देवाच्या मंदिराकडे ‘चित्त लाव!’
“मानवपुत्रा, . . . मी तुला जे काही दाखवितो त्या सर्वांकडे चित्त लाव; . . . तू जे पाहशील ते सर्व इस्राएल घराण्यास सांग.”—यहेज्केल ४०:४.
१. सा.यु.पू. ५९३ मध्ये देवाचे निवडलेले लोक कोणत्या अवस्थेत होते?
वर्ष होते, सा.यु.पू. ५९३; इस्राएलच्या बंदिवासाचे १४ वे वर्ष. बॅबिलोनमध्ये राहणाऱ्या यहुद्यांना, आपला प्रिय स्वदेश अतिशय दूर वाटत असावा. बहुतेकांनी जेव्हा शेवटच्या वेळी जेरूसलेमला पाहिले तेव्हा ते आगीच्या झोतात होते, त्यातील मजबूत भिंती भुईसपाट झाल्या होत्या, दिमाखाने उभ्या असलेल्या इमारती कोसळल्या होत्या. यहोवाच्या मंदिराचे—जे एके काळी शहराचे शोभायमान मुकुट होते, संपूर्ण पृथ्वीवर शुद्ध उपासनेचे मुख्य केंद्र होते—त्याचे तुकडे तुकडे झाले होते. इस्राएलच्या बंदिवासाचे आणखी पुष्कळ दिवस बाकी होते. अभिवचनानुसार त्यांची सुटका व्हायला अजून ५६ वर्ष बाकी होती.—यिर्मया २९:१०.
२. जेरूसलेममधील देवाच्या मंदिराच्या आठवणींनी यहेज्केल दुःखी का झाला असावा?
२ शेकडो किलोमीटर दूर देवाचे मंदिर ओसाड पडले असेल, जंगली प्राण्यांचे ते वसतीस्थान झाले असेल असा विचार करूनच विश्वासू संदेष्टा यहेज्केल दुःखी झाला असेल. (यिर्मया ९:११) त्याचा पिता, बूजी तेथे याजक म्हणून सेवा करीत होता. (यहेज्केल १:३) यहेज्केललासुद्धा हा सुहक्क मिळाला असता, पण सा.यु.पू. ६१७ मध्ये जेव्हा तो अजूनही तरुण होता तेव्हा जेरूसलेमच्या उमरावांबरोबर त्यालाही पकडून नेण्यात आले होते. आता, तो सुमारे ५० वर्षांचा होता. यहेज्केलला बहुधा हे माहीत असावे, की तो पुन्हा कधीच जेरूसलेम पाहणार नाही किंवा जेरूसलेममधील मंदिराच्या बांधकामात त्याला कोणताही भाग मिळणार नाही. म्हणूनच, यहेज्केलला भव्य मंदिराचा दृष्टान्त पाहायला मिळाला तेव्हा त्याला किती धन्य वाटले असावे!
३. (अ) मंदिराबद्दलच्या यहेज्केलच्या दृष्टान्ताचा हेतू काय होता? (ब) दृष्टान्ताचे चार मुख्य पैलू कोणते आहेत?
३ यहेज्केलच्या पुस्तकातील नऊ अध्याय या विस्तृत दृष्टान्ताचे वर्णन देतात. ते बंदिस्त यहुद्यांना, त्यांचा विश्वास मजबूत करणारे एक अभिवचन देतात. शुद्ध उपासनेची पुनर्स्थापना होणार होती! तेव्हापासून आजपर्यंतच्या शतकांत हा दृष्टान्त यहोवावर प्रेम करणाऱ्या सर्वांना उत्तेजन देतो. ते कसे? यहेज्केलच्या भविष्यसूचक दृष्टान्ताचा बंदिस्त इस्राएलांसाठी कोणता अर्थ होता याचे आपण परीक्षण करून पाहू या. या दृष्टान्ताचे चार पैलू आहेत: मंदिर, याजकगण, अधिपती आणि देश.
पुनर्स्थापित मंदिर
४. यहेज्केलला सुरवातीला दृष्टान्त दाखवण्याकरता कोठे नेले जाते, तो तेथे काय पाहतो व कोण त्याला सर्व फिरवून दाखवतो?
४ पहिल्यांदा, यहेज्केलला “एका अतिशयित उंच पर्वतावर” नेले जाते. या पर्वतावर दक्षिणेकडे, तटबंदी असलेल्या शहराप्रमाणे एक भले मोठे मंदिर आहे. ‘पितळासारखे स्वरूप’ असलेला एक देवदूत यहेज्केलला मंदिराच्या परिसराचा कानाकोपरा दाखवण्यासाठी नेतो. (यहेज्केल ४०:२, ३) दृष्टान्तात यहेज्केल पाहतो, की देवदूत तीन द्वारांचे आणि चौकींचे, बाहेरील अंगणाचे, आतील अंगणाचे, खोल्यांचे, एका वेदीचे, मंदिराच्या गाभाऱ्याचे, आणि पवित्र व परम पवित्रस्थानांचे काळजीपूर्वक माप घेतो.
५. (अ) यहोवा यहेज्केलास कोणती खात्री देतो? (ब) मंदिरातून काढणे जरूरीचे होते असे ‘राजांची प्रेते’ काय होती व हे महत्त्वपूर्ण का होते?
५ मग, स्वतः यहोवा दृष्टान्तात प्रकट होतो. तो मंदिरात प्रवेश करतो व यहेज्केलला खात्री देतो की तो तेथे वास करील. पण, तो आपले घर शुद्ध करायला सांगतो. तो म्हणतो: “आता त्यांनी आपला व्यभिचार व त्यांच्या राजांनी स्थापिलेल्या प्रेतवत मूर्ती मजपासून दूर घालवाव्या, मग मी त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहीन.” (यहेज्केल ४३:२-४, ७, ९) हे उघड आहे, की ‘त्यांच्या राजांच्या प्रेतांनी’ मूर्तींना सूचित केले. जेरूसलेमच्या बंडखोर शासकांनी व लोकांनी, देवाचे मंदिर मूर्तींनी दूषित केले होते; खरे तर त्यांना त्यांनी आपले राजे केले होते. (पडताळा आमोस ५:२६.) या मूर्त्या, जिवंत देव किंवा राजे तर नव्हत्या, उलट त्या मृत आणि यहोवाच्या नजरेत घृणित वस्तू होत्या. त्यांना काढून टाकणे जरुरीचेच होते.—लेवीय २६:३०; यिर्मया १६:१८.
६. मंदिराच्या मोजण्याने काय सूचित केले?
६ दृष्टान्ताच्या या भागाचा काय अर्थ होता? हाच, की देवाच्या मंदिरात शुद्ध उपासनेची पूर्णपणे पुनर्स्थापना होईल अशी बंदिस्तांना खात्री दिली जात होती. शिवाय, मंदिराचे मोजमाप एक ईश्वरी शाश्वती होती की हा दृष्टान्त नक्कीच पूर्ण होणार होता. (पडताळा यिर्मया ३१:३९, ४०; जखऱ्या २:२-८.) सर्व प्रकारची मूर्तिपूजा काढली जाणार होती. यहोवा पुन्हा आपले घर आशीर्वादित करणार होता.
याजकगण आणि अधिपती
७. लेवी आणि याजक यांच्याबद्दल कोणती माहिती देण्यात आली आहे?
७ याजकगणाचे देखील शुद्धीकरण व्हायचे होते. मूर्तिपूजेच्या आहारी गेल्याबद्दल लेवीयांची कानउघाडणी करायची होती; पण, सादोकाच्या याजकीय वंशजाची प्रशंसा करायची होती आणि शुद्ध राहिल्याबद्दल त्यांना प्रतिफळ द्यायचे होते.a तरीसुद्धा, दोन्ही गटांना देवाच्या पुनर्स्थापित घरात सेवा करण्यास मिळणार होते, पण तेही व्यक्तिगत रूपात त्यांच्या विश्वासूपणावर अवलंबून होते. शिवाय, यहोवाने अशी आज्ञा दिली: “त्यांनी माझ्या लोकांस शिक्षण द्यावे; पवित्र काय व सामान्य काय, शुद्ध काय व अशुद्ध काय, यांचा भेद त्यांस त्यांनी दाखवून द्यावा.” (यहेज्केल ४४:१०-१६, २३) म्हणजे, याजकपदाची पुनर्स्थापना होणार होती तसेच त्यांच्या विश्वासू सहनशीलतेचे प्रतिफळही त्यांना दिले जाणार होते.
८. (अ) प्राचीन इस्राएलात अधिपती कोण होते? (ब) यहेज्केलच्या दृष्टान्तातील अधिपती शुद्ध उपासनेत सक्रिय कसा होता?
८ हा दृष्टान्त अधिपतीचा देखील उल्लेख करतो. मोशेच्या दिवसांपासून त्या राष्ट्रात अधिपती होते. अधिपती यासाठी असलेला नासी हा इब्री शब्द एखाद्या घराण्याच्या, वंशाच्या, किंवा राष्ट्राच्या प्रमुखाला सूचित होऊ शकतो. यहेज्केलच्या दृष्टान्तांत, वर्ग या नात्याने इस्राएलच्या शासकांची कानउघाडणी केली जाते कारण त्यांनी लोकांवर जुलूम केले; त्यांना निपक्षपाती आणि न्याय्य असण्याचा सल्ला दिला जातो. अधिपती हा याजक वर्गाचा नसला तरी, एका प्रमुख मार्गाने शुद्ध उपासनेत सक्रिय असतो. गैरयाजकीय वंशजांबरोबर बाहेरील अंगणात त्याची ये-जा असते, पूर्वेकडील द्वाराच्या देवडीत तो बसतो आणि वाहण्यासाठी लोकांना काही अर्पणे देतो. (यहेज्केल ४४:२, ३; ४५:८-१२, १७) अशाप्रकारे, या दृष्टान्ताने यहेज्केलच्या लोकांना खात्री दिली, की पुनर्स्थापित राष्ट्राला अनुकरणीय पुढारी मिळतील; हे असे लोक असतील जे देवाच्या लोकांना संघटित करण्याकरता याजकांना पाठबळ देतील आणि आध्यात्मिक गोष्टीत स्वतः उत्तम उदाहरण मांडतील.
देश
९. (अ) जमिनीची वाटणी कशी व्हायची होती, पण कोणाला तिचा हिस्सा मिळणार नव्हता? (ब) समर्पित अंश काय होते व त्यात काय होते?
९ शेवटी, यहेज्केलच्या दृष्टान्तांत इस्राएल देशाचे संक्षिप्त वर्णन देखील आहे. प्रत्येक वंशाला एक एक हिस्सा ह्याप्रमाणे त्याची वाटणी होणार होती. यात अधिपतीला देखील एक हिस्सा मिळणार होता. परंतु याजकांना मिळणार नव्हता कारण यहोवा म्हणतो: “मी त्यांचे वतन आहे.” (यहेज्केल ४४:१०, २८; गणना १८:२०) दृष्टान्तानुसार, अधिपतीच्या हिश्श्याची जमीन, समर्पित अंश संबोधलेल्या दोन्ही भागाच्या एका बाजूला होती. ही जमीन चौकोनी आकाराची होती जिचे तीन पट्ट्यात विभाजन करण्यात आले होते; वरील पट्टा पश्चात्तापी लेवीयांसाठी होता, मधला पट्टा याजकांसाठी आणि सर्वात खालचा पट्टा शहरासाठी आणि सुपीक जमिनीसाठी होता. यहोवाचे मंदिर चौकोनी अंशाच्या मध्यभागी म्हणजेच याजकांच्या पट्ट्यात होते.—यहेज्केल ४५:१-७.
१०. बंदिस्त यहुद्यांसाठी जमिनीच्या वाटणीसंबंधीच्या भविष्यवाणीचा काय अर्थ होता?
१० हे सर्व ऐकून बंदिस्त यहुद्यांना किती उत्तेजन मिळाले असावे! प्रत्येक कुटुंबाला जमीनाचा हिस्सा मिळेल अशी खात्री देण्यात आली होती. (पडताळा मीखा ४:४.) तेथे शुद्ध उपासनेला उच्च, केंद्रिय स्थान मिळणार होते. याचीही नोंद घ्या, की यहेज्केलच्या दृष्टान्तात अधिपतीसुद्धा याजकांप्रमाणेच लोकांनी देणगी म्हणून दिलेल्या जमिनीवर राहणार होते. (यहेज्केल ४५:१६) म्हणजेच, या पुनर्स्थापित देशात, यहोवाने ज्यांना पुढाकार घेण्यासाठी नेमले होते त्यांच्या कार्यात लोकांनी मदत करायचे होते, त्यांच्या मार्गदर्शनाला सहकार्य देऊन त्यांना आधार द्यायचा होता. एकूण, हा देश संघटना, सहकार्य आणि सुरक्षितता यांचा नमुना होता.
११, १२. (अ) यहोवाने त्याच्या लोकांना, तो त्यांच्या पुनर्स्थापित स्वदेशावर आशीर्वाद देईल याची खात्री कशी देतो? (ब) नदीच्या तीरावरील झाडे कशाला चित्रित करतात?
११ यहोवा त्यांच्या देशावर आशीर्वाद देणार होता का? भविष्यवाणी एका प्रोत्साहक वर्णनातून या प्रश्नाचे उत्तर देते. मंदिरातून एक झरा वाहतो; पुढे तो झरा विस्तारत जातो आणि मृत समुद्रापाशी पोहंचेपर्यंत त्या झऱ्याचे रूपांतर नदीत होते. तेथे ती नदी निर्जीव पाण्याला पुन्हा जिवंत करते आणि समुद्रकिनाऱ्यावर दूरपर्यंत मत्स्योद्योगाची भरभराट होते. नदीच्या तीरावर पुष्कळ झाडे आहेत जी वर्षभर फळांनी लगडलेली असून ती पौष्टिक आणि औषधी असतात.—यहेज्केल ४७:१-१२.
१२ या अभिवचनाने, बंदिस्तांना प्रिय वाटणाऱ्या पूर्वीच्या पुनर्स्थापनेविषयीच्या भविष्यवाण्यांची पुनरुक्ती केली आणि खात्री पटवली. अनेक वेळा, यहोवाच्या ईश्वरप्रेरित संदेष्ट्यांनी, परादीसीय स्थितीतील पुनर्स्थापित, पुनः वसलेल्या इस्राएलचे वर्णन केले होते. ओसाड प्रदेश जिवंत होतात हा भविष्यसूचक विषय पुनःपुन्हा येत होता. (यशया ३५:१, ६, ७; ५१:३; यहेज्केल ३६:३५; ३७:१-१४) यास्तव, जीवन प्रदान करणाऱ्या यहोवाचे आशीर्वाद पुनर्स्थापित मंदिरातून एका नदीप्रमाणे वाहतील अशी अपेक्षा लोक करू शकत होते. परिणामतः, आध्यात्मिकरीत्या मृत असलेले एक राष्ट्र पुन्हा जिवंत होणार होते. पुनर्स्थापित लोकांना, खास आध्यात्मिक पुरुष लाभणार होते; हे असे पुरुष होते जे धार्मिक आणि स्थिर होते. ते, दृष्टान्तातील त्या नदीच्या तीरावरील झाडांप्रमाणे होणार होते, जे नाश झालेल्या देशाचे पुनः बांधकाम करण्यात पुढाकार घेतात. यशया देखील ‘धार्मिकतेच्या वृक्षांबद्दल’ बोलला होता जे “पुरातन काळची मोडतोड बांधून काढितील.”—यशया ६१:३, ४.
दृष्टान्ताची पूर्णता केव्हा होते?
१३. (अ) यहोवाने कोणत्या अर्थाने त्याच्या पुनर्स्थापित लोकांना ‘धार्मिकतेच्या वृक्षांनी’ आशीर्वादित केले? (ब) मृत समुद्राविषयीची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?
१३ घरी परतणारे बंदिवान निराश होते का? मुळीच नाही. पुनर्स्थापित शेष सा.यु.पू. ५३७ मध्ये आपल्या प्रिय स्वदेशी परतला होता. काही समयानंतर, “धार्मिकतेचे वृक्ष”—जसे की, शास्त्री एज्रा, संदेष्ट्ये हाग्गय आणि जखऱ्या आणि महायाजक यहोशवा—यांच्या मार्गदर्शनाखाली केव्हा पासून उजाड पडलेली स्थाने पुन्हा बांधण्यात आली. नहेम्या आणि जरुब्बाबेल यांसारख्या अधिपतींनी निःपक्षपातीपणे आणि न्याय्याने शासन केले. यहोवाच्या मंदिराची पुनर्स्थापना झाली होती व जीवनासाठी असलेल्या त्याच्या तरतुदी, अर्थात त्याच्या करारानुसार जगल्याने मिळणारे आशीर्वाद पुन्हा वाहू लागले. (अनुवाद ३०:१९; यशया ४८:१७-२०) यापैकी एक आशीर्वाद म्हणजे, ज्ञान. याजकगण पुन्हा आपली कामगिरी पार पाडू लागला आणि त्यांनी लोकांना नियमशास्त्राचे प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. (मलाखी २:७) यामुळे, मृत समुद्र जसा बरा झाला व त्याच्या किनाऱ्यावरचा मत्स्योद्योग जसा भरभराटीस आला त्याप्रमाणे लोक आध्यात्मिकरीत्या पुन्हा जिवंत झाले, पुन्हा एकदा यहोवाचे फलदायी सेवक बनले.
१४. यहुदी बॅबिलोनहून बंदिवासातून परत आल्यानंतर जे घडले यावरच यहेज्केलच्या भविष्यवाणीची पूर्णता का होत नाही?
१४ यहेज्केलच्या दृष्टान्ताची केवळ इतकीच पूर्णता होती का? नाही; आणखी पुष्कळ गोष्टींना तो सूचित करतो. विचार करा: यहेज्केलने पाहिलेले मंदिर, वर्णन केल्याप्रमाणे बांधणे शक्य नव्हते. हे खरे आहे की यहुद्यांनी दृष्टान्ताकडे गांभिर्याने पाहिले आणि त्यातील काही गोष्टी अक्षरशः लागू पण केल्या.b पण, दृष्टान्तातील ते संपूर्ण मंदिर खूप मोठे असून, पहिल्या मंदिराचे स्थान अर्थात मोराय पर्वतावर बसण्याइतके नव्हते. शिवाय, यहेज्केलचे मंदिर शहरात नव्हते तर एका दुसऱ्या ठिकाणी जरा दूरवर होते; तर, दुसरे मंदिर पहिल्या मंदिराच्याच ठिकाणी, जेरूसलेममध्येच बांधण्यात आले होते. (एज्रा १:१, २) तसेच, जेरूसलेमच्या मंदिरातून कोणतीही नदी वाहत नव्हती. म्हणजे, प्राचीन इस्राएलने यहेज्केलच्या भविष्यवाणीची केवळ एक लहानशी पूर्णता पाहिली. यावरून असे सूचित होते, की या दृष्टान्ताची एका मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक पूर्णता असली पाहिजे.
१५. (अ) यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराचे कार्य केव्हापासून सुरू झाले? (ब) यहेज्केलच्या दृष्टान्ताची पूर्णता ख्रिस्त पृथ्वीवर होता तेव्हा झाली नाही हे कशावरून सूचित होते?
१५ स्पष्टपणे, आपण यहेज्केलच्या दृष्टान्तातील यहोवाच्या महान आध्यात्मिक मंदिराच्या मुख्य पूर्णतेकडे पाहिले पाहिजे; याचेच विस्तारीत वर्णन प्रेषित पौल इब्री लोकांस पुस्तकात करतो. या मंदिराचे कार्य, येशू ख्रिस्त जेव्हा सा.यु. २९ मध्ये महायाजक म्हणून अभिषिक्त झाला तेव्हापासून सुरू झाले. पण यहेज्केलच्या दृष्टान्ताची पूर्णता येशूच्या दिवसात झाली का? नक्कीच नाही. येशूने महायाजक या नात्याने, आपला बाप्तिस्मा, यज्ञरूपी मृत्यू आणि परमपवित्र स्थानात अर्थात स्वर्गात प्रवेश करण्याद्वारे प्रायश्चित दिवसाचा भविष्यसूचक अर्थ पूर्ण केला. (इब्री लोकांस ९:२४) पण एक गोष्ट आस्थेची आहे, की यहेज्केलच्या दृष्टान्तात महायाजक किंवा प्रायश्चित दिवसाचा एकदाही उल्लेख नाही. तेव्हा हा दृष्टान्त सा.यु. पहिल्या शतकाकडे लक्ष वेधत होता हे असंभाव्य आहे. मग, कोणत्या काळाला तो लागू होतो?
१६. यहेज्केलच्या दृष्टान्तातील दृश्य आपल्याला आणखी कोणत्या भविष्यवाणीची आठवण करून देते व हे आपल्याला यहेज्केलच्या दृष्टान्ताच्या मुख्य पूर्णतेचा काळ समजण्यास कशी मदत करते?
१६ उत्तरासाठी आपण दृष्टान्ताचाच पुन्हा विचार करू या. यहेज्केलने लिहिले: “त्याने दिव्य दृष्टांताच्या द्वारे मला इस्राएल देशात नेऊन एका अतिशयित उंच पर्वतावर ठेविले; त्यावर दक्षिणेस नगराच्या आकारासारखे काही होते.” (यहेज्केल ४०:२) या दृष्टान्ताचे दृश्य, अर्थात ‘उंच पर्वत’ आपल्याला मीखा ४:१ ची आठवण करून देतो; तेथे म्हटले आहे: “शेवटल्या दिवसात असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील.” ही भविष्यवाणी केव्हा पूर्ण झाली? मीखा ४:५ दाखवते, की राष्ट्रे अजूनही खोट्या दैवतांची उपासना करत असताना या भविष्यवाणीच्या पूर्णतेची सुरवात होईल. खरे तर, आपल्याच काळात, म्हणजे “शेवटल्या दिवसात” शुद्ध उपासनेला उंचावण्यात आले आहे, देवाच्या सेवकांच्या जीवनात, उचित स्थानी ती पूर्ववत झाली आहे.
१७. यहेज्केलच्या दृष्टान्तातील मंदिराचे शुद्धीकरण केव्हा झाले ते समजण्यास मलाखी ३:१-५ आपली मदत कशी करते?
१७ ही पुनर्स्थापना कशामुळे शक्य झाली? यहेज्केलच्या दृष्टान्तातील सर्वात महत्त्वपूर्ण घटनेत यहोवा मंदिरात येतो व आपले घर मूर्तीपूजेपासून स्वच्छ करण्याचा आग्रह करतो. देवाचे आध्यात्मिक मंदिर केव्हा स्वच्छ करण्यात आले? मलाखी ३:१-५ मध्ये, यहोवा एक काळ भाकीत करतो जेव्हा तो ‘करार घेऊन येणाऱ्या निरोप्यासह’ अर्थात येशू ख्रिस्तासह “आपल्या मंदिरात येईल.” त्याचा उद्देश? “तो धातु गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा” असेल. या शुद्धीकरणाची सुरवात पहिल्या महायुद्धाच्या समयादरम्यान झाली. याचा परिणाम काय झाला? यहोवा आपल्या घरात राहिला आहे आणि १९१९ पासून पुढे तो आपल्या लोकांच्या आध्यात्मिक देशाला आशीर्वाद देत आला आहे. (यशया ६६:८) यावरून मग आपण असा निष्कर्ष काढू की यहेज्केलच्या मंदिराच्या भविष्यवाणीची महत्त्वपूर्ण पूर्तता शेवटल्या दिवसांदरम्यान होईल.
१८. मंदिराच्या दृष्टान्ताची शेवटची पूर्णता केव्हा होईल?
१८ पुनर्स्थापनेविषयीच्या इतर भविष्यवाणींप्रमाणे, यहेज्केलच्या दृष्टान्ताची आणखीन एक पूर्णता, शेवटची पूर्णता परादीसमध्ये होईल. फक्त तेव्हाच, प्रामाणिक अंतःकरणाच्या मानवजातीला देवाच्या मंदिराच्या व्यवस्थेचे पूर्ण लाभ प्राप्त होतील. तेव्हा ख्रिस्त १,४४,००० या आपल्या स्वर्गीय याजकगणासह आपल्या खंडणी बलिदानाचे मूल्य लागू करील. ख्रिस्ताच्या शासनाखालील सर्व आज्ञाधारक मानवी प्रजेला परिपूर्णतेप्रत नेले जाईल. (प्रकटीकरण २०:५, ६) परंतु, परादीस, यहेज्केलच्या दृष्टान्ताच्या पूर्णतेचा प्रमुख समय नसेल. का नाही?
दृष्टान्त आपल्या दिवसाकडे लक्ष केंद्रित करतो
१९, २०. दृष्टान्ताची प्रमुख पूर्णता परादीसमध्ये नव्हे तर आज का झाली पाहिजे?
१९ यहेज्केलने एक मंदिर पाहिले ज्याला मूर्तीपूजा आणि आध्यात्मिक व्याभिचार यांपासून स्वच्छ करायचे होते. (यहेज्केल ४३:७-९) हे निश्चित परादीसमधील यहोवाच्या उपासनेला लागू होऊ शकत नाही. शिवाय, दृष्टान्तातील याजक, अजूनही पृथ्वीवरच असलेल्या अभिषिक्त याजकीय वर्गाला सूचित करतात; स्वर्गामध्ये त्यांचे पुनरुत्थान झाल्यावर किंवा हजार वर्षीय राजवटीदरम्यान नाही. का नाही? याजक आतील अंगणात सेवा करत असल्याचे दाखवण्यात आले आहे, याकडे लक्ष द्या. टेहळणी बुरूज अंकातील पूर्वीच्या लेखांत असे सांगण्यात आले होते, की हे अंगण, ख्रिस्ताच्या दुय्यम याजकांच्या अद्वितीय आध्यात्मिक भूमिकेला चित्रित करते; आणि तेही ते अजूनही पृथ्वीवरच आहेत तेव्हाच्या त्यांच्या भूमिकेला चित्रित करते.c हेही पाहा, की तो दृष्टान्त याजकांच्या अपरिपूर्णतेवर जोर देतो. त्यांना त्यांच्या पापांसाठी अर्पणे वाहावयास सांगण्यात आले आहे. त्यांना, आध्यात्मिकरीत्या आणि शारीरिकरीत्या अशुद्ध होण्याच्या धोक्याची ताकीद दिली जाते. तेव्हा, ते पुनरुत्थित अभिषिक्त लोकांना चित्रित करत नाहीत; त्यांच्याविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील.” (तिरपे वळण आमचे.) (१ करिंथकर १५:५२; यहेज्केल ४४:२१, २२, २५, २७) दृष्टान्तातील याजक लोकांबरोबर मिसळतात व थेटपणे त्यांची सेवा करतात. पण परादीसमध्ये असे होणार नाही कारण तेव्हा याजक वर्ग स्वर्गात असेल. यास्तव, हा दृष्टान्त आपल्याला अभिषिक्त लोक आज पृथ्वीवरील ‘मोठ्या लोकसमुदायाच्या’ किती जवळून कार्य करीत आहेत त्याचे उत्तम चित्र देतो.—प्रकटीकरण ७:९; यहेज्केल ४२:१४.
२० अशाप्रकारे, मंदिराबद्दल यहेज्केलचा दृष्टान्त, आज पूर्ण होत असलेल्या आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या हितकारक परिणामांना सूचित करतो. पण याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो? हा दृष्टान्त म्हणजे एक दुर्बोध वेदांतीय कोडे नव्हे. केवळ एकच खरा देव यहोवा याची आपण दररोज करत असलेल्या उपासनेशी या दृष्टान्ताचा पुष्कळ संबंध आहे. ते कसे हे आपण पुढील लेखात पाहू या.
[तळटीपा]
a यामुळे यहेज्केलला हायसे वाटले असेल, कारण असे म्हटले जाते की तो स्वतःच सादोकच्या याजकीय कुटुंबातला होता.
b जसे की, प्राचीन मिशना म्हणतो, की पुनर्स्थापित मंदिरात वेदी, मंदिराची दु-फळी दारे आणि स्वयंपाक करण्याच्या जागा, यहेज्केलच्या दृष्टान्ताला जुळतील अशाचप्रकारे बांधण्यात आल्या होत्या.
c टेहळणी बुरूज जुलै १, १९९६, पृष्ठ १६; डिसेंबर १, १९७२, (इंग्रजी) पृष्ठ ७१८ पाहा.
तुम्हाला आठवते का?
◻ मंदिर आणि याजकगण यांच्याबद्दलच्या यहेज्केलच्या दृष्टान्ताची पहिली पूर्णता काय होती?
◻ जमिनीच्या वाटणीबद्दल यहेज्केलच्या दृष्टान्ताची पहिली पूर्णता कशी झाली?
◻ प्राचीन इस्राएलच्या पुनर्स्थापनेत विश्वासू अधिपती कोण होते व “धार्मिकतेचे वृक्ष” कोण होते?
◻ यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्ताची प्रमुख पूर्णता शेवटल्या दिवसांत का झाली पाहिजे?