आज आशावादी असण्याकरता रास्त आधार
सन १८६६ मध्ये जन्मलेले इतिहासकार आणि समाजशास्त्रज्ञ एच. जी. वेल्स यांनी २० व्या शतकाच्या विचारसरणीवर बराच पगडा बसवला होता. विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच सुवर्णकाळ येणार आहे असे आपल्या ठाम मताचे स्पष्टीकरण त्यांनी त्यांच्या लिखाणांतून दिले. म्हणूनच, कॉलियर्स एन्सायक्लोपिडिआमध्ये, वेल्सने आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविरत काम करत असताना “अपरिमित आशावाद” दर्शवल्याचा उल्लेख आढळतो. पण ते पुढे असेही म्हणते, की दुसऱ्या महायुद्धाचा उद्रेक झाला तेव्हा त्याच्या आशावादाचा भंग झाला.
वेल्स यांना जेव्हा समजले की, “विज्ञान, चांगलेही करू शकते आणि वाईटही करू शकते, तेव्हा त्यांच्या विश्वासाला तडा गेला आणि ते निराशावादी बनले,” असे चेम्बर्स बायोग्राफिकल डिक्शनरी म्हणते. असे घडण्यामागील कारण काय?
वेल्स यांचा विश्वास आणि आशावाद पूर्णपणे मानवी साध्यतांवर आधारित होता. मानवजातीत, युटोपिया (मनोराज्य) साध्य करण्याचे सामर्थ्य नाही याची जेव्हा त्यांना जाणीव झाली तेव्हा नाईलाजास्तव ते निराशावादाकडे वळाले. आशाहीनता लागलीच निराशावादात बदलली.
आज, अशाच कारणामुळे अनेक लोकांना असाच अनुभव आला आहे. तरुण असताना ते आशावादी होऊन बुडबुड्यासारखे तरंगत असतात; पण जसजसे म्हातारे होत जातात तसतसे ते खिन्न निराशावादी होतात. असेही तरुण लोक आहेत जे, सर्वसामान्य म्हटली जाणारी जीवनशैली सोडून मादक पदार्थांचा दुरुपयोग, स्वैराचारी लैंगिक वर्तन आणि इतर हानीकारक जीवनशैली यांत बुडून जातात. याचे उत्तर काय आहे? बायबल काळांतील पुढील उदाहरणांचा विचार करा व गतकाळात, सद्यकाळात आणि भवितव्यात आशावादी होण्याचा कोणता आधार आहे का ते पाहा.
अब्राहामाच्या आशावादीवृत्तीमुळे प्रतिफळ
सा.यु.पू. १९४३ मध्ये, अब्राहामाने हारान देश सोडला, एफ्रात नदी पार करून कनान देशात प्रवेश केला. ‘विश्वास ठेवतात त्या सर्वांचा बाप’ असे अब्राहामाचे वर्णन करण्यात आले आहे; आपल्याकरता त्याने किती उत्तम उदाहरण मांडले आहे!—रोमकर ४:११.
अब्राहामाबरोबर त्याच्या भावाचा अनाथ मुलगा लोट आणि त्याचे कुटुंबही होते. नंतर, त्या देशात दुष्काळ पडला तेव्हा ही दोन्ही कुटुंबे इजिप्तला राहावयास गेली, आणि कालांतराने पुन्हाही आली. या वेळेपर्यंत, अब्राहाम आणि लोट या दोघांनी बरीच संपत्ती तसेच गुरेढोरे व कळप कमवले होते. त्यांच्या गुराख्यांमध्ये भांडण पेटले तेव्हा अब्राहामाने पुढाकार घेऊन म्हटले: “हे पाहा, माझ्यातुझ्यामध्ये, आणि माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो. सर्व देश तुला मोकळा नाही काय? तर मजपासून वेगळा हो, तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन; तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”—उत्पत्ति १३:८, ९.
अब्राहाम वडील असल्यामुळे त्याला आपल्या मर्जीनुसार निर्णय घेता येत होते आणि लोटाला आपल्या चुलत्याचा मान राखून अब्राहाम जे काही सांगेल ते कबूल करता येत होते. त्याउलट, “लोटाने आपली दृष्टि फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तो तीत सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले; परमेश्वराने सदोम व गमोरा यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा, आणि मिसर देशासारखा होता. ही यार्देनेची सर्व तळवट लोटाने आपणासाठी पसंत केली.” आता लोट आशावादी असणारच होता. पण अब्राहामाविषयी काय?—उत्पत्ति १३:१०, ११.
अब्राहाम अविचारी, आपल्या कुटुंबाचे कल्याण धोक्यात घालणारा होता का? नाही. अब्राहामाच्या सकारात्मक मनोवृत्तीमुळे व उदार आत्म्यामुळे त्याला मोठे प्रतिफळ मिळाले. यहोवा अब्राहामाला म्हणाला: “तू आहेस तेथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टि लावून पाहा; कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन.”—उत्पत्ति १३:१४, १५.
अब्राहामाच्या आशावादीवृत्तीला योग्य आधार होता. ती, देवाने त्याला दिलेल्या अभिवचनावर आधारित होती; “[अब्राहामाच्या] द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित” व्हावेत म्हणून देव त्याच्यापासून एक मोठे राष्ट्र निर्माण करणार होता असे वचन देवाने त्याला दिले. (उत्पत्ति १२:२-४, ७) ‘देवावर प्रीती करणाऱ्यांस देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात,’ हे माहीत असल्यामुळे आपणही असा विश्वास बाळगू शकतो.—रोमकर ८:२८.
दोन आशावादीवृत्तीचे हेर
चारशेपेक्षा अधिक वर्षांनंतर, “दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशांत,” म्हणजे कनान देशात प्रवेश करण्यासाठी इस्राएल राष्ट्र तयार होते. (निर्गम ३:८; अनुवाद ६:३) “त्या देशाची माहिती मिळवून कोणत्या मार्गाने . . . जावे लागेल व कोणकोणती नगरे लागतील ह्यांची . . . खबर” आणण्याची कामगिरी मोशेने १२ अधिपतींवर सोपवली. (अनुवाद १:२२; गणना १३:२) देशाच्या समृद्धतेच्या वर्णनाविषयी सर्व १२ हेरांचे एकमत होते, पण त्यांच्यातील १० जणांनी निराशजनक बातमी दिली ज्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली.—गणना १३:३१-३३.
याउलट, यहोशवा आणि कालेब या दोघांनी, लोकांना आशा ठेवण्यालायक संदेश दिला; त्यांनी त्यांच्या मनातून भीती काढण्याचा होता होईल तितका प्रयत्न केला. त्यांच्या मनोवृत्तीवरून आणि बातमीवरून, वाग्दत्त देशात त्यांना पुन्हा नेण्याविषयी यहोवाने दिलेले वचन पूर्ण करण्याचे त्याच्याजवळ सामर्थ्य आहे यावर त्यांचा पूर्ण विश्वास प्रकट झाला; पण याचा काही उपयोग झाला नाही. उलट, “सर्व मंडळी म्हणू लागली की, ह्यांना दगडमार करा.”—गणना १३:३०; १४:६-१०.
यहोवावर भरवसा ठेवण्यास मोशेने लोकांना गळ घातली; पण लोकांनी त्याचे ऐकले नाही. ते निराशवृत्तीच दाखवत राहिल्यामुळे संपूर्ण राष्ट्राला ४० वर्षांपर्यंत रानात भटकत राहावे लागले. १२ हेरांपैकी फक्त यहोशवा आणि कालेब या दोघांनाच आशावादीवृत्तीमुळे प्रतिफळ प्राप्त झाले. या लोकांची खरी समस्या काय होती बरे? त्यांच्यात विश्वासाची उणीव होती, ते आपल्याच बुद्धीवर अवलंबून होते.—गणना १४:२६-३०; इब्री लोकांस ३:७-१२.
योनाचे डळमळणे
सा.यु.पू. नवव्या शतकात योना हयात होता. तो, यराबाम दुसरा याच्या कारकीर्दीदरम्यानच्या काळात, इस्राएलच्या दहा वंश राज्याचा यहोवाचा विश्वासू संदेष्टा होता असे बायबल सूचित करते. तरीही, लोकांना इशारा देण्यासाठी निनवेला जाण्याची कामगिरी स्वीकारण्यास तो तयार नव्हता. उलट, “तेथून निसटून” याफेस जाणे बरे राहील असे त्याला वाटले, असे इतिहासकार जोसेफस म्हणतो. तेथून तो, कदाचित आजचे आधुनिक स्पेन असलेल्या तार्शिशला जाणाऱ्या जहाजात बसला. (योना १:१-३) योनाने त्याच्या नेमणुकीविषयी अशी निराशवृत्ती का अंगीकारली त्याचे कारण योना ४:२ मध्ये दिले आहे.
सरतेशेवटी योना हे कार्य पार पाडण्यास तयार झाला, पण निनवेच्या लोकांनी पश्चात्ताप केला तेव्हा मात्र त्याला राग आला. तेव्हा, तो ज्या तुंबीच्या वेलीखालच्या सावलीत आराम करीत होता तो वेल वाळवून टाकण्याद्वारे यहोवाने त्याला दयेविषयी धडा शिकवला. (योना ४:१-८) ज्या वेलीच्या वाळून जाण्यावर योना दुःख व्यक्त करीत होता, त्याऐवजी त्याने खरेतर, “उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांस कळत नाही” अशा निनवेतील १,२०,००० माणसांबद्दल दुःख व्यक्त करायला हवे होते.—योना ४:११.
योनाच्या अनुभवावरून आपण काय शिकू शकतो? पवित्र सेवेत निराशवृत्तीला स्थान नाही. यहोवाचे मार्गदर्शन समजून व पूर्ण भरवशाने त्याचे अनुसरण केल्याने आपल्याला यश मिळेल.—नीतिसूत्रे ३:५, ६.
संकटातही आशावादीवृत्ती
“दुष्कर्म्यांवर जळफळू नको; अन्याय करणाऱ्यांचा हेवा करू नको,” असे राजा दावीद म्हणाला. (स्तोत्र ३७:१) हा खरोखरच सुज्ञ सल्ला आहे कारण, आज आपण अन्यायी आणि कुटिल लोकांनी घेरलेलो आहोत.—उपदेशक ८:११.
आपण दुष्कर्म्यांचा हेवा करीत नसलो तरी, दुष्टांच्या हाती निष्पाप लोकांचे हाल होताना आपण पाहतो तेव्हा किंवा कधीकधी आपल्यावरच अन्याय होतो तेव्हा राग येणे साहजिक आहे. अशा कटू अनुभवांमुळे कदाचित आपणही हताश होऊ, निराशवृत्ती विकसित करू. असे आपल्याला वाटते तेव्हा आपण काय करावे? दुष्ट लोक, बदला कधी घेतलाच जाणार नाही असे निर्धास्तपणे गृहीत धरू शकत नाहीत हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवले पाहिजे. स्तोत्र ३७ अध्यायाच्या २ ऱ्या वचनात आपल्याला आश्वासन मिळते: “ते [दुष्ट] गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात.”
याशिवाय, आपण जे चांगले ते करीत राहू, आशावादी होऊ आणि यहोवावर विसंबून राहू. स्तोत्रकर्ता पुढे म्हणतो: “वाईटापासून दूर राहा, बरे ते कर; म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांस सोडीत नाही.”—स्तोत्र ३७:२७, २८.
खरी आशावादीवृत्ती टिकते!
मग आपल्या भवितव्याबद्दल काय? बायबलमधील प्रकटीकरणाचे पुस्तक आपल्याला “ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत” त्यांच्याविषयी सांगते. त्यांतील, युद्धाला चित्रित करणारा अग्निवर्ण घोड्यावरील स्वार “पृथ्वीवरील शांतता हरण” करणारा म्हणून प्रकट करण्यात आले आहे.—प्रकटीकरण १:१; ६:४.
पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटनमध्ये लोकप्रिय आणि आशावादी मत बाळगले जात होते, की हे सर्वात मोठे असे शेवटले युद्ध असेल. सन १९१६ मध्ये ब्रिटिश मुत्सद्दी डेव्हीड लॉईड जॉर्ज अधिक वास्तववादी होते. ते म्हणाले: “हे युद्ध, पुढील युद्धाप्रमाणे युद्धाचा नाश करणारे युद्ध आहे.” (तिरपे वळण आमचे.) त्यांचे बरोबर होते. दुसऱ्या महायुद्धापासून दुसरे काही नाही तर, प्रचंड प्रमाणात नाश करण्यासाठी आणखी क्रूर पद्धतींत वाढच झाली आहे. त्यानंतर ५० वर्षांनंतरही युद्धाचा अंत होईल असे काही चिन्ह दिसत नाही.
त्याच प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण दुसऱ्या घोडेस्वारांविषयी वाचतो जे दुष्काळ, मऱ्या आणि मृत्यूला चित्रित करतात. (प्रकटीकरण ६:५-८) ते काळाच्या चिन्हाचे पुढील पैलू आहेत.—मत्तय २४:३-८.
मग या कारणांमुळे निराशावादी व्हावे का? नाही, कारण दृष्टान्तात पुढे ‘एका पांढऱ्या घोड्याचे’ वर्णन आहे, ‘त्याच्यावर बसलेल्या स्वाराजवळ धनुष्य होते, मग त्याला मुगूट देण्यात आला; तो विजय मिळवीत मिळवीत आणखी विजयावर विजय मिळविण्यास निघून गेला.’ (प्रकटीकरण ६:२) येथे आपण येशू ख्रिस्ताला स्वर्गीय राजा म्हणून पाहतो, तो दुष्टाईचे उच्चाटन करीत विश्वात शांती आणि ऐक्य प्रस्थापित करण्यास दौड करीत आहे.a
नेमस्त राजा या नात्याने येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना राज्यासाठी प्रार्थना करण्यास शिकवले. कदाचित तुम्हालाही “हे आमच्या स्वर्गातील बापा,” किंवा प्रभूची प्रार्थना शिकवली असेल. त्या प्रार्थनेत आपण देवाचे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही त्याच्या इच्छेप्रमाणे होवो असे म्हणतो.—मत्तय ६:९-१३.
विंधून गेलेल्या सद्य व्यवस्थीकरणालाच ठिगळे जोडण्याऐवजी, यहोवा आपला मशीही राजा, ख्रिस्त येशू याच्यामार्फत त्या व्यवस्थीकरणाला पूर्णपणे काढून टाकील. त्याऐवजी, “मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करितो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत,” असे यहोवा म्हणतो. या स्वर्गीय राज्य सरकाराखाली पृथ्वी मानवजातीचे शांतीमय, आनंदी घर होईल; जीवन आणि काम यांतून नेहमीच आनंद मिळेल. यहोवा म्हणतो: “जे मी उत्पन्न करितो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा . . . माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगितील.” (यशया ६५:१७-२२) त्या अटळ अभिवचनावर तुम्ही तुमच्या भवितव्याच्या आशेचा पाया रचलात तर आता आणि चिरकालासाठी तुम्ही आशावादी होऊ शकता!
[तळटीप]
a या दृष्टान्ताच्या सविस्तर माहितीकरता, वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकातील १६ अध्याय कृपया पाहा.
[४ पानांवरील चित्र]
एच. जी. वेल्स
[Credit Line]
Corbis-Bettmann