“पृथ्वीच्या दिगंतापर्यंत” प्रकाश पोचवण्यात त्यांचे योगदान
प्रेषित पौलाला, “पृथ्वीच्या दिगंतापर्यंत” आध्यात्मिक प्रकाश पोचवण्यासाठी नेमले गेले होते. त्याच्या कार्यामुळे, ‘सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्या’ कित्येकांनी “विश्वास ठेवला.”—प्रेषितांची कृत्ये १३:४७, ४८; यशया ४९:६.
आध्यात्मिक प्रकाश सर्वत्र पोचवण्याची तीव्र उर्मी, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य, विल्यम लॉईड बॅरी यांच्या समर्पित जीवनशैलीतून व ख्रिस्ती कार्यांतील त्यांच्या अथक परिश्रमांतून दिसून येते. जुलै २, १९९९ रोजी बंधू बॅरी यांचे निधन झाले; हवाई येथील एका प्रांतिय अधिवेशनात ते भाषण देत होते.
लॉईड बॅरी यांचा जन्म डिसेंबर २०, १९१६ रोजी, न्यूझीलंड येथे झाला. त्यांच्या आईवडिलांनी, वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे वितरित केल्या जाणाऱ्या सी. टी. रसल यांच्या प्रकाशनांतील बायबल सत्यांमध्ये आधीच अतिशय आस्था दाखवली होती. अशा एका श्रद्धाळू ख्रिस्ती घरात बंधू बॅरी लहानाचे मोठे झाले.
बंधू बॅरी यांना खेळांत तसेच शिक्षणात रस होता, ते विज्ञान शाखेचे पदवीधर देखील होते; पण त्यांनी सदैव आध्यात्मिक गोष्टींवरच आपले लक्ष केंद्रित केले. यामुळेच, जानेवारी १, १९३९ रोजी त्यांनी, ऑस्ट्रेलियातील संस्थेच्या कार्यालयात बेथेल कुटुंबाचा एक सदस्य होण्याद्वारे पूर्ण वेळेच्या सेवेला आरंभ केला. सरकारने १९४१ मध्ये संस्थेवर बंदी घातल्यानंतर बंधू बॅरी कार्यालयीन कामकाज करीत राहिले; कधीकधी त्यांना सहविश्वासू बांधवांच्या उत्तेजनाकरता लेख लिहिण्याची नेमणूक मिळायची. प्रचार कार्यातही त्यांचा उत्साह अनुकरणीय होता.
बंधू बॅरी यांचा विवाह १९४२ सालच्या फेब्रुवारी महिन्यात झाला. त्यांच्या पत्नी देखील पूर्ण वेळेच्या सेवेत होत्या. अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्त्वाच्या मेल्बा यांनी बंधू बॅरींना आजवर अनेक वर्षे जगाच्या अनेक भागांत कार्य करताना विश्वासूपणे साथ दिली. संयुक्त संस्थानांतील वॉच टावर बायबल स्कूल ऑफ गिलियडच्या ११ व्या वर्गात उपस्थित राहण्याद्वारे त्यांनी विदेशी क्षेत्रांत सेवा करण्याचे मोठे पाऊल उचलले. अनेक ज्याला ‘पृथ्वीचा दिगंत’ समजतील, अर्थात जपानमध्ये सेवा करण्याची त्यांना नेमणूक मिळाली. नोव्हेंबर १९४९ मध्ये जपानला आल्यावर त्यांनी बंदर असलेल्या कोबे शहरात मिशनरी या नात्याने सेवा सुरू केली. त्यावेळी जपानमध्ये सुवार्तेचा प्रचार करणारे फक्त १२ जणच होते. बंधू बॅरी यांनी तिथली भाषा शिकली व या नवीन देशातील रीतीभाती शिकून घेतल्या; पुढील २५ वर्षांपर्यंत त्यांनी ज्यांच्याबरोबर सेवा केली त्या जपानी लोकांबद्दल त्यांना अतिशय जिव्हाळा होता. ‘सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्यांबद्दलचे’ त्यांचे प्रेम, जपानमध्ये वाढत चाललेल्या ख्रिस्ती बंधूसमाजाला स्पष्ट दिसत होते; आणि यामुळेच ते अनेक दशके शाखेच्या देखरेखीचे काम प्रभावीपणे करू शकले.
जपानमध्ये, १९७५ च्या मध्यात ३०,००० साक्षीदार होते तेव्हा बॅरी पतीपत्नीची ब्रुकलिन न्यूयॉर्कला बदली झाली. आत्म्याने अभिषिक्त असलेल्या बंधू बॅरी यांना यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचा सदस्य म्हणून सेवा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. (रोमकर ८:१६, १७) लेखन कार्यात त्यांना अनुभव असल्यामुळे लेखन विभागात त्यांची खूप मदत झाली. शिवाय, शाखेसंबंधी आणि आंतरराष्ट्रीय कामकाजांच्या अनुभवामुळे, नियमन मंडळाच्या प्रकाशन समितीचा सदस्य या नात्याने ते अमूल्य सहकार देऊ शकले.
पण, पूर्वेकडील देश आणि तेथील लोकांबद्दल बंधू बॅरी यांना असलेले प्रेम कमी झाले नाही. गिलियड प्रशालेतील विद्यार्थी आणि बेथेल कुटुंबाच्या सदस्यांना हे लगेच जाणवायचे जेव्हा बंधू बॅरी आपल्या भाषणांतून व विवेचनांतून मिशनरी कार्य केलेल्या अनेकांचे सुखद अनुभव कथन करीत. बंधू बॅरी अगदी उत्साहाने आपले अनुभव सांगायचे तेव्हा “पृथ्वीच्या दिगंतापर्यंत” होत असलेल्या राज्य प्रचारकार्याचे जिवंत चित्रच डोळ्यांसमोर उभे राहायचे. यांतील काही अनुभव सप्टेंबर १५, १९६० च्या टेहळणी बुरूजमध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या जीवन कथेत सांगितले आहेत.
‘सार्वकालिक जीवनासाठी नेमलेल्यांबद्दल’ बंधू बॅरी यांचे प्रेम, आज “ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस” झाल्यावरही कायम राहील, याची आम्हाला खात्री आहे. बंधू बॅरी यांना ओळखणाऱ्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना, यहोवाची सेवा करायला स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेला आणि देवाच्या लोकांबद्दल गाढ प्रेम असलेला आध्यात्मिक प्रवृत्तीचा पुरुष म्हणून त्यांची खूप आठवण येईल. पण, बंधू बॅरी पृथ्वीवर असेपर्यंत विश्वासूपणे टिकून राहिले याचा आम्हाला अत्यंत आनंद होतो.—प्रकटीकरण २:१०.
[१६ पानांवरील चित्र]
“शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी” हे इंग्रजीतील पुस्तक १९८८ मध्ये प्रकाशित झाले तेव्हा लॉईड बॅरी आणि जॉन बार
[१६ पानांवरील चित्र]
गिलियडच्या ११ व्या वर्गाचे पदवीधर ४० वर्षांनंतर जपानमध्ये भेटताना