‘सर्वांचा उचित काळ असतो’
“सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो.”—उपदेशक ३:१.
१. अपरिपूर्ण मानवांना काय ठरवायला कठीण जाते आणि काहीवेळा याचा काय परिणाम होतो?
अनेकदा आपण लोकांना असे म्हणताना ऐकतो, “खरं तर मी हे आधीच करायला हवं होतं.” किंवा सगळे काही झाल्यानंतर लोक असे म्हणतात, “आपण उगीच घाई केली.” लोकांच्या या बोलण्यावरून, एखादी गोष्ट केव्हा करावी आणि केव्हा करू नये हे ठरवताना अपरिपूर्ण मनुष्य सहसा चुकतो हेच दिसून येते. आणि या चुकीमुळे काही लोकांचे संबंध बिघडले, काहींच्या पदरी निराशा पडली. पण, यामुळे सर्वात वाईट गोष्ट कोणती झाली असेल तर ती म्हणजे यहोवावरील आणि त्याच्या संघटनेवरील काही लोकांचा विश्वास कमजोर झाला.
२, ३. (अ) यहोवाने ठरवून दिलेले नियुक्त काळ व समय स्वीकारणेच का उत्तम आहे? (ब) बायबलमधील भविष्यवाणीच्या पूर्णतेच्या बाबतीत आपण कोणता संतुलित दृष्टिकोन बाळगला पाहिजे?
२ पण, मनुष्याकडे जी बुद्धी आणि अंतर्दृष्टी नाही ती यहोवाकडे आहे. कोणत्याही घटनेचा काय परिणाम घडून येईल हे त्याची इच्छा असल्यास तो आधीच जाणून घेऊ शकतो. एका अर्थाने, तो “आरंभीच शेवट” जाणू शकतो. (यशया ४६:१०) त्यामुळे, एखादी गोष्ट करायची असल्यास त्यासाठी तो सगळ्यात उचित वेळ निवडू शकतो, आणि यात तो कधीच चुकत नाही. होय, योग्य वेळ ठरवण्याच्या बाबतीत यहोवा मनुष्यासारखा चुकत नाही, तेव्हा आपण स्वतःच्या बुद्धीवर भरवसा ठेवण्याऐवजी त्याने ठरवून दिलेले काळ व समय स्वीकारणेच उत्तम ठरणार नाही का?
३ उदाहरणार्थ, बायबलमधील विशिष्ट भविष्यवाणींची पूर्णता पाहण्यासाठी प्रौढ ख्रिस्ती यहोवाच्या नियुक्त वेळेपर्यंत विश्वासूपणे थांबून राहतात. देवाची सेवा करण्यात ते व्यस्त असतात आणि असे करत असताना विलापगीत ३:२६ या वचनातील तत्त्वाचे त्यांना कधीही विस्मरण होत नाही. तेथे सांगण्यात आले आहे: “परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीहि मुकाट्याने पाहणे बरे आहे.” (पडताळा हबक्कूक ३:१६.) त्यांना या गोष्टीची पूर्ण खात्री देखील पटली आहे, की यहोवाने भाकीत करून ठेवलेला न्यायदंड “विलंब लागला तरी . . . तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही.”—हबक्कूक २:३.
४. आमोस ३:७ आणि मत्तय २४:४५ ही वचने यहोवावर धीराने अवलंबून राहण्यास आपल्याला कशी मदत करतात?
४ काहीवेळा असे होईल की बायबलचे काही उतारे किंवा संस्थेच्या प्रकाशनातील काही स्पष्टीकरण आपल्याला पूर्णपणे समजणार नाही. अशावेळी आपण काय करावे? अधीर व्हावे? मुळीच नाही; त्याऐवजी, विशिष्ट गोष्टीवर प्रकाश टाकण्याच्या यहोवाच्या नियुक्त वेळेपर्यंत थांबून राहणेच सगळ्यात शहाणपणाचे ठरेल. कारण “प्रभु परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.” (आमोस ३:७) किती विलक्षण अभिवचन! पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे, की यहोवा हे रहस्य आपल्याला नव्हे तर त्याला योग्य वाटेल तेव्हा कळवतो. म्हणूनच, आपल्या लोकांना “यथाकाळी [आध्यात्मिक अन्न] खावयास देण्यासाठी” देवाने “विश्वासू आणि बुद्धिमान दासाला” नेमले आहे. (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २४:४५) तेव्हा, विशिष्ट गोष्टींचा पूर्णपणे खुलासा न झाल्यास आपण अवास्तव चिंता करत बसू नये किंवा अस्वस्थ होऊ नये तर धीर धरून यहोवावर अवलंबून राहावे. आपल्या विश्वासू दासाद्वारे देव आवश्यक ती माहिती “यथाकाळी” जरूर प्रकाशात आणील अशी खात्री आपण बाळगू शकतो.
५. उपदेशक ३:१-८ या वचनांवर विचार केल्यामुळे कोणता लाभ होईल?
५ प्रत्येक गोष्टीला एक “उचित समय” आहे अशा एकूण २८ गोष्टींचा उल्लेख बुद्धिमान राजा शलमोन याने केला आहे. (उपदेशक ३:१-८) शलमोनाने जे काही म्हटले त्याचा अर्थ आणि ते आपल्याला कसे लागू होते हे समजल्यास देवाच्या दृष्टिकोनातून विशिष्ट गोष्टींसाठी कोणती वेळ योग्य आहे आणि कोणती वेळ अयोग्य आहे हे ठरवण्यास आपल्याला मदत होईल. (इब्री लोकांस ५:१४) आणि त्याप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनाला आकार देता येईल.
“रडण्याचा समय व हसण्याचा समय”
६, ७. (अ) कोणत्या कारणांमुळे लोकांवर आज ‘रडण्याची’ पाळी येते? (ब) जगाच्या परिस्थितीचे गांभीर्य कमी करण्याच्या प्रयत्नात काय केले जाते?
६ “रडण्याचा आणि हसण्याचा समय” असतो, हे खरे असले तरी रडायला कोणाला आवडेल? (उपदेशक ३:४) पण जगाची आजची परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्यासमोर रडण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. बातम्या ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर कोणाचे मन उदास होत नाही? मुलांनी त्यांच्याच शाळेतील मुलांना गोळ्या घालणे, पालकांचा त्यांच्या मुलांवरील अत्याचार, दहशतवाद्यांकडून निरपराध लोकांचे नाहक बळी, तथाकथित नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जीवित आणि वित्तीय हानी अशाप्रकारच्या बातम्या ऐकून आपल्या मनात एक प्रकारची भीती निर्माण होत नाही का? भुकेने व्याकूळ झालेली, हातापायाच्या काड्या झालेली चिमुकली मुले आणि जीव घेऊन पळत सुटलेले शरणार्थी, त्यांचे ते केविलवाणे चेहरे टिव्हीवर पाहिल्यावर आपले मन अगदी विषण्ण होते. जातीय शुद्धीकरण, एड्स, रोगाणू युद्ध आणि एल निनो ही यापूर्वी क्वचितच ऐकण्यात आलेली नावे आज आपल्याला अस्वस्थ करून सोडतात.
७ आजचे हे जग दुःखाने, मन खेदीत करणाऱ्या गोष्टींनी भरले आहे हे कोणीही मान्य करील. पण या परिस्थितीचे गांभीर्य कमी करण्याच्या हेतूने की काय मनोरंजन विश्वाने लोकांवर उथळ, असभ्य कार्यक्रमांचा भडिमार लावला आहे; आणि बहुतेक वेळा या मनोरंजनात अनैतिकतेशिवाय आणि हिंसाचाराशिवाय आणखी काही नसते. हे कार्यक्रम अशाप्रकारे तयार आणि सादर केले जातात, की त्यामुळे आपल्याला इतरांच्या दुःखाची जाणीव होत नाही. अशाप्रकारच्या मनोरंजनामध्ये सहसा थट्टामस्करी, पोरकटपणाचे हास्यविनोद दाखवण्यात येतात, पण त्यामुळे निर्माण होणाऱ्या बेपर्वाईच्या वृत्तीतून खरा आनंद मिळत नाही. खरा आनंद देवाच्या आत्म्याचे फळ आहे आणि हा आनंद सैतानाच्या जगात शोधूनही गवसणार नाही.—गलतीकर ५:२२, २३; इफिसकर ५:३, ४.
८. हसणे आणि रडणे यांपैकी ख्रिश्चनांनी आज कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे? स्पष्ट करा.
८ आजच्या जगातली भयंकर परिस्थिती विचारात घेता, ही वेळ हसण्याखेळण्याला महत्त्व देण्याची नाही हे स्पष्टच आहे. फक्त करमणूक आणि मनोरंजन करण्याची किंवा आध्यात्मिक गोष्टींना बाजूला सारून फक्त “मजा करण्याची” ही वेळ नाही. (पडताळा उपदेशक ७:२-४.) प्रेषित पौलाने म्हटले, की “जे ह्या जगाचा उपयोग करितात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे.” का? कारण “जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे.” (१ करिंथकर ७:३१) त्यामुळे खऱ्या ख्रिश्चनांना प्रत्येक दिवशी या गोष्टीची जाण असते, की ते ज्या काळात जगत आहेत तो फार गंभीर काळ आहे.—फिलिप्पैकर ४:८.
रडतानाही खरा आनंद!
९. जलप्रलयापूर्वी लोकांची मनोवृत्ती कशी होती आणि आज आपल्याकरता त्याचा काय अर्थ होतो?
९ जागतिक जलप्रलय येण्यापूर्वी लोकांनी जीवनाकडे गंभीरतेने पाहिले नाही. ते त्यांच्या रोजच्या कामातच मग्न होते आणि “पृथ्वीवरील मानवांची दुष्टाई फार” झाली आहे हे पाहून देखील त्यांना काहीच दुःख झाले नाही. पृथ्वी “जाचजुलमांनी भरली होती,” तरी त्यांना त्याचे काही वाटले नाही. (उत्पत्ति ६:५, ११) त्या काळातील लोकांच्या चुकीच्या मनोवृत्तीचा येशूने उल्लेख केला. आणि आपल्या काळातही लोकांची प्रवृत्ती अशीच होईल, असे त्याने भाकीत केले होते. त्याने असा इशारा दिला: “तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल.”—मत्तय २४:३८, ३९.
१०. हाग्गयाच्या दिवसांतील इस्राएल लोकांना यहोवाच्या नियुक्त काळाविषयी कदर नव्हती हे कसे दिसून आले?
१० या जलप्रलयाच्या सुमारे १,८५० वर्षांनंतर हाग्गयाच्या दिवसांतही अनेक इस्राएल लोकांनी आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती दाखवली. स्वतःचा स्वार्थ साधण्यात ते इतके गुंतले होते, की यहोवाला आनंदविणाऱ्या कार्यांना महत्त्व देण्याची ही वेळ आहे याची त्यांना जाणीवच झाली नाही. आपण त्या लोकांविषयी असे वाचतो: “हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचे वचन हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे प्राप्त झाले ते असे: इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा.”—हाग्गय १:१-५.
११. आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजे?
११ हाग्गयच्या दिवसांतील इस्राएल लोकांप्रमाणे आज यहोवाच्या साक्षीदारांनाही यहोवाप्रती काही जबाबदाऱ्या आहेत, त्याचे कार्य करण्याची खास संधी त्यांना आहे. म्हणूनच आपणही आपल्या जीवनाकडे मोठ्या गंभीरतेने पाहिले पाहिजे. आजची जगाची परिस्थिती आणि त्यामुळे देवाच्या नावाची होणारी निंदा पाहून आपण ‘रडतो’ का? लोक देवाचे अस्तित्व नाकारतात किंवा त्याची धार्मिक तत्त्वे सरळसरळ उडवून लावतात तेव्हा आपल्याला दुःख होते का? यहेज्केलने २,५०० वर्षांपूर्वी दृष्टान्तात कपाळावर चिन्ह असलेल्या लोकांना पाहिले; त्या लोकांप्रमाणे आपण करतो का? त्यांच्याविषयी आपण बायबलमध्ये असे वाचतो: “परमेश्वर त्याला [कारकुनाची दऊत असलेल्या मनुष्याला] म्हणाला, ‘नगरामधून, यरुशलेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.’”—यहेज्केल ९:४.
१२. यहेज्केल ९:५, ६ या वचनांचा लोकांकरता आज काय अर्थ होतो?
१२ विध्वंसक हत्यारे हाती घेतलेल्या सहा पुरुषांना असे फर्मावण्यात येते: “त्याच्यामागून नगरात जा व संहार करा; कृपादृष्टि करू नका; गय करू नका, वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया यांची निखालस कत्तल करा; पण ज्यांवर चिन्ह असेल त्यांस स्पर्श करू नका; माझ्या पवित्रस्थानापासून आरंभ करा.” (यहेज्केल ९:५, ६) आजच्या काळात हे अतिशय गांभिर्याने घेण्याजोगे शब्द आहेत! कारण आजचा काळ खरे तर रडण्याचा आहे हे आपण ओळखून त्याप्रमाणे चाललो, तरच येणाऱ्या मोठ्या संकटातून आपला बचाव होईल.
१३, १४. (अ) येशूने कोणत्या लोकांना आनंदी म्हटले? (ब) यहोवाच्या साक्षीदारांच्या बाबतीत हे खरे आहे असे तुम्हाला का वाटते ते सांगा.
१३ आजच्या जगाची नीतिभ्रष्ट परिस्थिती पाहून यहोवाचे सेवक ‘रडतात’ हे खरे आहे, पण याचा असा अर्थ होत नाही, की ते जीवनाचा आनंदच घेत नाहीत. उलट, ते तर पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक आहेत! खरे आनंदी कोण आहेत याविषयी येशूने सांगितले: “आध्यात्मिक गरजेची जाण असणारे, . . . शोक करणारे, . . . सौम्य, . . . धार्मिकतेचे भुकेले व तान्हेले, . . . दयाळू, . . . शुद्ध अंतःकरणाचे, . . . शांतिमय, . . . धार्मिकतेकरता ज्यांचा छळ होतो असे लोक आनंदी आहेत.” (मत्तय ५:३-१०, NW) हे शब्द यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेबाबतीत खरे ठरतात. आणि याचा भरपूर पुरावा आहे.
१४ खऱ्या उपासनेची १९१९ मध्ये पुनर्स्थापना झाली, तेव्हापासून विशेषतः यहोवाचे लोक ‘हास्याचा’ अनुभव घेत आहेत. सा.यु.पू. सहाव्या शतकात बॅबिलोनच्या बंदिवासातून परतलेल्या लोकांनी केलेला हर्षोल्लास यहोवाच्या लोकांनी देखील आध्यात्मिक अर्थाने अनुभवला आहे: “सीयोनेतून धरून नेलेल्या लोकांना जेव्हा परमेश्वराने परत आणिले. तेव्हा आम्ही स्वप्नात आहो असे आम्हाला वाटले. तेव्हा आमचे मुख हास्याने व आमची जीभ जयघोषाने भरली, . . . परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत. त्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे.” (स्तोत्र १२६:१-३) आज यहोवाचे साक्षीदार आध्यात्मिक हर्षाच्या काळात असले तरी, ते या काळाच्या गांभीर्याचा कधीही विसर पडू देत नाहीत. एकदा नवीन जग वास्तवात आल्यावर आणि पृथ्वीवरील लोकांना “खरे जीवन” प्राप्त झाल्यावर त्यानंतरचा काळ हा सदैव हर्षाचा काळ असेल; रडण्याचा अनुभव त्यानंतर कधीही येणार नाही.—१ तीमथ्य ६:१९; प्रकटीकरण २१:३, ४.
“आलिंगन देण्याचा समय व आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय”
१५. मैत्री करण्यापूर्वी ख्रिश्चन फार विचार का करतात?
१५ मैत्रीच्या रूपात कोणालाही जवळ करण्याआधी खरे ख्रिस्ती फार विचार करतात. ते पौलाचा इशारा नेहमी लक्षात ठेवतात: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) शलमोन या बुद्धिमान राजानेही असेच लिहिले: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०.
१६, १७. मैत्री, डेटींग आणि विवाह यांकडे पाहण्याचा यहोवाच्या साक्षीदारांचा कोणता दृष्टिकोन आहे आणि का?
१६ देवाचे सेवक अशाच लोकांशी मैत्री करतात ज्यांचे त्यांच्याप्रमाणेच यहोवावर व त्याच्या नीतिमान तत्त्वांवर प्रेम आहे. त्यांना मित्रमैत्रिणींचा सहवास हवाहवासा वाटतो हे खरे आहे. पण आज काही देशांत डेटींगच्या (लग्नापूर्वी मुलामुलींचे एकमेकांना भेटणे) बाबतीत बाळगला जाणारा स्वैर दृष्टिकोन ते स्वीकारत नाहीत. केवळ मौजेखातर मुलामुलींनी भेटावे, सोबत फिरावे हे योग्य नाही हे त्यांना माहीत आहे. आणि म्हणून, संबंधित व्यक्ती विवाहासारख्या कायमस्वरूपी बंधनाकरता—शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या तयार असेल—आणि बायबलच्या तत्त्वांनुसार लग्न करण्यास योग्य असेल—तरच ते विवाहाचा उद्देश समोर ठेवून, गांभिर्याने विचार करून हे डेटींगचे पाऊल उचलतात.—१ करिंथकर ७:३६.
१७ डेटींग आणि विवाहाच्या बाबतीत काहींना कदाचित हे विचार जुन्या पिढीचे विचार वाटतील. पण यहोवाचे साक्षीदार मित्रमैत्रिणींच्या निवडीच्या बाबतीत किंवा डेटींग आणि विवाहाच्या बाबतीत जगातील बहुतेक लोकांच्या मनोवृत्तीच्या आधारावर आपले मत ठरवत नाहीत. कारण “ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते,” याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. (मत्तय ११:१९) या विषयाचा यहोवाशिवाय आणि कोण चांगला सल्लागार असू शकेल? त्यामुळे “केवळ प्रभूमध्ये लग्न” करा या देवाच्या सल्ल्याकडे त्याचे सेवक मोठ्या गंभीरतेने पाहतात. (१ करिंथकर ७:३९; २ करिंथकर ६:१४) लग्नानंतर दोघांचे जमले नाही तर आपण घटस्फोट घ्यायला किंवा वेगळे व्हायला मोकळे आहोत, असा चुकीचा विचार करून ते लग्नाची घाई करत नाहीत. योग्य विवाहसोबती मिळेपर्यंत ते थांबून राहतात कारण त्यांना या गोष्टीची जाण असते, की विवाहाची शपथ घेतल्यानंतर त्यांना कोणत्याही परिस्थितीत विवाहाच्या बाबतीत असणाऱ्या यहोवाच्या नियमाप्रमाणे चालावेच लागेल: “ह्यामुळे ती पुढे दोन नव्हत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”—मत्तय १९:६; मार्क १०:९.
१८. आनंदी विवाहाची सुरवात कशी होऊ शकते?
१८ विवाह म्हणजे आयुष्यभराचे बंधन. त्यामुळे विवाहापूर्वी विचारपूर्वक योजना केलीच पाहिजे. ही योजना करताना विवाह करण्याची इच्छा असणारा मुलगा साहजिकच असा विचार करेल, की “ती मुलगी माझ्याकरता योग्य आहे का?” पण तितकाच महत्त्वाचा दुसरा प्रश्न त्याने स्वतःला विचारला पाहिजे, तो असा की, ‘मी तिच्याकरता योग्य आहे का? तिच्या आध्यात्मिक गरजा मी पूर्ण करू शकेन, इतके माझे ख्रिस्ती व्यक्तिमत्त्व विकसित झाले आहे का? इतका मी ख्रिस्ती जीवनात परिपक्व झालो आहे का?’ विवाह करू इच्छिणाऱ्या मुलाकडून आणि मुलीकडून यहोवा हीच अपेक्षा करतो, की त्यांनी आध्यात्मिकरित्या मजबूत असावे; देवाच्या नजरेत आदरणीय ठरेल असे अतूट विवाहबंधन राखण्याची पात्रता त्यांच्या अंगी असावी. हजारो ख्रिस्ती दांपत्ये त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून हे दाखवून देऊ शकतात, की पूर्ण-वेळेचे सेवाकार्य ही आनंदी विवाहाची एक उत्तम सुरवात आहे कारण यात घेण्यापेक्षा देण्यावर अधिक भर असतो.
१९. काही ख्रिस्ती विवाह न करण्याचे का ठरवतात?
१९ काही ख्रिस्ती लोक सुवार्तेकरता विवाह न करण्याचे ठरवतात आणि त्याअर्थी, ते “आलिंगन देण्याचे आवरून” धरत असतात. (उपदेशक ३:५) काही असेही आहेत जे योग्य सोबती मिळण्याकरता आध्यात्मिकरित्या पात्र होईपर्यंत लग्न करण्याचे पुढे ढकलतात. आणि असेही काही अविवाहित ख्रिस्ती आहेत ज्यांना लग्न करावेसे वाटते, वैवाहिक जीवनाचा आनंद घ्यावासा वाटतो, पण त्यांना विवाहसोबती मिळत नाही. विवाह करण्याची या ख्रिस्ती मुलामुलींची कितीही इच्छा असली तरी, ते ईश्वरी तत्त्वांशी कोठेही तडजोड करत नाहीत हे पाहून यहोवाला निश्चितच आनंद वाटतो. या मुलामुलांनी यहोवाप्रती दाखवलेल्या एकनिष्ठेची आपणही कदर केली पाहिजे; त्यांना आवश्यक ते उत्तेजन दिले पाहिजे.
२०. विवाहित जोडपीही काहीवेळा “आलिंगन देण्याचे आवरून” का धरतात?
२० विवाहित जोडप्यांनीही “आलिंगन देण्याचे आवरून” धरले पाहिजे का? एका अर्थाने तसे करणे योग्य आहे कारण पौलाने असे लिहिले: “बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, काळाचा सक्षेप करण्यात आला आहे, ह्यासाठी की, ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे.” (१ करिंथकर ७:२९) पौलाच्या शब्दांवरून हे दिसून येते, की काहीवेळा आपल्याला ईश्वरशासित जबाबदाऱ्यांपुढे वैवाहिक जीवनातील आनंद, सूख यांना दुय्यम स्थान द्यावे लागेल. पण या बाबतीत संतुलित दृष्टिकोन बाळगल्यास वैवाहिक जीवनात बाधा येण्याऐवजी विवाहबंधन अधिकच मजबूत होईल. कारण या संतुलित दृष्टिकोनामुळे पतीला आणि पत्नीला नेहमी हे लक्षात ठेवण्यास मदत होईल, की त्यांच्यामधील नातेसंबंध केवळ यहोवामुळेच दृढ होऊ शकतो.—उपदेशक ४:१२.
२१. मुले होऊ देण्याच्या बाबतीत विवाहित जोडप्यांच्या व्यक्तिगत निर्णयाची आपण टीका का करू नये?
२१ याशिवाय, काही वैवाहिक जोडप्यांनी देवाच्या सेवेकरता आणखी वेळ मिळावा म्हणून मुले न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर ही दांपत्ये एक प्रकारे मोठा त्यागच करत आहेत, आणि यहोवा त्यांच्या निःस्वार्थ सेवेचे नक्की प्रतिफळ देईल. अर्थात, सुवार्तेकरता अविवाहित राहण्याचे जसे बायबलमध्ये थेटपणे उत्तेजन देण्यात आले आहे, तसे सुवार्तेकरता मुले न होऊ देण्याविषयी बायबलमध्ये कोठेही थेट उल्लेख आढळत नाही. (मत्तय १९:१०-१२; १ करिंथकर ७:३८; पडताळा मत्तय २४:१९ आणि लूक २३:२८-३०.) त्यामुळे विवाहित जोडप्यांनी स्वतःच्या परिस्थितीनुसार आणि सदसद्विवेकबुद्धीला पटेल त्यानुसार व्यक्तिगत निर्णय घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाची इतरांनी कोणत्याही प्रकारे टीका करू नये.
२२. आज आपल्याकरता काय जाणून घेणे महत्त्वाचे आहे?
२२ अशाप्रकारे, “सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावर प्रत्येक कार्याला समय असतो.” तसेच, “युद्ध करण्याचा समय, व सख्य करण्याचा [“शांतीचा,” NW] समय असतो.” (उपदेशक ३:१, ८) आज युद्धाचा समय आहे की शांतीचा समय आहे हे जाणून घेणे आपल्याकरता महत्त्वाचे आहे आणि याची चर्चा पुढील लेखात करण्यात येईल.
तुम्हाला सांगता येईल का?
◻ ‘प्रत्येक गोष्टीचा उचित काळ असतो’ हे जाणणे आपल्याकरता महत्त्वाचे का आहे?
◻ आज प्रामुख्याने ‘रडण्याचा काळ’ का आहे?
◻ ख्रिस्ती ‘रडत’ असले तरी ते खऱ्या अर्थाने आनंदी कसे आहेत?
◻ “आलिंगन देण्याचे आवरून” धरण्याचा हा काळ आहे हे आपण ओळखतो, हे काही ख्रिस्ती कसे दाखवून देतात?
[६, ७ पानांवरील चित्रं]
आजची जगाची परिस्थिती पाहून ख्रिस्ती लोक ‘रडत’ असले तरी. . .
. . . ते पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक आहेत
[८ पानांवरील चित्र]
पूर्ण-वेळेचे सेवाकार्य म्हणजे आनंदी विवाहासाठी एक उत्तम आधार