मृत्यूनंतर जीवन—बायबल काय म्हणते?
“तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.”—उत्पत्ति ३:१९.
१, २. (अ) मृत्यूनंतर जीवन असते याविषयी कोणती भिन्न मते आहेत? (ब) मनुष्य काय आहे याविषयी बायबल काय शिकवते ते आपल्याला शोधून काढायचे असेल तर आपण कशाचे परीक्षण केले पाहिजे?
“निर्मित गोष्टींबद्दल देवाला प्रेम आहे असा विश्वास आणि चिरकालिक यातनेविषयीचा सिद्धान्त यात अगदी विसंगती आढळते. . . . अल्प वर्षांच्या चुकांसाठी, तेही सुधारण्याची कोणतीही संधी न देता आत्म्याला चिरकालापर्यंत शिक्षा मिळते यावर विश्वास ठेवणे म्हणजे तर्काच्या नियमाविरुद्ध जाणे होय,” असे हिंदू तत्त्ववेत्ता निखिलानंद यांचे म्हणणे आहे.
२ निखिलानंद यांच्याप्रमाणेच अनेकांना चिरकालिक यातनेविषयीची शिकवण अस्वस्थ करते. त्याच कारणासाठी, निर्वाण प्राप्त करून निसर्गाशी एकरूप होण्याबद्दलची शिकवण इतरांना समजायला कठीण वाटते. बायबलवर आपला विश्वास आहे असा दावा करणाऱ्यांमध्येसुद्धा, मनुष्य काय आहे व तो मेल्यावर त्याचे काय होते याबद्दलची भिन्नभिन्न मते आहेत. खरे तर, मनुष्यामध्ये काहीतरी अमर असे आहे, अशी बायबल शिकवण देत असल्याचा दावा पुष्कळ जण करतात. हे खरे आहे का? मनुष्य काय आहे व त्याला कसे बनवण्यात आले होते व तो मेल्यावर त्याचे काय होते याविषयी बायबल काय शिकवते? याच्या उत्तरादाखल आपल्याला इब्री शब्द निफेश आणि ग्रीक शब्द सीखे यांचा काय अर्थ होतो त्याचे परीक्षण करावे लागेल.
बायबलनुसार निफेश आणि सीखे
३. (अ) इब्री शब्द निफेशचा अर्थ काय होतो? (ब) उत्पत्ति २:७ हे वचन, “प्राणी” म्हणजे एक संपूर्ण व्यक्ती असल्याचे कसे सिद्ध करते?
३ इब्री शास्त्रवचनांत निफेश हा इब्री शब्द ७५४ वेळा आढळतो. निफेशचा अर्थ काय होतो? द डिक्शनरी ऑफ बायबल ॲण्ड रिलिजननुसार, “तो बहुतेकवेळा एका संपूर्ण जिवंत प्राण्याला, एका पूर्ण व्यक्तीला सूचित करतो.” मराठी बायबलमध्ये याचे भाषांतर जीव, जीवजंतू, प्राण, प्राणी, जीवधारी प्राणी, मनुष्य, जण असे करण्यात आले आहे. मनुष्याला कशाप्रकारे निर्माण करण्यात आले होते त्याबद्दल बायबलमधील साध्यासोप्या वर्णनावरून हे सिद्ध होते. बायबलचे अगदी पहिले पुस्तक उत्पत्ति २:७ मध्ये म्हटले आहे: “परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकिला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.” याकडे लक्ष द्या, की पहिला मनुष्य प्राणी “झाला.” तेव्हा, “प्राणी” म्हणजे एक संपूर्ण व्यक्ती होय.
४. सीखे या शब्दाचा अर्थ काय होतो?
४ सीखे म्हणजे काय? निफेशप्रमाणे या शब्दाचा अर्थही एक व्यक्ती असा होतो. याचा अर्थ समजण्याकरता कृपया पुढील वचनांचा विचार करा: “माझा जीव व्याकूळ झाला आहे.” (योहान १२:२७) “आपल्या जिवाविषयी . . . चिंता करीत बसू नका.” (मत्तय ६:२५) “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन असावे.” (रोमकर १३:१) “मनुष्याचा पुत्रहि . . . आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे.” (मार्क १०:४५) स्पष्टपणे मग, निफेशप्रमाणे सीखेचा अर्थ सुद्धा एक संपूर्ण व्यक्ती असाच होतो. निजेल टर्नर या विद्वानाच्या मते, हा शब्द “विशिष्टपणे मानव, स्वतः, भौतिक देह ज्यात देवाचा रुह [कार्यकारी शक्ती] आहे त्याला सूचित करतो. . . . या शब्दाचा एक संपूर्ण व्यक्ती यावर जोर आहे.”
५. प्राणी जीव आहेत का? वर्णन करा.
५ बायबलमध्ये निफेश आणि सीखे केवळ मानवांनाच नव्हे तर प्राण्यांना देखील लागू होतात. जसे की, समुद्रातील प्राण्यांच्या सृष्टीचे वर्णन देताना उत्पत्ति १:२० म्हणते, की “जीवजंतूंच्या [इब्री, निफेश] थव्यांनी जले भरून जावोत,” अशी देवाने आज्ञा दिली. आणि सृष्टीच्या पुढील दिवशी देव म्हणाला: “प्रत्येक जातीचे ग्रामपशु, रांगणारे प्राणी व वनपशु असे जीवधारी प्राणी [इब्री, निफेश] पृथ्वी उपजवो.”—उत्पत्ति १:२४; पडताळा लेवीय १७:१४.
६. निफेश आणि सीखे आणखी काय सूचित करतात?
६ अशाप्रकारे बायबल मनुष्याचे वर्णन एक प्राणी असे करते आणि मूळ भाषांत अगदी तोच शब्द, एखाद्या मनुष्याला किंवा प्राण्याला अथवा मनुष्याच्या वा प्राण्याच्या जीवनाला सूचित करण्यासाठी वापरण्यात आला आहे. (वरील पेटी पाहा.) मनुष्य काय आहे याविषयी बायबलची व्याख्या, जटिल तत्त्वज्ञान आणि मानवांचे अंधविश्वास यांनी भरलेली नसून अगदी साधीसोपी आणि सुसंगत आहे. असे आहे तर मग, आपण हा निकडीचा प्रश्न विचारला पाहिजे, मनुष्य मेल्यावर त्याचे काय होते याविषयी बायबल काय म्हणते?
मृतजन बेशुद्ध असतात
७, ८. (अ) मृतांच्या स्थितीविषयी शास्त्रवचने काय प्रकट करतात? (ब) व्यक्ती किंवा प्राणी यातील काही तरी मृत्यूनंतरही जिवंत राहते असे बायबल सूचित करते का?
७ मृतांच्या स्थितीविषयी उपदेशक ९:५, १० (पं.र.भा.) मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे: “मेलेले काही जाणत नाहीत. . . . मृतलोकांत काही कार्य अथवा संकल्प अथवा विद्या अथवा ज्ञान असे काहीच नाही.” यास्तव, मृत्यू म्हणजे अस्तित्वविरहित अवस्था. एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा “तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो,” असे स्तोत्रकर्त्याने लिहिले. (स्तोत्र १४६:४) मृत जन बेशुद्ध, अक्रियाशील अवस्थेत असतात.
८ आदामावर शिक्षा ठोठावताना, देव म्हणाला: “तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९) देवाने आदामाला मातीपासून बनवून त्याला जीवन देण्याआधी तो अस्तित्वात नव्हता. तो मेल्यावर त्याची पुन्हा तीच दशा झाली. त्याची शिक्षा मृत्यू होती—दुसऱ्या जगात स्थलांतर नव्हे. त्याच्यामध्ये अमर असे काहीतरी होते का जे जिवंत राहिले? नाही, बायबल म्हणते, की मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा तो पूर्णपणे नाश होतो. प्रत्येक प्राण्यात अमर असे काहीतरी असते जे नंतरही जिवंत राहते अशी शिकवण ते देत नाही. अमर आत्म्यावर विश्वास ठेवणाऱ्याला हे कदाचित विचित्र वाटेल पण, मृत्यूच्या वेळी संपूर्ण प्राणी किंवा व्यक्ती मरते आणि त्यातले काहीही जिवंत राहत नाही.
९. राहेलचा “प्राण जाताजाता” या वाक्यांशाच्या बाबतीत बायबलला काय म्हणायचे आहे?
९ पण मग, उत्पत्ति ३५:१८ मध्ये, आपल्या दुसऱ्या मुलाला जन्म देताना जिला मरण आले त्या राहेलच्या मृत्यूविषयीचे वर्णन देताना जो वाक्यांश वापरला आहे त्याच्याबद्दल काय? तेथे म्हटले आहे: “तिचा प्राण जाताजाता तिने मुलाचे नाव बेनओनी . . . ठेविले; तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव बन्यामीन . . . असे ठेविले.” या उताऱ्यावरून असे सूचित होते का, की राहेलमध्ये काही तरी होते जे तिच्या मृत्यूनंतर तिच्यातून बाहेर निघाले? नाही, मुळीच नाही. हे लक्षात असू द्या, की “प्राण” हा शब्द एखाद्या मनुष्याच्या जीवाला देखील सूचित होऊ शकतो. तर, या बाबतीत राहेलचा “प्राण” म्हणजे तिचा “जीव.” म्हणूनच इतर बायबल अनुवाद “तिचा प्राण जाताजाता” या वाक्यांशाचे भाषांतर “तिचा जीव जात असता” (पं.र.भा.), “शेवटचा श्वास घेण्यापूर्वी” (सुबोध), आणि “तिला प्राण कंठाशी आला” (कॉमन लँग्वेज) असे करतात. राहेलच्या शरीरातून काही तरी गूढ तिच्या मृत्यूनंतर जिवंत राहिले असा कोठेही संकेत नाही.
१०. कोणत्या अर्थाने विधवेच्या मुलाचा प्राण ‘पुन्हा त्याच्यात आला’?
१० पहिले राजे अध्याय १७ मध्ये एका विधवेच्या पुत्राच्या पुनरुत्थानाबद्दल जे लिहिले आहे त्याच्याबाबतीतही हे असेच आहे. २२ व्या वचनात आपण वाचतो, की एलीयाने त्या मुलासाठी प्रार्थना केल्यानंतर यहोवाने “एलीयाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊन तो पुनरपि जिवंत झाला.” पुन्हा येथेही “प्राण” म्हणजे “जीव.” म्हणूनच पंडिता रमाबाई भाषांतरात हे वचन अशाप्रकारे आहे: “मुलाचा जीव त्याच्यामध्ये परत आला, आणि तो जिवंत झाला.” मुलाकडे कसलेही अस्पष्ट रूप नव्हे तर त्याचा जीव परत आला होता. हे एलीयाने त्या मुलाच्या आईस जे म्हटले त्याच्या सुसंगतेत आहे: “पाहा, तुझा मुलगा [एक संपूर्ण व्यक्ती] जिवंत आहे.”—१ राजे १७:२३.
बायबलमधील आत्मा या शब्दाविषयी काय?
११. इब्री शब्द रुअख आणि ग्रीक शब्द न्यूमा यांचा मूळ अर्थ काय होतो?
११ मराठी बायबलमध्ये इब्री शब्द रुअख आणि ग्रीक शब्द न्यूमा यांचे पुष्कळवेळा आत्मा असे भाषांतर करण्यात आले आहे. परंतु या शब्दांचा अर्थ, मृत्यूनंतर जिवंत राहणारी मनुष्यातील काही तरी अस्पष्ट अमर गोष्ट, असा होत नाही. रुअख आणि न्यूमा यांचा मूळ अर्थ “श्वास” असा होतो. उदाहरणार्थ, उपदेशक ३:१९ (पं.र.भा.) म्हणते: “जे मनुष्य संतानांस घडते ते पशूंस घडते, त्यांना तर एकच गोष्ट घडते; जसा हा मरतो तसाच तोहि मरतो, आणि त्या सर्वांना एकच श्वास (रुअख) आहे, तर पशूंपेक्षा मनुष्याला काही श्रेष्ठता नाही, कारण सर्व काही व्यर्थता आहे.”
१२. इब्री शब्द रुअख आणि ग्रीक शब्द न्यूमा काय सूचित करतात?
१२ पण रुअख आणि न्यूमा फक्त श्वास हाच शब्द सूचित करत नाहीत. उदाहरणार्थ मनुष्याच्या मृत्यूचे वर्णन करताना स्तोत्र १४६:४ म्हणते: “त्याचा प्राण (रुअख) जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” यास्तव, इब्री शब्द रुअख याचे भाषांतर काहीवेळा “प्राण” असेही केले जाते व बायबलमध्ये सर्व जिवंत प्राण्यांमध्ये अर्थात, श्वासोच्छ्वासामुळे जिवंत राहणाऱ्या मनुष्यांमध्ये व प्राण्यांमध्ये ते सक्रिय असलेल्या जीवन शक्तीला सूचित करते.
१३. बायबल म्हणते त्याप्रमाणे, एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा आत्मा देवाकडे परत कसा जातो?
१३ एखाद्या मनुष्याचा मृत्यू झाल्यावर “देवाने दिलेला आत्मा (रुअख) त्याजकडे परत” जातो असे उपदेशक १२:७ म्हणते त्याचा काय अर्थ होतो? आत्मा खरोखरच अंतराळातून प्रवास करून देवाकडे जातो असा याचा अर्थ आहे का? तसा कसलाही प्रकार सूचित होत नाही. आधी उल्लेख केल्याप्रमाणे, रुअख शरीराच्या मृत्यूनंतर जिवंत राहणारी अस्पष्ट अमर गोष्ट सूचित करत नाही. बायबलमध्ये रुअख म्हणजे जीवन-शक्ती असल्यामुळे, तो “त्याजकडे परत” जातो म्हणजे त्या मनुष्यासाठी भवितव्यातील जीवनाची कोणतीही आशा ही पूर्णपणे देवावर अवलंबून आहे. फक्त देवच एखाद्या मनुष्याला पुन्हा जिवंत करून रुअख किंवा जीवन-शक्ती पुन्हा देऊ शकतो. (स्तोत्र १०४:३०) पण देवाचा तो हेतू आहे का?
‘तो पुन्हा उठेल’
१४. लाजरचा मृत्यू झाल्यावर त्याच्या बहिणींचे दुःखपरिहार करण्यासाठी आणि त्यांना सांत्वन देण्यासाठी येशूने काय म्हटले व केले?
१४ जेरुसलेमच्या पूर्वेला सुमारे तीन किलोमीटर दूर असलेल्या बेथानीच्या एका लहानशा गावात मरीया व मार्था आपला भाऊ लाजर याच्या अकाली मृत्यूमुळे शोक करीत होत्या. येशूही त्यांच्या दुःखात सामील झाला कारण त्याचे लाजर आणि त्याच्या बहिणींवर प्रेम होते. येशू या बहिणींना सांत्वन कसे देऊ शकत होता? कसली तरी क्लिष्ट गोष्ट सांगण्याऐवजी सत्य सांगण्याद्वारे तो त्यांचे सांत्वन करू शकत होता. येशू त्यांना फक्त असेच म्हणाला: “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” येशू मग कबरेजवळ गेला व त्याने लाजरचे पुनरुत्थान केले—चार दिवसांपासून मृत असलेल्या मनुष्याला त्याने पुन्हा जिवंत केले!—योहान ११:१८-२३, ३८-४४.
१५. येशूने काय म्हटले व केले त्यावर मार्थेची काय प्रतिक्रिया होती?
१५ लाजर पुन्हा “उठेल” या येशूच्या बोलण्यावर मार्थेला आश्चर्य वाटले का? नाही, कारण तिने त्याला उत्तर दिले: “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” तिला पुनरुत्थानावर आधीपासूनच विश्वास होता. येशूने मग तिला सांगितले: “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल.” (योहान ११:२३-२५) लाजरला पुन्हा जिवंत केल्याच्या चमत्कारामुळे तिचा विश्वास आणखी पक्का झाला आणि इतरांमध्येही विश्वास उत्पन्न झाला. (योहान ११:४५) पण “पुनरुत्थान” या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो?
१६. “पुनरुत्थान” या शब्दाचा काय अर्थ होतो?
१६ “पुनरुत्थान” या शब्दाचे भाषांतर अनास्तासिस या ग्रीक शब्दातून करण्यात आले आहे; याचा अक्षरशः अर्थ “पुन्हा उभे राहणे” असा होतो. ग्रीकच्या इब्री भाषांतरकारांनी अनास्तासिसचे भाषांतर, “मृतांचे पुनरूज्जीवन” (इब्री, टेखीयॉथ हॉमेथीम) या अर्थाचा शब्द वापरून केले आहे.a यास्तव, पुनरुत्थानात एखाद्या मनुष्याला मृत्यूसारख्या निर्जीव स्थितीतून पुन्हा उभे करणे—एखाद्याला पुन्हा जिवंत व पुन्हा कार्यशील करणे समाविष्ट आहे.
१७. (अ) लोकांचे पुनरुत्थान करायला यहोवा देवाला आणि येशू ख्रिस्ताला कठीण का नाही? (ब) स्मृती कबरेत असलेल्यांबद्दल येशूने कोणते वचन दिले?
१७ अमर्याद बुद्धी व परिपूर्ण स्मरणशक्ती असलेल्या यहोवा देवाला एखाद्या मनुष्याचे पुनरुत्थान करणे फार सोपे आहे. मृतांचे जीवन—त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा व्यक्तिगत इतिहास आणि त्यांचा सर्व तपशील—त्याच्या आठवणीत आहे. (ईयोब १२:१३; पडताळा यशया ४०:२६.) शिवाय, लाजरचा अनुभव सूचित करतो त्याप्रमाणे येशू ख्रिस्त मृतांना पुनरुत्थित करायला इच्छुक पण आहे आणि त्याच्याठायी तेवढे सामर्थ्यही आहे. (पडताळा ७:११-१७; ८:४०-५६) म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणाला: “स्मृती कबरेतील सर्व माणसे त्याची [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.” (योहान ५:२८, २९, NW) होय, येशू ख्रिस्ताने वचन दिले आहे की यहोवाच्या स्मरणात असलेल्यांना पुनरुत्थित केले जाणार आहे. बायबलनुसार हे स्पष्ट आहे, की मृत्यूच्या वेळी कसलाही अमर भाग जिवंत राहत नाही तर मृत्यूवरील एकमात्र उपाय पुनरुत्थान हाच आहे. पण आजपर्यंत कोट्यवधी लोक जिवंत राहून मरण पावले आहेत. त्यांच्यातील कोण देवाच्या स्मरणात, पुनरुत्थानाची वाट पाहत आहेत?
१८. कोणाचे पुनरुत्थान होईल?
१८ यहोवाचे सेवक या नात्याने ज्यांनी धार्मिक जीवन व्यतीत केले होते अशांचे पुनरुत्थान केले जाईल. तरीपण, मृत्यू पावलेल्या अशा कोट्यवधी लोकांना देवाच्या धार्मिक दर्जांनुसार आपले जीवन व्यतीत करायचे की नाही हे दाखवण्याची संधी मिळाली नाही. त्यांना कदाचित यहोवाच्या अपेक्षा माहीत नसतील किंवा आवश्यक ते बदल करायला त्यांना पुरेसा वेळ मिळाला नसेल. हे लोकही देवाच्या स्मरणात आहेत व त्यांचे पुनरुत्थान केले जाईल कारण बायबल अभिवचन देते: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५.
१९. (अ) प्रेषित योहानाला पुनरुत्थानाविषयीचा कोणता दृष्टान्त झाला? (ब) “अग्नीच्या सरोवरात” काय टाकले जाते व त्याचा काय अर्थ होतो?
१९ पुनरुत्थित जन देवाच्या सिंहासनापुढे उभे आहेत असा एक अद्भुत दृष्टान्त प्रेषित योहानाने पाहिला. त्याचे वर्णन देताना त्याने लिहिले: “समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतास बाहेर सोडले; आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.” (प्रकटीकरण २०:१२-१४) याचा काय अर्थ होतो त्याचा विचार करा! देवाच्या स्मरणात असलेल्या सर्व मृतांना हेडीज किंवा शिओल म्हणजेच मानवजातीची सर्वसाधारण कबर येथून मुक्त केले जाईल. (स्तोत्र १६:१०; प्रेषितांची कृत्ये २:३१) मग “मरण व अधोलोक” यांना “अग्नीच्या सरोवरात” टाकले जाईल म्हणजे त्यांचा पूर्णपणे नाश केला जाईल. मानवजातीची सर्वसाधारण कबर राहणार नाही.
अद्भुत आशा!
२०. आता मृत असलेल्या कोट्यवधी लोकांना कोणत्या परिसरात पुनरुत्थित केले जाईल?
२० कोट्यवधी लोकांचे पुनरुत्थान केले जाते तेव्हा त्यांना निर्जन पृथ्वीवर जिवंत केले जाणार नाही. (यशया ४५:१८) त्यांना जिवंत केल्यावर ते त्यांच्या आजूबाजूचा परिसर किती सुंदर सुधारला आहे, त्यांच्यासाठी राहायला घरे, कपडालत्ता आणि भरपूर अन्न तयार असल्याचे पाहतील. (स्तोत्र ६७:६; ७२:१६; यशया ६५:२१, २२) ही सर्व तयारी कोण करतील? यासाठी निश्चितच पृथ्वीवर पुनरुत्थान सुरू होण्याआधी नवीन जगात लोक जिवंत असायला हवेत. पण हे कोण लोक आहेत?
२१, २२. ‘शेवटल्या काळांत’ जगणाऱ्यांसाठी भवितव्यात कोणती अद्भुत आशा आहे?
२१ बायबल भविष्यवाणीची पूर्णता दाखवून देते की आपण या व्यवस्थीकरणाच्या ‘शेवटल्या काळांत’ जगत आहोत.b (२ तीमथ्य ३:१) फार लवकर, यहोवा देव मानवी कारभारात हस्तक्षेप करून पृथ्वीवरील सर्व दुष्टाई काढून टाकणार आहे. (स्तोत्र ३७:१०, ११; नीतिसूत्रे २:२१, २२) त्या वेळी, देवाची विश्वासूपणे सेवा करणाऱ्यांचे काय होईल?
२२ यहोवा दुष्टांबरोबर धार्मिकांचाही नाश करणार नाही. (स्तोत्र १४५:२०) त्याने असे कधीच केलेले नाही व पृथ्वीवरील सर्व दुष्टपणा काढून टाकतानाही तो असे करणार नाही. (पडताळा उत्पत्ति १८:२२, २३, २६.) खरे तर, बायबलचे शेवटले पुस्तक एका ‘मोठ्या लोकसमुदायाविषयी’ जो “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही” व जो “मोठ्या संकटातून” पार होतो त्याविषयी सांगते. (प्रकटीकरण ७:९-१४) होय, सध्याच्या दुष्ट जगाचा ज्यात अंत होणार आहे त्या मोठ्या संकटातून एक मोठा लोकसमुदाय बचावेल व देवाच्या नवीन जगात प्रवेश करील. तेथे, आज्ञाधारक मानवजातीला, पाप आणि मृत्यू यांपासून मुक्त करण्यासाठी असलेल्या देवाच्या अद्भुत तरतुदींचा पूर्ण लाभ घेता येईल. (प्रकटीकरण २२:१, २) म्हणून, ‘मोठ्या लोकसमुदायाला’ मृत्यूचा कधीही अनुभव येणार नाही. काय ही अद्भुत आशा!
मृत्यू विना जीवन
२३, २४. पृथ्वीवरील परादीसमध्ये मृत्यूविना जीवन जगण्याची तुमची इच्छा आहे तर तुम्ही काय केले पाहिजे?
२३ या विस्मयकारक आशेवर आपण भरवसा ठेवू शकतो का? अर्थात! स्वतः येशू ख्रिस्ताने हे सांगितले की एक असा काळ येईल जेव्हा लोक कधीच मरणार नाहीत तर कायम जिवंत राहतील. आपला मित्र लाजर याचे पुनरुत्थान करायच्या आधी येशू मार्थेला म्हणाला: “जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीहि मरणार नाही.”—योहान ११:२६.
२४ तुम्हाला पृथ्वीवरील परादीसमध्ये अनंतकाळ जगायचे आहे का? तुम्हाला तुमच्या प्रिय जणांना पाहायची उत्कंठा आहे का? प्रेषित योहानाने म्हटले: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७) देवाची इच्छा काय आहे ते शिकण्याची व त्यानुसार जगण्याचा निश्चय करण्याची ही वेळ आहे. मग तुम्हीही, इतर लाखो लोक जे देवाची इच्छा पूर्ण करत आहेत त्यांच्यासोबत पृथ्वीवरील परादीसमध्ये अनंतकाळ जगू शकाल.
[तळटीपा]
a “पुनरुत्थान” हा शब्द इब्री शास्त्रवचनांत नसला तरी, पुनरुत्थानाची आशा मात्र ईयोब १४:१३, दानीएल १२:१३ आणि होशय १३:१४ येथे स्पष्ट दिसून येते.
b वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित केलेले सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकाची पृष्ठे ९८-१०७ पाहा.
तुम्हाला आठवते का?
◻ “जीव,” “प्राण” किंवा “प्राणी” असे भाषांतर करण्यात आलेल्या मूळ भाषांतील शब्दांचा मूलभूत अर्थ काय आहे?
◻ मनुष्य मेल्यावर त्याचे काय होते?
◻ बायबलनुसार मृत्यूवर कोणता उपाय आहे?
◻ आज विश्वासू लोकांसाठी कोणती एकमेव आशा आहे?
[१५ पानांवरील चौकट]
“प्राण” म्हणजे एखाद्या प्राण्याचा जीव
कधीकधी, “प्राण” हा शब्द एखाद्या मनुष्याच्या अथवा प्राण्याच्या जिवाला लागू होतो. यामुळे, बायबल लेखकांनी जीव, प्राण किंवा प्राणी असे भाषांतर करण्यात आलेला शब्द वापरला तेव्हा त्यांच्या मनात जो अर्थ होता तो बदलला नाही. बायबल लेखकांनी जेव्हा एक जिवंत मनुष्य सूचित करण्यासाठी निफेश किंवा सीखे हे शब्द वापरले तेव्हा त्यांनी त्यांचे भाषांतर प्राणी असे केले आहे व ते त्या मनुष्याबद्दल तो एक प्राणी आहे असे म्हणू शकत होते. एखादी व्यक्ती जिवंत असते तेव्हाही निफेश किंवा सीखे हे शब्द वापरले जाऊ शकतात व या बाबतीत त्यांचे भाषांतर सहसा जीव किंवा प्राण असे करण्यात येते.
उदाहरणार्थ, देवाने मोशेला सांगितले: “तुझा जीव घेऊ पाहणारे सगळे मृत्यु पावले आहेत.” मोशेचे शत्रू त्याचा जीव घेऊ पाहत होते, हे स्पष्ट आहे. (निर्गम ४:१९; पडताळा यहोशवा ९:२४; नीतिसूत्रे १२:१०.) येशूनेही या शब्दाचा उपयोग अशाच रितीने केला; त्याने म्हटले: “मनुष्याचा पुत्र . . . पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” (मत्तय २०:२८; पडताळा १०:२८, पं.र.भा.) या प्रत्येक बाबतीत “प्राण” म्हणजे “जीव.”
[१५ पानांवरील चित्र]
हे सर्व जीव आहेत
[Credit Line]
हमिंगबर्ड: U.S. Fish and Wildlife Service, Washington, D.C./Dean Biggins
[१७ पानांवरील चित्र]
पुनरुत्थान हाच मृत्यूवर उपाय असल्याचे येशूने दाखवून दिले
[१८ पानांवरील चित्र]
“जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीहि मरणार नाही”—योहान ११:२६.