वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ९/१ पृ. २५-२९
  • यहोवा माझा दुर्ग राहिला आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा माझा दुर्ग राहिला आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आध्यात्मिक कुटुंब मिळणे
  • एकटा पायनियर
  • छळ आणि हद्दपारी
  • विरोध होऊनही वाढ
  • “सोडविणारा” यहोवा
  • छळाच्या धगधगत्या भट्टीत पारख
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • पन्‍नासपेक्षा अधिक वर्षांपासून ‘भेटी देणे’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवा ज्यास पात्र आहे ते त्याला देणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • यहोवानं आम्हाला ‘पराकोटीचे सामर्थ्य’ दिले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ९/१ पृ. २५-२९

यहोवा माझा दुर्ग राहिला आहे

इम्यॅनवेल लिओनाउडाकीस यांच्याद्वारे कथित

माझी आई माझ्यावर खेकसून म्हणाली: “तुझा हाच निर्णय असेल तर मग तुला हे घर सोडावं लागेल.” देवाच्या राज्याचा पूर्ण वेळ प्रचार करायचं मी ठरवलं होतं. पण मला वारंवार होणाऱ्‍या अटकेमुळे माझं कुटुंब त्यांचा होणारा अपमान सहन करू शकले नाही.

माझे आईवडील गरीब आणि देव-भीरू होते. ते क्रीटच्या ग्रीक बेटाच्या पश्‍चिमेला म्हणजे डाऊलिअना गावात राहात होते, तेथेच १९०८ साली माझा जन्म झाला. मला बालपणापासून त्यांनी देवाला भिऊन वागण्यास व देवाचा आदर करण्यास शिकवलं. मी शाळा मास्तरांच्या किंवा ग्रीक कर्मठ पाळकांच्या हातात बायबल कधी पाहिलं नव्हतं, तरीपण मला देवाच्या वचनावर प्रेम होतं.

आमच्या एका शेजाऱ्‍यानं, सी. टी. रस्सल यांचं इंग्रजी भाषेतील शास्त्रवचनांचा अभ्यास या सहा खंडाचं आणि देवाची वीणा या पुस्तकाचं वाचन झाल्यावर मला त्यातील शास्त्रवचनांचे विषय दाखवले ज्यामुळे माझे डोळे उघडले. ही पुस्तके बायबल विद्यार्थ्यांनी छापली होती; यहोवाच्या साक्षीदारांना पूर्वी बायबल विद्यार्थी असे म्हटले जायचे. मी अथेन्समधील वॉच टावर संस्थेतून एक बायबल आणि पुस्तकांच्या काही प्रती मागवल्या. मला अजूनही आठवते, की मी त्या शेजाऱ्‍याबरोबर रात्री उशिरापर्यंत यहोवाला प्रार्थना करून मेणबत्तीच्या प्रकाशात त्या पुस्तकांच्या साहाय्याने शास्त्रवचनांचा खोल अभ्यास करत असे.

मला मिळालेले बायबलचे ज्ञान मी इतरांना सांगू लागलो तेव्हा २० वर्षांचा होतो आणि जवळपासच्या एका गावात शाळा मास्तर म्हणून काम करत होतो. लवकरच आम्ही चार जण डाऊलिअनामध्ये बायबल अभ्यासासाठी नियमित सभा भरवू लागलो. मानवजातीसाठी असलेली एकमेव आशा अर्थात देवाच्या राज्याबद्दल इतरांना शिकता यावं म्हणून आम्ही हस्तपत्रिका, पुस्तिका, पुस्तके आणि बायबल यांचे वाटप देखील केले.

सन १९३१ मध्ये, आम्हीही त्या हजारो लोकांमध्ये होतो ज्यांनी यहोवाचे साक्षीदार हे बायबल आधारित नाव स्वीकारलं. (यशया ४३:१०) त्याच्या पुढील वर्षी, आम्ही एका प्रसिद्धी मोहिमेत भाग घेतला; या मोहिमेत आम्ही आमचं नवीन नाव आणि त्याचं महत्त्व अधिकाऱ्‍यांना समजावून सांगितलं. यामध्ये आमच्या क्षेत्रातील प्रत्येक पाळकाला, न्यायाधीशाला, पोलिस अधिकाऱ्‍याला आणि व्यापाऱ्‍याला आमच्या मोहिमेसंबंधित पुस्तिका देणंही आलं.

आम्हाला जसं वाटलं तसंच झालं; पाळकांनी लोकांना चिथावल्यामुळे आमचा छळ सुरू झाला. मला सर्वात पहिल्यांदा अटक झाली तेव्हा २० दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. मी सुटून बाहेर आलो तोच पुन्हा मला अटक करून एक महिन्यासाठी कैदेत डांबण्यात आलं. एका न्यायाधीशानं आम्हाला आमचं प्रचार कार्य थांबवण्यास सांगितलं तेव्हा आम्ही त्याला प्रेषितांची कृत्ये ५:२९ हे वचन दाखवलं: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” नंतर, १९३२ मध्ये वॉच टावर संस्थेच्या एका प्रतिनिधीने डाऊलिअनामधील आमच्या लहानशा गटाला भेट दिली आणि आमच्या चारही जणांचा बाप्तिस्मा झाला.

आध्यात्मिक कुटुंब मिळणे

प्रचार कार्यात अधिक वेळ खर्च करण्याची माझी इच्छा असल्यामुळे मी शाळेचं काम सोडून दिलं. माझ्या आईला ते काही सहन झालं नाही. मी घर सोडावं असं तिनं मला सांगितलं. अथेन्समधील वॉच टावर संस्थेच्या शाखा कार्यालयाच्या संमतीनं, क्रीटमधील इरकलियोन शहरात राहणाऱ्‍या एका बांधवानं मला त्याच्या घरी आसरा दिला. १९३३ च्या ऑगस्ट महिन्यात माझ्या गावातील बांधव आणि काही आस्थेवाईक लोक मला बसस्टॉपवर पोहंचवायला आले. तो क्षण अतिशय नाजूक होता; आम्ही सर्व जण रडलो कारण, आम्ही पुन्हा एकमेकांना केव्हा पाहू शकू हे कुणालाच माहीत नव्हतं.

इराकलियोनमध्ये, मी एका प्रेमळ आध्यात्मिक कुटुंबाचा भाग झालो. इथं मला सोडून, तीन ख्रिस्ती बंधू आणि एक भगिनी होती; आम्ही अभ्यासासाठी आणि उपासनेसाठी नियमितरीत्या एकत्र येत असू. “ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी . . . शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया . . . मिळाल्याशिवाय राहणार नाही,” या येशूने दिलेल्या अभिवचनाचा मी प्रत्यक्षात अनुभव घेत होतो. (मार्क १०:२९, ३०) त्या शहरात आणि जवळपासच्या गावात प्रचार करण्याची माझी जबाबदारी होती. संपूर्ण शहरात प्रचार झाल्यावर मी इराकलियोन आणि लसिथोयोनच्या प्रादेशिक प्रशासकीय उपविभागामध्ये कार्य करायला गेलो.

एकटा पायनियर

एका गावातून दुसऱ्‍या गावात पायी जायला मी खूप तास खर्च केले. शिवाय, तेव्हा साहित्य पाठवण्याची इतकी सोय नसल्यामुळे मलाच कितीतरी किलो वजनाचं छापील साहित्य उचलावं लागायचं. मला रात्री डोकं टेकायला कुठेही जागा नसल्यामुळे मी गावातील कॉफीहाऊसमध्ये जायचो, शेवटचा गिऱ्‍हाईक जाईपर्यंत, बहुतेकदा तो मध्यरात्रीनंतरच जायचा, तोपर्यंत मी एखाद्या कोचवर झोपायचो आणि दुसऱ्‍या दिवशी कॉफीहाऊस सुरू होण्याआधीच म्हणजे पहाटेच उठायचो. आणि कोचवर किती त्या पिसवा म्हणून सांगू!

लोकांचा बहुतेकदा थंड प्रतिसाद असला तरी, माझ्या तरुणपणाची शक्‍ती मी यहोवासाठी खर्च करतोय याचा आनंद मला वाटायचा. बायबल सत्यात आस्था घेणारा कोणी मला भेटल्यावर, जीवन वाचवण्याचे काम करत राहण्याचा माझा दृढनिश्‍चय आणखी पक्का व्हायचा. शिवाय, माझ्या आध्यात्मिक बंधूभगिनींचा सहवास देखील मला सुखदायक वाटायचा. मी त्यांना २० ते ५० दिवसांच्या अंतराने, मी जिथं प्रचार करायचो तेथून इराकलियोन शहर किती लांब आहे यानुसार त्यांना भेटायचो.

मला अजूनही ती दुपार आठवते; इराकलियोनमधील माझ्या ख्रिस्ती बंधूभगिनींची संध्याकाळी सभा असेल असा विचार करून मला खूप एकटं वाटत होतं. मला त्यांना भेटण्याची इतकी तीव्र इच्छा झाली, की ते माझ्यापासून २५ पेक्षा जास्त किलोमीटर दूर होते तरी त्यांना भेटायला मी पायी निघालोच. मी आयुष्यात कधी इतका भराभरा चाललो नव्हतो. त्या संध्याकाळी मला त्यांचा तो गोड सहवास लाभला आणि मला किती हायसं वाटलं, माझा आध्यात्मिक तलाव जणू पुन्हा भरून आला!

माझ्या प्रचार कार्यातील परिश्रमी प्रयत्नांचे मला प्रतिफळ मिळू लागले. प्रेषितांच्या दिवसांप्रमाणे, ‘यहोवा, तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची आमच्यात भर घालीत’ गेला. (प्रेषितांची कृत्ये २:४७) क्रीटमधील यहोवाच्या उपासकांची संख्या वाढू लागली. इतर जण माझ्याबरोबर सेवेत येऊ लागल्यानंतर माझी एकटेपणाची भावना नाहीशी होऊ लागली. आम्ही तेव्हा खूप कष्ट व कडक विरोध सहन केला. आमच्या रोजच्या आहारात ब्रेड असायचा आणि त्याच्याबरोबर, अंडी, ऑलिव्ह किंवा भाजीपाला असायचा; आम्ही ज्या लोकांना प्रचार करायचो ते लोक साहित्य घ्यायचे आणि पैशाऐवजी या वस्तू द्यायचे.

क्रीटच्या आग्नेय भागातील इरापेट्रा गावात मिनोस कोकीनाकीस या कापड व्यापाऱ्‍याला मी प्रचार केला. त्यांच्याबरोबर बायबल अभ्यास चालू करायचा मी खूपदा प्रयत्न केला पण त्यांना त्यांच्या कामात वेळच मिळायचा नाही. परंतु, त्यांनी अभ्यास करायचं मनावर घेतलं तेव्हा आपल्या जीवनात आमूलाग्र बदल केले. ते सुवार्तेचे सर्वात आवेशी व सक्रिय उद्‌घोषकही बनले. हे बदल पाहून, कोकीनाकीस यांच्याकडे कामाला असलेला १८ वर्षीय इमॅन्युएल पतरकीस इतका प्रभावीत झाला, की त्याने पण बायबल साहित्य मागितले. हा युवक आध्यात्मिक प्रगती करून पुढे एक मिशनरी झालेला पाहून मला किती आनंद झाला!a

या सर्व वेळेदरम्यान, माझ्या गावातील मंडळीचा आकार वाढू लागला होता; तेथे १४ प्रचारक झाले होते. मी तो दिवस केव्हाही विसरणार नाही जेव्हा मला माझ्या बहिणीचं, डेस्पिनाचं पत्र आलं; त्यात, तिनं आणि आईबाबांनी सत्य स्वीकारून यहोवाचे उपासक बनल्याचं लिहिलं होतं!

छळ आणि हद्दपारी

ग्रीक कर्मठ चर्च आमचं प्रचारकार्य म्हणजे विनाश करणाऱ्‍या टोळांची धाड असं समजू लागल्यामुळे आमचा बिमोड करायचा त्यांनी जणू चंगच बांधला. सन १९३८ च्या मार्चमध्ये मला सरकारी अभियोक्‍त्‌यांसमोर आणण्यात आलं आणि त्यांनी मला लगेचच्या लगेच तो भाग सोडून जाण्यास सांगितलं. आमचं प्रचार कार्य खरं तर लोकांच्या फायद्याचं आहे व हे कार्य करायला आम्हाला एका सर्वोच्च अधिकाऱ्‍यानं, आपला राजा येशू ख्रिस्त यानं आज्ञा दिली होती, असं मी उत्तर दिलं.—मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:८.

दुसऱ्‍या दिवशी मला स्थानीय पोलिस चौकीत बोलावण्यात आलं. मी समाजाला धोका होतो; मला अमोरगोसच्या एजियन बेटावर एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलं आहे, असं तेथे मला सांगण्यात आलं. काही दिवसांनंतर मला हातात बेड्या घालून बोटीनं त्या बेटावर नेण्यात आलं. अमोरगोस येथे कोणीही यहोवाचा साक्षीदार नव्हता. पण सहा महिन्यांनंतर मला समजले, की आणखी एका साक्षीदाराला याच बेटावर पाठवण्यात आलं आहे! कोण असेल बरे तो? क्रीटमधील माझा बायबल विद्यार्थी, मिनोस कोकीनाकीस! मला आध्यात्मिक सोबती मिळाल्याचा आनंद होत होता! काही दिवसांनंतर मला त्याला अमोरगोसच्या पाण्यात बाप्तिस्मा देण्याचा सुहक्क मिळाला!b

क्रीटला आल्यावर मला परत लगेचच अटक करण्यात आली आणि ह्‍या वेळेस नियोपोलिसच्या बेटावरील गावात सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले. सहा महिन्यांच्या हद्दपारीनंतर मला पुन्हा अटक करून दहा दिवसांसाठी कोठडीत डांबण्यात आले आणि मग हद्दपार केलेल्या साम्यवाद्यांसाठी राखून ठेवलेल्या एका बेटावर चार महिन्यांसाठी पाठवण्यात आले. “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल,” हे प्रेषित पौलाचे शब्द किती खरे आहेत याचा मला प्रत्यय आला.—२ तीमथ्य ३:१२.

विरोध होऊनही वाढ

सन १९४०-४४ पर्यंत ग्रीसवर जर्मन लोकांचा कब्जा असल्यामुळे आमचं प्रचार कार्य जवळजवळ थांबलंच होतं. परंतु, ग्रीसमधील यहोवाचे लोक लगेच संघटित झाले आणि आम्ही पुन्हा नव्यानं आमचं प्रचार कार्य सुरू केलं. वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी आम्ही सक्रियपणे व अगदी आवेशाने राज्याच्या कार्यात पुढे गेलो.

आम्ही अपेक्षा केल्याप्रमाणे धार्मिक विरोधाने पुन्हा पेट घेतला. पुष्कळदा ग्रीक कर्मठ पाळक कायदा आपल्या हातात घ्यायचे. एका गावात एका पाळकानं लोकांना आमच्याविरुद्ध चिथावलं. स्वतः पाळक मला मारू लागला आणि त्याचा मुलगाही मागून मारत होता. मी जवळच्याच एका घरात शिरलो पण माझ्या बरोबर असलेल्या बांधवाला तर त्यांनी गावच्या चौकात नेलं आणि तिथं त्याला बेदम मारलं. लोकांनी त्याचं साहित्य फाडलं, आणि एक स्त्री तर तिच्या बाल्कनीतून “मारून टाका त्याला!” असं ओरडत राहिली. शेवटी, एक डॉक्टर आणि रस्त्यावरून चाललेल्या एका पोलिसानं आम्हाला वाचवलं.

सन १९५२ मध्ये मला पुन्हा अटक करण्यात आली व चार महिन्यांसाठी क्रीटच्या कास्टेली किसमोस येथे हद्दपार करण्यात आलं. त्यानंतर लगेचच मला मंडळ्यांना भेट देऊन आध्यात्मिकरीत्या त्यांना मजबूत करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अशाप्रकारचे प्रवासी कार्य दोन वर्ष केल्यानंतर मी डेस्पिनाबरोबर विवाह केला; माझ्या बहिणीचं पण हेच नाव होतं. तेव्हापासून आजपर्यंत माझी पत्नी देखील यहोवाची एक निष्ठावान उपासक ठरली आहे. आमच्या लग्नानंतर मला हानियाच्या गावात खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं; अजूनही मी इथेच आहे.

माझ्या जवळजवळ ७० वर्षांच्या पूर्ण वेळेच्या सेवेदरम्यान मी, ८,३०० चौरस किलोमीटरचे व २५० किलोमीटर लांबी असलेल्या क्रीटच्या बहुतेक भागात प्रचार केला आहे. १९३० च्या दशकामध्ये या बेटावर मुठभर साक्षीदार होते पण आज तेथे १,१०० पेक्षा अधिक साक्षीदार पाहून मला सर्वात जास्त आनंद होतो. यांतील बहुतेकांना बायबलमधील अचूक ज्ञान आणि भवितव्यातील अद्‌भुत आशा प्राप्त करण्यास मदत करण्यासाठी माझा उपयोग करून घेतल्याबद्दल मी यहोवाचे आभार मानतो.

“सोडविणारा” यहोवा

खऱ्‍या देवाला लोकांनी ओळखावे म्हणून त्यांना मदत करताना सहनशीलता आणि धीर यांची गरज लागते हे मी अनुभवावरून शिकलो आहे. यहोवा हे गुण अगदी विपुल प्रमाणात देतो. माझ्या ६७ वर्षांच्या पूर्ण वेळेच्या सेवेदरम्यान मी पुनःपुनः प्रेषित पौलाच्या या शब्दांवर मनन केले आहे: “सर्व गोष्टीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो; फार धीराने, संकटात, विपत्तीत, पेचप्रसंगात, फटके खाण्यात, बंदिवासात दंग्याधोप्यात, काबाडकष्टात, जागरणात, उपवासात.” (२ करिंथकर ६:४, ५) मी सेवा सुरू केली तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती अगदीच बिकट होती. परंतु यहोवाने मला आणि माझ्या कुटुंबाला कधीच त्यागलं नाही. तो निरंतर आणि शक्‍तिशाली मदतनीस ठरला आहे. (इब्री लोकांस १३:५, ६) आम्ही नेहमी, त्याची मेंढरे गोळा करण्यात आणि आमच्या गरजा पूर्ण करण्यात त्याचे प्रेमळ साहाय्य अनुभवले आहे.

मी मागील गोष्टींचा विचार करतो तेव्हा, एका आध्यात्मिक अर्थाने मरूभूमि फुलली आहे व माझे श्रम वाया गेले नाहीत याची मला खात्री आहे. मी माझ्या तरुणपणाच्या शक्‍तीचा सदुपयोग केला होता. पूर्ण वेळेच्या सेवेतील माझे जीवनध्येय इतर कामांपेक्षा अधिक अर्थपूर्ण झाले आहे. माझं आता वय झालं आहे; ‘आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मरण्याचे’ उत्तेजन मी तरुणांना पूर्ण मनाने देऊ शकतो.—उपदेशक १२:१.

मी ९१ वर्षांचा असलो तरी, दर महिन्याला १२० पेक्षा अधिक तास प्रचार कार्यात खर्च करू शकतो. मी दररोज सकाळी ७.३० वाजता उठतो आणि रस्त्यावर, दुकानांत किंवा बागेत असलेल्या लोकांना साक्ष देतो. दर महिन्याला मी सरासरी १५० मासिकांचे वाटप करतो. माझी दृष्टी कमजोर झाली आहे आणि मला ऐकू कमी येतं तरी माझे प्रेमळ बंधूभगिनी—माझे मोठे आध्यात्मिक कुटुंब—आणि माझ्या दोन मुलींचा परिवार मला खूप मदत करतात.

या सर्वांपेक्षा यहोवावर भरवसा ठेवण्यास मी शिकलो आहे. आजपर्यंत तो मला “माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा,” ठरला आहे.—स्तोत्र १८:२.

[तळटीपा]

a इमॅन्यूएल पतराकीस यांची जीवनकथा, टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, १९९६, पृष्ठे २२-७ वर आहे.

b मिनोस कोकीनाकीसने त्याच्यावरील खटला जिंकला त्याची माहिती टेहळणी बुरूज (इंग्रजी) सप्टेंबर १, १९९३, पृष्ठे २७-३१ मध्ये आहे. १९९९ च्या जानेवारीमध्ये मिनोस कोकीनाकीस यांचे निधन झाले.

[२६, २७ पानांवरील चित्रं]

खाली: माझ्या पत्नीबरोबर; डावीकडे: १९२७ साली; समोरच्या पानावर: १९३९ मध्ये, तुरुंगातून सुटून आल्यावर लगेच ॲक्रोपोलीस येथे मिनोस कोकीनाकिस (डावीकडे) व आणखी एका साक्षीदाराबरोबर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा