“सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा”
“तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या.” असे, मत्तय २८:१९ मधील येशूने दिलेल्या आज्ञेचे भाषांतर इंग्रजीतील नवे जग भाषांतर मध्ये करण्यात आले आहे. परंतु या भाषांतरावर टिकास्त्र झोडण्यात आले आहेत. जसे की, एका धार्मिक पत्रिकेने दावा केला: “ग्रीक वचनाचे केवळ एकाच प्रकारे भाषांतर करण्यात येऊ शकते व ते अशाप्रकारे आहे: ‘सर्व राष्ट्रांना शिष्य करा.’” हे खरे आहे का?
“सर्व राष्ट्रांना शिष्य करा,” असेच भाषांतर अनेक बायबल आवृत्तींमध्ये आढळते व ते ग्रीकचे शब्दशः भाषांतर आहे. तेव्हा, ‘सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा, त्यांस बाप्तिस्मा द्या,’ या वचनाला काय आधार आहे? संदर्भ. ‘त्यांस बाप्तिस्मा द्या’ ही अभिव्यक्ती राष्ट्रांना नव्हे तर लोकांना उद्देशून आहे. जर्मन विद्वान हान्स ब्रून्स म्हणतात: “‘त्यांस’ हा [शब्द], राष्ट्रांना (ग्रीक भाषा स्पष्टपणे फरक दाखवते) उद्देशत नसून राष्ट्रांतील लोकांस उद्देशून आहे.”
पुढे, येशूच्या आज्ञेचे ज्याप्रकारे पालन करण्यात आले होते त्याचाही विचार करणे आवश्यक आहे. आशिया मायनरच्या दर्बे नामक शहरातील पौल आणि बर्णबा यांच्या सेवेविषयी आपण असे वाचतो: “त्या नगराला सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया ह्या नगरात ते परत आले.” (प्रेषितांची कृत्ये १४:२१, NW) पौल आणि बर्णबाने दर्बे शहराला शिष्य बनवले नाही तर दर्बेत राहणाऱ्या काही लोकांना शिष्य बनवले याची नोंद घ्यावी.
तसेच, अंत समयाविषयी प्रकटीकरणाचे पुस्तक, सर्व राष्ट्रे देवाची सेवा करतील असे भाकीत करीत नाही तर “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांचा मिळून बनलेला . . . मोठा लोकसमुदाय” देवाची सेवा करील असे भाकीत करते. (प्रकटीकरण ७:९, NW) म्हणूनच, इंग्रजीतील नवे जग भाषांतर ‘प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेखाच्या’ विश्वसनीय भाषांतराचा खरेपणा शाबीत करते.—२ तीमथ्य ३:१६.