यहोवाच्या आशीर्वादांची तुम्ही खरी कदर बाळगता का?
केनिची नामक एक मध्यमवयीन गृहस्थ, पडशावर औषध आणण्यासाठी औषधाच्या दुकानात गेले. औषध घेतल्यावर त्यांच्या संपूर्ण अंगावर खाज सुटली आणि फोड उठले. औषध विकणाऱ्याने आपली दखल घेण्याची तसदी घेतली नव्हती अशी शंकेची पाल केनिची यांच्या मनात चुकचुकली, यात काही नवल नाही.
औषध विकणाऱ्याबद्दल केनिची यांचा जो ग्रह झाला त्याचप्रकारे काहीजण यहोवा देवाबद्दल विचार करतील. सर्वसमर्थ यहोवा देवाला आपली खरोखरच काळजी आहे की नाही याविषयी त्यांना शंका येते. देव चांगला आहे हे जरी त्यांना माहीत असले तरी, तो प्रत्येकांची व्यक्तिशः काळजी घेतो याची त्यांना खात्री नसते. त्यांच्याबाबतीत जेव्हा विपरीत गोष्टी घडतात किंवा बायबल तत्त्वांचे पालन केल्यानंतर त्यांच्यावर समस्या कोसळतात तेव्हा खासकरून ही गोष्ट खरी ठरते. त्यांच्यात समजबुद्धीची उणीव असल्यामुळे ते, त्यांच्यावर कोसळणाऱ्या समस्यांकडे, केनिची यांच्या अंगाला अचानक सुटलेली खाज आणि आलेले फोड त्यासमान पाहू लागतात जणू काय देवाचीच चूक आहे.—नीतिसूत्रे १९:३.
यहोवाची अपरिपूर्ण मानवांबरोबर तुलना करता येणार नाही. मानवांच्या ज्ञान आणि क्षमतेला सीमा आहेत. केनिची यांना औषध देणाऱ्याप्रमाणे ते इतरांच्या गरजा पूर्णपणे जाणू शकत नाहीत. याच्या उलट, कोणतीही गोष्ट यहोवाच्या नजरेतून सुटत नाही. या वस्तुस्थितीविषयी आपण अजाण असलो किंवा तिच्याबद्दल कदर बाळगत नसलो तरी, यहोवा अनेकदा आपली मदत करतो कारण आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे जास्त लक्ष देणे व आपल्याला मिळणाऱ्या अनेक आशीर्वादांकडे दुर्लक्ष करणे हा आपला स्वभावच आहे. आपण तोंड देत असलेल्या समस्यांबद्दल मागचा पुढचा विचार न करता लगेच यहोवाला दोष देण्याऐवजी, यहोवाकडून आलेले आशीर्वाद समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आशीर्वाद, याची व्याख्या “सौख्याला किंवा कल्याणाला बढावा देणारी गोष्ट” अशी करता येते. यहोवाकडून येणाऱ्या आशीर्वादांनंतरच विशेषकरून असा अनुभव येतो याची तुम्ही कदर बाळगता का?
अतुलनीय दाता
माझा पती सर्वकाही पुरवतो असे जेव्हा एखादी पत्नी म्हणते तेव्हा तिला म्हणायचे असते की, तिचा पती कुटुंबाच्या सर्व गरजा पुरेशा प्रमाणात पुरवतो, कुटुंबाच्या सौख्यासाठी व कल्याणासाठी पुरेसे अन्न, निवारा आणि कपडालत्ता पुरवतो. दाता या नात्याने यहोवा कितपत चांगला आहे? मानवाचे घर, अर्थात आपल्या पृथ्वी ग्रहाचं जवळून निरीक्षण करा. ते सूर्यापासून १५,००,००,००० किलोमीटर्स दूर आहे, हे अंतर उचित आहे ज्यामुळे पृथ्वीवरले तापमान मध्यम राहते जे पृथ्वीवर जीवन शक्य करते. आपल्या पृथ्वीचा २३.५ डिग्री कलतेपणा इतका उचित आहे की त्यामुळे विविध ऋतू येतात आणि विपुल मात्रेत कापणी होण्यास हातभार लावतात. यामुळे, पृथ्वी पाचशे कोटी पेक्षा अधिक लोकांना खाऊ घालते. यहोवा खरोखरच उत्तम दाता आहे!
याखेरीज, बायबल आपल्याला हमी देते, की यहोवाला आपल्या प्रत्येकांमध्ये आणि आपल्या प्रत्येकाच्या कल्याणामध्ये आवड आहे. विचार करा, यहोवा अब्जावधी ताऱ्यांपैकी प्रत्येकाला नावाने हाका मारतो, एकही चिमणी त्याच्या न कळत भूमीवर पडत नाही. (यशया ४०:२६; मत्तय १०:२९-३१) तर मग, त्याच्यावर प्रीती करणाऱ्या व त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने विकत घेतलेल्या मानवांची तो किती अधिक काळजी वाहतो! (प्रेषितांची कृत्ये २०:२८) अगदी उचितपणे सुज्ञ मनुष्याने म्हटले: “परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”—नीतिसूत्रे १०:२२.
समृद्ध करणारे आशीर्वाद
आपल्या सर्वांजवळ असे काहीतरी खूप मौल्यवान आहे ज्याच्याबद्दल आपण कृतज्ञ असणे आवश्यक आहे. काय आहे ते? बायबल त्याची ओळख करून देते: “सोन्यारुप्याच्या लक्षावधि नाण्यांपेक्षा तुझ्या तोंडचे नियमशास्त्र मला मोलवान आहे.” (स्तोत्र ११९:७२; नीतिसूत्रे ८:१०) चोख सोने मौल्यवान असू शकते, पण त्यापेक्षा यहोवाचे नियमशास्त्र अधिक प्रिय आहे. यहोवा, प्रांजळ सत्यशोधकांना त्याच्या नियमशास्त्राचे अचूक ज्ञान तसेच सूक्ष्मदृष्टी आणि समजबुद्धी देतो त्यांचा सांभाळ करणे आवश्यक आहे. या गोष्टी स्वतःचे संरक्षण करण्यास, कठीण परिस्थितींना तोंड देण्यास, यशस्वीरीत्या समस्या हाताळण्यास व सुखीसमाधानी होण्यास आपले साहाय्य करतात.
लहान मुलांच्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. यहोवाचे नियमशास्त्र अनुसरून एका छोटुकलीने तिची समस्या कशी सोडवली ते पाहा. तिचे नाव आहे ऑकमी; ती टोकियोजवळ राहते. तिच्या पालकांनी तिला प्रशिक्षण देतेवेळी बायबल तत्त्वांचे अनुकरण केले व आपल्या बोलण्याचालण्यातून आपल्या मुलीला यहोवा आणि शेजाऱ्यांबद्दल प्रीती विकसित करण्यास मदत केली. शाळेत तिला समस्यांना तोंड द्यावे लागेल हे जाणून त्यांनी होता होईल तितक्या चांगल्याप्रकारे तिला तयार केले. ऑकमी प्राथमिक शाळेत जाऊ लागली तेव्हा तिच्या काही वर्गमित्रांना ती “वेगळी” वाटली, कारण ती जेवणाआधी प्रार्थना करीत असे व विशिष्ट अशास्त्रवचनीय कार्यांत मुद्दामहून भाग घेत नसे. काही दिवसांतच ती, धाकदपटशाह करणाऱ्या एका गटाला बळी पडली, ते तिला शाळेनंतर बाजूला नेत, तिच्या थोबाडीत मारीत, तिचा हात मुरगळीत आणि तिची टर उडवीत.
लहानग्या ऑकमीने प्रतिकार केला नाही किंवा तिला त्रास देणाऱ्यांना ती घाबरली नाही. उलट, ती जे काही शिकली होती त्याचा अवलंब करण्याचा तिने प्रयत्न केला. तिच्या उत्तम वर्तनामुळे व धैर्यामुळे तिच्यासोबतचे विद्यार्थी तिचा आदर करू लागले. त्यांनी तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल शिक्षिकेला सांगितले आणि त्या दिवसापासून, ऑकमीला पुन्हा कधी शाळेत त्रास झाला नाही.
ऑकमीच्या समस्येला यशस्वीरीत्या हाताळण्यास कोणत्या गोष्टीने तिला साहाय्य केले? तिच्या पालकांनी तिच्यात बिंबवलेले यहोवाकडून येणारे अचूक ज्ञान, सूक्ष्मदृष्टी व बुद्धी. येशूनेही सहनशीलता दाखवल्याचे तिला चांगल्याप्रकारे माहीत होते व त्याचेच उदाहरण गिरवण्यास ती प्रवृत्त झाली. काही लोक अजाणतेत चुका करतात हे समजण्यास बायबलने तिची मदत केली शिवाय, छळ करणाऱ्या लोकांचा नव्हे तर त्यांच्यातील वाईट गुणांचा द्वेष करण्यास तिला बायबलने उत्तेजन दिले.—लूक २३:३४; रोमकर १२:९, १७-२१.
आपल्या मुलाची टर उडवली जावी किंवा त्याच्याबरोबर दुर्व्यवहार व्हावा असे कोणत्याही पालकांना वाटणार नाही. तरीसुद्धा, ऑकमीच्या बाबतीत घडलेल्या गोष्टी तिच्या पालकांनी सविस्तर ऐकल्या तेव्हा त्यांना तिचा केवढा अभिमान वाटला असावा याची तुम्ही कल्पना करू शकता. अशी मुले खरोखरच यहोवाकडून एक आशीर्वाद आहेत.—स्तोत्र १२७:३; १ पेत्र १:६, ७.
सहनशीलतेने यहोवावर थांबून राहणे
परंतु, कधीकधी यहोवाकडून आशीर्वाद मिळण्याआधी तुम्हाला त्याच्या नियुक्त समयापर्यंत थांबून राहावे लागते. यहोवा तुमची परिस्थिती जाणतो आणि तुम्हाला लाभ होऊ शकेल अशा उचित समयी तो आपली प्रत्येक गरज पूर्ण करील. (स्तोत्र १४५:१६; उपदेशक ३:१; याकोब १:१७) तुम्हाला कदाचित फळ खावयास आवडत असेल, पण ते खाण्यालायक होण्याआधीच जर का यजमानांनी ते तुम्हाला खावयास दिले तर तुम्हाला कसे वाटेल? सफरचंद, संत्र किंवा इतर कोणतेही फळ असो, पिकलेले, रसरशीत, मधूर फळ खायला तुम्हाला आवडेल. तसेच, उचित समयी आवश्यक असणारी गोष्ट यहोवा तुम्हाला पुरवतो—खूपच लवकर किंवा खूपच उशिराही नव्हे.
योसेफाचा अनुभव आठवा. त्याची काहीही चूक नसताना त्याला एका इजिप्शियन अंधार कोठडीत डांबण्यात आले. फारोचा प्यालेबरदार त्याच्याबरोबर तुरुंगात होता, त्याची सुटका होईल अशी त्याला आशा होती आणि सुटल्यावर तो फारोला योसेफाची सुटका करण्यास सांगेल असे त्याने वचन दिले. पण सुटल्यावर मात्र तो योसेफाला पूर्णपणे विसरून गेला. योसेफाला जणू काय त्यागल्यासारखे वाटत होते. परंतु, तब्बल दोन वर्षांनी, तुरुंगातून त्याची एकदाची सुटका झाली आणि कालांतराने त्याला इजिप्तचा दुसरा शासक म्हणून नेमण्यात आले. अधीर होण्याऐवजी योसेफ यहोवावर थांबून राहिला. यामुळे त्याला अशाप्रकारे आशीर्वादित करण्यात आले जेणेकरून इस्राएली आणि इजिप्शियन दोन्ही लोकांचे प्राण वाचले.—उत्पत्ति ३९:१–४१:५७.
मॉशॉशी उत्तर जपानमधील एका मंडळीत वडील या नात्याने कार्य करीत होते. ते काही अंधारकोठडीत नव्हते पण त्यांना यहोवावर थांबून राहावे लागले. कशासाठी? योग्यता प्राप्त ख्रिस्ती सेवकांना प्रशिक्षण देणारी शाळा म्हणजे सेवा प्रशिक्षण प्रशालेची जपानमध्ये स्थापना झाल्यापासून त्यांची त्या शाळेला उपस्थित राहण्याची तीव्र इच्छा होती. हा विशेषाधिकार आपल्याला मिळावा म्हणून त्यांनी खूप प्रार्थना केल्या. त्यांच्या पायनियर सोबत्याला आमंत्रण मिळाले, पण मॉशॉशी यांची उत्कट इच्छा असतानाही त्यांना आमंत्रण मिळाले नाही. त्यांची खूप निराशा झाली.
तरीसुद्धा, त्यांनी स्वतःला खूप आवरले. त्यांनी नम्र होण्यास व आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास साहाय्य होईल अशा विषयांवर बायबल आणि वॉच टावर संस्थेने प्रकाशित केलेल्या प्रकाशनांचा अभ्यास केला. त्यांनी आपली विचारसरणी बदलली व यामुळे ते आपल्या नेमणुकीत समाधानी राहिले. मग, त्यांच्या ध्यानीमनी नसताना त्यांना प्रशालेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण मिळाले.
सहनशीलता आणि नम्रता यासारखे गुण विकसित केल्यामुळे त्यांना प्रशालेचा जास्त लाभ झाला. नंतर, मॉशॉशी यांना आपल्या बांधवांची सेवा करण्याकरता प्रवासी पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्याचा विशेषाधिकार देण्यात आला. होय, मॉशॉशी यांना कशाची आवश्यकता होती हे यहोवाला माहीत होते व ते त्याने तेव्हाच पुरवले जेव्हा त्याचा जास्त फायदा होणार होता.
त्याचे आशीर्वाद मिळवा
तेव्हा, यहोवा त्या औषध विकणाऱ्या मनुष्यासारखा नाही. यहोवा आपल्याप्रती दाखवत असलेली काळजी, चिंता आपण समजू शकलो नाही तरी, पुष्कळदा आणि आपल्याला त्यांचा फायदा होईल अशा उचित वेळी व विविध मार्गांनी आपल्याला त्याची दया जाणवते. यास्तव, त्याचे आशीर्वाद मिळवत राहा. त्याचे आभार मानण्याकरता आपल्याजवळ आधीच भरपूर कारणे आहेत हे लक्षात असू द्या. पृथ्वीवर जिवंत राहण्याकरता तुम्हाला सर्व मूलभूत तरतुदी पुरवण्यात आल्या आहेत. तुम्हाला यहोवा आणि त्याच्या परिपूर्ण मार्गांचे ज्ञान देण्यात आले आहे. तुम्हाला सूक्ष्मदृष्टी देण्यात आली आहे. आणि तुम्ही समजबुद्धी प्राप्त केली आहे. यासर्व गोष्टी तुमच्या सौख्याला आणि कल्याणाला हातभार लावतात.
यहोवाच्या आशीर्वादाचा पूर्णपणे उपभोग घेण्याकरता बायबलचा नियमित अभ्यास जारी ठेवा. त्याच्या प्रेरित वचनांतील रत्नासमान शिकवणुकी समजण्यास आणि त्या लागू करण्यास मदत प्राप्त व्हावी म्हणून यहोवाला विनंती करा. त्यामुळे तुम्ही खरोखरच समृद्ध व्हाल, तुम्हाला कशाचीच कमी राहणार नाही. होय, तुम्हाला खऱ्या अर्थाने आत्ताच्या आणि येणाऱ्या नवीन जगातील समृद्ध जीवनात सौख्यानंद आणि समाधान मिळेल.—योहान १०:१०; १ तीमथ्य ४:८, ९.
[२३ पानांवरील चित्र]
यहोवाचा आशीर्वाद सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे