आपल्या ‘देशावर’ यहोवाचा आशीर्वाद
“जेथेजेथे ही नदी जाईल तेथेतेथे सर्व प्राणी जिवंत राहतील.”—यहेज्केल ४७:९.
१, २. (अ) पाणी किती मौल्यवान आहे? (ब) यहेज्केलच्या दृष्टान्तातील नदीचे पाणी कशाला चित्रित करते?
पाणीहे एक अद्भुत द्रव आहे. सर्व जिवंत सृष्टी त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्याविना आपल्यातील कोणीही जास्त काळ टिकू शकत नाही. आपण साफसफाईसाठीसुद्धा त्याच्यावर अवलंबून असतो, कारण पाणी सर्व मलीनता धुवून टाकते. म्हणूनच आपण आपले शरीर, आपले कपडे इतकेच नव्हे तर आपले अन्नही पाण्याने धुवून काढतो. असे केल्याने आपले जीवन वाचू शकते.
२ जीवनासाठी असलेल्या यहोवाच्या आध्यात्मिक तरतुदी चित्रित करण्यासाठी बायबल पाण्याचा उपयोग करते. (यिर्मया २:१३; योहान ४:७-१५) या तरतुदींमध्ये, त्याच्या लोकांना ख्रिस्ताचे खंडणी बलिदान आणि त्याच्या वचनातील त्याचे ज्ञान यांच्याकरवी शुद्ध करणे समाविष्ट आहे. (इफिसकर ५:२५-२७) यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्तात, मंदिरातून वाहणारी चमत्कारिक नदी जीवन-प्रदान करणाऱ्या आशीर्वादांना चित्रित करते. पण ती नदी केव्हा वाहते व आज तिचा आपल्यासाठी काय अर्थ होतो?
पुनर्स्थापित देशात नदी वाहते
३. यहेज्केल ४७:२-१२ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहेज्केलाने काय अनुभवले?
३ बॅबिलोनमध्ये बंदिवान या नात्याने यहेज्केलच्या लोकांना यहोवाच्या तरतुदींची नितान्त गरज होती. तेव्हा, पवित्रस्थानातून पाण्याचा स्रोत आहे व तो दृष्टान्तातील मंदिराच्या बाहेर वाहत जातो हे यहेज्केलाने पाहिले तेव्हा त्याला किती प्रोत्साहन मिळाले असावे! एक देवदूत १,००० हात अंतराअंतराने नदी मापतो. नदीची खोली वाढत जाते; पहिल्यांदा ते घोट्यापर्यंत असते मग ते गुडघ्यापर्यंत येते आणि पुढे जाऊन ते कमरेइतके आणि त्याच्यापुढे इतके खोल की त्यात पोहावे लागते. ही नदी जीवन देणारी आणि सुपिकता आणणारी आहे. (यहेज्केल ४७:२-११) यहेज्केलला सांगितले जाते: “नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हरतऱ्हेची झाडे वाढतील.” (यहेज्केल ४७:१२अ) नदी मृत समुद्रात प्रवेशते तेव्हा निर्जीव पाणी जिवंत होते! नदीत मासे विपुल होतात. मत्स्योद्योगाची भरभराट होते.
४, ५. नदीविषयी योएलची भविष्यवाणी यहेज्केलच्या भविष्यवाणीशी कशी जुळते व हे महत्त्वपूर्ण का आहे?
४ या सुंदर भविष्यवाणीवरून यहुदी बंदिस्तांना, दोन पेक्षा अधिक शतकांआधी उच्चारलेली आणखी एक भविष्यवाणी आठवली असावी; “परमेश्वराच्या मंदिरातून झरा निघेल तो शिट्टिमाच्या खोऱ्यास पाणी पुरवील.”a (योएल ३:१८) यहेज्केलच्या भविष्यवाणीप्रमाणे, योएलाची भविष्यवाणी, एक नदी देवाच्या घरातून अर्थात मंदिरातून वाहील आणि एका रूक्ष प्रदेशास जिवंत करील असे भाकीत करते.
५ टेहळणी बुरूजने अनेक वर्षांआधी स्पष्ट केले होते, की योएलाची भविष्यवाणी आपल्या काळात पूर्ण होत आहे.b तेव्हा, यहेज्केलच्या त्याच दृष्टान्ताच्या बाबतीतही ही गोष्ट खरी असेल. देवाच्या लोकांच्या पुनर्स्थापित देशात आज, प्राचीन इस्राएलात होते त्याप्रमाणे यहोवाचे आशीर्वाद वाहत आहेत.
आशीर्वादांचा मोठा प्रवाह
६. दृष्टान्तातील वेदीवर रक्त शिंपडण्यावरून यहुद्यांना कशाची आठवण व्हायला हवी होती?
६ देवाच्या पुनर्स्थापित लोकांवर येणाऱ्या आशीर्वादांचा उगम काय आहे? नदीचे पाणी देवाच्या मंदिरातून वाहते हे लक्षात घ्या. तसेच आज, यहोवाचे महान आध्यात्मिक मंदिर अर्थात, खऱ्या उपासनेची व्यवस्था याद्वारे यहोवाकडून आशीर्वाद येतात. यहेज्केलच्या दृष्टान्तात आणखी एक महत्त्वपूर्ण तपशील आहे. तो पाण्याचा झरा आंतील अंगणात वेदीच्या समोरून दक्षिणेकडे वाहतो. (यहेज्केल ४७:१) वेदी, दृष्टान्तातील मंदिराच्या अगदी केंद्रस्थानी आहे. यहोवा काटेकोरपणे यहेज्केलास त्याचे वर्णन देतो आणि अर्पणाचे रक्त त्यावर शिंपडण्याची आज्ञा देतो. (यहेज्केल ४३:१३-१८, २०) सर्व इस्राएलांना ही वेदी अतिशय महत्त्वपूर्ण वाटत होती. मोशेने जेव्हा सियोन पर्वताच्या पायथ्याशी एका वेदीवर रक्त शिंपडले तेव्हा म्हणजे खूप वर्षांआधीच यहोवाबरोबरचा त्यांचा करार वैध ठरला होता. (निर्गम २४:४-८) दृष्टान्तातील वेदीवर रक्त शिंपडण्यावरून त्यांना याची आठवण झाली असावी, की ते त्यांच्या पुनर्स्थापित देशात पोहंचल्यावर, यहोवाचे आशीर्वाद पुन्हा वाहू लागतील; पण फक्त तोपर्यंत जोपर्यंत ते त्याच्याबरोबर केलेल्या करारानुसार जगतील.—अनुवाद २८:१-१४.
७. लाक्षणिक वेदीचा आज ख्रिश्चनांकरता काय अर्थ होतो?
७ तसेच, आज देवाच्या लोकांना एका करारामार्फत—एक उत्तम करार, नवीन करार याच्यामार्फत आशीर्वादित केले जात आहे. (यिर्मया ३१:३१-३४) हा करार फार पूर्वीच रक्ताने, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने वैध करण्यात आला होता. (इब्री लोकांस ९:१५-२०) आज, आपण कराराचे भाग असलेल्या अभिषिक्त लोकांपैकी असू किंवा करारातून लाभ मिळवणाऱ्या ‘दुसऱ्या मेंढरांतील’ असू, आपल्याला लाक्षणिक वेदी महत्त्वाची आहे. ती ख्रिस्ताच्या बलिदानासंबंधी देवाच्या इच्छेला चित्रित करते. (योहान १०:१६; इब्री लोकांस १०:१०) लाक्षणिक वेदी जशी आध्यात्मिक मंदिराच्या मध्यभागी आहे तसेच ख्रिस्ताचे खंडणी बलिदान शुद्ध उपासनेत महत्त्वपूर्ण आहे. ते आपल्या पापांच्या क्षमेसाठी व अशाप्रकारे भवितव्यात आपल्या आशांसाठी आधार आहे. (१ योहान २:२) म्हणूनच, आपण नवीन कराराशी संबंधीत असलेल्या नियमशास्त्रानुसार अर्थात ‘ख्रिस्ताच्या नियमानुसार’ जगण्याचा प्रयत्न करतो. (गलतीकर ६:२) जोपर्यंत आपण असे करू तोपर्यंत आपल्याला जीवनासाठी असलेल्या यहोवाच्या तरतुदींचा लाभ होऊ शकतो.
८. (अ) दृष्टान्तातील मंदिराच्या आंतील अंगणात काय नव्हते? (ब) कोणत्या साधनाद्वारे दृष्टान्तातील याजक स्वतःला स्वच्छ करू शकत होते?
८ एक लाभ म्हणजे, यहोवासमोरील शुद्ध भूमिका. दृष्टान्तातील मंदिराच्या आतील अंगणात एक मुख्य गोष्ट नाही जी निवासमंडपाच्या अंगणात आणि शलमोनाच्या मंदिरात अतिशय महत्त्वपूर्ण होती; ते आहे एक मोठे गंगाळ. याला नंतर गंगाळसागर असे संबोधण्यात येऊ लागले ज्यात याजक आपले हात धूत असत. (निर्गम ३०:१८-२१; २ इतिहास ४:२-६) यहेज्केलच्या दृष्टान्तातील मंदिरात याजक साफसफाईसाठी कशाचा उपयोग करू शकत होते? आंतील अंगणातून वाहणाऱ्या त्या चमत्कारिक नदीचा! होय, यहोवा त्यांना, त्यांनी शुद्ध किंवा पवित्र भूमिकेत राहावे म्हणून एक साधन देणार होता.
९. अभिषिक्त जण आणि मोठ्या लोकसमुदायाचे लोक आज शुद्ध भूमिकेत कसे राहू शकतात?
९ तसेच आज, अभिषिक्त लोकांना यहोवासमोर शुद्ध भूमिकेत राहता येते. यहोवा त्यांना पवित्र, धार्मिक लेखतो. (रोमकर ५:१, २) गैरयाजकीय वंशाला चित्रित करणाऱ्या ‘मोठ्या लोकसमुदायाबद्दल’ काय? ते बाहेरील अंगणात उपासना करतात आणि दृष्टान्तातील याच भागातून नदी वाहते. तेव्हा, प्रेषित योहान आध्यात्मिक मंदिराच्या अंगणात शुभ्र वस्त्र परिधान करून उपासना करणाऱ्या मोठ्या लोकसमुदायाला पाहतो हे किती उचित आहे! (प्रकटीकरण ७:९-१४) या अवनत जगात त्यांना कसेही वागवण्यात आले असले तरी, जोपर्यंत ते ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवतात तोपर्यंत यहोवा त्यांना स्वच्छ आणि शुद्ध असे लेखतो ही खात्री ते बाळगू शकतात. ते विश्वास कसा प्रदर्शित करतात? येशूच्या पावलांवर पाऊल ठेवण्याद्वारे व खंडणी बलिदानावर पूर्ण भरवसा ठेवण्याद्वारे.—१ पेत्र २:२१.
१०, ११. लाक्षणिक नदीचा एक महत्त्वपूर्ण पैलू काय आहे व याचा नदीचा होत असलेल्या प्रचंड विस्ताराशी कसा संबंध येतो?
१० आधीच उल्लेख केल्याप्रमाणे, या लाक्षणिक पाण्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण पैलू आहे—ज्ञान. पुनर्स्थापित इस्राएलमध्ये, यहोवाने याजकगणाकरवी शास्त्रवचनांचे प्रशिक्षण देऊन आपल्या लोकांना आशीर्वादित केले. (यहेज्केल ४४:२३) तुलनात्मकरीतीने, यहोवाने ‘राजकीय याजकगणाकरवी’ आज आपल्या लोकांना आपल्या वचनाच्या सत्याविषयी भरपूर प्रशिक्षण देऊन आशीर्वादित केले आहे. (१ पेत्र २:९) या शेवटल्या दिवसांत, यहोवा देव, मानवजातीबद्दलचे त्याचे उद्देश आणि खासकरून येशू ख्रिस्त व त्याचे मशिही राज्य यांच्याबद्दलचे ज्ञान सतत वाढत जाणाऱ्या झऱ्याप्रमाणे वाहत आहे. आपल्याला प्रचंड जलप्रलयाप्रमाणे मिळणारा हा आध्यात्मिक तजेला किती भव्य आहे!—दानीएल १२:४.
११ देवदूताने माप घेतलेली नदी जशी खोल होत गेली तसेच यहोवाकडून येणारे जीवनप्रद आशीर्वाद नाट्यमयरीत्या वाढले आहेत ज्यामुळे आपल्या धन्य आध्यात्मिक देशात येणाऱ्या लोकांना राहता येते. पुनर्स्थापनेविषयीच्या आणखी एका भविष्यवाणीने असे भाकीत केले: “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” (यशया ६०:२२) हे शब्द खरे ठरले आहेत—लाखो लोक झुंडीच्या झुंडीने आपल्याबरोबर शुद्ध उपासनेसाठी एकत्र आले आहेत! जे यहोवाकडे वळतात अशा सर्वांसाठी त्याने मुबलक “पाणी” उपलब्ध केले आहे. (प्रकटीकरण २२:१७) आपली पार्थिव संघटना संपूर्ण जगभरात शेकडो भाषांत बायबल आणि बायबल आधारित प्रकाशने यांचे वितरण करीत आहे याकडे तो लक्ष देत आहे. शिवाय, संपूर्ण जगभरात ख्रिस्ती सभा आणि अधिवेशने आयोजली जातात जेणेकरून सर्वांना सत्याचे स्फटिकासारखे शुद्ध पाणी मिळेल. या तरतुदींचा लोकांवर काय परिणाम झाला आहे?
पाणी जीवन देते!
१२. (अ) यहेज्केलच्या दृष्टान्तातील झाडे इतक्या अद्भुतरित्या फळे, पाने का उत्पन्न करू शकतात? (ब) ही फलदायी झाडे या शेवटल्या दिवसांत कोणाला चित्रित करतात?
१२ यहेज्केलच्या दृष्टान्तातील नदी जीवन आणि आरोग्य देते. नदीच्या तीरावर वाढणाऱ्या झाडांबद्दल यहेज्केलला समजते तेव्हा त्याला सांगण्यात येते: “त्यांची पाने वाळणार नाहीत; त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही . . . त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील.” ही झाडे इतक्या अद्भुतरित्या फळे, पाने का उत्पन्न करू शकतात? “कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे.” (यहेज्केल ४७:१२ब) ही लाक्षणिक झाडे येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर मानवजातीला पुन्हा परिपूर्ण करण्याकरता असलेल्या देवाच्या सर्व तरतुदींना चित्रित करतात. यावेळी पृथ्वीवर अभिषिक्त शेष आध्यात्मिक पोषण पुरवण्यात व बरे करण्याच्या कामात पुढाकार घेतात. सर्व १,४४,००० जणांना त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ मिळाल्यावर ख्रिस्ताबरोबर सहराजे या नात्याने त्यांच्या याजकीय सेवांतून मिळणारे लाभ भवितव्यातही, आदामाच्या मृत्यूवर पूर्णपणे विजयी होईपर्यंत मिळत राहतील.—प्रकटीकरण ५:९, १०; २१:२-४.
१३. आपल्या काळात बरे करण्याचे कोणते काम पूर्ण झाले आहे?
१३ दृष्टान्तातील नदी निर्जीव मृत समुद्राला जाऊन मिळते आणि जेथे जेथे ती पोहंचते तेथे तेथे ती सर्वांना बरे करते. हा समुद्र आध्यात्मिक मृत अवस्थेला चित्रित करतो. “ही महानदी जाईल तेथेतेथे” सर्व काही जिवंत होते. (यहेज्केल ४७:९) तसेच आज या शेवटल्या दिवसांत हे जीवनाचे पाणी जेथे जेथे पोहंचले आहे तेथे तेथे लोक आध्यात्मिकरीत्या जिवंत झाले आहेत. सर्वात पहिले जे पुनः जिवंत झाले ते १९१९ मधील अभिषिक्त शेष होते. मृतवत, निष्क्रिय स्थितीतून ते आध्यात्मिकरीत्या जिवंत झाले. (यहेज्केल ३७:१-१४; प्रकटीकरण ११:३, ७-१२) हे मौल्यवान पाणी आध्यात्मिकरीत्या मृत असलेल्या इतरांपर्यंत पोहंचले व ते जिवंत झाले आणि त्यांचा दुसऱ्या मेंढरांचा वाढत जाणारा मोठा लोकसमुदाय बनला जो यहोवावर प्रेम करून त्याची सेवा करतो. लवकरच ही तरतूद कोट्यवधी पुनरुत्थित जणांपर्यंतही पोहंचेल.
१४. मृत समुद्राच्या किनाऱ्यावरील भरभराटीस आलेला मत्स्योद्योग उचितरीत्या आज कशाला चित्रित करतो?
१४ आध्यात्मिकरीत्या जिवंत झाल्यामुळे उत्पादनही वाढते. याचे उदाहरण, पूर्वी मृत असलेल्या समुद्रावर भरभराटीस आलेल्या मत्स्योद्योगावरून पाहायला मिळते. येशू आपल्या अनुयायांना म्हणाला: “मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” (मत्तय ४:१९) या शेवटल्या दिवसांत, ही मासेमारी तेव्हा सुरू झाली जेव्हा अभिषिक्त लोकांच्या शेष जनांना एकत्र करण्याची सुरवात झाली; पण ही मासेमारी तिथेच थांबली नाही. यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरातून येणारे हे जीवनप्रदायक पाणी, ज्यात अचूक ज्ञानाचाही समावेश होतो, सर्व राष्ट्रांतील लोकांवर प्रभाव पाडते. नदी जेथेजेथे पोहंचली आहे तेथेतेथे सर्व आध्यात्मिकरीत्या जिवंत झाले आहे.
१५. सर्वच जण जीवनासाठी असलेल्या देवाच्या तरतुदींचा स्वीकार करणार नाहीत हे कशावरून दिसते व अशा लोकांचे शेवटी काय होईल?
१५ अर्थातच, आज सर्वच लोक जीवनाच्या संदेशाला अनुकूल प्रतिसाद देत नाहीत; किंवा ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान पुनरूत्थित झालेले देखील देणार नाहीत. (यशया ६५:२०; प्रकटीकरण २१:८) देवदूत म्हणतो, की समुद्राचे काही भाग बरे झाले नाहीत. ही दलदलीची, निर्जीव ठिकाणे ‘खारटच’ राहतील. (यहेज्केल ४७:११) आपल्या दिवसांत, यहोवाचे जीवन देणारे पाणी ज्यांना दिले जाते ते सर्वच लोक ते स्वीकारणार नाहीत. (यशया ६:१०) हर्मगिदोनमध्ये, आध्यात्मिकरीत्या मृत आणि निर्जीव स्थितीत राहू इच्छिणारे सर्व खारटच राहतील म्हणजे त्यांचा कायमचा नाश केला जाईल. (प्रकटीकरण १९:११-२१) पण, हे पाणी विश्वासूपणे पिणारे बचावाची व या भविष्यवाणीची शेवटली पूर्णता पाहण्याची आशा बाळगू शकतात.
परादीसमध्ये नदी वाहते
१६. यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्ताची शेवटली पूर्णता केव्हा आणि कशी होईल?
१६ पुनर्स्थापनेविषयीच्या इतर भविष्यवाणींप्रमाणे, यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्ताची शेवटली पूर्णता हजार वर्षीय राजवटीदरम्यान होईल. तेव्हा याजक वर्गाचे कोणीही पृथ्वीवर नसतील. “ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर [स्वर्गात] एक हजार वर्षे राज्य करितील.” (प्रकटीकरण २०:६) हे स्वर्गीय याजक, ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचे पूर्ण लाभ प्रदान करताना त्याच्याबरोबर असतील. अशाप्रकारे मानवजात वाचवली जाईल आणि तिला परिपूर्णतेप्रत पूर्ववत आणले जाईल.—योहान ३:१७.
१७, १८. (अ) प्रकटीकरण २२:१, २ मध्ये जीवनप्रदान करणाऱ्या नदीचे वर्णन कसे करण्यात आले आहे व या दृष्टान्ताची पूर्णता होण्याची प्रमुख वेळ केव्हा आहे? (ब) परादीसमध्ये, जीवनाच्या पाण्याच्या नदीचा विस्तार का होईल?
१७ खरे तर, यहेज्केलाने पाहिलेली नदी, सर्वात गुणकारी जीवनाच्या पाण्याने वाहील. प्रकटीकरण २२:१, २ मधील भविष्यवाणी लागू होण्याची ही प्रमुख वेळ आहे; तेथे म्हटले आहे: “त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली, नगरीच्या मार्गांवरून वाहणारी, जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. नदीच्या दोन्ही बाजूस बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते दर महिन्यास आपली फळे देते, आणि त्या झाडाची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात.”
१८ हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान, सर्व आजारपण—शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक—बरे केले जातील. ही गोष्ट, त्या लाक्षणिक झाडांच्या साह्याने ‘राष्ट्रांना आरोग्य देणे’ याद्वारे चांगल्याप्रकारे चित्रित केलेली आहे. ख्रिस्त आणि १,४४,००० यांच्याद्वारे येणाऱ्या तरतुदींमुळे “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) आणि नदीचा विस्तार वाढत जाईल. तिचे पात्र विस्तारीत व खोल झाले पाहिजे जेणेकरून कोट्यवधी लोकांना कदाचित कोट्यवधी पेक्षा अधिक पुनरुत्थित जणांना तिच्यात राहता येईल व जीवनाचे हे शुद्ध पाणी पिता येईल. दृष्टान्तातील नदीने मृत समुद्राला बरे केले, नदीचे पाणी जेथे जेथे गेले तेथे तेथे सर्व जिवंत होत गेले. परादीसमध्ये, सर्व स्त्रीपुरुषांनी, त्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या खंडणी लाभावर विश्वास ठेवला तर ते पूर्णार्थाने जिवंत होतील व वारशाने मिळालेल्या आदामाच्या मृत्यूपासून ते पूर्ण बरे होतील. तेव्हा प्रकटीकरण २०:१२ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे “पुस्तके” उघडली जातील व ती अधिक समज प्रदान करतील ज्यांचा पुनरुत्थित लोकांना लाभ होईल. दुःखाची गोष्ट म्हणजे परादीसमध्येही काही जण बरे होण्यास नकार देतील. हे बंडखोर ‘खारटच’ राहतील व त्यांचा कायमचा नाश केला जाईल.—प्रकटीकरण २०:१५.
१९. (अ) परादीसमध्ये जमिनीची वाटणी कशी पूर्ण होईल (ब) परादीसमध्ये नगर कशाला चित्रित करते? (क) मंदिरापासून काही अंतरावर नगराचे स्थान असणे याचा काय अर्थ होतो?
१९ तसेच, त्याच वेळी, यहेज्केलच्या दृष्टान्ताप्रमाणे जमिनीच्या वाटणीची देखील शेवटची पूर्णता होईल. प्रत्येकाला त्याच्या हिश्श्याची जमीन मिळाल्याचे यहेज्केलाने पाहिले त्याचप्रमाणे, प्रत्येक विश्वासू ख्रिश्चन, परादीसमध्ये जमीन किंवा वतन प्राप्त करण्याची खात्री बाळगू शकतो. राहण्यासाठी स्वतःचे घर असावे आणि त्याची काळजी घेता यावी अशी जी मनीषा बाळगली जाते ती सुव्यवस्थित मार्गाने पूर्ण होईल. (यशया ६५:२१; १ करिंथकर १४:३३) यहेज्केलाने पाहिलेले नगर उचितरीत्या, नवीन पृथ्वीसाठी यहोवाने उद्देशिलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला चित्रित करते. अभिषिक्त याजक वर्गाचे कोणीही शारीरिकरूपाने मानवजातीत उपस्थित नसेल. दृष्टान्तात, नगर मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या “अधार्मिक” देशात असल्याचे चित्रित करण्यात आले आहे. (यहेज्केल ४८:१५, NW) १,४४,००० जण ख्रिस्ताबरोबर स्वर्गात राज्य करतात तेव्हा पृथ्वीवर राजाचे प्रतिनिधी असतील. त्याच्या मानवी प्रजेला अधिपती वर्गाच्या प्रेमळ मार्गदर्शनाचा व देखरेखीचा खूप लाभ मिळेल. परंतु, या सरकाराचे सिंहासन पृथ्वीवर नव्हे तर स्वर्गात असेल. पृथ्वीवरील सर्वजण ज्यात अधिपती वर्गाचा देखील समावेश होतो, मशिही राज्याच्या अधीन असतील.—दानीएल २:४४; ७:१४, १८, २२.
२०, २१. (अ) नगराचे नाव उचित का आहे? (ब) यहेज्केलच्या दृष्टान्ताबद्दल आपल्याला मिळालेल्या समजेवरून आपण स्वतःला कोणते प्रश्न विचारले पाहिजेत?
२० यहेज्केलच्या भविष्यवाणीच्या शेवटल्या शब्दांकडे लक्ष द्या: “या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.” (यहेज्केल ४८:३५) हे नगर, लोकांना शक्ती किंवा सामर्थ्य देण्यासाठी नसेल किंवा कोणाही मानवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी नसेल. ते यहोवाचे नगर आहे; हे नगर त्याचे विचार त्याचे प्रेमळ आणि वाजवी मार्ग दाखवेल. (याकोब ३:१७) यावरून आपल्याला ही उत्तेजनात्मक खात्री मिळते, की यहोवा आपल्या सुव्यवस्थित ‘नवी पृथ्वीच्या’ मानव समाजाला सदोदित आशीर्वाद देत राहील.—२ पेत्र ३:१३.
२१ आपल्यापुढे असलेल्या या आशेमुळे आपण आनंदी होत नाही का? तेव्हा, आपल्यातील प्रत्येक जण असे उचितपणे स्वतःला विचारू शकतो की: ‘यहेज्केलचा दृष्टान्त प्रकट केलेल्या अद्भुत आशीर्वादांना मी कसा प्रतिसाद देतो? प्रेमळ पर्यवेक्षक, अभिषिक्त शेष आणि अधिपती वर्गाचे भावी सदस्य करत असलेल्या कार्याला मी विश्वासूपणे सहकार्य देत आहे का? शुद्ध उपासनेला मी माझ्या जीवनाचा केंद्र बनवले आहे का? आज विपुल मात्रेत वाहणाऱ्या जीवनाच्या पाण्याचा मी पूर्ण लाभ घेत आहे का?’ आपल्यातील प्रत्येक जण असे करीत राहो व चिरकालासाठी यहोवाच्या तरतुदींत आनंद मानो!
[तळटीपा]
a ही खोऱ्यातील नदी किद्रोन ओहोळाला सूचित करू शकते; तो ओहोळ आग्नेयपासून म्हणजे जेरुसलेमहून सुरू होऊन मृत समुद्रात समाप्त होतो. ओहोळाचा शेवटचा भाग संपूर्ण वर्षभर निर्जल आणि कोरडा असतो.
b मे १, १८८१ आणि जून १, १९८१ चे इंग्रजीतील टेहळणी बुरूज अंक पाहा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ मंदिरातून वाहणारे पाणी कशाला चित्रित करते?
◻ लाक्षणिक पाण्याद्वारे यहोवाने कोणते बरे करण्याचे काम साध्य केले आहे व या नदीचा विस्तार का झाला आहे?
◻ नदीच्या तीरावरील झाडे कोणाला चित्रित करतात?
◻ नगर, हजार वर्षांच्या राजवटीदरम्यान कशाला चित्रित करील व नगराचे नाव उचित का आहे?
[२३ पानांवरील चित्रं]
जीवनाची नदी तारणासाठी असलेल्या देवाच्या तरतुदींना सूचित करते