वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ११/१५ पृ. २४-२७
  • मी माझ्या भावाकडून कर्ज घ्यावे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी माझ्या भावाकडून कर्ज घ्यावे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • परिणामांचा विचार करा
  • पैसे का हवेत ते सांगा
  • नोंद ठेवणे
  • पैसे उधार देण्याच्या बाबतीत सावध असा
  • विचारपूर्वक पावले उचला
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • मित्रांमध्ये आपापसांत उसने देणे आणि घेणे
    सावध राहा!—१९९९
  • मी पैसे उधार घ्यावेत का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ११/१५ पृ. २४-२७

मी माझ्या भावाकडून कर्ज घ्यावे का?

सायमनचे सर्वात धाकटे मूल खूप आजारी आहे आणि त्याच्या औषधाकरता त्याला पैशाची नितान्त गरज आहे. पण सायमनची परिस्थिती इतकी नाजूक आहे, की पैसे कोठून येतील या प्रश्‍नाने तो अस्वस्थ झाला आहे. तो आता काय करणार? मायकल हा त्याचा ख्रिस्ती बांधव आहे. त्याची आर्थिक परिस्थिती बऱ्‍यापैकी आहे. मायकल कदाचित त्याला पैसे देईलही. पण घेतलेले पैसे सायमनला परत करता येतील किंवा नाही, असा विचार सायमनच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.a

सायमन पैसे मागण्यासाठी मायकलकडे येतो तेव्हा मायकल पेचात पडतो. सायमनला पैशाची खरोखरच गरज आहे हे त्याला माहीत आहे, पण घेतलेले पैसे त्याला परत करता येतील किंवा नाही याबाबतीत त्याला जरा शंकाच वाटते कारण सायमन आपल्या मुलाबाळांना दोन वेळचं जेवणही मोठ्या कष्टाने पुरवतो. त्यामुळे मायकलसमोर प्रश्‍नचिन्ह उभे राहते.

अनेक देशांत लोकांचे रोजीरोटीचे साधन अचानक नाहीसे होते त्यामुळे औषधोपचारावर होणारा खर्च भागवण्यास त्यांच्याकडे काहीच पैसे राहत नाहीत. बँकेकडून कर्ज मिळत नाही, आणि मिळाले तरी व्याजाचा दर खिशाला परवडणारा नसतो. त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी मित्राकडे पैसे मागण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. पण पैसे मागण्यापूर्वी काही विशेष गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

परिणामांचा विचार करा

पैसे उधार देणाऱ्‍याला आणि मागणाऱ्‍याला बायबलमध्ये काही खास मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. दिलेल्या या सल्ल्याप्रमाणे चालल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतात आणि एकमेकांना टाळावे असेही त्यांना वाटत नाही.

उदाहरणार्थ, बायबल आपल्याला आठवण करून देते, की पैसे उधार मागण्याला हलकी गोष्ट समजू नये. प्रेषित पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना असे आर्जवले: “एकमेकांवर प्रीती करणे ह्‍याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका; कारण जो दुसऱ्‍यावर प्रीती करितो त्याने नियमशास्त्र पूर्णपणे पाळले आहे.” (रोमकर १३:८) सांगण्याचा मुद्दा असा, की ख्रिश्‍चनांनी केवळ प्रेमाच्या बाबतीत एकमेकांचे ऋणी असावे. यामुळे, आपण स्वतःला हा प्रश्‍न विचारू शकतो, ‘कर्ज घेतलेच पाहिजे का?’

कर्जाशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्यास त्यामुळे होणाऱ्‍या परिणामांचा विचार करणे शहाणपणाचे आहे. येशू ख्रिस्ताने हे दाखवून दिले, की महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी चांगल्याप्रकारे विचार आणि योजना करण्याची गरज असते. त्याने त्याच्या शिष्यांना विचारले: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” (लूक १४:२८) हेच तत्त्व आपण आपल्या बांधवाकडे कर्ज मागण्याचा विचार करतो तेव्हाही लागू होते. कर्ज घेण्यापूर्वी विचार करणे म्हणजे घेतलेले कर्ज केव्हा आणि कसे फेडावे याचा विचार करणे.

घेतलेले कर्ज केव्हा आणि कसे फेडले जाईल, असे कर्ज देणाऱ्‍याने विचारल्यास त्यात वावगे ते काहीच नाही. कर्जाच्या बाबींचा सर्व अंगांनी विचार करून आपल्याला त्याला योग्य ते उत्तर देता येईल. घेतलेले कर्ज ठराविक काळात परत करणे आपल्याला शक्य होईल किंवा नाही याचा आपण विचार केला आहे का? आपल्या भावाला असे म्हणणे अगदी सोपे आहे: “लवकरात लवकर मी तुमचे पैसे करत करीन. तुमचा माझ्यावर भरवसा आहे नं.” पण अशाप्रकारच्या व्यवहारांत आपण अधिक जबाबदारीने वागायला नको का? कर्ज फेडण्याचा विचार आपण ते घेतानाच केला पाहिजे कारण यहोवा आपल्याकडून हेच अपेक्षितो. स्तोत्र ३७:२१ म्हणते: “दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही.”

आपण जेव्हा या गोष्टीचा विचार करतो, की घेतलेले कर्ज आपण केव्हा आणि कसे फेडणार आहोत तेव्हा दिलेला शब्द किती गंभीर आहे याची आपल्याला जाण होते. त्यामुळे कर्ज घेण्याचे आपल्याला शक्यतो टाळता येईल. कर्ज घेण्याचे टाळल्याने आपल्याला पुष्कळ फायदे होऊ शकतात. नीतिसूत्रे २२:७ इशारा देते: “ऋणको धनकोचा दास होतो.” कर्ज देणारा आणि घेणारा हे दोघेही आध्यात्मिक भाऊ असले, तरी कर्जामुळे त्यांच्या नातेसंबंधावर काही प्रमाणात का होईना पण फरक पडतोच. कर्जांमुळे निर्माण झालेल्या गैरसमजांमुळे काही मंडळ्यांतील शांती भंग पावली आहे.

पैसे का हवेत ते सांगा

घेतलेले कर्ज केव्हा आणि कसे फेडले जाईल, असे कर्ज देणाऱ्‍याने विचारल्यास त्यात वावगे ते काहीच नाही. या कर्जाशिवाय आपण इतरांकडून पैसे उधार घेणार आहोत का? असे असल्यास आपण ज्याच्याकडून कर्ज घेत आहोत त्याला या गोष्टीची कल्पना द्यावी त्यामुळे आपल्याला कर्ज फेडता येईल किंवा नाही हे त्याला कळू शकेल.

व्यापाराकरता मागितलेले कर्ज आणि एखादा अनपेक्षित प्रसंग ओढवल्यामुळे मागितलेले कर्ज यांच्यातला फरक समजून घेणे जरूरीचे आहे. एखाद्या व्यापाराकरता पैसे देण्यास बांधव बांधील आहे, असे काही बायबलमध्ये सांगण्यात आलेले नाही, पण आपल्याकडे काही खाण्याकरता, पुरेशा कपड्यांकरता किंवा औषधे घेण्याकरताही पैसे नसले तर आपल्या बांधवाला साहजिकच मदत कराविशी वाटेल. अशाप्रकारच्या व्यवहारांत मनमोकळेपणा आणि खरेपणा असला म्हणजे आपल्याला पुष्कळ गैरसमज टाळता येतील.—इफिसकर ४:२५.

नोंद ठेवणे

पुढे होणारे गैरसमज टाळण्याचे सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे केलेल्या कराराची लेखी नोंद ठेवणे. करार हा लेखी स्वरूपात नसला म्हणजे त्यातील लहानसहान गोष्टी आठवणीत ठेवणे कठिणच असते. आपण किती पैसे उधार घेतले आहेत आणि आपण ते केव्हा परत करणार आहोत हे लिहून ठेवले पाहिजे. कर्ज देणाऱ्‍याने आणि कर्ज घेणाऱ्‍याने दोघांनी करारावर सही करावी आणि त्या दोघांकडे याची एकेक प्रत असावी. पैशाचे व्यवहार कायदेशीररीत्या लेखी स्वरूपात असावे, असे बायबल सांगते. बॅबिलोनच्या लोकांनी जेरुसलेमचा नाश करण्याच्या काही काळाआधी यहोवाने यिर्मयाला त्याच्या नातेवाईकांकडून जमीन विकत घेण्यास सांगितले. त्याने ती कशी विकत घेतली याचा विचार केल्याने आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो.

यिर्मयाने म्हटले: “मी अनाथोथातले ते शेत माझा चुलतभाऊ हानामेल याजपासून विकत घेतले व त्याला त्याचे मोल सतरा शेकेल रुपे तोलून दिले. मी खरेदीखतावर सही केली, त्यावर शिक्का मारिला व साक्षी बोलावून त्यास पैसा तोलून मोजून दिला. तेव्हा शर्ती नमूद केलेल्या खरेदीखताची एक मोहोरबंद व एक उघडी अशा नकला मी घेतल्या; आणि माझा चुलतभाऊ हानामेल याच्यासमक्ष व ज्यांनी खरेदीखतावर साक्षी घातल्या होत्या त्यांच्यासमक्ष पहारेकऱ्‍यांच्या चौकात जे यहूदी बसले होते त्या सर्वांच्या समक्ष ते खरेदीखत बारूख बिन नरीया बिन महसेया याच्या स्वाधीन केले.” (यिर्मया ३२:९-१२) या उदाहरणामध्ये कर्ज घेण्या-देण्याविषयी नव्हे, तर खरेदीविषयी सांगण्यात आले आहे. पण पैशाचे व्यवहार करताना किती चोख आणि स्पष्ट असण्यास हवे हे या उदाहरणात आपल्याला पाहता येते.—टेहळणी बुरूज, (इंग्रजी) मे १, १९७३, पृष्ठे २८७-८ पाहा.

एखादी समस्या निर्माण झाल्यास ख्रिश्‍चनांनी मत्तय १८:१५-१७ येथे येशूने दिलेल्या सल्ल्यानुसार ती सोडवण्याचा प्रयत्न करावा. एका वडिलांनी या बाबतीत मदत करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी म्हटले: “जवळजवळ प्रत्येक बाबतीत हे दिसून आले आहे, की झालेले करार हे लेखी स्वरूपात नसतात. त्यामुळे कर्ज देणाऱ्‍याला आणि घेणाऱ्‍याला याची पूर्ण कल्पना आलेली नसते, की घेतलेले कर्ज कशाप्रकारे फेडले जावे. मला असे ठामपणे म्हणावेसे वाटते, की अशाप्रकारच्या गोष्टी लेखी स्वरूपात असाव्यात. असे केल्यामुळे प्रेम दिसून येते; आपल्या भावावर आपला विश्‍वास नाही असा याचा अर्थ होत नाही.”

एकदा करार झाल्यानंतर दिलेला शब्द पाळण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिजे. येशूने आर्जवले: “तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्‍याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ५:३७) पण अचानक आलेल्या एखाद्या समस्येमुळे आपल्याला वेळेवर कर्ज फेडणे शक्य होत नसल्यास ज्याच्याकडून आपण कर्ज घेतले आहे त्या बांधवाला लागलीच कळवावे. कदाचित तो आपल्याला आणखी सवलत देईल ज्यामुळे आपल्याला त्याचे पैसे हप्त्या-हप्त्याने परत करता येतील.

अचानक समस्या आल्यास पैसे देण्यास कितीही उशीर झाला तरी चालेल असा याचा अर्थ होत नाही. कारण यहोवाची भीती बाळगणारा मनुष्य दिलेला शब्द पाळण्यासाठी त्याच्या परीने प्रयत्न करतो. (स्तोत्र १५:४) आपण जसा विचार केला होता त्याप्रमाणे गोष्टी होत नाहीत तरी कर्ज फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागत असल्यास आपण त्याकरता तयार असले पाहिजे. कारण ही आपली ख्रिस्ती जबाबदारी आहे.

पैसे उधार देण्याच्या बाबतीत सावध असा

कर्ज घेणाऱ्‍यालाच चांगल्या प्रकारे विचार करण्याची गरज असते असे नाही, तर पैसे उधार देणाऱ्‍या बांधवालाही बाबींचा सर्वांगाने विचार करण्यास हवा. पैसे उधार देण्यापूर्वी चांगल्याप्रकारे आणि डोळे उघडे ठेवून विचार करणे आपल्याकरता केव्हाही शहाणपणाचे आहे. आपण सावध राहावे असे बायबल आर्जवते, ते म्हणते: “हातांवर हात मारणारे व कर्जाला जामीन होणारे यांतला तू होऊ नको.”—नीतिसूत्रे २२:२६.

पैसे उधार मागणाऱ्‍या भावाला पैसे परत करता आले नाही तर काय होईल याचा विचार पैसे उधार देण्यापूर्वी करा. त्याला पैसे परत करता आले नाही, तर तुम्हाला पैशाची चणचण भासेल का? उसने पैसे घेतलेला भाऊ कदाचित प्रामाणिक असेल पण तरी परिस्थिती बदलण्याची किंवा त्याचा अंदाज चुकण्याची शक्यता ही असतेच. याकोब ४:१४ आपल्याला या गोष्टीची आठवण करून देते: “तुम्हाला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहा ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.”—पडताळा उपदेशक ९:११.

विशेषतः उद्योगधंद्याकरता कर्ज द्यायचे असल्यास पैसे उधार मागणाऱ्‍या भावाचा नावलौकिक कसा आहे याचा विचार करणे चांगले होईल. तो भाऊ विश्‍वासू आणि भरवसालायक आहे का किंवा त्याला पैशाचे व्यवहार हाताळता येतात का? मंडळीतील लोकांना वारंवार पैसे उधार मागण्याची त्याला सवय तर नाही ना? पुढील शब्द मनात ठेवणे उत्तम होईल: “भोळा प्रत्येक शब्दावर विश्‍वास ठेवितो; शहाणा नीट पाहून पाऊल टाकितो.”—नीतिसूत्रे १४:१५.

काही वेळा असे होते, की पैसे मागणाऱ्‍याला पैसे मिळाले तरी त्याला त्या पैशांचा लाभ होत नाही. उलट त्यावर ते ओझे होते आणि त्यामुळे तो आनंदी राहू शकत नाही. पैसे मागणाऱ्‍या बांधवाने आपले “दास” व्हावे असे आपल्याला वाटते का? या कर्जामुळे आपले संबंध पूर्वीसारखे राहू शकतील का किंवा कर्ज परत करता न आल्यास त्या बांधवाला लाजल्यासारखे वाटणार नाही का?

पैशाची खरोखरच आवश्‍यकता असल्यास, पैसे उधार देण्याऐवजी कमी का होईना पैशाच्या स्वरूपात बक्षीस देणे आपल्याला शक्य आहे का? गरजू लोकांना मदत करावी, असे शास्त्रवचन आपल्याला उत्तेजन देते. स्तोत्रकर्ता दावीद याने म्हटले: “नीतिमान उदारपणे वागतो व दान करतो.” (स्तोत्र ३७:२१) गरजू बांधवांना व्यावहारिक मदत करण्याकरता आपल्याला त्यांच्याविषयी प्रेम वाटण्यास हवे.—याकोब २:१५, १६.

विचारपूर्वक पावले उचला

कर्जामुळे समस्या उद्‌भवण्याची शक्यता असते त्यामुळे कर्जाला सहज सोपा मार्ग समजण्याऐवजी आपण त्यास अखेरचा पर्याय समजावे. आधी पाहिल्याप्रमाणे पैसे उधार मागणाऱ्‍या बांधवाने पैसे देणाऱ्‍यासोबत कोणताही आडपडदा न ठेवता बोलणी करावी आणि आपण पैसे केव्हा आणि कसे परत देऊ हे स्पष्ट लेखी स्वरूपात द्यावे. आणि जेव्हा खरोखरच एखादा आणीबाणीचा प्रसंग येतो तेव्हा बक्षीस देऊन मदत करण्यासारखा दुसरा मार्ग नाही.

सायमनने पैसे उधार मागितले तेव्हा मायकलने त्याला पैसे उधार दिले नाही. तर सायमनने त्याला मागितलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे बक्षीस म्हणून दिले. सायमनच्या मुलाची औषधे आणण्याकरता मायकलने त्याला अशाप्रकारे मदत केली तेव्हा तो फार कृतज्ञ झाला. मायकलही आनंदी होता कारण त्याला त्याच्या भावावरचे प्रेम व्यावहारिक रीतीने व्यक्‍त करता आले होते. (नीतिसूत्रे १४:२१; प्रेषितांची कृत्ये २०:३५) मायकल आणि सायमन देवाच्या राज्याची वाट पाहत आहेत कारण तेव्हा ख्रिस्त ‘दरिद्री लोकांना सोडवील’ आणि “मी रोगी आहे,” असे कोणी म्हणणार नाही. (स्तोत्र ७२:१२; यशया ३३:२४) तोपर्यंत, जेव्हा आपल्याला कोणा बांधवाकडून कर्ज घ्यावेसे वाटते तेव्हा आपण आपली पावले विचारपूर्वक उचलू या.

[तळटीपा]

a नावे बदलण्यात आली आहेत.

[२५ पानांवरील चित्र]

कर्जाचे करार लेखी स्वरूपात केल्यामुळे तुमच्या भावावर तुमचे प्रेम असल्याचे दिसून येते; तुमच्या भावावर तुमचा विश्‍वास नाही असा याचा अर्थ होत नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा