वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 १०/१ पृ. १०-१५
  • “शांतीचा समय” लवकरच!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “शांतीचा समय” लवकरच!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खऱ्‍या शांतीचा आधार
  • “युद्ध करण्याचा समय” का?
  • हा “बोलण्याचा समय” आहे
  • “शांति नसता शांति आहे” असे म्हणणारे
  • यहोवा आपले मौन तोडतो
  • खरी शांती—कोणत्या उगमाकडून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • देवाकडील शांती केव्हा?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • मानवाला शांतीकडे कोण नेऊ शकेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 १०/१ पृ. १०-१५

“शांतीचा समय” लवकरच!

“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; . . . युद्ध करण्याचा समय, व सख्य करण्याचा [“शांतीचा,” NW] समय असतो.”—उपदेशक ३:१, ८.

१. या २० व्या शतकात युद्ध आणि शांतीच्या संबंधाने खरे तर कोणती परिस्थिती आहे?

बहुतेक लोक शांतीकरता आसुसले आहेत आणि हे साहजिकच आहे. या २० व्या शतकाने पूर्वी कधी नव्हती इतकी अशांती अनुभवली आहे. खरे तर असे व्हायला नको होते; कारण याच शतकात शांती कायम राखण्यासाठी पूर्वी कधी केले नव्हते इतक्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. उदाहरणार्थ, प्रथम १९२० मध्ये राष्ट्र संघाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर १९२८ मध्ये केलॉग-ब्रायन्ड करार मंजूर करण्यात आला; “पहिल्या महायुद्धानंतर शांती कायम राखण्याच्या उद्देशाने उचललेले सर्वात मोठे पाऊल” असे या कराराला म्हणण्यात आले; या कराराला “जवळजवळ सर्व राष्ट्रांनी पाठिंबा दिला . . . आणि त्याकरवी असे ठरवले, की आपसांतील मतभेद मिटवण्याकरता ते कधीही युद्ध करणार नाहीत.” मग १९४५ मध्ये, एव्हाना निष्क्रिय झालेल्या राष्ट्र संघाची जागा संयुक्‍त राष्ट्र संघटनेने घेतली.

२. संयुक्‍त राष्ट्र संघटनेचा उद्देश काय आहे आणि तिच्या प्रयत्नांना कितपत यश मिळाले आहे?

२ राष्ट्र संघाप्रमाणेच संयुक्‍त राष्ट्र संघटनेचाही उद्देश जागतिक पातळीवर शांती कायम राखणे हा आहे. पण या संघटनेच्या प्रयत्नांना म्हणावे तितके यश आलेले नाही. कदाचित, पहिल्या दोन महायुद्धांसारखी भयंकर युद्धे आता कोठेही चालू नसतील; पण जगभरात सध्या कित्येक लहानमोठ्या लढाया चालू असून त्यामुळे लाखो लोकांची शांती हिरावून घेतली जात आहे, त्यांच्या मालमत्तेची हानी होत आहे आणि काहींना तर या लढायांमध्ये आपला जीवही गमवावा लागत आहे. तर मग संयुक्‍त राष्ट्र, २१ व्या शतकाचे ‘शांतीच्या काळात’ परिवर्तन करील हे कोणत्या आधारावर म्हणावे?

खऱ्‍या शांतीचा आधार

३. द्वेष असल्यास खरी शांती का प्रस्थापित होऊ शकत नाही?

३ लोकांमध्ये आणि राष्ट्रांमध्ये एकमेकांचे सोसण्याची तयारी असली म्हणजे शांती आहे असे नाही. आपण एखाद्याचा द्वेष करत असल्यास त्याच्याशी आपल्याला खरेच शांतीने राहता येईल का? मुळीच नाही! कारण १ योहान ३:१५ म्हणते: “जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करितो तो नरहिंसक आहे.” अलीकडे आलेल्या अनुभवांवरून हे दिसून येते, की खोलवर रुजलेल्या द्वेषाचे हिंसाचारात रूपांतर होण्यास जास्त वेळ लागत नाही.

४. खरी शांती फक्‍त कोणत्या लोकांमध्ये असू शकते आणि का?

४ यहोवा “शांतीचा देव आहे.” त्यामुळे त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या आणि त्याच्या धार्मिक तत्त्वांचा मनापासून आदर करणाऱ्‍या लोकांमध्येच शांती असू शकते. अर्थात, यहोवाकडून मिळणारी शांती सर्वांसाठी नसते. “दुर्जनांस शांति नाही असे माझा देव म्हणतो.” कारण शांती पवित्र आत्म्याचे फळ आहे आणि दुष्ट लोकांची पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालण्याची इच्छा नसते.—रोमकर १५:३३; यशया ५७:२१; गलतीकर ५:२२.

५. कोणता विचार खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या मनात देखील येत नाही?

५ आपसांत युद्ध करणे हा विचार खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या मनात देखील येत नाही, पण खासकरून या २० व्या शतकात तथाकथित ख्रिश्‍चन बहुतेक वेळा लढायांमध्ये गुंतले होते. (याकोब ४:१-४) खरे ख्रिश्‍चनही एकप्रकारच्या युद्धात गुंतले आहेत, पण हे युद्ध देवाविषयी चुकीची माहिती देणाऱ्‍या शिकवणींच्या विरुद्ध आहे; या युद्धामुळे कोणाची हानी होत नाही किंबहुना यामुळे लोकांची मदतच होते. दुसऱ्‍या धर्माच्या लोकांचा छळ करणे किंवा राष्ट्रीयत्वाच्या भावनेपोटी लोकांना मारहाण करणे अशा गोष्टी खऱ्‍या ख्रिस्तित्वाच्या अगदी विरुद्ध आहेत. कारण रोममधील ख्रिश्‍चनांना पौलाने असे म्हटले: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.”—रोमकर १२:१७-१९; २ तीमथ्य २:२४, २५.

६. आज खरी शांती फक्‍त कोठे दिसू शकते?

६ देवाकडून येणारी शांती आज केवळ यहोवा देवाच्या खऱ्‍या उपासकांमध्येच आढळते. (स्तोत्र ११९:१६५; यशया ४८:१८) संपूर्ण जगभरात ते राजकीय बाबतीत तटस्थ असल्यामुळे कोणत्याही राजकीय मतभेदांमुळे त्यांच्या ऐक्यात फुट पडत नाही. (योहान १५:१९; १७:१४) “एकचित्ताने आणि एकमताने जोडलेले” असल्यामुळे कोणत्याही राजकीय मतभेदांमुळे त्यांच्यातील शांती भंग पावत नाही. (१ करिंथकर १:१०) यहोवाचे साक्षीदार अनुभवत असलेल्या शांतीला चमत्कारच म्हणावा लागेल. ही शांती देवाने दिलेल्या अभिवचनाच्या एकवाक्यतेत आहे: “तुजवर शांति सत्ता चालवील व न्याय तुझा कारभार पाहील.”—यशया ६०:१७; इब्री लोकांस ८:१०.

“युद्ध करण्याचा समय” का?

७, ८. (अ) यहोवाच्या साक्षीदारांमध्ये खरी शांती असली, तरी ते आजच्या काळाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात? (ब) ख्रिस्ती लोकांच्या युद्धातील प्रमुख शस्त्र कोणते आहे?

७ यहोवाच्या साक्षीदारांमध्ये शांती असली, तरी ते सध्याच्या काळाकडे प्रामुख्याने “युद्ध करण्याचा समय” या दृष्टीने पाहतात. अर्थात हे काही खरे युद्ध नाही कारण जोरजबरदस्ती करून बायबलचा संदेश आपण कोणावरही लादू शकत नाही. लोकांना देव असे आमंत्रण देतो की, “ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.” (तिरपे वळण आमचे.) (प्रकटीकरण २२:१७) यहोवाचे साक्षीदार कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीने धर्मांतर करत नाहीत! यहोवाच्या साक्षीदारांचे युद्ध पूर्णपणे आध्यात्मिक आहे. कारण पौलाने असे लिहिले: “आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत.”—२ करिंथकर १०:४; १ तीमथ्य १:१८.

८ ‘आपल्या युद्धाच्या शस्त्रांमध्ये’ सर्वात प्रमुख शस्त्र, अर्थात “आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन” आहे. (इफिसकर ६:१७) ही तलवार खूप शक्‍तिशाली आहे. “देवाचे वचन सजीव, सक्रिय कोणत्याहि दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्‍यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतु ह्‍यांचे परीक्षक असे आहे.” (इब्री लोकांस ४:१२) या तलवारीच्या साह्‍याने ख्रिश्‍चनांना “तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही” पाडता येते. (२ करिंथकर १०:५) या तलवारीमुळे देवाच्या सेवकांना खोटी धर्मतत्त्वे, विघातक चालिरीती आणि ईश्‍वरी बुद्धीऐवजी मानवी बुद्धीवर आधारलेले तत्त्वज्ञान उघडकीस आणणे शक्य होते.—१ करिंथकर २:६-८; इफिसकर ६:११-१३.

९. पापमय शरीराच्या विरुद्ध आपण सतत का लढत राहिले पाहिजे?

९ आध्यात्मिक युद्धाचा आणखी एक प्रकार म्हणजे, पापमय शरीराविरुद्ध आपल्याला करावा लागणारा संघर्ष. याबाबतीत ख्रिस्ती लोक पौलाच्या उदाहरणाचे अनुकरण करतात; पौलाने मान्य केले: “मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्‍यास घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन.” (१ करिंथकर ९:२७) कलस्सैमधील ख्रिश्‍चनांना असे सांगण्यात आले होते, की “पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ—ह्‍याला मूर्तिपूजा म्हणावे—हे जिवे मारा.” (कलस्सैकर ३:५) यहुदा या बायबल लेखकाने ख्रिश्‍चनांना अगदी आग्रहाने सांगितले: ‘पवित्र जनांच्या हवाली केलेल्या विश्‍वासाचे समर्थन [विश्‍वासाचे रक्षण करण्याकरता कडा संघर्ष] करा.’ (यहूदा ३) आपण हा संघर्ष का करावा? पौल याचे उत्तर देतो: “जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहा, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल.” (रोमकर ८:१३) या वचनाला लक्षात ठेवून आपण सतत वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढत राहिले पाहिजे.

१०. सन १९१४ मध्ये काय झाले आणि त्यामुळे अलीकडच्या भविष्यात काय होईल?

१० आजच्या काळाकडे युद्धाचा समय असे पाहण्याचे आणखी एक कारण आहे; ‘आपल्या देवाचा सूड घेण्याचा दिवस’ अगदी जवळ आहे. (यशया ६१:१, २) सन १९१४ मध्ये मशीही राज्याची स्थापना करण्याची आणि या राज्याला सैतानाच्या व्यवस्थीकरणाविरुद्ध सक्रिय युद्ध करण्याचा अधिकार देण्याची यहोवाची नियुक्‍त वेळ आली. देवाच्या कोणत्याही मदतीविना शासन करून पाहण्याकरता मानवांना दिलेली वेळ त्यावेळी संपली. पण देवाच्या मशीही राजाचा स्वीकार करण्याऐवजी पहिल्या शतकात बहुतेक लोकांनी केल्याप्रमाणे आजही अनेक लोक त्याला सरळसरळ नाकारतात. (प्रेषितांची कृत्ये २८:२७) परिणामी, येशूला देवाच्या राज्याच्या विरोधकांवर अर्थात ‘त्याच्या शत्रूंवर प्रभुत्व’ करणे भाग पडले आहे. (स्तोत्र ११०:२) आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, प्रकटीकरण ६:२ अभिवचन देते, की येशू ‘विजयी होईल.’ हा विजय ‘सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईत’ प्राप्त होईल जिला ‘इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटले आहे.’—प्रकटीकरण १६:१४, १६.

हा “बोलण्याचा समय” आहे

११. यहोवाने इतका धीर का धरला आहे, पण अखेरीस काय होईल?

११ सन १९१४ मध्ये संपूर्ण मानवी इतिहासाला कलाटणी मिळाली आणि या गोष्टीला आता ८५ वर्षे उलटली आहेत. यहोवाने मानवांच्या बाबतीत बराच काळ धीर धरला आहे. हा काळ किती गंभीर आहे या गोष्टीची देवाने त्याच्या सेवकांना पूर्ण जाणीव करून दिली आहे. लाखो लोकांचे जीवन धोक्यात आहे. अनेक लोकांना इशारा देण्याचे अजून बाकी आहे कारण “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची [यहोवाची] इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.” (२ पेत्र ३:९) पण लवकरच तो दिवस येईल; “प्रभु येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून . . . प्रगट होईल.” आणि तेव्हा तो अशा लोकांवर “सूड” उगवील ज्यांनी देवाच्या राज्याचा हेतूपुरस्सर अव्हेर केला आणि ‘ज्यांनी त्याची सुवार्ता मानली नाही.’—२ थेस्सलनीकाकर १:६-९.

१२. (अ) मोठे संकट केव्हा येईल याविषयी तर्कवितर्क करणे निव्वळ व्यर्थ का आहे? (ब) याबाबतीत येशूने कोणता इशारा दिला?

१२ पण यहोवा अजून किती काळ धीर धरणार आहे? “मोठे संकट” केव्हा येईल याविषयी तर्कवितर्क करणे निव्वळ व्यर्थ आहे. कारण येशूने असे म्हटले: “त्या दिवसाविषयी . . . कोणालाच ठाऊक नाही.” पण त्याने असेही म्हटले: “जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही. म्हणून तुम्हीहि सिद्ध असा, कारण तुम्हास कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.” (मत्तय २४:२१, ३६, ४२, ४४) सोप्या शब्दांत सांगायचे तर, याचा असाच अर्थ होतो, की आपण दररोज जागतिक घटनांविषयी दक्ष असावे; मोठ्या संकटाचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो या अपेक्षेत असावे. (१ थेस्सलनीकाकर ५:१-५) चारचौघांसारखे आपणही आरामात जगू अशी प्रवृत्ती किंवा पुढे होईल ते पाहता येईल अशी मनोवृत्ती बाळगणे किती धोक्याचे आहे! येशूने म्हटले: “तुम्ही संभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्‍यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुम्हांवर पाशाप्रमाणे अकस्मात येईल.” (लूक २१:३४) पण एक गोष्ट मात्र नक्की: यहोवाच्या ‘चार देवदूतांनी’ विनाशाचे जे ‘चार वारे’ सध्या अडवून धरले आहेत, ते कायमचे अडवून ठेवणार नाहीत.—प्रकटीकरण ७:१-३.

१३. सुमारे साठ लाख लोकांना कोणत्या गोष्टीची जाणीव झाली आहे?

१३ मनुष्याकडून झाडा घेण्याचा देवाचा दिवस किती वेगाने जवळ येत आहे हे लक्षात घेता, “बोलण्याचा समय” असतो असे जे शलमोनाने म्हटले ते अधिकच अर्थपूर्ण वाटू लागते. (उपदेशक ३:७) हा निश्‍चितच बोलण्याचा समय आहे याची जाणीव झाल्यामुळे सुमारे साठ लाख यहोवाचे साक्षीदार मोठ्या आवेशाने देवाच्या राज्याचा महिमा वर्णीत आहेत; त्याच्या सूडाच्या दिवसाविषयी इशारा देत आहेत. ख्रिस्ताचा हा पराक्रमाचा दिवस आहे हे जाणून ते संतोषाने पुढे येत आहेत.—स्तोत्र ११०:३; १४५:१०-१२.

“शांति नसता शांति आहे” असे म्हणणारे

१४. सा.यु.पू. ७ व्या शतकात कोणते खोटे संदेष्टे होते?

१४ सा.यु.पू. सातव्या शतकाच्या दरम्यान यिर्मया आणि यहेज्केल या देवाच्या संदेष्ट्यांनी जेरुसलेमवर आणि देवाच्या मार्गापासून भरकटलेल्या, त्याची अवज्ञा करणाऱ्‍या लोकांवर येणाऱ्‍या न्यायदंडाचा संदेश सांगितला. त्यांनी भाकीत केलेला विनाश सा.यु.पू. ६०७ मध्ये आला. अर्थात, त्या काळच्या प्रमुख आणि प्रभावी धार्मिक पुढाऱ्‍यांनी देवाच्या या खऱ्‍या संदेष्ट्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. पण खरे तर हे धार्मिक पुढारी “मूर्ख संदेष्टे” ठरले कारण त्यांनी ‘शांती नसता, शांती आहे असे म्हणून [देवाच्या] लोकांना बहकवले.’—यहेज्केल १३:१-१६; यिर्मया ६:१४, १५; ८:८-१२.

१५. आजही अशाचप्रकारचे खोटे संदेष्टे आहेत का? स्पष्ट करा.

१५ त्याकाळातील ‘मूर्ख संदेष्ट्यांप्रमाणे’ आज देखील बहुतेक धार्मिक पुढारी देवाच्या येणाऱ्‍या न्यायाच्या दिवसाविषयी लोकांना इशारा देत नाहीत. त्याऐवजी ते लोकांसमोर असे चित्र उभे करतात, की राजकीय प्रयत्नांतून एक ना एक दिवस शांती आणि सुरक्षितता जरूर प्राप्त होईल. देवाऐवजी लोकांचे समाधान करण्याची या धार्मिक पुढाऱ्‍यांना चिंता असल्यामुळे देवाचे राज्य स्थापन झाले असून मशीही राजा लवकरच विजय प्राप्त करील हे सांगण्याऐवजी ते आपल्या चर्चच्या सदस्यांना ऐकायला आवडतील अशाच गोष्टी त्यांना सांगतात. (दानीएल २:४४; २ तीमथ्य ४:३, ४; प्रकटीकरण ६:२) खोट्या संदेष्ट्यांप्रमाणे तेही “शांति नसता शांति आहे” असे म्हणतात. पण देवाविषयी चुकीची माहिती लोकांना सांगणाऱ्‍या आणि त्याच्या नावाची निंदा करणाऱ्‍या लोकांवर देवाचा क्रोध भडकेल तेव्हा मात्र त्यांचा हा भ्रम नाहीसा होईल. बायबलमध्ये अनैतिक स्त्री म्हणून उल्लेख करण्यात आलेल्या खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यातील या शांतीचा खोटा प्रचार करणाऱ्‍या या नेत्यांची तोंडे कायमची बंद केली जातील.—प्रकटीकरण १८:७, ८.

१६. (अ) यहोवाच्या साक्षीदारांनी काय दाखवून दिले आहे? (ब) “शांति नसता शांति आहे” असे म्हणणाऱ्‍यांपेक्षा ते वेगळे कसे आहेत?

१६ बहुतेक प्रमुख आणि प्रभावी नेते अद्यापही शांतीचे खोटे अभिवचन देत आहेत, पण त्यांच्या या खोट्या अभिवचनामुळे खऱ्‍या शांतीचे अभिवचन देणाऱ्‍या देवावर भरवसा असणाऱ्‍या लोकांच्या विश्‍वासाला तडा जात नाही. एका शतकाहून अधिक काळापासून यहोवाच्या साक्षीदारांनी हे दाखवून दिले आहे, की ते देवाच्या वचनाचे निष्ठावान रक्षक आहेत, खोट्या धर्माचे निडर विरोधक आहेत आणि देवाच्या राज्याचे निग्रही समर्थक आहेत. शांतीचे गोड अंगाई गीत गाऊन लोकांना झोपवण्याऐवजी यहोवाचे साक्षीदार आजचा काळ युद्धाचा आहे हे वास्तव लोकांच्या समोर आणण्यासाठी त्यांना जागे करण्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न करतात.—यशया ५६:१०-१२; रोमकर १३:११, १२; १ थेस्सलनीकाकर ५:६.

यहोवा आपले मौन तोडतो

१७. यहोवा लवकरच मौन तोडेल, याचा काय अर्थ होतो?

१७ शलमोनाने असे म्हटले: “देव धार्मिकाचा आणि दुष्टाचा न्याय करील. कारण हरएक गोष्टीचा व हरएक कामाचा नेमलेला समय आहे.” (उपदेशक ३:१७) होय, खोट्या धर्मावर आणि ‘यहोवाविरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्‍ताविरुद्ध उठलेल्या पृथ्वीवरील राजांवर’ न्यायदंड बजावण्याकरता देवाने एक समय नियुक्‍त केला आहे. (स्तोत्र २:१-६; प्रकटीकरण १६:१३-१६) एकदा ती वेळ आल्यानंतर यहोवा “मौन” धरणार नाही. (स्तोत्र ८३:१; यशया ६२:१; यिर्मया ४७:६, ७) त्याच्या शत्रूंना केवळ युद्धाची भाषा समजत असल्यामुळे तो त्याच भाषेत त्यांच्याशी आपल्या सिंहासनाधिष्ट मशीही राजा येशू ख्रिस्त याच्याद्वारे ‘बोलेल’: “परमेश्‍वर वीराप्रमाणे निघेल, रणधुरंधराप्रमाणे तो आपल्या आवेशाचे उद्दीपन करील; तो प्रचंड शब्द करील; तो रणशब्द करील; तो आपल्या शत्रूस आपला प्रभाव दाखवील. मी दीर्घकाळ मौन धरिले; मी स्तब्ध राहिलो; मी स्वतःला आवरिले; वेणा देणाऱ्‍या स्त्रीप्रमाणे मी आता कण्हत आहे, उसासे व धापा टाकीत आहे. मी पर्वत व टेकड्या उध्वस्त करीन, त्यावरचा झाडपाला सुकवीन; नद्यांची बेटे करीन, तळी आटवून टाकीन. माहीत नाही अशा रस्त्याने मी अंधळ्यास नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांस चालवीन; त्याच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्‍या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.”(तिरपे वळण आमचे.)—यशया ४२:१३-१६.

१८. देवाचे सेवक कोणत्या अर्थाने लवकरच ‘मौन धरतील’?

१८ एकदा देवाने आपल्या देवत्वाच्या समर्थनार्थ ‘बोलायला’ सुरवात केल्यावर, त्याच्या लोकांना आपल्या समर्थनार्थ काहीही बोलण्याची गरजच उरणार नाही. आता त्यांच्याकरता ‘मौन धरण्याची’ वेळ असेल. पुढील शब्द देवाच्या सेवकांच्या बाबतीत जसे भूतकाळात खरे ठरले तसेच ते पुन्हा एकदा खरे ठरतील: “या लढाईत तुम्हांस लढावे लागणार नाही; . . . तुम्ही स्थिर उभे राहा आणि परमेश्‍वर तुमचे कसे तारण करील ते पाहा.”—२ इतिहास २०:१७.

१९. ख्रिस्ताच्या आत्मिक बांधवांना लवकरच कोणता विशेषाधिकार मिळेल?

१९ सैतानाचा आणि त्याच्या संघटनेचा तो किती दारुण पराभव असेल! ख्रिस्ताचे गौरवशाली बांधव या नीतिमान युद्धात भाग घेतील कारण त्यांना हे अभिवचन देण्यात आले आहे: “शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील.” (रोमकर १६:२०) दीर्घकाळानंतर अखेरीस शांतीच्या काळाची चाहूल लागेल.

२०. लवकरच कोणता काळ येईल?

२० यहोवाच्या या महान शक्‍तिप्रदर्शनातून वाचलेले लोक किती आशीर्वादित असतील! त्यानंतर लवकरच भूतकाळातील विश्‍वासू स्त्री-पुरुषांचे पुनरुत्थान होण्याची नियुक्‍त वेळ येईल. ख्रिस्ताच्या राज्याचा हजार वर्षांचा कालावधी खऱ्‍या अर्थाने “रोपण्याचा समय . . . बरे करण्याचा समय . . . बांधून काढण्याचा समय . . . हसण्याचा समय . . . नृत्य करण्याचा [खेळण्याचा] समय . . . आलिंगन देण्याचा समय व . . . प्रेम करण्याचा समय” असेल. आणि हो, तो अनंत काळापर्यंत ‘शांतीचा काळ’ असेल!—उपदेशक ३:१-८; स्तोत्र २९:११, ३७:११; ७२:७.

तुमचे उत्तर?

◻ कायमस्वरुपी शांतीचा आधार काय आहे?

◻ यहोवाचे साक्षीदार सध्याच्या काळाकडे “युद्ध करण्याचा समय” असे का पाहतात?

◻ देवाच्या सेवकांनी केव्हा ‘बोलावे’ आणि केव्हा “मौन” धरावे?

◻ यहोवा कसे आणि केव्हा त्याचे मौन तोडेल?

[१३ पानांवरील चौकट/चित्रं]

पुढील घटनांकरता यहोवाची नियुक्‍त वेळ आहे

◻ गोग याला देवाच्या सेवकांवर हल्ला करायला लावणे—यहेज्केल ३८:३, ४, १०-१२

◻ मोठ्या बाबेलचा नाश करण्याचे मानवी राज्यकर्त्यांच्या मनात घालणे—प्रकटीकरण १७:१५-१७; १९:२

◻ कोकऱ्‍याचे लग्न संपन्‍न होणे—प्रकटीकरण १९:६, ७

◻ हर्मगिदोनाचे युद्ध सुरू करणे—प्रकटीकरण १९:११-१६, १९-२१

◻ येशूची हजार वर्षांची कारकीर्द सुरू करण्याकरता सैतानाला बंदिस्त करणे—प्रकटीकरण २०:१-३

बायबलमध्ये ज्या क्रमाने या घटनांचा उल्लेख आढळतो त्या क्रमाने त्या वरती दिल्या आहेत. या पाचही घटना घडतील यात शंका नाही, पण त्या यहोवाने ठरवलेल्या क्रमाने आणि त्याने ठरवलेल्या वेळीच घडतील.

[१५ पानांवरील चित्रं]

ख्रिस्ताच्या हजार वर्षांचा काळ म्हणजे . . .

हसण्याचा समय. . .

आलिंगन देण्याचा समय. . .

प्रेम करण्याचा समय . . .

रोपण्याचा समय. . .

खेळण्याचा समय. . .

बांधून काढण्याचा समय. . .

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा