तुम्ही आशावादी आहात की निराशावादी?
“तोउत्कृष्ट काळ होता, तो अतिशय वाईट काळ होता, . . . तो आशेचा वसंत होता, तो निराशेचा हेमंत होता, आमच्यापुढे सर्व काही होते, आमच्यापुढे काहीच नव्हते.” चार्ल्स डिकन्झ यांच्या ए टेल ऑफ टू सिटीज [दोन शहरांची कहाणी] नावाच्या सरस कादंबरीच्या आरंभीचे शब्द, आपल्या विचारसरणीवर, आपल्या भावनांवर आणि आपल्या दृष्टिकोनावर घटनांचा प्रभाव कसा पडू शकतो त्यातील फरक कुशलपणे दाखवून देतात.
येथे रंगवण्यात आलेली ती दोन शहरे फ्रेंच क्रांतीच्या दंगली दरम्यानचे लंडन आणि पॅरिस होत. १८ व्या शतकाच्या फ्रान्समधील जुलूमाखाली असलेल्या नागरिकांनी मानवी हक्कांची घोषणा ऐकली तेव्हा तो त्यांच्यासाठी “आशेचा वसंत होता.” पण, क्रांतीपूर्व फ्रान्सच्या जमान्यातील लोकांसाठी किंवा मावळत्या राजकीय व्यवस्थावाल्यांसाठी तो मृत्यू आणि नाशाप्रत नेणारा “निराशेचा हेमंत” होता.
आशावाद की निराशावाद? तुम्ही कोणत्या बाजूने उभे होता यावर ते अवलंबून होते. आणि अजूनही आहे.
आत्म-परीक्षणाचा समय
तुम्ही आशावादी आहात का? तुम्ही जीवनाची उज्ज्वल बाजू पाहता का, नेहमी चांगल्याची अपेक्षा करता का? की, तुमचा निराशावादाकडे जास्त कल आहे, तुमच्या भवितव्यातील आशेकडे तुम्ही नेहमी नकारात्मक दृष्टिकोन बाळगता, चांगल्याची आशा धरता पण अपेक्षा मात्र वाईटाची करता?
साठ वर्षांपूर्वी जेम्स ब्रांच काबल नामक एका अमेरिकी कादंबरीकाराने परस्पर विरोधात असलेल्या या दोन तत्त्वज्ञानांचा अशाप्रकारे सारांश दिला: “आम्ही सर्वात उत्तम समाजात जगत आहोत असे आशावादी म्हणत असतो; पण निराशावाद्याला ते खरे असल्यास त्याची भीती वाटत असते.” हा विचार तुम्हाला उपहासजनक वाटत असेल तर, खाली सादर केलेल्या आजच्या जगाच्या केवळ तीन पैलूंच्या सकारात्मक आणि नकारात्मक कारणांचे परीक्षण करून पाहा. मग तुमच्या प्रतिक्रियांचे परीक्षण करा आणि स्वतःस विचारा, ‘मी आशावादी आहे की निराशावादी?’
चिरस्थायी शांती: जगातील किती त्रस्त ठिकाणांची तुम्ही नावे सांगू शकता? आयर्लंड, पूर्वीचे युगोस्लाव्हिया, मध्यपूर्व, बुरुंडी, रवांडा—ही नावे चटकन आपल्या मनात येतात. चिरकालिक, विश्व शांती आणण्याकरता, या देशांतील किंवा इतर भागांतील झगडे कधी सोडवले जातील का? जग शांतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे का?
आर्थिक स्थैर्य: सन १९९९ पर्यंत द्रव्यसंबंधी संयोग होईल अशी आशा बाळगणारे युरोपीय युनियन राष्ट्रे चलनवाढ आणि पब्लिक बॉरोईंगच्या गंभीर समस्यांशी झगडत आहेत. दुसरीकडे, अनेक अमेरिकी आणि आफ्रिकी राष्ट्रांच्या आर्थिक सांगाड्याला भ्रष्टाचाराच्या किडीने खाऊन टाकले आहे, चलनवाढीच्या ओझ्याखाली ते जवळजवळ पूर्णच दबले गेले आहेत आणि जातीय समस्या अजूनही लोकांमध्ये फुटी पाडत आहेत. जागतिक आर्थिक स्थैर्य फारच जवळ आहे का?
बेकारी: सन १९९७ च्या राष्ट्रीय निवडणूकीत, ब्रिटिश चर्चेसनी, सर्व कामगार वर्गासाठी नोकरीचा विषय आपल्या कार्यसूचीत सर्वात प्रथम ठेवावा असे सर्व राजकीय पक्षांना आर्जवले. पण, जगाच्या कामगार वर्गाच्या जवळजवळ ३० टक्के लोकांना काम नसताना किंवा कमी काम असताना कायम, पूर्ण वेळेची नोकरी खासकरून तरुणांना मिळेल का?
अशावेळी निराशावादी असणे किती सोपे आहे! तरीसुद्धा, आशेचा एक किरण आहे आणि आम्ही तुम्हाला आशावादी दृष्टिकोन विकसित करणे कसे शक्य आहे त्याचा विचार करण्यास आमंत्रित करीत आहोत.
[३ पानांवरील चित्र]
फ्रेंच क्रांती
[३ पानांवरील चित्र]
जगाचा चित्रमय इतिहास नामक इंग्रजी पुस्तकातून