल!—प्रकटीकरण २०:१२.
हर्मगिदोनातून बचावलेल्या ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ लोकांना आजही एकत्र केले जात आहे. ते ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीसाठी तयारी करत आहेत. ही राजवट केव्हा सुरू होईल हे त्यांना माहीत नसले तरी, देवाच्या नियुक्त समयी ती सुरू होईल अशी त्यांना खात्री आहे. तुम्हीही त्या लोकांपैकी एक होऊ शकता पण त्याआधी तुम्हाला—आपली मालमत्ता विकून एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाण्याद्वारे नव्हे तर बायबलच्या अभ्यासातून यहोवा देव आणि त्याचे उद्देश यांबद्दलचे अचूक ज्ञान घेण्याद्वारे तयारी केली पाहिजे. यहोवाचे साक्षीदार विनामूल्य व कसल्याही अटीविना बायबलच्या अभ्यासाद्वारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लाभ कसा मिळू शकतो ते आनंदाने दाखवतील. या नियतकालिकाच्या प्रकाशकांना तुम्हाला सविस्तर माहिती द्यायला आनंद वाटेल.
[७ पानांवरील चौकट]
हजार वर्ष—खरे की लाक्षणिक?
बायबलमधील प्रकटीकरण पुस्तकाचा बहुतांश भाग लाक्षणिक भाषेत लिहिला असल्यामुळे एक प्रश्न पुढे येतो. प्रकटीकरणात उल्लेखलेल्या ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीबद्दल काय? हा कालावधी खरा असेल की लाक्षणिक?
हा वास्तविक हजार वर्षांचा कालावधी असेल, असेच सूचित होते. विचार करा: मानवजातीचा न्याय केला जाईल त्या ख्रिस्ताच्या हजार वर्षीय राजवटीला प्रेषित पौल एक दिवस म्हणतो. (प्रेषितांची कृत्ये १७:३१; प्रकटीकरण २०:४) यहोवाला एक दिवस (२४ तास) हजार वर्षांसारखा आहे, असे प्रेषित पेत्र लिहितो. (२ पेत्र ३:८) यावरून हे सूचित होते की हा न्यायाचा “दिवस” वास्तविकतेत हजार वर्षांचा आहे. शिवाय, प्रकटीकरण २०:३, ५-७ मध्ये आपण चार विविध वेळा “ती हजार वर्षे” (तिरपे वळण आमचे.) असे वाचतो. यावरून, हा एक निश्चित समयावधी आहे हे सूचित होते.