तुमच्या विचारसरणीला कोण आकार देतो?
“मी काय विचार करावा हे मला कोणी सांगायला नको! मी काय करायचं हेही सांगण्याची कोणाला गरज नाही!” तुम्ही जेव्हा असे ठासून म्हणता तेव्हा त्याचा असा अर्थ होतो, की तुम्हालाही स्वतःवर आणि स्वतःच्या निर्णयशक्तीवर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला असेच वाटते का? हे खरे आहे, की इतर कोणीही तुमच्याकरता निर्णय घेता कामा नये. पण, कधीकधी दिलेला सल्ला उपयोगीही पडू शकतो; पण असा सल्ला लागलीच धुडकावून लावणे शहाणपणाचे ठरेल का? योग्य निर्णय घेण्याकरता तुम्हाला कोणीच मदत करू शकत नाही का? तुमच्या नकळत कोणीतरी तुमच्या विचारसरणीला आकार देत नाही ना या गोष्टीची तुम्ही पूर्ण खात्री बाळगू शकता का?
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या आधी हिटलरच्या योझेफ गोबल्स या प्रसारमाध्यमाच्या मंत्र्याने जर्मनीचा चित्रपट उद्योग आपल्या ताब्यात घेतला. का? कारण त्याने हे ओळखले, की चित्रपट म्हणजे त्याच्या हातात असलेल्या एका अत्यंत शक्तिशाली शस्त्रासारखे असून त्या माध्यमाद्वारे त्याला “लोकांच्या विश्वासांवर आणि पर्यायाने त्यांच्या वर्तनावर प्रभाव” पाडणे शक्य होते. (मतप्रसार आणि जर्मन सिनेमा १९३३-१९४५) सामान्य, सुजाण लोकांना कह्यात ठेवून नात्सी तत्त्वज्ञानाचे आंधळेपणाने अनुकरण करण्याकरता त्याने या प्रसार माध्यमांचा आणि पद्धतीचा जो अत्यंत परिणामकारक उपयोग केला त्याविषयी तुम्हाला कदाचित माहीत असेल.
वास्तविकता ही आहे, की तुमचे विचार आणि पर्यायाने तुमच्या कृती यांवर कोणत्या न कोणत्या प्रकारे, तुम्ही ज्यांचे ऐकता त्यांच्या भावनांचा आणि दृष्टिकोनांचा प्रभाव हा पडतोच. अर्थात, हे नेहमीच वाईट असते असे नाही. तुमचे हितचिंतक—जसे, की शिक्षक, मित्र किंवा पालक—असल्यास त्यांचा सल्ला आणि त्यांची मसलत यांपासून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. पण सल्ला देणारे लोकच स्वार्थी आणि स्वतःच भरकटलेले असल्यास, किंवा त्यांची विचारसरणी भ्रष्ट असल्यास, म्हणजे पौलाच्या शब्दांत ते “मनाची फसवणूक करणारे” असतील तर अशा लोकांपासून सावध राहिलेलेच बरे!—तीत १:१०, NW; अनुवाद १३:६-८.
अर्थात, आपल्यावर कोणी प्रभाव पाडूच शकत नाही अशी खात्री बाळगून निर्धास्त राहू नका. (पडताळा १ करिंथकर १०:१२.) कदाचित तुमच्या नकळत हे आधीपासूनच आणि वारंवार घडतही असेल—तुम्ही मानायला तयार नसलात तरीसुद्धा. साधेच उदाहरण घ्या. तुम्हाला बाजारातून एखादी वस्तू विकत आणायची आहे. मग तो निर्णय पूर्णपणे तुमच्या व्यक्तिगत मतावर आधारलेला, डोळसपणे घेतलेला निर्णय असतो का? की मग, इतर लोक तुमच्या निर्णयावर नकळत आणि जणू पडद्यामागे राहून प्रभाव पाडतात का? अन्वेषण पत्रकार एरिक क्लार्क यांना तसे वाटते. ते म्हणतात: “जाहिरातींचा आपल्यावर जितका जास्त भडिमार होतो, तितकेच आपण त्यांकडे दुर्लक्ष करू लागतो, पण तरीही आपल्यावर त्यांचा तितकाच जास्त परिणाम होत असतो हेही निश्चित.” जाहिरातबाजीच्या परिणामकारकतेबद्दल लोकांना त्यांचे मत विचारण्यात येते तेव्हा “ती अत्यंत परिणामकारक असल्याचे बरेचजण कबूल करतात, पण आपल्यावर मात्र तिचा काही प्रभाव पडत नाही,” असे ते म्हणतात. लोक असा विचार करतात, की एक त्यांना स्वतःला सोडले तर जाहिरातबाजीला प्रत्येक जण बळी पडतो. “जाहिरातींच्या प्रभावाचा प्रतिकार करण्याची शक्ती जणू त्यांच्याचजवळ आहे.”—द वॉन्ट मेकर्स.
सैतानाच्या साच्यात कोंबले जाणे
दररोजच्या जाहिरातबाजीमुळे प्रभावित झाले काय आणि न झाले काय त्याचा इतका गंभीर परिणाम होणार नाही. पण, त्याहीपेक्षा भयंकर असणारा एक प्रभाव अस्तित्वात आहे. बायबल स्पष्टपणे दाखवते, की सैतान हा कह्यात ठेवण्यात पटाईत आहे. (प्रकटीकरण १२:९) त्याचे तत्त्वज्ञान खरे तर जाहिरातबाजी करणाऱ्या एका एजंटप्रमाणेच आहे; या एजंटच्या मते ग्राहकांना प्रभावित करण्याचे दोन मार्ग आहेत—“एकतर त्यांना मोहात पाडायचे किंवा त्यांचे मन वळवायचे.” मतप्रसारक आणि जाहिरातबाजी करणारे आपल्या विचारसरणीत बदल करण्याकरता इतक्या धूर्त पद्धतींचा उपयोग करू शकतात, तर मग सैतान अशा प्रकारच्या कितीतरी पद्धतींचा उपयोग करण्यात आणखी किती तरबेज असेल!—योहान ८:४४.
प्रेषित पौलाला हे माहीत होते. त्याला या गोष्टीची भीती वाटत होती, की त्याचे सहख्रिश्चन बेसावध होऊन सैतानाच्या फसवणुकीला बळी पडतील. त्याने लिहिले: “तरी जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.” (२ करिंथकर ११:३) ह्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहा. नाहीतर तुम्ही देखील अशा लोकांपैकी व्हाल ज्यांना वाटते, की मतप्रसाराचा आणि अवलंबीकरणाचा परिणाम होतो—“पण आमच्यावर नाही.” खरे तर, सैतानी मतप्रसाराचा परिणाम निश्चितच होतो हे आपल्या सभोवताली दिसणाऱ्या आणि या पिढीला चिन्हित करणाऱ्या क्रूरतेवरून, नीतिभ्रष्टतेवरून आणि दांभिकतेवरून दिसून येते.
म्हणूनच पौलाने आपल्या सहख्रिश्चनांना अशी विनंती केली की ‘या युगाबरोबर समरूप होऊ नका.’ (रोमकर १२:२) एका बायबल भाषांतरकाराने पौलाचे शब्द पुढीलप्रमाणे मांडले: “तुमच्या भोवती असलेल्या जगाच्या साच्यात स्वतःला कोंबून घेऊ नका.” (रोमकर १२:२, फिलिप्स भाषांतर.) ज्याप्रमाणे अनुभवी कुंभार त्याला हव्या असलेल्या आकृत्या आणि छाप उमटवण्यासाठी मातीच्या गोळ्यावर जसा दाब देतो त्याप्रमाणे सैतानही तुम्हाला त्याच्या साच्यात कोंबण्याकरता काहीही करील. याकरता सैतानाकडे जगीक राजकारण, व्यापार, धर्म आणि मनोरंजन ही माध्यमे तयारच आहेत. त्याचा प्रभाव किती व्यापक आहे? प्रेषित योहानाच्या दिवसांप्रमाणेच हा प्रभाव व्यापक आहे. योहानाने म्हटले: “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९; २ करिंथकर ४:४ देखील पाहा.) लोकांना फसवण्यातील आणि त्यांची विचारसरणी भ्रष्ट करण्यातील सैतानाच्या क्षमतेवर तुम्हाला शंका असल्यास हे लक्षात असू द्या, की देवाला समर्पित असलेल्या संपूर्ण इस्राएल राष्ट्राला त्याने किती प्रभावीरित्या फसवले आणि भ्रष्ट केले. (१ करिंथकर १०:६-१२) तुमच्या बाबतीतही हेच होऊ शकते का? तुम्ही तुमचे मन सैतानाच्या भ्रष्ट प्रभावाप्रती खुले ठेवल्यास तुमच्या बाबतीतही हेच होऊ शकते.
काय चालले आहे ते जाणा
सामान्यपणे, अशाप्रकारच्या कपटपूर्ण शक्तींचा तुमच्यावर तेव्हाच प्रभाव पडतो जेव्हा तुम्ही त्यांस वाव देता. गुप्तपणे मन वळविणारे (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात व्हॅन्स पॅकर्ड यांनी हा मुद्दा स्पष्ट केला: “[गुप्तपणे] मन वळविणाऱ्यांचा प्रतिकार करण्याकरता आपल्याकडे अद्यापही एक मजबूत शस्त्र आहे: आपले मन न वळू देण्याची आपण निवड करू शकतो. जवळजवळ सर्व परिस्थितींमध्ये आपल्यासमोर निवड असते आणि काय चालले आहे याची जाणीव असल्यास आपण अगदी सहजपणे कोणाच्या कह्यात येणार नाही.” हीच गोष्ट मतप्रसार आणि फसवणूक यांबाबतीत खरी आहे.
अर्थात, “काय चालले आहे ते जाणण्याकरता” तुम्ही तुमचे मन खुले आणि चांगल्या प्रभावांविषयी ग्रहणशील ठेवले पाहिजे. सुदृढ शरीराप्रमाणे निकोप मनालाही चांगल्याप्रकारे कार्य करायचे असल्यास चांगल्या पोषणाची आवश्यकता आहे. (नीतिसूत्रे ५:१, २) अर्धवट माहिती ही चुकीच्या माहितीइतकीच प्राणघातक असू शकते. तेव्हा, वाममार्गाला नेणाऱ्या कल्पना आणि तत्त्वज्ञान यांपासून तुम्हाला तुमच्या मनाचे रक्षण करण्याची गरज आहे हे खरे असले तरी, तुम्हाला देण्यात येणारा सल्ला आणि मिळणारी माहिती प्रत्येकच वेळेस वाईट असते असा पूर्वग्रहदूषित आणि उपहासात्मक दृष्टिकोन न बाळगण्याचा प्रयत्न करा.—१ योहान ४:१.
प्रामाणिकपणे मन वळविणे गुप्तपणे मतप्रसार करण्यासारखे नाही. प्रेषित पौलाने तीमथ्य या तरुणाला अशी सूचना दिली होती, की त्याने ‘दुसऱ्यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावणाऱ्या दुष्ट व भोंदू माणसांचा’ शोध घ्यावा. पण पौलाने पुढे असेही म्हटले: “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे [“मन वळविण्यात आले आहे,” NW] त्या धरून राहा.” (२ तीमथ्य ३:१३, १४) तुम्ही जे काही ग्रहण करता, त्याचा काही प्रमाणात तुमच्यावर परिणाम नक्की होईल, त्यामुळे ‘तुम्ही कोणाकडून गोष्टी शिकता हे जाणून घेणे’ महत्त्वाचे आहे. असे केल्यास, त्या लोकांना तुमच्याविषयी आस्था आहे किंवा नाही हे तुम्हाला ठरवता येईल.
निवड तुम्हाला करायची आहे. जगीक तत्त्वज्ञान आणि मूल्ये यांद्वारे तुमची विचारसरणी नियंत्रित होऊ देण्याद्वारे “या युगाबरोबर समरूप” होण्याचे तुम्ही निवडू शकता. (रोमकर १२:२) पण या जगाला तुमच्यात मनापासून आस्था नाही. म्हणून प्रेषित पौलाने असा इशारा दिला: “ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, . . . तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या.” (कलस्सैकर २:८) अशाप्रकारे सैतानाच्या साच्यात स्वतःला कोंबण्याकरता किंवा ‘त्याच्या ताब्यात जाण्याकरता’ काही प्रयत्न करावा लागत नाही. हे एखाद्या धूम्रपान करणाऱ्याच्या सहवासात राहण्यासारखे आहे. दुषित हवेत निव्वळ श्वासोच्छ्वास केल्यामुळेही तुमच्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.
तेव्हा, तुम्ही त्या दुषित “हवेत” श्वास घेण्याचे टाळू शकता. (इफिसकर २:२, NW) त्याऐवजी पौलाच्या पुढील सल्ल्याचे अनुकरण करा: ‘देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घेऊन आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.’ (रोमकर १२:२) याकरता प्रयत्नाची गरज आहे. (नीतिसूत्रे २:१-५) हे लक्षात ठेवा, की यहोवा कोणाला कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. आवश्यक ती सर्व माहिती तो आपल्याला देतो, पण त्या माहितीपासून लाभ घेण्याकरता तुम्ही ती ऐकली पाहिजे आणि त्या माहितीला तुमच्या विचारसरणीमध्ये बदल घडवू दिला पाहिजे. (यशया ३०:२०, २१; १ थेस्सलनीकाकर २:१३) ‘पवित्र शास्त्रात’ अर्थात बायबल या देवाच्या प्रेरित वचनात असलेल्या सत्याने मन भरण्यास तुम्ही तयार असले पाहिजे.—२ तीमथ्य ३:१५-१७.
यहोवा आपल्याला घडवितो तेव्हा प्रतिसाद द्या
यहोवाच्या घडविण्याच्या प्रभावापासून आपल्याला लाभ घ्यायचा असल्यास स्वेच्छिक, आज्ञांकित प्रतिसाद दाखवण्याची गरज आहे; ही गोष्ट यिर्मयाच्या मनावर ठसवण्यासाठी यहोवाने त्याला कुंभाराच्या कार्यशाळेला भेट द्यायला सांगितले. यिर्मयाने पाहिले, की घडवत असलेले ‘पात्र कुंभाराच्या हातून बिघडल्यास’ त्याचे दुसरे पात्र बनविण्याचा तो विचार करतो. तेव्हा यहोवाने म्हटले: “हे इस्राएलाच्या घराण्या, या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करिता येत नाही काय? . . . पाहा, कुंभाराच्या हाती माती असते तसे तुम्ही माझ्या हाती आहा.” (यिर्मया १८:१-६) तर मग, इस्राएलचे लोक यहोवाच्या हातांतील मातीच्या एका निर्जीव गोळ्याप्रमाणे होते का ज्यास तो त्याची इच्छा होईल तसे एका किंवा दुसऱ्या प्रकारच्या पात्रात घडवणार होता?
लोकांच्या इच्छेविरुद्ध काही करण्याकरता यहोवा त्याच्या परात्पर सामर्थ्याचा उपयोग करत नाही, तसेच मानवी कुंभारांप्रमाणे दोषपूर्ण उत्पादनाकरता तो जबाबदारही नाही. (अनुवाद ३२:४) यहोवा त्याच्या मार्गदर्शनानुरूप सकारात्मकरीत्या घडवत असताना त्याला विरोध केल्यामुळे दोष निर्माण होऊ शकतात. तुम्ही आणि मातीचा निर्जीव गोळा यात हा फार मोठा फरक आहे. तुमच्याकडे इच्छा स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याचा उपयोग तुम्ही यहोवाच्या घडविण्याच्या प्रभावास प्रतिक्रिया दाखवण्यासाठी किंवा मुद्दामहून त्यास विरोध करण्यासाठी करू शकता.
किती विचारप्रवर्तक धडा! “मी काय करायचं हेही सांगण्याची कोणाला गरज नाही,” असे मगरूरपणे म्हणण्यापेक्षा यहोवाच्या वाणीकडे कान देणे किती चांगले आहे! यहोवाच्या मार्गदर्शक प्रभावाची आपल्या सर्वांना गरज आहे. (योहान १७:३) स्तोत्रकर्त्या दावीदाप्रमाणे असा, त्याने अशी प्रार्थना केली: “हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखीव; तुझ्या वाटा मला प्रगट कर.” (स्तोत्र २५:४) राजा शलमोनाने काय म्हटले ते लक्षात ठेवा: “ज्ञानी पुरुषाने ऐकावे, त्याचे ज्ञान वाढावे.” (नीतिसूत्रे १:५) तुम्ही ऐकणार का? ऐकल्यास, ‘विवेक तुमचे रक्षण करील, समंजसपणा तुम्हाला संभाळील.’—नीतिसूत्रे २:११.