वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ३/१ पृ. १३-१८
  • आजचे ‘मंदिर’ आणि ‘अधिपती’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आजचे ‘मंदिर’ आणि ‘अधिपती’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मंदिर आणि तुम्ही
  • विश्‍वासू याजकगण
  • अधिपती—तो कोण आहे?
  • आज देवाच्या लोकांचा देश
  • देवाच्या मंदिराकडे ‘चित्त लाव!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • “हाच मंदिराचा कायदा आहे”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • “मंदिराचं वर्णन करून सांग”
    शेवटी संपूर्ण जगात यहोवाची शुद्ध उपासना!
  • यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग २
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ३/१ पृ. १३-१८

आजचे ‘मंदिर’ आणि ‘अधिपती’

“ते प्रवेश करीत असता अधिपतीने त्यांच्यात मिसळून आत यावे; ते बाहेर जातानाहि त्याने त्यांच्याबरोबर जावे.”—यहेज्केल ४६:१०.

१, २. कोणते प्रमुख सत्य आपल्याला, यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्ताचा अर्थ समजण्यास मदत करते?

काही प्राचीन रब्बी, यहेज्केलच्या पुस्तकाबाबत समाधानी नव्हते. टॅलमूडनुसार, पवित्र शास्त्राच्या अधिकृत यादीतूनच हे पुस्तक खोडून टाकण्याचा काहीजण विचार करीत होते. विशेषकरून मंदिराचा दृष्टान्त समजायला अवघड वाटत होता व म्हणून त्यांनी, हा दृष्टान्त मानवी समजेपलिकडे आहे असे जाहीर करून टाकले. इतर बायबल विद्वान यहोवाच्या मंदिराविषयी असलेल्या यहेज्केलच्या दृष्टान्ताबद्दल गोंधळून गेले आहेत. आपल्याबद्दल काय?

२ शुद्ध उपासनेची पुनर्स्थापना झाल्यापासून, यहोवाने आपल्या लोकांना पुष्कळ आध्यात्मिक समजेची माहिती देऊन आशीर्वादित केले आहे; यात, देवाचे आध्यात्मिक मंदिर म्हणजे शुद्ध उपासनेसाठी असलेली यहोवाची मंदिरासमान व्यवस्था आहे, या समजेचाही समावेश होता.a हे प्रमुख सत्य आपल्याला यहेज्केलच्या मंदिराच्या दृष्टान्ताचा पुष्कळसा अर्थ समजण्यास मदत करते. या दृष्टान्ताच्या चार पैलूंचे, मंदिर, याजकगण, अधिपती आणि देश, यांचे आपण जरा जवळून परीक्षण करून पाहू या. आज यांचा काय अर्थ होतो?

मंदिर आणि तुम्ही

३. मंदिराचे उंच छप्पर आणि प्रवेशद्वाराच्या भिंतीवर कोरलेले चित्र यांवरून आपण काय शिकतो?

३ असे समजा की आपण दृष्टान्तातील हे मंदिर फिरून पाहत आहोत. आपण सात पायऱ्‍या चढून भल्या मोठ्या एका द्वाराजवळ जातो. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण भयचकीत होतो. त्याचे छप्पर ३० मीटर पेक्षा अधिक उंच आहे! यावरून आपल्याला आठवण होते, की उपासनेसाठी असलेल्या यहोवाच्या व्यवस्थेतील दर्जे किती उच्च आहेत. खिडक्यांतून येणाऱ्‍या प्रकाशाच्या किरणांमुळे भिंतींवर कोरलेली खजुरीची झाडे चमकू लागतात. शास्त्रवचनांत, धार्मिकतेला चित्रित करण्याकरता खजुरीच्या झाडांचा उपयोग करण्यात आला आहे. (स्तोत्र ९२:१२; यहेज्केल ४०:१४, १६, २२) हे पवित्र स्थान नैतिकरीत्या व आध्यात्मिकरीत्या धार्मिक असलेल्यांसाठी आहे. या अनुषंगाने, आपण धार्मिक राहू इच्छितो जेणेकरून आपली उपासना यहोवा स्वीकार करील.—स्तोत्र ११:७.

४. मंदिरात प्रवेश करण्यास कोणास मनाई केली जाते व यावरून आपण काय शिकतो?

४ येण्या-जाण्याच्या मार्गाच्या प्रत्येक बाजूला तीन चौक्या आहेत. चौकीदार आपल्याला मंदिरात प्रवेश करू देतील का? यहोवा यहेज्केलास सांगतो, की ‘मनाने बेसुंती असलेल्या’ कोणाही विदेशीला आत जाण्यास मनाई आहे. (यहेज्केल ४०:१०; ४४:९) याचा काय अर्थ होतो? देव केवळ अशाच उपासकांचा स्वीकार करतो जे त्याच्या नियमांवर प्रेम करतात व त्यांनुसार जगतात. (यिर्मया ४:४; रोमकर २:२९) अशांचे तो आपल्या आध्यात्मिक मंडपात, उपासनेच्या त्याच्या घरात स्वागत करतो. (स्तोत्र १५:१-५) १९१९ मध्ये जेव्हापासून शुद्ध उपासनेची पुनर्स्थापना झाली आहे, तेव्हापासून यहोवाच्या पार्थिव संघटनेने त्याचे नैतिक नियम उंचावून धरले आहेत व त्यांचे अधिकाधिक स्पष्टीकरण दिले आहे. हेतुपुरस्सर अवज्ञा करणाऱ्‍यांना त्याच्या लोकांबरोबर सहवास राखण्याची परवानगी नाही. आज, अपश्‍चात्तापी पातक्यांना बहिष्कृत करण्याच्या बायबल आधारित प्रथेमुळे आपली उपासना निर्मळ आणि शुद्ध राहते.—१ करिंथकर ५:१३.

५. (अ) यहेज्केलचा दृष्टान्त आणि प्रकटीकरण ७:९-१५ मधील योहानाचा दृष्टान्त यात कोणत्या साम्यता आहेत? (ब) यहेज्केलच्या दृष्टान्तात बाहेरील अंगणात उपासना करणारे १२ वंश कोणाला चित्रित करतात?

५ येण्या-जाण्याच्या मार्गातून आत गेल्यावर बाहेरील अंगण लागते जेथे लोक यहोवाची उपासना आणि स्तुती करतात. यावरून आपल्याला योहानाच्या दृष्टान्तातील “मोठा लोकसमुदाय” आठवतो जो “अहोरात्र” यहोवाची सेवा करतो. दोन्ही दृष्टान्तांत खजुरीची झाडे दाखवण्यात आली आहेत. यहेज्केलच्या दृष्टान्तात प्रवेशद्वाराच्या भिंतींवरील या खजुरीच्या झाडांमुळे प्रवेशद्वार उठून दिसते. योहानाच्या दृष्टान्तात, उपासकांच्या हातात खजुरीच्या झावळ्या आहेत; यावरून, यहोवाची उपासना करण्यात आणि त्यांचा राजा म्हणून येशूचे स्वागत करण्यात त्यांना होणारा आनंद चित्रित होतो. (प्रकटीकरण ७:९-१५) यहेज्केलच्या दृष्टान्ताच्या संदर्भात, इस्राएलाचे १२ वंश “दुसरी मेंढरे” यांना चित्रित करतात. (योहान १०:१६; पडताळा लूक २२:२८-३०.) तुम्हीही, यहोवाच्या राज्याची घोषणा करण्याद्वारे त्याची स्तुती करण्यात आनंद प्राप्त करणाऱ्‍यांपैकी एक आहात का?

६. बाहेरील अंगणातील खोल्या कशासाठी होत्या व यावरून दुसऱ्‍या मेंढरांच्या कोणत्या विशेषाधिकारांची आपल्याला आठवण होते?

६ बाहेरील अंगण फिरून पाहताना आपण ३० खोल्या पाहतो; येथे लोक त्यांची स्वेच्छिक अर्पणे सेवन करत असतात. (यहेज्केल ४०:१७) आज, दुसऱ्‍या मेंढरांतील लोक पशुबली अर्पण करत नाहीत; पण आध्यात्मिक मंदिरात रिकाम्या हातानेही येत नाहीत. (पडताळा निर्गम २३:१५.) प्रेषित पौलाने लिहिले: “त्याचे नाव पत्करणाऱ्‍या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे [येशूद्वारे] देवाला नित्य अर्पण करावा. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका; कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो.” (इब्री लोकांस १३:१५, १६; होशेय १४:२) अशी अर्पणे यहोवाला वाहणे मोठा विशेषाधिकार आहे!—नीतिसूत्रे ३:९, २७.

७. मंदिराचे माप घेतले जाते यावरून आपल्याला कोणती खात्री मिळते?

७ एक देवदूत दृष्टान्तातील मंदिराचे माप घेत असताना यहेज्केल त्याच्याकडे पाहतो. (यहेज्केल ४०:३) तसेच, प्रेषित योहानाला सांगण्यात आले होते: “ऊठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्‍यांचे माप घे.” (प्रकटीकरण ११:१) माप घेण्याचा काय अर्थ होतो? दोन्ही बाबतीत, शुद्ध उपासनेसंबंधी असलेले यहोवाचे उद्देश पूर्ण होण्यापासून कोणतीही गोष्ट यहोवाच्या आड येऊ शकत नाही याची ती एक खात्री किंवा चिन्ह होते. तसेच आज, आपण ही खात्री बाळगू शकतो, की काहीही—मग तो शक्‍तिशाली सरकारांकडून आलेला कडा विरोध जरी असला तरी—शुद्ध उपासनेच्या पुनर्स्थापनेच्या आड येऊ शकत नाही.

८. आंतील अंगणातील दारातून कोण प्रवेश करतात व या फाटकांवरून आपल्याला कशाची आठवण होते?

८ आपण बाहेरील अंगणातून पुढे चालत जातो तेव्हा आपल्याला आतील अंगणात जाणारे तीन द्वार दिसतील; आतील द्वार बाहेरील द्वारांच्या अगदी समोर व त्यांच्याच आकाराचे आहेत. (यहेज्केल ४०:६, २०, २३, २४, २७) फक्‍त याजकांनाच आतील अंगणात प्रवेश करण्याची परवानगी आहे. अभिषिक्‍त लोकांनी ज्या ईश्‍वरी दर्जांनुरुप व नियमांनुरुप असले पाहिजे तेच दर्जे व नियम सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांना मार्गदर्शन देतात याची आठवण आपल्याला आतील द्वारांवरून होते. पण याजकांचे काय काम आहे व याचा आज काय अर्थ होतो?

विश्‍वासू याजकगण

९, १०. यहेज्केलच्या दृष्टान्तातील याजकीय वर्गाला चित्रित करणाऱ्‍या ‘राजकीय याजकगणाने’ आध्यात्मिक प्रशिक्षण कसे दिले आहे?

९ ख्रिस्त-पूर्व काळांत, याजकांना मंदिरात खूप काही करावे लागत असे. बलीपशूंचा वध करणे, वेदीवर त्यांना चढवणे आणि सहयाजकांपुढे व लोकांपुढे ते ठेवणे हे खूप कष्टाचे काम होते. पण त्यांना इतरही महत्त्वाची कामे होती. याजकांविषयी यहोवाने आज्ञा दिली: “त्यांनी माझ्या लोकांस शिक्षण द्यावे; पवित्र काय व सामान्य काय, शुद्ध काय व अशुद्ध काय, यांचा भेद त्यांस त्यांनी दाखवून द्यावा.”—यहेज्केल ४४:२३; मलाखी २:७.

१० अभिषिक्‍त लोकांनी, एक गट, “राजकीय याजकगण” या नात्याने शुद्ध उपासनेसाठी जे कष्टाचे व नम्र कार्य केले आहे त्याची तुम्ही कृतज्ञता बाळगता का? (१ पेत्र २:९) प्राचीन काळच्या लेवी याजकगणाप्रमाणे त्यांनी आध्यात्मिक शिक्षण देण्यात, देवाच्या नजरेत शुद्ध व स्वीकारयोग्य काय आहे व काय नाही ते लोकांना समजावण्यात पुढाकार घेतला आहे. (मत्तय २४:४५) बायबल आधारित प्रकाशने, ख्रिस्ती सभा आणि अधिवेशने यांच्याद्वारे येणाऱ्‍या अशाप्रकारच्या शिक्षणाने लाखो लोकांना देवाशी समेट करायला मदत केली आहे.—२ करिंथकर ५:२०.

११. (अ) यहेज्केलच्या दृष्टान्ताने याजकांच्या शुद्धतेच्या महत्त्वावर कसा जोर दिला? (ब) शेवटल्या दिवसांत, अभिषिक्‍त लोकांना एका आध्यात्मिक अर्थाने शुद्ध कसे करण्यात आले?

११ परंतु, याजकांनी फक्‍त लोकांना शुद्ध राहायला शिकवायचे नव्हते तर त्यांनी स्वतः देखील शुद्ध राहिले पाहिजे होते. म्हणूनच, यहेज्केलने इस्राएलच्या याजकगणाचे शुद्धिकरण आगाऊ पाहिले. (यहेज्केल ४४:१०-१६) तसेच, इतिहास दाखवतो, की १९१८ मध्ये, यहोवा आपल्या आध्यात्मिक मंदिरात “शुद्ध करणाऱ्‍यासारखा” बसला; अभिषिक्‍त याजकीय वर्गाला त्याने पारखले. (मलाखी ३:१-५) जे आध्यात्मिकरीत्या शुद्ध ठरले किंवा ज्यांनी पूर्वीची मूर्तीपूजा सोडून दिली त्यांना त्याच्या आध्यात्मिक मंदिरात सेवा करण्याचा सुहक्क जारी ठेवण्याची परवानगी मिळाली. तरीपण, इतरांप्रमाणे अभिषिक्‍त जनांपैकी काही आध्यात्मिकरीत्या व नैतिकरीत्या अशुद्ध होऊ शकतात. (यहेज्केल ४४:२२, २५-२७) त्यांना “जगापासून निष्कलंक” राहायला बरेच प्रयत्न करावे लागले आहेत.—याकोब १:२७; पडताळा मार्क ७:२०-२३.

१२. आपण अभिषिक्‍त लोकांच्या कामाची कृतज्ञता का बाळगली पाहिजे?

१२ आपल्यातील प्रत्येकजण स्वतःला विचारू शकतो, ‘अभिषिक्‍त लोकांनी त्यांच्या इतक्या वर्षांच्या विश्‍वासू सेवेचे आपल्यापुढे मांडलेल्या उदाहरणाची मी कृतज्ञता बाळगतो का? मी त्यांचा विश्‍वास अनुसरतो का?’ मोठ्या लोकसमुदायाच्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे शहाणपणाचे आहे, की अभिषिक्‍त त्यांच्याबरोबर पृथ्वीवर नेहमीसाठीच राहणार नाहीत. यहेज्केलच्या दृष्टान्तातील याजकांबद्दल यहोवा म्हणतो: “त्यास इस्राएलात [जमिनीचा] वाटा देऊ नये; त्यांचा वाटा मी आहे.” (यहेज्केल ४४:२८) तसेच, अभिषिक्‍त लोकांना पृथ्वीवर कायमचे स्थान नाही. त्यांना स्वर्गाचा वारसा आहे व मोठ्या लोकसमुदायाचे लोक, हे अभिषिक्‍त पृथ्वीवर आहेत तोपर्यंत त्यांना पाठिंबा देण्याचा व उत्तेजन देण्याचा सुहक्क समजतात.—मत्तय २५:३४-४०; १ पेत्र १:३, ४.

अधिपती—तो कोण आहे?

१३, १४. (अ) अधिपती दुसऱ्‍या मेंढरांतील का असला पाहिजे? (ब) अधिपती कोणाला चित्रित करतो?

१३ आता एक कुतूहलजनक प्रश्‍न येतो. अधिपती कोणाला चित्रित करतो? तो एक व्यक्‍ती आहे आणि एक गट आहे, असे दोन्ही प्रकारे त्याच्याविषयी बोलले जात असल्यामुळे तो लोकांच्या एका गटाला चित्रित करतो असे आपण गृहीत धरू शकतो. (यहेज्केल ४४:३; ४५:८, ९) पण तो आहे तरी कोण? अभिषिक्‍त जण तर निश्‍चितच नाही. दृष्टान्तात तो याजकगणाबरोबर कार्य करतो पण तो त्यांच्यापैकीचा नाही. त्याला जमिनीचा वाटा दिला जातो व यामुळे त्याला स्वर्गामध्ये नव्हे तर पृथ्वीवरील भवितव्य आहे. (यहेज्केल ४८:२१) शिवाय, यहेज्केल ४६:१० म्हणते: “ते [याजक वर्गाचे नसलेले वंश] [मंदिराच्या बाहेरील अंगणात] प्रवेश करीत असता अधिपतीने त्यांच्यात मिसळून आत यावे; ते बाहेर जातानाहि त्याने त्यांच्याबरोबर जावे.” तो आतील अंगणात प्रवेश करीत नाही तर बाहेरील अंगणात उपासना करतो, लोकांबरोबर मंदिरात ये-जा करतो. या कारणांमुळे अधिपती हा दुसऱ्‍या मेंढरांच्या मोठ्या लोकसमुदायाचाच आहे.

१४ अधिपतीला देवाच्या लोकांमध्ये काही जबाबदाऱ्‍या आहेत, हे स्पष्ट आहे. बाहेरील अंगणात तो पूर्वेकडील द्वारात बसतो. (यहेज्केल ४४:२, ३) यावरून देखरेखीचे स्थान सूचित होते; इस्राएलमधील वडील पुरुष देखील असेच शहराच्या वेशीत बसून न्याय करीत. (रूथ ४:१-१२; नीतिसूत्रे २२:२२) आज दुसऱ्‍या मेंढरांपैकी कोणाकडे देखरेखीचे स्थान आहे? पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त झालेल्या व पार्थिव आशा असलेल्या वडिलांकडे. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) यास्तव, अधिपती वर्गाच्या वडिलांसमोर नवीन जगात प्रशासकीय स्थानावर काम करण्याची आशा असल्यामुळे त्यांना आताच तयार केले जात आहे.

१५. (अ) यहेज्केलचा दृष्टान्त, मोठ्या लोकसमुदायातील वडील आणि अभिषिक्‍त याजक वर्गातील वडील यांच्यातील संबंधावर प्रकाश कसा टाकतो? (ब) अभिषिक्‍त वडिलांनी देवाच्या पृथ्वीवरील संघटनेत कसा पुढाकार घेतला आहे?

१५ परंतु, अभिषिक्‍त याजकीय वर्गाचे आणि मोठ्या लोकसमुदायाचा भाग म्हणून देखरेखीच्या स्थानावर सेवा करणाऱ्‍या अशा वडील लोकांचे आज काय नाते आहे? मोठ्या लोकसमुदायाचे सदस्य असलेल्या वडिलांची आधारभूत व दुय्यम भूमिका आहे, तर अभिषिक्‍त जन आध्यात्मिक पुढाकार घेतात असे यहेज्केलचा दृष्टान्त सुचवतो. ते कसे? लक्षात ठेवा, की दृष्टान्तातील याजकांवर, लोकांना आध्यात्मिक बाबींचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी होती. कायदेशीर बाबींत न्यायाधीश म्हणून कार्य करण्यासही त्यांना सांगण्यात आले होते. शिवाय, लेवीयांना मंदिराच्या द्वारापुढे “देखरेख्याच्या हुद्द्‌यावर” नेमण्यात आले होते. (यहेज्केल ४४:११, NW; २३, २४) स्पष्टपणे, अधिपतीला याजकांच्या आध्यात्मिक सेवेच्या व नेतृत्वाच्या अधीन राहायचे होते. तेव्हा, आधुनिक दिवसात अभिषिक्‍त जण शुद्ध उपासनेत पुढाकार घेतात हे किती उचित आहे. जसे की, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य अभिषिक्‍तांमधूनच निवडण्यात आले आहेत. हे विश्‍वासू अभिषिक्‍त वडील विकसनशील अधिपती वर्गाच्या लोकांना अनेक दशकांपासून प्रशिक्षण देत आहेत; देवाच्या येणाऱ्‍या नवीन जगात या वर्गाच्या भावी सदस्यांना त्या दिवसासाठी तयार केले जात आहे जेव्हा त्यांना पूर्ण मात्रेत अधिकार सोपवला जाईल.

१६. यशया ३२:१, २ नुसार, सर्व वडिलांनी कसे असले पाहिजे?

१६ अधिपती वर्ग म्हणून मोठ्या जबाबदाऱ्‍या मिळणाऱ्‍या भावी सदस्यांचे हे पर्यवेक्षक कशाप्रकारचे आहेत? यशया ३२:१, २ मधील भविष्यवाणी म्हणते: “पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवितील. वाऱ्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया असा तो होईल.” अभिषिक्‍त आणि दुसऱ्‍या मेंढरांतील ख्रिस्ती वडील, आपल्या कळपाला छळ आणि निरुत्साह यांसारख्या “वादळापासून” संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ही भविष्यवाणी आज पूर्ण होत आहे.

१७. ख्रिस्ती मेंढपाळांनी स्वतःला कसे लेखले पाहिजे व कळपाने त्यांना कसे लेखले पाहिजे?

१७ इब्री भाषेत एकाच अर्थाचे “सरदार” आणि “अधिपती” हे शब्द लोकांना उंचावण्याकरता वापरण्यात आलेले नाहीत. तर, त्यावरून या लोकांना देवाच्या मेंढरांची काळजी घेण्याची जबाबदारी आहे असे समजते. यहोवा कडक इशारा देतो: “इस्राएलाच्या अधिपतींनो, झाले ते पुरे; आता तुम्ही बलात्कार व जुलूम यापासून दूर राहा, न्याय व नीति यांचे पालन करा.” (यहेज्केल ४५:९) सर्व वडिलांनी हा सल्ला स्वीकारणे सुज्ञपणाचे आहे. (१ पेत्र ५:२, ३) आणि कळप हे जाणून घेतो, की येशूने या मेंढपाळांना ‘मानवरूपी देणग्या’ म्हणून देऊ केले आहे. (इफिसकर ४:८) त्यांच्या पात्रता देवाच्या ईश्‍वरप्रेरित वचनात दिल्या आहेत. (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:५-९) यास्तव, ख्रिस्ती लोक वडिलांच्या पुढाकारानुसार वागतात.—इब्री लोकांस १३:७.

१८. आज भावी अधिपती वर्गाच्या काही जबाबदाऱ्‍या काय आहेत व भवितव्यात त्यांच्या काय जबाबदाऱ्‍या असतील?

१८ बायबल काळात, काही अधिपतींकडे जास्त तर काहींकडे कमी अधिकार होता. आज, मोठ्या लोकसमुदायाच्या वडिलांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या असू शकतील. काही जण एकाच मंडळीत कार्य करतात; काही जण अनेक मंडळ्यांत प्रवासी पर्यवेक्षक म्हणून कार्य करतात; काही जण शाखा समितीचे सदस्य या नात्याने संपूर्ण राष्ट्राची सेवा करतात; काही जण नियमन मंडळाच्या विविध समितींना थेट मदत करतात. नवीन जगात येशू, यहोवाच्या उपासकांमध्ये पुढाकार घेण्यासाठी ‘पृथ्वीवर अधिपती’ नेमील. (स्तोत्र ४५:१६) यात काही शंका नाही, की आजच्या विश्‍वासू वडिलांतील बहुतेकांना तो निवडेल. आज हे पुरुष आपली पात्रता शाबीत करत असल्यामुळे भवितव्यात अर्थात, नवीन जगात तो अधिपती वर्गाच्या भूमिका प्रकट करील, तेव्हा तो त्यांना आणखी विशेषाधिकार सोपवील.

आज देवाच्या लोकांचा देश

१९. यहेज्केलच्या दृष्टान्तातील देश कशाला चित्रित करतो?

१९ यहेज्केलचा दृष्टान्त पुनर्स्थापित इस्राएल देशाचे देखील वर्णन करतो. दृष्टान्ताचा हा पैलू कशाचे प्रतिनिधीत्व करतो? पुनर्स्थापनेविषयीच्या इतर भविष्यवाण्यांनी भाकीत केले, की हा देश अर्थात इस्राएल देश एदेनासारख्या परादीसप्रमाणे बनेल. (यहेज्केल ३६:३४, ३५) आज, आपल्याला एका पुनर्स्थापित ‘देशात’ राहायला आनंद वाटतो; हा देशही एका अर्थाने एदेनासारखाच आहे. तसेच, आपण नेहमी आध्यात्मिक परादीसविषयी बोलत असतो. टेहळणी बुरूजने आपल्या ‘देशाची’ व्याख्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या “कार्याचे क्षेत्र” असे केले आहे.b यहोवाचा सेवक कोठेही असोत, तो जोपर्यंत ख्रिस्त येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याद्वारे खऱ्‍या उपासनेला उंचावून धरण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत तरी त्या पुनर्स्थापित देशात आहे.—१ पेत्र २:२१.

२०. यहेज्केलच्या दृष्टान्तातील “समर्पित अंश” यामागील तत्त्वातून आपण काय शिकू शकतो व हे तत्त्व आपण कसे लागू करू शकतो?

२० “समर्पित अंश” म्हटलेल्या जमिनीच्या तुकड्याबद्दल काय? ही, याजकगण आणि शहर यांच्यासाठी लोकांनी दिलेली देणगी होती. तसेच, ‘देशाच्या सर्व लोकांना’ अधिपतीसाठी जमिनीचा एक तुकडा देणगी म्हणून द्यायचा होता. याचा आज काय अर्थ होतो? याचा असा अर्थ होत नाही की, देवाच्या लोकांवर पगार घेणाऱ्‍या पाळक वर्गाचे ओझे लादायचे. (२ थेस्सलनीकाकर ३:८) तर, वडिलांना दिला जाणारा पाठिंबा प्रामुख्याने आध्यात्मिक आहे. यामध्ये, सध्या पूर्ण केल्या जाणाऱ्‍या कार्याला हातभार लावणे व सहकारी, अधीन राहण्याचा आत्मा दाखवणे समाविष्ट आहे. तरीपण, यहेज्केलच्या दिवसांप्रमाणे, ही देणगी, कोणा मनुष्याला नव्हे तर “परमेश्‍वराप्रीत्यर्थ” केली जाते. (तिरपे वळण आमचे.)—यहेज्केल ४५:१, ७, १६.

२१. यहेज्केलच्या दृष्टान्तात जमिनीची वाटणी होते यावरून आपण काय शिकू शकतो?

२१ या पुनर्स्थापित देशात केवळ अधिपतीला व याजकगणालाच नियुक्‍त अशी स्थाने नाहीत. देशाच्या वाटणीवरून दिसते, की १२ वंशातील प्रत्येकाला एक सुरक्षित वतन आहे. (यहेज्केल ४७:१३, २२, २३) यास्तव, मोठ्या लोकसमुदायाच्या लोकांना फक्‍त आजच आध्यात्मिक परादीसमध्ये जागा आहे असे नाही तर देवाच्या राज्यात पृथ्वीवरही त्यांना त्यांच्या हक्काची जमीन मिळेल.

२२. (अ) यहेज्केलच्या दृष्टान्तातील नगर कोणाला चित्रित करते? (ब) नगराला सर्व बाजूंनी वेशी आहेत यावरून आपण काय शिकू शकतो?

२२ शेवटी, दृष्टान्तातील नगर कशाचे प्रतिनिधीत्व करते? ती स्वर्गीय नगरी नाही, कारण ती “अधार्मिक” (अपवित्र) देशात आहे. (यहेज्केल ४८:१५-१७, NW) तेव्हा हे पृथ्वीवरीलच काहीतरी असले पाहिजे. मग, हे नगर काय आहे? यावरून, अशी कल्पना मिळत नाही का, की काही लोक गटाच्या रूपाने व्यवस्थित व संघटित राहतात? होय. म्हणूनच, नगर हे पार्थिव प्रशासनास चित्रित करते; धार्मिक पार्थिव समाजाच्या लोकांना या प्रशासनाचा लाभ प्राप्त होईल. हे प्रशासन, येणाऱ्‍या ‘नवीन पृथ्वीवर’ पूर्णपणे कार्य करील. (२ पेत्र ३:१३) नगराच्या प्रत्येक बाजूला व प्रत्येक वंशासाठी एक फाटक आहे; यावरून सर्वांना आत येण्याची मुभा असल्याचे चित्रित होते. आज, देवाचे लोक कोणत्याही गुप्त प्रशासनाखाली नाहीत. जबाबदार बांधवांनी असे असले पाहिजे की लोक त्यांच्याकडे सहज जाऊ शकतील; त्यांना लागू होणारी तत्त्वे सर्वांना माहीत असतात. सर्व वंशाचे लोक, देशात शेती करून नगर सांभाळतात या वस्तुस्थितीवरून आपल्याला आठवण करून दिली जाते, की दुसरी मेंढरे, संपूर्ण जगभरात देवाच्या लोकांसाठी केल्या जाणाऱ्‍या प्रशासकीय व्यवस्थांना आर्थिकरीतीनेसुद्धा साहाय्य करतात.—यहेज्केल ४८:१९, ३०-३४.

२३. पुढील लेखात आपण काय शिकणार आहोत?

२३ परंतु, मंदिराच्यामधून वाहणाऱ्‍या नदीबद्दल काय? ती आज आणि भवितव्यात कशाला चित्रित करते हा या शृंखलेचा तिसरा आणि शेवटला विषय असेल.

[तळटीपा]

a वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! पुस्तक, पृष्ठ ६४, परि. २२ पाहा.

b जुलै १, १९९५ चे टेहळणी बुरूज पृष्ठ २० पाहा.

उजळणीचे प्रश्‍न

◻ यहेज्केलच्या दृष्टान्तील मंदिर कशाला चित्रित करतो?

◻ मंदिरात सेवा करणारे याजक कोणाला चित्रित करतात?

◻ अधिपती वर्ग कोण आहे व त्यांच्या काही जबाबदाऱ्‍या कोणत्या आहेत?

◻ यहेज्केलच्या दृष्टान्तातील देश काय आहे व कोणत्या अर्थाने त्याची १२ वंशात वाटणी केली जाते?

◻ नगर कशाला चित्रित करते?

[Diagram/Map on page 15]

(For fully formatted text, see publication)

यहेज्केलच्या दृष्टान्तात चित्रित केल्याप्रमाणे देशाची वाटणी

बारा वंश

महासमुद्र

गालील समुद्र

यार्देन नदी

क्षार समुद्र

दान

आशेर

नफताली

मनश्‍शे

एफ्राईम

रऊबेन

यहुदा

अधिपती

बन्यामीन

शिमोन

इस्साखार

जबुलून

गाद

[Diagram]

समर्पित अंशाचा विस्तार

अ. “यहोवा स्वतः तेथे आहे” (यहोवा-शम्मा); ब. नगराची सुपीक जमीन

लेवींचा हिस्सा

यहोवाचे पवित्रस्थान

याजकांचा हिस्सा

ब अ ब

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा