अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून —देवाबरोबर चालणे
“आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.”—मीखा ४:५.
१. यहोवाला ‘युगांचा राजा’ का म्हणता येऊ शकते?
यहोवा देवाला सुरवात नव्हती. गतकाळात पाहिले तर त्याचे अस्तित्व कोठेच दिसत नसल्यामुळे त्याला उचितरीत्या “पुराणपुरुष” असे संबोधण्यात आले आहे. (दानीएल ७:९, १३) यहोवा भविष्यातही अनंतकाळ जिवंत राहील. केवळ तोच ‘युगांचा राजा’ आहे. (प्रकटीकरण १०:६; १५:३, सुबोध भाषांतर.) त्याच्या दृष्टीत, हजार वर्षे “कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.”—स्तोत्र ९०:४.
२. (अ) आज्ञाधारक मानवांसाठी देवाचा काय उद्देश आहे? (ब) आपण आपल्या आशा आणि योजना कशावर केंद्रित केल्या पाहिजेत?
२ हा जीवनदाता सनातन असल्यामुळे आदाम आणि हव्वा या पहिल्या मानवी जोडप्याला परादीसमध्ये अनंत जीवनाची आशा देऊ शकला. परंतु अवज्ञेमुळे आदामाने सार्वकालिक जीवनाचा हक्क गमावला आणि आपल्या संततीत पाप आणि मरण पसरवले. (रोमकर ५:१२) पण, आदामाच्या या बंडखोरीमुळे देवाचा मूळ उद्देश निष्फळ ठरला नाही. आज्ञाधारक मानवांनी अनंतकाळ जगावे अशी यहोवाची इच्छा आहे व तो आपला उद्देश साध्य करीलच. (यशया ५५:११) तेव्हा, अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून यहोवाची सेवा करण्यावर आपली आशा व आपल्या योजना केंद्रित करणे किती उचित आहे! आपण ‘देवाच्या दिवसाची’ सतत अपेक्षा करीत असलो तरी, देवाबरोबर अनंतकाळ चालण्याचे आपले ध्येय आहे हे आपण विसरता कामा नाही.—२ पेत्र ३:१२.
यहोवा त्याच्या नियुक्त समयी कार्य करतो
३. आपले उद्देश पूर्ण करण्याकरता यहोवाकडे एक “[नियोजित] समय” आहे हे आपल्याला कसे माहीत होते?
३ देवाबरोबर चालणारे या नात्याने आपल्याला त्याची इच्छा पूर्ण करण्याची उत्कंठा आहे. यहोवा महान टाईमकीपर आहे हे आपल्याला माहीत आहे; तो त्याच्या नियुक्त वेळी त्याचे उद्देश पूर्ण करण्यास विसरत नाही हा भरवसा आपल्याला आहे. जसे की, “काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले.” (गलतीकर ४:४) प्रेषित योहानाला सांगण्यात आले होते, की चिन्हांच्या रूपात त्याने पाहिलेल्या भविष्यसूचक गोष्टींची पूर्णता एका ‘[नियोजित] समयी’ होईल. (प्रकटीकरण १:१-३) “मृतांचा न्याय” करण्याकरता देखील एक ‘नियोजित वेळ’ आहे. (प्रकटीकरण ११:१८) देवाने “जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने” करण्याकरता “एक दिवस नेमला आहे” असे म्हणावयास प्रेषित पौलाला १,९०० पेक्षा अधिक वर्षांआधी ईश्वरप्रेरणा मिळाली.—प्रेषितांची कृत्ये १७:३१.
४. या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत करण्याची यहोवाची इच्छा आहे हे आपल्याला कसे माहीत होते?
४ आजच्या जगात यहोवाच्या नावाला दूषण लावले जात असल्यामुळे तो या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत करणार आहे. दुष्टांची भरभराट झाली आहे. (स्तोत्र ९२:७) आपल्या आचारविचारांद्वारे ते देवाचा अपमान करतात; आणि आपल्या सेवकांची होत असलेली निंदा व छळ पाहून देवाचे हृदय पिळवटून निघते. (जखऱ्या २:८) म्हणूनच तर यहोवाने सैतानाच्या संपूर्ण व्यवस्थेचा समूळ नाश करण्याचा हुकूम काढला आहे! हे निश्चितपणे केव्हा घडेल ते देवाने ठरवले आहे आणि बायबल भविष्यवाण्यांची पूर्णता दाखवून देते, की आपण आता ‘अंतसमयात’ जगत आहोत. (दानीएल १२:४) त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तो फार लवकर कार्य करणार आहे.
५. लोट आणि हबक्कूक यांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसराविषयी काय वाटत होते?
५ गत काळातील यहोवाचे सेवक दुष्टाईचा अंत पाहायला आतुर होते. धार्मिक लोट “अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला” होता. (२ पेत्र २:७) त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितींमुळे हताश झालेला संदेष्टा हबक्कूक याने विनंती केली: “हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू? तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करीत नाहीस. मला अधर्म का पाहावयास लावितोस? विपत्ति मला का दाखवितोस? लुटालूट व जुलूम माझ्यासमोर आहेत; कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.”—हबक्कूक १:२, ३.
६. यहोवाने हबक्कूकच्या प्रार्थनेच्या प्रत्त्युरात काय म्हटले व यातून आपण काय शिकू शकतो?
६ यहोवाने हबक्कूकला काहीसे असे उत्तर दिले: “हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करीत आहे, तो फसवावयाचा नाही; त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला, विलंब लागावयाचा नाही.” (हबक्कूक २:३) अशाप्रकारे देवाने सांगितले, की तो ‘नेमलेल्या समयी’ कार्य करील. आपल्याला विलंब वाटेल पण यहोवा मात्र नक्की त्याचे वचन पूर्ण करील!—२ पेत्र ३:९.
अथक आवेशाने सेवा करणे
७. यहोवाचा दिवस केव्हा येईल हे येशूला निश्चित माहीत नसले तरी त्याने आपले कार्य जारी कसे ठेवले?
७ देवाबरोबर आवेशाने चालण्याकरता, यहोवा निश्चितपणे कधी कार्य करील हे माहीत असणे जरूरीचे आहे का? नाही, तशी काही गरज नाही. काही उदाहरणांचा विचार करा. जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही देवाची इच्छा पूर्ण होईल त्या समयाची येशूला आतुरता होती. म्हणूनच तर ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना अशी प्रार्थना करायला शिकवले: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) आपली ही विनंती ऐकली जाईल हे येशूला माहीत होते पण ते केव्हा घडेल ते त्याला माहीत नव्हते. व्यवस्थीकरणाच्या अंताविषयी त्याने केलेल्या महान भविष्यवाणीत तो म्हणाला होता: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाहि नाही.” (मत्तय २४:३६) देवाचा उद्देश पूर्ण होण्यात येशू ख्रिस्ताची प्रमुख भूमिका असल्यामुळे त्याच्या स्वर्गीय पित्याच्या शत्रूंवर न्यायदंड बजावण्यात त्याचा थेट संबंध असेल. परंतु, पृथ्वीवर असताना देव केव्हा कार्य करील हे सुद्धा येशूला माहीत नव्हते. यामुळे यहोवाच्या सेवेतील त्याचा आवेश कमी झाला का? मुळीच नाही! येशूला मंदिराची स्वच्छता आवेशाने करताना पाहिले “तेव्हा ‘तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले.” (योहान २:१७; स्तोत्र ६९:९) येशूला ज्या कामासाठी पाठवण्यात आले होते त्या कामात त्याने स्वतःला मग्न ठेवले व हे काम त्याने अथक आवेशाने केले. त्यानेही अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून देवाची सेवा केली.
८, ९. राज्याच्या पुनःस्थापनेविषयी शिष्यांनी विचारणा केली तेव्हा त्यांना काय सांगण्यात आले व त्यांनी कसा प्रतिसाद दिला?
८ ख्रिस्ताच्या शिष्यांच्या बाबतीतही ही गोष्ट खरी होती. स्वर्गारोहण होण्याआधीच येशूने त्यांना भेट दिली. अहवाल सांगतो: “ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभुजी, ह्याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय?” त्यांच्या धन्याप्रमाणे तेही राज्य येण्याची आतुरतेने वाटत पाहत होते. तरीसुद्धा येशू त्यांना म्हणाला, “जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”—प्रेषितांची कृत्ये १:६-८.
९ या उत्तराने शिष्यगण निराश झाल्याचा कोणताही उल्लेख नाही. उलट, त्यांनी प्रचाराच्या कार्यात स्वतःला आवेशपूर्णरीत्या मग्न ठेवले. काही आठवड्यांतच त्यांनी आपल्या शिकवणीने जेरुसलेम भरून टाकले. (प्रेषितांची कृत्ये ५:२८) आणि ३० वर्षांच्या कालावधीत त्यांच्या प्रचाराचे कार्य इतके पसरले, की “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” सुवार्तेचा प्रचार झाला असे पौल म्हणू शकला. (कलस्सैकर १:२३) शिष्यांचा गैरसमज झाला होता, की ‘इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापन’ केले जाईल, परंतु तसे झाले नाही; शिवाय शिष्य जिवंत होते तेव्हाही ते स्वर्गात स्थापन करण्यात आले नव्हते तरी, अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून त्यांनी यहोवाची आवेशाने सेवा केली.
आपल्या हेतूंचे परीक्षण करणे
१०. सैतानाच्या व्यवस्थीकरणाचा देव केव्हा नाश करील हे माहीत नसल्यामुळे आपल्याला काय शाबीत करण्यास वाव मिळतो?
१० यहोवाच्या आधुनिक दिवसातील सेवकांनाही आजच्या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत पाहण्याची उत्सुकता आहे. परंतु, देवाच्या वचनयुक्त नवीन जगात प्रवेश मिळवणे हा आपला मुख्य हेतू नाही. आपल्याला यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण व त्याच्या सार्वभौम सत्तेचे दोषनिवारण होताना पाहायचे आहे. तेव्हा, सैतानाच्या व्यवस्थिकरणाचा नाश करण्याकरता जो ‘दिवस वा घटका’ ठरवण्यात आली आहे ती आपल्याला त्याने सांगितले नाही हे बरेच झाले. यामुळे आपण शाबीत करू शकतो, की आपण अल्पकालीक, स्वार्थी हेतुंमुळे नव्हे तर देवावर आपले प्रेम आहे म्हणून त्याच्याबरोबर अनंतकाळ चालण्याचा दृढनिश्चय केला आहे.
११, १२. ईयोबाच्या सचोटीची परीक्षा कशी घेण्यात आली व त्या परीक्षेशी आपला संबंध कसा येतो?
११ देवाबरोबर प्रामाणिक राहिल्याने आपल्याला शाबीत करता येईल की, धार्मिक ईयोब—आणि त्याच्यासारखे धार्मिक मानव—स्वार्थापोटी देवाची सेवा करतात हा दियाबलाने लावलेला आरोप चुकीचा आहे. यहोवाने जेव्हा ईयोबाला निष्कलंक, धार्मिक आणि देव-भीरू असे म्हटले तेव्हा सैतानाने दुष्टपणे आरोप केला, की “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धि पावत आहे ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.” (ईयोब १:८-११) त्याच्या परीक्षेतही सचोटी राखून ईयोबाने हा द्वेषयुक्त दावा खोटा शाबीत करून दाखवला.
१२ तसेच, आपणही सचोटी राखून, आपल्याला फार लवकर प्रतिफळ मिळणार आहे म्हणून देवाची सेवा करीत आहोत, याप्रकारच्या सैतानाच्या कोणत्याही आरोपाचे खंडन करू शकतो. दुष्टांवर देवाचा सूड नक्की केव्हा उगवणार हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण यहोवावर मनापासून प्रीती करतो व त्याच्या मार्गात अनंतकाळ चालण्याची आपली इच्छा आहे हे शाबीत करण्यासाठी आपल्याला संधी मिळते. आपण देवाशी एकनिष्ठ आहोत व तो जे काही करील ते योग्यच असेल असा आपला भरवसा आहे हेही त्यावरून दिसून येते. शिवाय, तो दिवस आणि घटका आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण सावध व आध्यात्मिकरीत्या जागृत राहतो कारण चोर जसा रात्रीच्या वेळी केव्हाही येतो तसा अंतही केव्हाही येऊ शकतो हे आपल्याला माहीत आहे. (मत्तय २४:४२-४४) नित्याने यहोवाबरोबर चालल्याने आपण त्याचे मन आनंदित करतो व त्याला टोमणा मारणाऱ्या दियाबलाला उत्तर देण्यासाठी एक संधी देतो.—नीतिसूत्रे २७:११.
अनंतकाळासाठी योजना करा!
१३. भवितव्यासाठी योजना करण्याविषयी बायबल काय सूचित करते?
१३ देवाबरोबर चालणाऱ्यांना माहीत आहे, की भवितव्यासाठी योग्य योजना बनवणे सुज्ञपणाचे आहे. उतारवयात समस्या येतील, मर्यादा येतील या जाणीवेमुळे पुष्कळ लोक आपल्या जवानीचा आणि शक्तीचा चांगला उपयोग करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून नंतर त्यांना आर्थिकरीत्या कसलीही काळजी राहणार नाही. परंतु यापेक्षा महत्त्वपूर्ण असलेल्या आपल्या आध्यात्मिक भवितव्याविषयी काय? नीतिसूत्रे २१:५ म्हणते: “उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात. जो कोणी उतावळी करितो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.” अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून पुढच्या योजना करणे खरोखरच फायदेकारक आहे. या व्यवस्थीकरणाचा अंत केव्हा येणार आहे हे आपल्याला निश्चित माहीत नसल्यामुळे भवितव्यातील आपल्या गरजांकडे आपण जरा लक्ष दिले पाहिजे. पण आपण समतोल बाळगला पाहिजे व ईश्वरी गोष्टींना आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले पाहिजे. विश्वासाची उणीव असलेले लोक म्हणतील, की आपले लक्ष देवाची इच्छा करण्यावर केंद्रित करणे म्हणजे भवितव्याचा विचार न करणे. परंतु हे तसे आहे का?
१४, १५. (अ) भवितव्यासाठी योजना करण्यासंबंधी येशूने कोणता दाखला दिला? (ब) येशूच्या दाखल्यातील धनवान मनुष्य भवितव्याचा विचार करणारा का नव्हता?
१४ याबाबतीत येशूने एक दाखला दिला जो प्रबोधनकारक आहे. तो म्हणाला: “कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, मी काय करू? कारण माझे उत्पन्न साठवावयास मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन: मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन; आणि तेथे मी आपले सर्व धान्य व माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे; विसावा घे, खा, पी, आनंद कर; परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे, ते कोणाचे होईल? जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करितो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे.”—लूक १२:१६-२१.
१५ या धनवान मनुष्याने भवितव्याचा विचार करून स्वतःसाठी धनसंचय करण्याकरता इतके कष्ट घेण्याची काही आवश्यकता नव्हती असे येशूचे तात्पर्य होते का? नाही, कारण शास्त्रवचनांमध्ये कष्टाचे काम करण्याला प्रोत्साहन दिले आहे. (२ थेस्सलनीकाकर ३:१०) या धनवान माणसाची चूक ही होती की त्याने “देवविषयक बाबतीत धनवान” होण्याकरता आवश्यक ते प्रयत्न केले नाहीत. साठवलेल्या धनाचा त्याला पुष्कळ वर्षांपर्यंत उपभोग घेता आला असता तरी एक ना एक दिवस तो मरण पावणार होता. त्याने भवितव्याचा विचार केला नाही, अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून त्याने कार्य केले नाही.
१६. सुरक्षित भवितव्यासाठी आपण पूर्ण भरवशाने यहोवावर विसंबून का राहू शकतो?
१६ अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून यहोवाबरोबर चालणे व्यावहारिक आणि दूरदर्शी आहे. भवितव्यासाठी योजना करण्याकरता तो सर्वात उत्तम मार्ग होय. शाळा, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यासंबंधाने व्यावहारिक योजना करणे सुज्ञपणाचे आहेच; पण यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकांचा त्याग करीत नाही हेही आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. दावीद राजाने गायिले: “मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.” (स्तोत्र ३७:२५) तसेच येशूने ही हमी दिली, की राज्याला प्रथम स्थान देणाऱ्यांची व यहोवाच्या धार्मिक मार्गात चालणाऱ्यांची देव काळजी घेईल.—मत्तय ६:३३.
१७. अंत जवळ आहे हे आपल्याला कसे माहीत होते?
१७ अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून आपण देवाची सेवा करीत असलो तरी, यहोवाच्या दिवसाची आपण सतत वाट पाहत आहोत. तो दिवस किती जवळ आहे याचा पुरावा बायबल भविष्यवाणीची पूर्णता किती स्पष्टपणे देते. युद्धे, रोगराई, भूकंप आणि अन्नटंचाई, खऱ्या ख्रिश्चनांचा छळ आणि देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार ही या शतकाची वैशिष्ट्ये आहेत. ही सर्व चिन्हे या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंताची चिन्हे आहेत. (मत्तय २४:७-१४; लूक २१:११) ‘स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणाऱ्या, उपकार न स्मरणाऱ्या, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणाऱ्या, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेल्या, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणाऱ्या, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणाऱ्या,’ लोकांची भरभराट झाली आहे. (२ तीमथ्य ३:१-५) या शेवटच्या कठीण दिवसांत, यहोवाचे सेवक या नात्याने जीवन जगणे अतिशय कठीण झाले आहे. यहोवाचे राज्य या वाईटाचा समूळ नाश करील त्या दिवसाची आपल्याला किती आतुरता आहे! पण तोपर्यंत आपण अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून देवाबरोबर चालत राहण्याचा दृढनिश्चय करू या.
अंतहीन जीवन दृष्टिपथात ठेवून सेवा करणे
१८, १९. प्राचीन काळच्या विश्वासू लोकांनी अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून देवाची सेवा केली हे कशावरून दिसते?
१८ यहोवाबरोबर चालत असताना आपण हाबेल, हानोख, नोहा, अब्राहाम आणि सारा यांनी दाखवलेला विश्वास लक्षात ठेवू या. त्यांचा उल्लेख केल्यावर पौलाने लिहिले: “हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ति झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहो असे पत्करले.” (इब्री लोकांस ११:१३) हे विश्वासू लोक “अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा” धरून होते. (इब्री लोकांस ११:१६) विश्वासाने त्यांनी देवाच्या मशीही राज्य शासनाखालील एका उत्तम जागेची वाट पाहिली. त्या उत्तम जागेत अर्थात पृथ्वीवरील राज्यशासनात देव त्यांना अनंतकाळच्या जीवनाचे प्रतिफळ देईल याची आपण खात्री बाळगू शकतो.—इब्री लोकांस ११:३९, ४०.
१९ संदेष्ट्या मीखाने अनंतकाळपर्यंत यहोवाची सेवा करण्याविषयी लोकांच्या दृढ निश्चयाबद्दल सांगितले. त्याने लिहिले: “सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.” (मीखा ४:५) मीखा त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत यहोवाशी एकनिष्ठ राहिला. नवीन जगात पुनरुत्थान झाल्यावर तो अनंतकाळासाठी देवाबरोबर चालत राहील यात शंका नाही. अंतसमयाच्या अगदी शेवटच्या काळात असलेल्या आपल्याकरता किती उत्तम उदाहरण!
२०. आपला दृढनिश्चय काय असला पाहिजे?
२० यहोवाच्या नावाबद्दल आपण दाखवत असलेल्या प्रीतीची तो प्रशंसा करतो. (इब्री लोकांस ६:१०) त्याला माहीत आहे, की दियाबलाचे वर्चस्व असलेल्या या जगात राहत असताना त्याच्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी आपल्याला किती कठीण जाते. “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१७; ५:१९) तेव्हा यहोवाच्या मदतीने आपण, दररोज आपल्या समोर येणाऱ्या परीक्षांचा सामना करण्याचा ठाम निश्चय करू या. आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याने वचन दिलेल्या अद्भुत आशीर्वादांवर आपण आपले विचार आणि जीवन केंद्रित करू या. अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून देवाबरोबर चालत राहिलो तर आपल्याला हे आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात.—यहूदा २०, २१.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ आज्ञाधारक मानवांबद्दल देवाचा काय उद्देश आहे?
◻ यहोवाने अद्यापही या अभक्त जगाचा अंत का केला नाही?
◻ देव केव्हा कार्य करील हे निश्चितपणे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपला आवेश कमी होण्याची आवश्यकता नाही ते का?
◻ अनंतकाळ दृष्टिपथात ठेवून देवाबरोबर चालण्याचे काही फायदे कोणते आहेत?
[१७ पानांवरील चित्र]
देवाबरोबर चालायचे आहे तर आपण ख्रिस्ताच्या आरंभीच्या शिष्यांप्रमाणे आवेशाने त्याची सेवा केली पाहिजे