जीवनात यशस्वी व्हा!
“जो पुरुष दुष्टांच्या मसलतीने चालला नाही . . . तो आनंदी आहे . . . जे काही तो हाती घेतो त्यात त्याला यश मिळेल.”—स्तोत्र १:१, ३, NW
१. (अ) जगातल्या बऱ्याच तरुणांच्या मते यश म्हणजे काय? (ब) जीवनात यशस्वी होणाऱ्या व्यक्तीचे बायबलमध्ये कसे वर्णन केले आहे?
तुमच्या मते यश म्हणजे काय? एका तरुणाने उत्तर दिले, “मला माझ्या बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचं आहे, हेच माझ्या जीवनाचं एकमेव ध्येय आहे.” एक तरुणी म्हणते: “माझा संसार सुखी व्हावा एवढंच, बाकी मला काही नको.” पण दुसरी एक तरुणी म्हणते: “कबूल करते, मी स्वार्थी आहे, पण माझं एकच स्वप्न आहे, आलिशान फ्लॅट, सुंदरशी कार . . .” पण वास्तविक पाहता, खरे यश हे माणसाजवळ असलेल्या पैशाने मोजता येत नाही, न त्याच्या कौटुंबिक जीवनाने आणि न त्याच्या यशस्वी करियरने. स्तोत्र १:१-३ यात असे म्हटले आहे: “जो पुरुष दुष्टांच्या मसलतीने चालला नाही . . . तो आनंदी आहे. . . . तो तर यहोवाच्या नियमशास्त्रात रमतो. . . . जे काही तो हाती घेतो त्यात त्याला यश मिळेल.”
२. खरे यश कोठे मिळू शकते आणि ते मिळवण्याचा एकमेव मार्ग कोणता?
२ त्याअर्थी बायबल एका अशा गोष्टीचे आश्वासन देते जी कोणताही मनुष्य देऊ शकत नाही—खरे यश! पण हे आर्थिक नफ्याच्या संदर्भात सांगितलेले नाही. उलट बायबल अशी ताकीद देते: “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे.” (१ तीमथ्य ६:१०) खरे यश हे देवाला संतुष्ट केल्याने—तसेच, त्याच्या नियमशास्त्रानुसार वागल्याने मिळते. खरे समाधान आणि निर्भेळ आनंद मिळवण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही! कदाचित काही लोकांना यहोवाच्या नियमशास्त्राच्या अधीन राहण्याची, त्याने जसे सांगितले आहे तसे वागण्याची कल्पना नकोशी वाटेल. पण, येशूने सांगितल्याप्रमाणे: “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे आनंदी आहेत.” (मत्तय ५:३, NW) तुम्हाला जाणीव असो अथवा नसो—माणसाच्या काही उपजत आध्यात्मिक गरजा असतात—उदाहरणार्थ, देवाला जाणून घेण्याची, त्याचे उद्देश जाणून घेण्याची एक स्वाभाविक इच्छा मनात कोठेतरी लपलेली असते. जर या गरजा तुम्ही तृप्त केल्या आणि ‘परमेश्वराचे नियमशास्त्र’ पाळले, तरच तुम्हाला जीवनात निर्भेळ आनंद अनुभवता येईल.
आपल्याला देवाच्या नियमांची गरज आहे
३. ‘पावले नीट टाकण्याकरता’ यहोवाचे मार्गदर्शन आपण आनंदाने का स्वीकारावे?
३ संदेष्टा यिर्मयाने असे लिहिले: “हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) हे प्रत्येक मनुष्याच्या बाबतीत खरे आहे, तो तरुण असो वा वयस्क. पावले नीट टाकण्यासाठी लागणारी पुरेशी बुद्धी, अनुभव आणि ज्ञान आपल्याजवळ नसते, किंबहुना स्वतःला मार्गदर्शित करण्याचा आपल्याला हक्कच नाही. प्रकटीकरण ४:११ येथे बायबल म्हणते: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” यहोवा हा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे “जीवनाचा झरा [त्याच्याजवळ] आहे.” (स्तोत्र ३६:९) आणि त्याअर्थी, आपण आपल्या जीवनाचा कसा उपयोग करावा हे इतर कोणापेक्षा तोच चांगल्याप्रकारे सांगू शकतो. त्याने जे नियम घालून दिले आहेत, ते आपला आनंद हिरावून घेण्यासाठी नव्हे, तर आपल्या हितासाठीच आहेत. (यशया ४८:१७) देवाच्या नियमांकडे दुर्लक्ष केले की मनुष्य आपोआपच अपयशाच्या मार्गाला लागतो.
४. अनेक तरुण आपल्या जीवनाचा सर्वनाश का करून घेतात?
४ उदाहरणार्थ, तुम्ही कधी याचा विचार केला आहे का, की असंख्य तरुण अंमली पदार्थ, व्यभिचार आणि अशा इतर वाईट गोष्टींच्या मागे लागून आपल्या जीवनाचा सर्वनाश का करून घेतात? स्तोत्र ३६:१, २ यात याचा खुलासा केला आहे: “दुर्जनाच्या मनातून अधर्माचा ध्वनि निघत असतो; त्याच्या दृष्टीपुढे देवाचे भय नाही. आपले पाप उघडकीस येणार नाही, त्याचा कोणी तिटकारा करणार नाही, अशी तो आपल्या मनाची समजूत करून घेतो.” सकारात्मक प्रकारचे “देवाचे भय” वाटत नसल्यामुळे अनेक तरुण स्वतःची अशी समजूत करून घेतात की आपल्या अनैतिक वर्तनाचा काही दुष्परिणाम होणार नाही. पण शेवटी मात्र त्यांना या त्रिकालाबाधित सत्याची प्रचिती येतेच: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.”—गलतीकर ६:७, ८.
‘दिवस गणणे’
५, ६. (अ) तरुणांनी आपले ‘दिवस का गणावेत’ आणि ‘दिवस गणणे’ म्हणजे काय? (ब) ‘आपल्या निर्माणकर्त्याच्या स्मरण्याचा’ काय अर्थ होतो?
५ तुम्ही आपल्या जीवनात यशस्वी होऊन “सार्वकालिक जीवन हे पीक” कसे मिळवू शकता? मोशेने लिहिले: ‘आमचे आयुष्य सत्तर वर्षे—आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.’ (स्तोत्र ९०:१०) मृत्यूचा विचार कदाचित तुमच्या मनात क्वचितच येत असेल. किंबहुना, काही तरुण तर असे वागतात जणू त्यांना मृत्यू येऊच शकत नाही. पण मोशे एक निर्मम सत्य आपल्या डोळ्यापुढे आणतो आणि ते असे की जीवन हे केवळ दोन दिवसांचे आहे. ७० किंवा ८० वर्षांपर्यंतही आपण जगू की नाही याची शाश्वती नाही. जे तरुण आणि निरोगी आहेत अशांवरही कधी कोणता “समय व प्रसंग” येईल आणि त्यांचे जीवन अकालीच संपुष्टात येईल हे सांगता येत नाही. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) असे असताना, तुम्ही तुमच्या बहुमूल्य आयुष्याचा कसा उपयोग कराल? मोशेने देवाला विनंती केली: “आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकीव की, आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त होईल.”—स्तोत्र ९०:१२.
६ दिवस गणणे म्हणजे काय? आपण किती दिवस जगू याचाच विचार करत बसणे असा याचा अर्थ नाही. मोशे यहोवाला अशी प्रार्थना करत होता, की त्याने आपल्या लोकांना त्यांच्या उरलेल्या आयुष्याचा अशाप्रकारे उपयोग करण्यास शिकवावे, जेणेकरून त्याच्या नावाला गौरव मिळेल. तुम्ही पण आपल्या आयुष्याचे दिवस गणता का—म्हणजे प्रत्येक दिवस बहुमूल्य आहे आणि देवाला गौरव आणण्याकरता त्याचा उपयोग होऊ शकतो असे तुम्ही समजता का? बायबल तरुणांना असे प्रोत्साहन देते: “आपल्या मनांतून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत. आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.” (उपदेशक ११:१०-१२:१) निर्माणकर्ता कोठेतरी अस्तित्वात आहे याचे आपल्याला विस्मरण होत नाही, म्हणजे आपण त्याला स्मरतो असे नाही. येशूच्या बाजूला ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या अपराध्याने त्याला कळकळीने विनंती केली, की “आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” येशूने केवळ आपल्या नावाची आठवण ठेवावी असे तो म्हणत नव्हता. येशूने त्याला पुनरुत्थित करावे अशी तो विनंती करत होता! (लूक २३:४२; पडताळा उत्पत्ति ४०:१४, २३; ईयोब १४:१३.) त्याचप्रमाणे यहोवाला स्मरणे म्हणजे त्याला संतोषविणारे कार्य करणे. तुम्ही यहोवाला या अर्थाने स्मरत आहात का?
दुष्कर्म्यांचा हेवा करू नका
७. काही तरुण जाणूनबुजून आपल्या निर्माणकर्त्याला का विसरतात? उदाहरण द्या.
७ अनेक तरुण जाणूनबुजून यहोवाला विसरतात कारण यहोवाचे साक्षीदार होऊन जीवन जगणे म्हणजे अतिशय बंधनकारक, असा त्यांचा समज असतो. आपल्याला तरुणपणी कसे वाटायचे याविषयी स्पेनच्या एका बांधवाने सांगितले: “मला जगाचं आकर्षण वाटू लागलं, कारण सत्यात राहणं मला महाकठीण वाटायचं, किती कडक हे नियम असं मला सारखं वाटायचं. तास न् तास बसा, अभ्यास करा, सभांना जा, टाय लावा, या सर्वांचा अगदी कंटाळा यायचा.” देवाची सेवा केल्यामुळे जीवनातील सगळी मजाच नाहीशी झाल्याचं तुम्हालाही कधीकधी वाटते का? बायबलच्या एका लेखकाला अगदी असेच वाटले होते, असे म्हटल्यावर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपले बायबल उघडून ७३ वे स्तोत्र वाचा.
८. आसाफाला ‘गर्विष्ठांचा हेवा’ का वाटला?
८ या स्तोत्राचा आपण थोडा बारकाईने अभ्यास करू. २ आणि ३ या वचनांत असे म्हटले आहे: “माझ्याविषयी म्हणाल तर माझे पाय लटपटण्याच्या लागास आले होते; माझी पावले बहुतेक घसरणार होती. कारण दुर्जनांचा उत्कर्ष पाहून मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो.” या स्तोत्राच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे हे आसाफने लिहिलेले स्तोत्र आहे. तो लेवी वंशाचा एक संगीतवादक होता आणि राजा दावीदाचा समकालीन होता. (१ इतिहास २५:१, २; २ इतिहास २९:३०) देवाच्या मंदिरात सेवा करण्याची बहुमोल सुसंधी मिळालेली असूनही तो अधर्माची बढाई मारणाऱ्या दुष्टांचा ‘हेवा करू लागला.’ कारण त्यांचा उत्कर्ष होत होता; ते अगदी शांतिसुखाने राहात होते. किंबहुना, ‘त्यांच्या मनात उचंबळणाऱ्या कल्पनांपेक्षाही’ त्यांना अधिक यश मिळत आहे असे भासत होते. (वचन ५, ७) आपल्या पराक्रमांविषयी ते “मोठ्या डौलाने,” म्हणजे अतिशय मगरूरपणे बोलायचे. (वचन ८) ‘ते आपले तोंड आकाशापर्यंत पोंचवित होते, त्यांची जीभ जगभर मिरवित होते,’—अर्थात आकाशातल्या किंवा पृथ्वीवर असणाऱ्या कोणाचीही त्यांना पर्वा नव्हती.—वचन ९.
९. आज काही ख्रिस्ती तरुणांना आसाफासारखे कसे वाटू शकते?
९ शाळाकॉलेजांत तुमच्याबरोबर शिकणाऱ्या मुलांच्या बाबतीतही कदाचित हेच म्हणता येईल. कदाचित ते तुमच्यासमोर आपल्या लैंगिक जीवनाबद्दल, बेफाम पार्ट्यांबद्दल किंवा दारू, ड्रग्स इत्यादी घेण्याच्या आपल्या सवयींबद्दल अगदी निर्लज्जपणे फुशारकी मारत असतील. ख्रिस्ती या नात्याने तुम्हाला ज्या अरुंद मार्गाने चालावे लागत आहे, त्याची तुलना त्यांच्या ऐषआरामाच्या जीवनाशी केल्यावर कदाचित तुम्हालाही कधीकधी त्या “गर्विष्ठांचा हेवा” वाटत असेल. (मत्तय ७:१३, १४) आसाफावर तर एक वेळ अशी आली की तो म्हणाला: “मी आपले मन स्वच्छ राखिले, आपले हात निर्दोषतेने धुतले, खचित हे सगळे व्यर्थ; कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे.” (वचन १३, १४) होय, देवाची सेवा करण्यात, सरळ मार्गाने चालण्यात खरच काही अर्थ आहे का अशी शंका त्याच्या मनात आली.
१०, ११. (अ) आसाफाचा दृष्टिकोन कसा बदलला? (ब) दुष्कर्मी “निसरड्या जागांवर” कशाप्रकारे उभे आहेत? एखादे उदाहरण देऊन सांगा.
१० अर्थात आसाफ फार काळ असेच दुःख करीत बसला नाही. लवकरच त्याला याची जाणीव झाली की दुष्कर्म्यांची वरवर भासणारी शांती ही खरे तर भ्रमिक—आणि अगदी क्षणिक असते! म्हणूनच आसाफाने असे म्हटले: “खचित तू त्यांना निसरड्या जागांवर उभे करितोस, त्यांना पाडून त्यांचा नाश करितोस. एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे! भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत.” (वचन १८, १९) तुमच्या समवयस्क सोबत्यांपैकी अनेक, अशाच “निसरड्या जागांवर उभे” आहेत. आज न उद्या त्यांना आपल्या अधार्मिक वर्तनाचे फळ भोगावे लागेल; नको असलेले गरोदरपण, लैंगिक संक्रमणाने झालेला एखादा रोग, कधीकधी तर तुरुंगवास किंवा मृत्यूदेखील! सर्वात वाईट म्हणजे, ते देवापासून दुरावले जातील.—याकोब ४:४.
११ स्पेनमध्ये राहणाऱ्या एका तरुण बहिणीला स्वतःच्या अनुभवावरून या सत्याची प्रचिती आली. तरुणपणी, तिची अतिशय अधार्मिक वृत्तीच्या मुलामुलींशी मैत्री झाली आणि ही मैत्री वाढतच गेली. आत एक आणि बाहेर एक, असे ढोंगी जीवन ती जगू लागली. काही दिवसांतच, ती याच मुलांपैकी एकाच्या प्रेमात पडली—तो अंमली पदार्थांचा व्यसनी होता. तिने स्वतः कधी अंमली पदार्थ घेतले नाहीत, पण ती त्याच्यासाठी अंमली पदार्थ विकत आणायची. ती कबूल करते, की “मी त्याला शिरेत सुई टोचायलाही मदत करायचे.” आनंदाची गोष्ट म्हणजे या बहिणीला मदत करण्यात आली, तिचे डोळे उघडले आणि तिची आध्यात्मिक स्थिती सावरली. काही काळानंतर तिला एक धक्कादायक बातमी कळली—तिचा व्यसनी मित्र एड्सने मरण पावला होता. स्तोत्रकर्त्याने जे लिहिले ते अगदी खरे आहे, अधार्मिक लोक “निसरड्या जागांवर उभे” आहेत. त्यांपैकी काही जणांना कदाचित त्यांच्या स्वैराचारी जीवनशैलीमुळे अकाली मृत्यू येईल. आणि जे बाकीचे आहेत, ते जर वेळीच सरळ मार्गावर आले नाहीत तर जेव्हा “[प्रभू येशू] आपल्या सामर्थ्यवान दूतासह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल, . . . जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील,” तेव्हा त्यांना त्याला तोंड द्यावे लागेल.—२ थेस्सलनीकाकर १:७, ८.
१२. दुष्कर्म्यांचा हेवा करणे निव्वळ मूर्खपणाचे आहे हे जपानच्या एका तरुणाला कसे कळून आले?
१२ मग, “जे देवाला ओळखत नाहीत” अशांचा हेवा करणे निव्वळ मूर्खपणाचे नाही का? खरे तर जे यहोवाला ओळखतात आणि ज्यांच्याजवळ सार्वकालिक जीवनाची आशा आहे त्यांचा हेवा केला पाहिजे. जपानच्या एका तरुण बांधवाला या गोष्टीची जाणीव झाली. तो सांगतो: “मला असं वाटायचं की माझ्या जीवनात काही मौजच नाही. मग मी विचार केला, की मला सत्याचं ज्ञान नसतं तर माझं जीवन कसं असतं? मला जाणीव झाली की मी जास्तीतजास्त ७० किंवा ८० वर्षे जगून मेलो असतो. पण यहोवाने तर आपल्याला सार्वकालिक जीवनाची आशा दिली आहे! आपल्याजवळ जे आहे ते किती बहुमोल आहे याची मला तेव्हा जाणीव झाली.” हे सर्व खरे असले तरीसुद्धा, देवाच्या नियमांना न जुमानणाऱ्या लोकांमध्ये राहताना आपला विश्वासूपणा टिकवून ठेवणे निश्चितच सोपे नाही. मग तुमच्यावर येणाऱ्या दबावांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही कोणत्या काही गोष्टी करू शकता?
मैत्री करताना सांभाळा!
१३, १४. मित्रमैत्रिणी विचारपूर्वक निवडणे इतके महत्त्वाचे का आहे?
१३ जीवनात यशस्वी होणाऱ्या मनुष्याचे स्तोत्र १:१-३ येथे दिलेले वर्णन पुन्हा एकदा पाहूया: “जो पुरुष दुष्टांच्या मसलतीने चालला नाही, पापी जनांच्या मार्गांत उभा राहिला नाही, आणि निंदकांच्या बैठकीत बसला नाही, तो आनंदी आहे. तो तर यहोवाच्या नियमशास्त्रात रमतो, आणि खालच्या आवाजात त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस वाचन करतो. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो होईल, आणि जे काही तो हाती घेतो त्यात त्याला यश मिळेल.”
१४ सर्वप्रथम, तुम्ही कोणाशी संगती करता हे अतिशय महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या. नीतिसूत्रे १३:२० म्हणते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” याचा अर्थ, जे यहोवाचे साक्षीदार नाहीत अशा तरुणांशी तुम्ही अगदी तुटकपणे वागावे किंवा त्यांना अपमानास्पद वागणूक द्यावी, असे नाही. बायबल आपल्याला आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा आणि “सर्व माणसांबरोबर . . . शांतीने राहा” असे सांगते. (रोमकर १२:१८; मत्तय २२:३९) पण, जे बायबलच्या नियमांनुसार वागत नाहीत अशा लोकांसोबत खूप जवळचे संबंध ठेवल्यास हळूहळू तुम्हीही त्यांच्या “मसलतीने” चालू लागाल.
बायबल वाचनामुळे होणारे फायदे
१५. बायबल वाचण्याची इच्छा तरुण कशाप्रकारे विकसित करू शकतात?
१५ स्तोत्रकर्त्याने असेही सांगितले की जीवनात यशस्वी होणारा मनुष्य परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे ‘खालच्या आवाजात रात्रंदिवस वाचन करतो.’ (स्तोत्र १:१, २) बायबल वाचणे हे गोष्टीचे पुस्तक वाचण्यासारखे नाही, आणि “त्यात समजावयास कठीण अशा काही गोष्टी आहेत” हे कबूल आहे. (२ पेत्र ३:१६) पण म्हणून त्याला कंटाळवाणे समजून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करावे असे नाही. तुम्ही देवाच्या वचनातील “निऱ्या दुधाची इच्छा” विकसित करू शकता. (१ पेत्र २:२, ३) सुरवातीला दररोज थोडासाच भाग वाचून पाहा. काही मुद्दे समजले नाहीत, तर त्यांवर संशोधन करा. यानंतर आपण काय वाचले यावर विचार करा. (स्तोत्र ७७:११, १२) लक्ष एकाग्र करणे तुम्हाला कठीण जात असल्यास मनात वाचण्याऐवजी, “खालच्या आवाजात” वाचून पाहा. हळूहळू तुम्हाला बायबल वाचायला नक्कीच आवडू लागेल. ब्राझीलची एक तरुण बहीण सांगते: “यहोवा माझ्यापासून खूप दूर आहे असे मला वाटायचे. पण मागच्या काही महिन्यांपासून मी आणखी चांगल्याप्रकारे वैयक्तिक अभ्यास आणि बायबलचे वाचन करू लागले. आता माझा यहोवासोबतचा नातेसंबंध खूप पक्का झाला आहे असे मला जाणवू लागले आहे. तो मला पूर्वीपेक्षा अधिकच वास्तविक वाटू लागला आहे.”
१६. मंडळीच्या सभांपासून आपण अधिक लाभ कसा मिळवू शकतो?
१६ आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करण्यासाठी मंडळीच्या सभांना उपस्थित राहणेही अतिशय महत्त्वाचे आहे. सभांमध्ये ‘तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहिल्यास’ तुम्हाला त्यांतून बरेच प्रोत्साहन मिळू शकते. (लूक ८:१८) तुम्हाला कधीकधी सभांमध्ये कंटाळा येतो का? असल्यास, स्वतःला विचारून पाहा की ‘सभा कंटाळवाण्या वाटू नयेत म्हणून मी काय करतो? मी पूर्ण लक्ष देतो का? मी तयारी करून जातो का? उत्तरं देतो का?’ बायबल आपल्याला सांगते की आपण “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष [द्यावे.] . . . एकमेकांस बोध करावा.” (इब्री लोकांस १०:२४, २५) असे करायचे असेल, तर तुम्ही सभांमध्ये सहभाग घेतला पाहिजे! अर्थात, सहभाग घेण्यासाठी तुम्हाला आधीपासूनच तयारी करून यावे लागेल. एक तरुण बहीण कबूल करते, की “तयारी केलेली असते, तेव्हा सभांमध्ये उत्तरं देणं खरंच सोपं जातं.”
देवाच्या मार्गाने चालणे हेच यशाचे रहस्य
१७. मन लावून बायबल वाचणारा, कशाप्रकारे ‘पाण्याच्या प्रवाहांजवळ लावलेल्या झाडासारखा’ असतो?
१७ जीवनात यशस्वी होणाऱ्या मनुष्याचे पुढे वर्णन करताना स्तोत्रकर्ता त्याची तुलना ‘पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडाशी’ करतो. पाण्याचे प्रवाह हे फळांच्या बागांमध्ये झाडांना पाणी मिळण्यासाठी केलेल्या पाटांच्या संदर्भात म्हटले असावे. (यशया ४४:४) दररोज बायबल वाचल्यामुळे तुम्ही जणू अशाच एका जलाशयाच्या अगदी जवळ असाल; त्यातून सतत पोषण मिळाल्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही अगदी ताजेतवाने राहाल. (यिर्मया १७:८) तुमच्यासमोर येणाऱ्या परीक्षांना आणि अडचणींना तोंड देण्यासाठी तुम्हाला दररोज नव्याने ताकद मिळेल. यहोवाची विचारसरणी आत्मसात केल्यामुळे योग्य निर्णय घेण्याची सुबुद्धी तुमच्याजवळ असेल.
१८. यहोवाची सेवा करताना तरुण आपल्या यशाची खात्री कशाप्रकारे करून घेऊ शकतात?
१८ कधीकधी, यहोवाची सेवा करताना तुम्हाला कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. पण या समस्या आपल्या अवाक्याबाहेर आहेत असे कधीही समजू नका. (अनुवाद ३०:११) बायबल आश्वासन देते की जोपर्यंत यहोवाला संतोषविणे आणि त्याचे हृदय आनंदित करणे हा तुमचा मुख्य उद्देश आहे तोपर्यंत ‘तुम्ही जे काही हाती घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल.’ (नीतिसूत्रे २७:११) शिवाय तुम्ही एकटे नाहीत हेही आठवणीत असू द्या. यहोवा आणि येशू ख्रिस्त तुमच्या पाठीशी आहेत. (मत्तय २८:२०; इब्री लोकांस १३:५) तुमच्यावर येणाऱ्या दबावांची त्यांना जाणीव आहे आणि ते तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाहीत. (स्तोत्र ५५:२२) तसेच एक मोठा ‘बंधुवर्गही’ तुमच्या पाठीशी आहे, आणि तुमचे आईवडील देवाचे उपासक असतील तर अर्थातच ते देखील. (१ पेत्र २:१७) या सर्वांचा पाठिंबा आणि त्यासोबत तुमच्या स्वतःचा निर्धार आणि प्रयत्न यांमुळे तुम्ही केवळ आजच नव्हे तर सर्वकाळ एक यशस्वी जीवन जगू शकता!
उजळणीचे प्रश्न
◻ खरे यश म्हणजे काय?
◻ पावले नीट टाकण्यासाठी आपल्याला यहोवाच्या मार्गदर्शनाची का गरज आहे?
◻ तरुण कशाप्रकारे आपले ‘दिवस गणू’ शकतात?
◻ दुष्कर्म्यांचा हेवा करणे निव्वळ मूर्खपणाचे का आहे?
◻ दररोज बायबल वाचल्यामुळे आणि सभांना नियमित उपस्थित राहिल्यामुळे तरुणांना यशस्वी जीवन जगण्यासाठी कशी मदत होऊ शकते?
[२० पानांवरील चित्र]
सकारात्मक प्रकारचे ‘देवाचे भय’ नसल्यामुळे बरेच तरुण विनाशकारी कृत्ये करतात
[२२ पानांवरील चित्र]
बऱ्याचदा तरुण आपल्या कृत्यांच्या परिणामांचा विचारच करत नाहीत
[२३ पानांवरील चित्र]
बायबल वाचनाची आवड विकसित करा
[२३ पानांवरील चित्र]
सभांमध्ये सहभाग घेतल्यास त्या तुम्हाला कधीही कंटाळवाण्या वाटणार नाहीत