वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w98 ११/१५ पृ. ४-७
  • देवदूत तुम्हाला कशी मदत करू शकतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवदूत तुम्हाला कशी मदत करू शकतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • देवदूतांशी भेटाभेट
  • मदतीसाठी आपण देवदूतांना बोलवावे का?
  • देवाला प्रार्थना करणे
  • देवदूत आणि नीतीमूल्ये
  • रक्षक देवदूत
  • देवदूतांकडील संदेश
  • दिव्यदूत तुमच्या जीवनावर प्रभाव पाडतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • देवदूत—“परिचारक आत्मे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • देवदूत
    सावध राहा!—२०१७
  • विश्‍वासू स्वर्गदूतांसारखं वागा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
w98 ११/१५ पृ. ४-७

देवदूत तुम्हाला कशी मदत करू शकतात

देवदूत अस्तित्वात असल्याचा पुरावा देवाचे वचन देते. असे असंख्य आत्मिक प्राणी असल्याचे ते आपल्याला सांगते. यहोवा देवाचा सेवक दानीएल याला स्वर्गीय गोष्टींचा दृष्टान्त झाला तेव्हा त्याने असे लिहिले: “हजारो हजारो त्याची सेवा करीत होते आणि दहा हजार गुणित दहा हजार त्याच्या समोर उभे राहिले होते.”—दानीएल ७:१०, पं.र.भा.

दानीएलाचे पुस्तक आपल्याला केवळ त्यांच्या संख्येचीच नव्हे तर इतरही माहिती पुरवते, याची नोंद घ्या. देवदूत देवाची सेवा करतात हेही ते सांगते. ते त्याचे सेवक आहेत. याच्याच सुसंगतेत स्तोत्रकर्त्याने गायिले: “अहो परमेश्‍वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्‍न आहा आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा. अहो परमेश्‍वराच्या सर्व सैन्यांनो, जी तुम्ही त्याची सेवा करून त्याचा मनोदय सिद्धीस नेता, ती तुम्ही त्याचा धन्यवाद करा.”—स्तोत्र १०३:२०, २१.

देवदूतांनी पृथ्वीवर मानव म्हणून आपल्या जीवनाची सुरवात केली नाही असेही बायबल आपल्याला स्पष्ट करते. पृथ्वीची निर्मिती करण्याआधीच यहोवाने स्वर्गामध्ये देवदूतांची निर्मिती केली. त्याने “पृथ्वीचा पाया घातला तेव्हा” देवाच्या सर्व “देवकुमारांनी जयजयकार केला.”—ईयोब ३८:४-७.

देवदूत अदृश्‍य, शक्‍तिशाली, बुद्धिमान आत्मिक प्राणी आहेत. बायबलमध्ये, आत्मिक प्राण्यांचा उल्लेख येतो तेव्हा मलाख या इब्री शब्दाचे आणि एज्जेलोस या ग्रीक शब्दाचे भाषांतर “देवदूत” असे करण्यात आले आहे. बायबलमध्ये हे शब्द सुमारे ४०० वेळा आढळतात. दोन्हींचा एकच अर्थ होतो, अर्थात “संदेशवाहक.”

देवदूतांशी भेटाभेट

देवदूत संदेशवाहक आहेत यात काही शंका नाही. गब्रीएल देवदूताने मरीयेला भेट दिल्याचा बायबलमधील वृत्तान्त कदाचित तुम्हाला माहीतच असेल. त्याने तिला सांगितले, की ती एक कुमारिका असली तरी तिला एक पुत्र होणार होता ज्याचे नाव येशू ठेवायचे होते. (लूक १:२६-३३) शेतामध्ये असलेल्या काही धनगरांना देखील एका देवदूताने दर्शन दिले. तो त्यांना म्हणाला: “तुमच्यासाठी आज . . . तारणारा जन्मला आहे; तो ख्रिस्त प्रभु आहे.” (लूक २:८-११) तसेच, हागार, अब्राहाम, लोट, याकोब, मोशे, गिदोन, येशू आणि बायबल अहवालातील इतरांना देवदूतांनी संदेश दिले.—उत्पत्ति १६:७-१२; १८:१-५, १०; १९:१-३; ३२:२४-३०; निर्गम ३:१, २; शास्ते ६:११-२२; लूक २२:३९-४३; इब्री लोकांस १३:२.

देवदूतांनी दिलेले हे सर्व संदेश, देवाचे उद्देश पूर्ण करण्यासंबंधी होते; ज्यांना ते कळवण्यात आले त्या मानवांचे उद्देश पूर्ण करण्यासंबंधी नव्हते. देवदूत, देवाच्या इच्छेनुसार व त्याच्या वेळेनुसार त्याचे प्रतिनिधी या नात्याने प्रकट झाले. मानवांनी त्यांना नेमले नव्हते.

मदतीसाठी आपण देवदूतांना बोलवावे का?

संकटात असताना देवदूतांचा धावा करणे उचित आहे का? तसे आहे तर, आपली चांगल्याप्रकारे मदत करू शकणाऱ्‍या देवदूताचे नाव आपल्याला माहीत असले पाहिजे. काही जाहिरात पुस्तकांत अनेक देवदूतांची नावे आणि यासोबतच त्यांचे पद, पदवी आणि कर्तव्य यांची देखील यादी दिली आहे. एक पुस्तक, “स्वर्गीय टॉप टेन,” “पाश्‍चिमात्य जगात सर्वात लोकप्रिय देवदूत,” यांची माहिती देते. यादीबरोबरच सूचनाही असतात: डोळे बंद करा, देवदूताचे नाव हळूहळू पुष्कळवेळा घेत राहा, खोल श्‍वास घ्या, मंद गतीने श्‍वासोच्छ्‌वास करा आणि “त्यांच्याशी भेट होण्याच्या तयारीत असा.”

या उलट, बायबल आपल्याला देवाच्या विश्‍वासू देवदूतांपैकी केवळ दोघांचीच नावे प्रकट करते; मीखाएल आणि गब्रीएल. (दानीएल १२:१; लूक १:२६) प्रत्येक देवदूत, काल्पनिक शक्‍ती नसून नाव असलेली एक विशिष्ट व्यक्‍ती आहे हे दाखवण्यासाठी कदाचित त्यांची नावे सांगण्यात आली आहेत.

उल्लेखण्याजोगी एक गोष्ट अशी, की काही देवदूतांनी मानवांना आपले नाव सांगण्यास नकार दिला. याकोबाने जेव्हा एक देवदूताला त्याचे नाव विचारले तेव्हा त्याने ते सांगितले नाही. (उत्पत्ति ३२:२९) यहोशवाकडे आलेल्या देवदूताला आपली ओळख काय असे विचारण्यात आले तेव्हा त्याने ऐवढेच म्हटले, की तो “परमेश्‍वराचा सेनापति” होता. (यहोशवा ५:१४) शमशोनाच्या आईवडिलांनी एका देवदूताला त्याचे नाव विचारले तेव्हा तो म्हणाला: “माझे नाव अगम्य आहे तेव्हा ते तू का विचारतोस?” (शास्ते १३:१७, १८) देवदूतांची नावे प्रकट न करण्यामागे बायबलचे एक कारण आहे; देवदूतांना अनावश्‍यक आदर व उपासना देण्यापासून ते आपल्याला वाचवते. आपण पुढे पाहणार आहोत, की बायबल आपल्याला त्यांना बोलावण्याचे प्रोत्साहन देत नाही.

देवाला प्रार्थना करणे

आत्मिक क्षेत्रात काय काय चालते ते आपल्याला जितके माहीत असले पाहिजे तितके सर्व बायबल आपल्याला सांगते. प्रेषित पौलाने लिहिले: ‘प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, ह्‍याकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.’ (२ तीमथ्य ३:१६, १७) अनेक देवदूतांची नावे आपल्याला माहीत असावीत असे देवाला वाटले असते तर त्याने ती त्याचे वचन बायबल यामध्ये प्रकट केली असती. आणि प्रार्थनेद्वारे देवदूतांशी संपर्क साधून त्यांच्याशी आपण कसे बोलावे याबद्दल देवाला सूचना द्यायच्या असत्या तर त्या त्याने शास्त्रवचनांतच पुरवल्या असत्या.

उलट येशू ख्रिस्ताने शिकवले: “तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करितोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. . . . तुम्ही ह्‍या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:६, ९) शास्त्रवचनीय विचार हा आहे: आपण देवदूतांना प्रार्थना करायची नाही तर देवदूतांचाही निर्माणकर्ता अर्थात देवाला प्रार्थना केली पाहिजे. त्याचे नाव गूढ नाही, किंवा ते प्रकट करण्याकरता कोणा दृष्ट्याची देखील गरज नाही. हे ईश्‍वरी नाव लपवून ठेवण्याचे पुष्कळ प्रयत्न करण्यात आले असले तरी बायबलमध्ये ते ७००० पेक्षा अधिक वेळा आढळते. जसे की, स्तोत्रकर्त्याने आपल्या स्वर्गीय पित्याला संबोधून असे गायिले: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.”—स्तोत्र ८३:१८, पं.र.भा.

यहोवाला आपण उचितरीत्या प्रार्थना करतो तेव्हा आपली प्रार्थना ऐकण्याकरता त्याच्याकडे वेळ नसतो असे कधीच होत नाही. बायबल आपल्याला हमी देते: “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.”—२ इतिहास १६:९.

देवदूत आणि नीतीमूल्ये

प्रसारमाध्यमात दाखवले जाते तसे देवदूत लोकांचा न्याय करीत नाहीत. कारण, देवदूतांना मानवांचा न्याय करण्याचा अधिकार दिलेला नाही. यहोवा “सर्वांचा न्यायाधीश” आहे, परंतु “न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे” अर्थात येशू ख्रिस्ताकडे “सोपवून दिले आहे.” (इब्री लोकांस १२:२३; योहान ५:२२) पण आपण कसे जगतो याकडे देवदूत दुर्लक्ष करतात असे गृहीत धरणे चुकीचे ठरेल. येशू म्हणाला होता: “पश्‍चात्ताप करणाऱ्‍या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो.”—लूक १५:१०.

पण हे देवदूत केवळ बघ्याची भूमिका घेत नाहीत. गतकाळात त्यांनी, देवाचे न्यायदंड अंमलात आणणारे दंडाधिकारी या नात्याने कार्य केले. जसे की, प्राचीन ईजिप्शियनांविरुद्ध देवाने देवदूतांचा उपयोग केला. स्तोत्र ७८:४९ नुसार, “त्याने त्यांच्यावर आपला कोपाग्नि, क्रोध, रोष व संकट ह्‍या अनिष्टकारक दूतांची स्वारी सोडिली.” तसेच, एका रात्रीत फक्‍त एका देवदूताने १,८५,००० अश्‍शूरी सैनिकांना ठार मारले.—२ राजे १९:३५.

तसेच, देवाच्या धार्मिक दर्जांनुरुप स्वतःला जुळवून घेण्यास नकार देऊन इतरांच्या कल्याणाला धोका ठरणाऱ्‍यांचा देवदूत भवितव्यात नाश करतील. येशू “आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व . . . सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.”—२ थेस्सलनीकाकर १:७, ८.

अशाप्रकारे शास्त्रवचने आपल्याला दाखवून देतात, की देवाचे विश्‍वासू देवदूत, त्याच्या सूचनांचे पालन करून व त्याच्या धार्मिक दर्जांना उंचावून त्याची इच्छा नेहमी पूर्ण करतात. तेव्हा, देवाच्या देवदूतांनी आपल्याला मदत करावी असे आपल्याला वाटत असल्यास, देवाची इच्छा काय आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे व ती मनापासून पूर्ण करण्याकरता झटले पाहिजे.

रक्षक देवदूत

देवदूत लोकांची काळजी घेऊन त्यांचे संरक्षण करतात का? प्रेषित पौलाने विचारले: “ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठविलेले ते [देवदूत] सर्व परिचारक आत्मे नाहीत काय?” (इब्री लोकांस १:१४) स्पष्टपणे, पौलाच्या या प्रश्‍नाचे उत्तर होय असेच आहे.

बॅबिलोनच्या नबुखद्‌नेस्सर राजाने बनवलेल्या एका सोन्याच्या मूर्तीला दंडवत करण्याचे नाकारणाऱ्‍या शद्रख, मेशख व अबेद्‌नगो या तीन हिब्रूंना धगधगत्या अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आले. पण देवाच्या या विश्‍वासू सेवकांच्या केसालाही धक्का पोहंचला नाही. राजाने जेव्हा भट्टीत पाहिले तेव्हा त्याला “चार इसम” दिसले; आणि “चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे” आहे असे तो म्हणाला. (दानीएल ३:२५) काही वर्षांनंतर, दानीएलाच्या विश्‍वासूपणामुळे त्याला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. तोही तेथून सहीसलामत वाचला आणि म्हणाला: “माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत.”—दानीएल ६:२२.

सा.यु. पहिल्या शतकातील ख्रिस्ताच्या अनुयायांच्या मंडळीची स्थापना झाल्यावर पुन्हा एकदा देवदूत प्रकट झाले; यावेळी त्यांनी प्रेषितांना तुरुंगातून बंधमुक्‍त केले. (प्रेषितांची कृत्ये ५:१७-२४; १२:६-१२) एकदा समुद्रावर पौलाचा जीव धोक्यात होता तेव्हा एका देवदूताने त्याला हमी दिली, की तो रोममध्ये सुखरूप पोहंचेल.—प्रेषितांची कृत्ये २७:१३-२४.

यहोवा देवाच्या आधुनिक दिवसातील सेवकांना पूर्ण खात्री आहे, की देवाची ही अदृश्‍य देवदूतांची सेना वास्तविक आहे व अलीशा आणि त्याचा सेवक यांना मिळाले तसे संरक्षण ते देऊ शकतात. (२ राजे ६:१५-१७) होय, “परमेश्‍वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करितो.”—स्तोत्र ३४:७; ९१:११.

देवदूतांकडील संदेश

यहोवा देवाच्या सेवकांच्या कल्याणाची काळजी देवदूतांना तर आहेच; पण त्याशिवाय इतर लोक त्याच्याविषयी आणि त्याच्या उद्देशांविषयी शिकतील याचीही ते खात्री करतात. प्रेषित योहानाने लिहिले: “नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्‍यांस म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्‍यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला: देवाची भीति बाळगा व त्याचे गौरव करा.”—प्रकटीकरण १४:६, ७.

ही “सार्वकालिक सुवार्ता” काय आहे हे तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहे का? असल्यास, यहोवाच्या साक्षीदारांना विचारा. त्यांना तुम्हाला सांगायला आनंद वाटेल.

[७ पानांवरील चित्रं]

अंतराळाच्या मध्यभागी एक देवदूत सार्वकालिक सुवार्तेची घोषणा करत आहे. तुम्हाला त्याविषयी आणखी शिकायचे आहे का?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा